::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 13.04.2017 )
आदरणीय अध्यक्षा श्रीमती एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार
1. तक्रारदार यांनी सदरहु तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये, विरुध्दपक्षाने द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला, म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्षाचा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ते यांचा लेखी युक्तीवाद व उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद, यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन, खालील प्रमाणे निर्णय पारीत केला.
उभय पक्षात या बद्दल वाद नाही की, तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्षाकडून दुरध्वनी जोडणी घेतली आहे, त्यामुळे तक्रारकर्ते विरुध्दपक्षाचे ग्राहक आहे, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
तक्रारकर्ते यांचा युक्तीवाद असा आहे की, विरुध्दपक्ष दुरध्वनी बील नियमित पाठवत नाही, या बद्दल विरुध्दपक्षाला नोटीस दिली असता, त्यांनी जुन 2016 मध्ये तक्रारकर्ते यांचा दुरध्वनी बंद केला व तक्रारकर्ते यांनी वकीलामार्फत नुकसान भरपाई मिळणे बाबतची नोटीस दिली असता, विरुध्दपक्षाने सदर दुरध्वनी दि. 3/5/2016 रोजी सुरु केला होता. तक्रारकर्ते यांनी बिल नियमितपणे भरलेले आहे. दुरध्वनी बंद असतांना देखील विरुध्दपक्षाने त्या काळातील म्हणजे दि. 1/6/2016 ते 30/6/2016 पर्यंतचे बिल पाठविले आहे. बिलात योग्य ती, बंद काळातील सुट दिलेली नाही, त्यामुळे ही विरुध्दपक्षाची सेवेतील त्रुटी ठरते. तक्रारकर्ते वकील असल्यामुळे, फोन बंद असलेल्या काळात पक्षकारांसोबत संपर्क साधणे कठीण झाले होते, म्हणून तक्रार प्रार्थनेसह मंजुर करावी.
यावर, विरुध्दपक्षाचा युक्तीवाद असा आहे की, तक्रारकर्ते यांनी दुरध्वनी बंद असल्याबद्दल विरुध्दपक्षाकडे रितसर तक्रारच केलेली नाही व जुन 2016 चे बिल भरलेले नाही. तक्रारकर्ते यांनी मंचाचा अंतरीम आदेश पारीत झाल्यावर, जुन 2016 चे बिल भरले. तक्रारकर्ते यांचा दुरध्वनी दि. 26/4/2016 ला केबल फॉल्ट असल्यामुळे बंद होता, विरुध्दपक्षाने प्रयत्न करुन, सदर दुरध्वनी फोन वकीलाचा असल्यामुळे कमी वेळातच दि. 3/5/2016 लाच सुरु करुन दिला. केबल फॉल्ट मुळे बंद असलेल्या टेलिफोन दुरुस्तीची प्रक्रिया ही किचकट असते. जुन 2016 मध्ये टेलिफोन सुरु होता हे जबाबासोबत दाखल केलेल्या, जुन 2016 मधील कॉलचे डिटेल्सवरुन लक्षात येते. तक्रारकर्ते यांचा दुरध्वनी दि. 26/4/2016 ते 3/5/2016 व दि. 24/8/2016 ते 28/8/2016 पर्यंत बंद होता व तोही केबल फॉल्टमुळे, म्हणून विरुध्दपक्षाने सदर टेलिफोन बंद काळातील योग्य व नियमात असणारे रिबेट / सुट रु. 389/- रकमेची दिली आहे, ती नंतरच्या बिलात कमी होवून येईल, म्हणून विरुध्दपक्षाची सेवा न्युनता सिध्द हेात नाही.
अशा प्रकारे उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मंचाचे असे मत आहे की, विरुध्दपक्षाने रेकॉर्डवर जुन 2016 मधील कॉल डिटेल्स दाखल केले आहे, त्यावरुन तक्रारकर्ते यांचा दुरध्वनी हा जुन 2016 मध्ये सुरु होता, असा निष्कर्ष निघतो. तक्रारकर्ते यांनी सदर तक्रारीसोबत तात्पुरता एकतर्फी आदेश मिळणेबाबत अर्ज दाखल केला होता, त्यावर दि. 10/8/2016 रोजी मंचाने थोडक्यात असा आदेश पारीत केला होता की, तक्रारकर्ते यांनी जुन 2016 चा भरणा करावा, त्यानंतर विरुध्दपक्षाने तात्काळ फोन सुरु करावा, तक्रारकर्ते यांनी पुढील देयके नियमित भरावी. त्यानुसार तकारकर्ते यांनी जुन 2016 चे बिल भरले आहे, मात्र विरुध्दपक्षाचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्ते यांचा दुरध्वनी हा दि.26/4/2016 ते 3/5/2016 व दि. 24/8/2016 ते 28/8/2016 पर्यंतच बंद होता व तोही केबल फॉल्टमुळे, परंतु हे दर्शविणारे कोणतेही दस्त ( केबल फॉल्टबद्दल ) विरुध्दपक्षाने रेकॉर्डवर दाखल केले नाही, या उलट तक्रारकर्ते यांनी असा युक्तीवाद केला की, विरुध्दपक्षाने दुरध्वनी दि. 3/5/2016 रोजी सुरु केला, परंतु या आधी सदर दुरध्वनी हा 40 ते 45 दिवसांपासून बंदच होता, मात्र विरुध्दपक्षाने जसे जुन 2016 चे कॉल डिटेल्स दाखल केले, तसे दि. 3/5/2016 च्या आधी ( दि. 15/3/2016 ते 3/5/2016 पर्यंतचे) कॉल डिटेल्स रेकॉर्डवर दाखल केले नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याच्या तक्रारीत तथ्य आढळते, तसेच विरुध्दपक्षाने ही बाब कबुल केली की, सदर टेलिफोन बंद काळातील योग्य व नियमात बसणारे रिबेट / सुट रक्कम रु. 389/- तक्रारकर्ते यांना दिली, ती नंतरच्या बिलात कमी होवून येईल, पंरतु हे नंतरचे बिल उभय पक्षाने रेकॉर्डवर दाखल केले नाही. त्यामुळे तक्रारकर्ते या टेलिफोन बंद काळातील रिबेट रक्कम रु. 389/- विरुध्दपक्षाकडून मिळण्यास देखील पात्र आहे. तक्रारकर्ते यांचा दुरध्वनी विरुध्दपक्षाने सुरु करुन दिलेला आहे, त्यामुळे तक्रारकर्ते यांच्या प्रार्थनेनुसार विरुध्दपक्षाने तक्रारकर्ते यांना रिबेट / सुट देवून बिल दुरुस्त करुन द्यावे व शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईसह प्रकरणाचा खर्च द्यावा, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
सबब अंतीम आदेश खालील प्रमाणे पारीत केला.
::: अं ति म आ दे श :::
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास दुरध्वनी बंद काळातील ( आदेशात नमुद केलेला कालावधी ) दुरध्वनी बिल नियमानुसार सुट देवून दुरुस्त करुन द्यावे, तसेच तक्रारकर्ते यांना शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई, प्रकरणाच्या न्यायिक खर्चासह रु. 4000/- ( रुपये चार हजार फक्त ) इतकी द्यावी.
- सदर आदेशाचे पालन, निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसात करावे.
सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना नि:शुल्क देण्यात याव्या.