घोषित द्वारा श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदारानी गैरअर्जदार क्रमांक 1 कडून गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या कंपनीचा एचसीएल कॉम्प्युटर दिनांक 2/5/2007 रोजी खरेदी केला. त्या कॉम्प्युटरचे वर्णन खालीलप्रमाणे आहे. Description of Goods/computer :- HCL EZEEBEE 4781 PDP 915 INTEL PENTIUM DUAL CORE 2.8 GHZ CPU 512 MB DDR/RAM/160 GB HDD DVD WRITER DRIVE/KEYBOARD OPTICAL MOUSE/17 CRT MONITORS HCL 3 YEARS WARRANTY S/N 3074 AZ 388201 कम्प्युटर खरेदी केल्यानंतर लगेचच दुस-या दिवशीच तक्रारदारास कॉम्प्युटर आपोआप टर्नऑफ आणि रिस्टार्ट होत असल्याचे दिसून आले. तक्रारदारास कम्प्युटरचे सेटींग व्यवस्थित झाले नसावे असे वाटले. हीच समस्या पुन्हा पुन्हा उदभवल्यानंतर त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांना सांगितली. त्यांच्या टेक्निशियनने तक्रारदाराच्या कॉम्प्युटरची तपासणी केली. परंतु त्यांना कॉम्प्युटरच्या समस्याचे निराकरण करता आले नाही म्हणून तक्रारदारानी यासंदर्भात कस्टमर कॉल कम सर्व्हिस रिपोर्ट दिला. त्यानंतर गैरअर्जदारांच्या टेक्निशियनने दिनांक 10/5/2007 रोजी येऊन कम्प्युटरची पाहणी केली व एसएमपीएस बदलून दिला. यामुळे कॉम्प्युटरच्या समस्या तात्पुरत्या सोडविल्या गेल्या. कांही महिन्यानंतर हीच समस्या पुन्हा उदभवली. म्हणून तक्रारदार गैरअर्जदार क्रमांक 1यांच्याकडे गेले असता त्यांनी तक्रारदारास गैरअर्जदार क्रमांक 4यांच्याकडे जाण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार गैरअर्जदार क्रमांक 4यांच्याकडे जाऊन समस्या सांगितल्या. दिनांक 12/12/2007 रोजी त्यांचा टेक्निशियन येऊन कॉस्मॉस बॅटरी बदलून दिली. तरीही रिस्टार्टची समस्या चालूच राहीली. त्यानंतर तक्रारदारानी दिनांक 15/12/2007, 4/1/2008, 14/1/2008, 7/2/2008, 28/3/2008, 26/6/2008, 18/8/2008, 13/9/2008, 12/11/2008, 24/11/2008, 27/12/2008, 2/2/2009, 1/7/2009, 1/8/2009 या तारखांना गैरअर्जदारांकडे त्यांच्या कम्प्युटरमधील समस्या बाबत तक्रार केली. गैरअर्जदारांनी अनेकवेळेस अनेक पार्टस बदलून दिले परंतु या 27 महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक पार्टस बदलूनही कम्प्युटरची समस्या सुटली नाही. तक्रारदारानी सदरील कम्प्युटर हा स्वत:च्या आणि त्यांच्या पत्नीच्या बीसीएम कोर्स करीत असल्यामुळे अभ्यासासाठी घेतला होता. परंतु कम्प्युटर सतत नादुरुस्त राहत असल्यामुळे कम्प्युटरचा त्यांना कांहीही उपयोग झाला नाही. म्हणून तक्रारदार गैरअर्जदाराकडून कम्प्युटरची किंमत रु 27,300/- 18 टक्के व्याजदराने आणि 40,000/- रुपये मानसिक व शारीरिक त्रासापोटी आणि रु 5000/- तक्रारीच्या खर्चापोटी मागतात. तक्रारदारानी त्यांच्या तक्रारीसोबत शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश मंचाने पारीत केला आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 ते 4 यांनी लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारास प्रत्येक वेळेस त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे आणि पार्टस सुध्दा बदलून दिलेले आहेत. तक्रारदारानी त्यांच्या कम्प्युटरमधील समस्या गैरअर्जदारांकडे जेंव्हा जेंव्हा आणल्या तेंव्हा तेंव्हा त्यांनी त्या सोडविल्या आहेत. सदरील कम्प्युटरमधील समस्या हया कम्प्युटर दुरुस्त करण्यासारख्याच होत्या. तक्रारदाराची कम्प्युटर बदलून देण्याची मागणी ही योग्य नाही. अनेकवेळा कम्प्युटरमधील समस्या हया अर्थींग व्यवस्थित नसल्यामुळे, पावर सप्लायमुळे, सॉप्टवेअर व्यवस्थीत वापरले नसल्यामुळे, व्हायरसमुळे येऊ शकतात. त्यामुळे तक्रारदाराची कम्प्युटर बदलून देण्याची मागणी योग्य नाही. गैरअर्जरदारानी तक्रारदारास अनेक वेळा व्यवस्थित सेवा दिलेली असल्यामुळे त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी ते करतात. गैरअर्जदारानी वॉरंटीच्या अटी व शर्ती दाखल केल्या आहेत. दोन्हीही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारानी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडून एचसीएल कंपनीचा कम्प्युटर दिनांक 2/5/2007 रोजी खरेदी केला. त्यानंतर दिनांक 8/5/2007 पासून दिनांक 10/2/2009 पर्यंत तक्रारदाराच्या कम्प्युटरमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्यावर गैरअर्जदारानी पार्टस बदलून त्या समस्या दूर केल्याचे जॉबशीटवरुन दिसून येते. प्रत्येक वेळेस वेगळी समस्या असल्याचे जॉबशिटवरुन दिसून येते. तसेच कम्प्युटर दुरुस्तीनंतर, कम्प्युटरच्या समस्या दूर केल्यानंतर तक्रारदार समाधानी नव्हते हे कस्टमर फिडबॅकच्या रकान्यात नमूद केल्यावरुन दिसून येते. तक्रारदाराने एचसीएल हया कंपनीचे ब्रँड पाहून कम्प्युटर खरेदी केला होता. परंतु कम्प्युटर घेतल्याच्या दुस-या दिवशीपासूनच कम्प्युटरमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्याचे दिसून येते. त्या समस्या गैरअर्जदारानी वेळावेळी दूर करुनही तक्रारदाराचे समाधान झाल्याबाबत दिसून येत नाही. गैरअर्जदारांनी सुध्दा कम्प्युटरमध्ये कुठल्या समस्या निर्माण झाल्या होत्या व त्याचे निराकरण कशाप्रकारे केले हे पुराव्यानिशी सिध्द केले नाही. गैरअर्जदारांचे असे म्हणणे आहे की, कधी कधी फॉल्टी पावर सप्लायमुळे तसेच फॉल्टी अर्थींगमुळे सुध्दा अशा समस्या निर्माण होतात. परंतु त्यांनी कुठल्याही शॉबशिटवर अर्थिंगची समस्या होती असे लिहून दिलेले नाही. केवळ जर आणि तर अशा उत्तराने तक्रारदाराच्या कम्प्युटरमध्ये कुठलीही समस्या निर्माण झाली होती हे सिध्द होत नाही. कम्प्युटर घेतल्यापासूनच त्यामध्ये दोष होता हे जॉबशिटवरुन सुध्दा सिध्द होते. म्हणून मंच गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांना असा आदेश देतो की, त्यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारास कम्प्युटरची रक्कम रु 27,300/- दिनांक 2/5/2007 पासून 9 टक्के व्याज दराने द्यावेत तसेच या सर्व प्रकारामुळे तक्रारदारास व त्यांच्या कुटूंबीयास मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला असल्यामुळे रु 3000/- आणि तक्रारीचा खर्च रु 1,000/- द्यावा. वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे. 2. गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकपणे तक्रारदारास रक्कम रु 27,300/- दिनांक 2/5/2007 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदराने तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु 3000/- व तक्रारीचा खर्च रु 1000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून 6 आठवडयाच्या आत द्यावेत. (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |