निकाल
(घोषित दि. 07.02.2017 व्दारा श्रीमती एम.एम.चितलांगे, सदस्य)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये दाखल केली.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे. तक्रारदार हा मौजे पारेगाव ता.जि.जालना येथील रहिवासी आहे व तो अल्पभूधारक शेतकरी आहे. तक्रारदार याने दि.26.03.2014 रोजी गैरअर्जदार क्र.1 कडून रक्कम रु.4,00,000/- किंमतीचे पॉवर ट्रॅक 425 खरेदी केले. त्याकरीता तक्रारदार याने गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडून रु.2,50,000/- चे कर्ज घेतले आहे. सदर ट्रॅक्टर तक्रारदाराचे ताब्यात आहे. सदर ट्रॅक्टर खरेदीबाबत तक्रारदार व गैरअर्जदार क्र. 2 आय.सी.आय.सी.आय.बॅंक यांच्यात करारनामा झालेला आहे. त्यानंतर तक्रारदाराने गैरअर्जदार नं. 1 यांना ट्रॅक्टरचे आर.सी.बुक, इंन्शुरंन्स बुक, ट्रॅक्टरची पावती, वॉरंटी कार्ड, ई. दस्तांची मागणी केली असता गैरअर्जदार क्र.1 यांने सदर दस्त तक्रारदाराला दिले नाहीत व ती गैरअज्रदार क्र.2 बॅंकेच्या ताब्यात असल्याबाबत सांगितले. तक्रारदार याचे म्हणण्याप्रमाणे त्याने ट्रॅक्टर कर्जाच्या परतफेडीकरीता पहिला हप्ता दि.20/10/2014 रोजी रु.44,340/- दुसरा हप्ता दि.23/4/2015 रोजी 25,000/- रु., दि. 25/4/2015 रोजी 17,000/- रु., दि. 27/4/2015 रोजी 2,300/- रु. असे एकुण 44,300/- रु. चे दाखल पावतीनुसार गैरअर्जदार क्र.2 बॅकेकडे भरले आहेत. तक्रारदाराने रु. 2,50,000/- पैकी एकुण 88,640/- ची फेड केली असल्याचे म्हणणे आहे. त्यानंतर तक्रारदाराने गैरअर्जदार क्र. 1 याना सदर ट्रॅक्टरचे पासिंग करुन मागितले व ट्रॅक्टरचे आर.सी.बुक, इंन्शुरंन्स बुक, ट्रॅक्टरची पावती, वॉरंटी कार्ड, ई. दस्तांची मागणी केली असता गैरअर्जदार क्र.1 यांने सदर दिली नाही. सदर कागदपत्र बॅकेतही जमा नाहीत अशी माहिती तक्रारदाराला मिळाली. या कारणाने तक्रारदार त्याचे ट्रॅक्टरचे रजिष्ट्रेशन आर.टी.ओ. कार्यालयात करु शकला नाही व त्याचा परिणाम तक्रारदाराच्या शेती व्यवसायावर झाला व तक्रारदारास नुकसान सहन करावे लागले. तक्रारदार याने त्याच्या विनंती कलमात गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेवर कारवाई करण्याची व ट्रॅक्टरचे आर.सी.बुक, इंन्शुरंन्स बुक, ट्रॅक्टरची पावती, वॉरंटी कार्ड, ई. दस्तांची पुर्तता करण्याची मागणी केली आहे. नुकसान भरपाई म्हणुन 1 लाख रुपये, मानसिक व शारीरीक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- तक्रार खर्च रक्कम रु. 25,000/-, ट्रॅक्टरचे उर्वरीत हप्ते भरण्यास एक वर्ष स्थगीती द्यावी, अशी मागणी केली आहे.
गैरअर्जदार हे मंचासमोर हजर झाले. त्यांनी आपले लेखी निवेदन नि.8 अन्वये दाखल केले. गैरअर्जदार यांचे कथनेनुसार तक्रारदाराने गैरअर्जदार क्र.1 कडून रक्कम रु.4,00,000/- चे पॉवर ट्रॅक 425 या कंपनीचे मिनी ट्रॅक्टर खरेदी केली. त्याकरता तक्रारदार याने गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून रक्कम रु.2,50,000/- चे कर्ज घेतले ही बाब मान्य केली आहे. तक्रारदार याने उर्वरीत रक्कम भरण्यास टाळाटाळ करण्याच्या उददेशाने सदर तक्रार दाखल केली. गैरअर्जदार यांनी तक्रारीतील उर्वरीत मजकूर स्पष्टपणे नाकारलेला आहे. ट्रॅक्टरची उर्वरीत रक्कम न भरल्यामुळे सदर ट्रॅक्टरच्या पासींगकरता तक्रारदार हा सर्वस्वी जबाबदार आहे. गैरअर्जदार क्र.1 यांचे कथन की, तक्रारदार याने दि.31.01.2014 रोजी ट्रॅक्टर खरेदी केले. सदर तक्रार तक्रारदार याने दि.08.03.2016 रोजी दाखल केली. त्यामुळे दाखल केलेली तक्रार तक्रारदार याने विहीत मुदतीत दाखल केली नाही. तक्रारदार याने उर्वरीत रक्कम रु.1,50,000/- जमा केली नसल्याकारणाने तक्रारदारास ट्रॅक्टर संबंधित कागदपत्रे दिली नाहीत. गैरअर्जदार क्र.1 याने तक्रारदार यांची कोणतीही फसवणूक केलेली नाही. तक्रारदार याने सदरील तक्रार ही चुकीच्या आधारे दाखल केली असल्यामुळे ती फेटाळण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार क्र.1 यांनी केली आहे.
गैरअर्जदार क्र.2 यांना नोटीसची बजावणी होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाही. त्यामुळे सदरील प्रकरण त्यांचे विरुध्द एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
तक्रारदार याने दाखल केलेली तक्रार व तक्रारीसोबतचे कागदपत्र, गैरअर्जदार क्र.1 यांचा लेखी जबाब व युक्तीवाद लक्षात घेतला. न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) गैरअर्जदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? नाही.
2) काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
कारणमीमांसा
मुददा क्र.1 ः तक्रारदार यांच्या वकीलांना ब-याच संधी देऊनही सदरील प्रकरणात त्यांनी युक्तीवाद केला नाही.
गैरअर्जदार क्र.1 यांच्या वकीलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार याने गैरअर्जदार क्र.1 कडून पॉवर ट्रॅक 425 या कंपनीचे ट्रॅक्टर रक्कम रु.4,00,000/- ला खरेदी केले आहे, त्याकरता तक्रारदार याने गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून कर्ज घेतले आहे. तक्रारदार याने सदरील कर्जाच्या परतफेडीकरता कर्जाचे पूर्ण हप्ते भरलेले नाहीत. तसेच सदरील ट्रॅक्टरच्या कर्जाची पुर्णतः परतफेड केलेली नाही. गैरअर्जदार क्र.1 यास तक्रारदाराकडून सदर ट्रॅक्टर बाबत येणे असलेली रक्कम रु.1,50,000/- ही तक्रारदाराने दिली नसल्याने सदरील ट्रॅक्टर संबंधित कागदपत्र तक्रारदारास देण्यात आलेले नाहीत. सदर ट्रॅक्टरच्या पासींगकरता तक्रारदार हा जबाबदार आहे. गैरअर्जदार याने सेवा देण्यात कोणतीही त्रुटी ठेवली नाही त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
आम्ही वर नमुद केलेला युक्तीवाद लक्षात घेतला. तक्रारदार याने तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले. यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारदार याने गैरअर्जदार क्र.1 कडून रक्कम रु.4,00,000/- किंमतीचे पॉवर ट्रॅक 425 या कंपनीचे मिनी ट्रॅक्टर खरेदी केले. सदर ट्रॅक्टर खरेदी करण्याकरता तक्रारदार याने गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून रक्कम रु.2,50,000/- चे कर्ज घेतले. तक्रारदार व गैरअर्जदार यांच्यामधील ग्राहक व सेवा पुरविणारे नाते उभयपक्षी मान्य आहे. त्यामुळे तक्रारदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे.
तक्रारदार याने दाखल केलेल्या पावत्यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार याने ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर सदर ट्रॅक्टरच्या कर्ज परतफेडीकरता दि.20.10.2014 रोजी रक्कम रु.44,340/-, दि.23.04.2015 रोजी रक्कम रु.25,000/-, दि.25.04.2015 रोजी रक्कम रु.17,000/- व दि.27.04.2015 रोजी रक्कम रु.02,300/-, चा भरणा गैरअर्जदार क्र.2 कडे केला. यावरुन असे दिसून येते की, तक्रारदार याने खरेदी केलेल्या ट्रॅक्टरच्या कर्जाची पुर्णतः परतफेड झाली नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांनी तक्रारीतील वादग्रस्त ट्रॅक्टर संबंधित कागदपत्रे तक्रारदारास दिली नाहीत. तक्रारदार याने खरेदी केलेल्या ट्रॅक्टरची उर्वरीत रक्कम रु.1,50,000/- हे तक्रारदारास देणे बाकी असल्याकारणाने व सदर रकमेचा तक्रारदार याने गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे भरणा न केल्यामुळे तक्रारदारास ट्रॅक्टरचे संबंधित कागदपत्र दिले नाही असे म्हटले आहे. तक्रारदार यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सदर प्रकरणातील रोजनाम्यांचे अवलोकन केले असता दि.20.06.2016 पासून ते आजपर्यंत सलग तक्रारदार व त्यांचे वकील गैरहजर आहेत. यावरुन असे दिसून येते की, तक्रारदारास सदरील प्रकरण चालविण्यात कोणतेही स्वारस्य नाही. तक्रारदार याने सदरील तक्रार प्रमाणिक उददेशाने मंचासमोर दाखल केली नसून तक्रारदार हा स्वच्छ हाताने मंचासमोर आलेला नाही. गैरअर्जदार याने तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली नाही.
वरील सर्व कारणावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारदार याने खरेदी केलेल्या ट्रॅक्टरच्या कर्जाच्या पुर्ण रकमेची परतफेड केली नाही. त्यामुळे गैरअर्जदार याने सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे असे म्हणता येणार नाही. सबब तक्रारदाराची तक्रार नामंजूर होणेस पात्र आहे. वरील
कारणास्तव मुद्दा क्र. 1 चे उत्तर नकारार्थी देऊन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार नामंजुर करण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाही.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. के.एन.तुंगार
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना.