निकालपत्र (दि.08/07/2014) व्दाराः- मा. सदस्य – श्री दिनेश एस.गवळी
1 प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारांना खरेदीपत्र पुर्ण करुन न देऊन सेवेत त्रुटी ठेवल्याने नुकसानभरपाई व खरेदीपत्र पुर्ण करुन मिळणेकरीता दाखल केली आहे.
2 प्रस्तुत तक्रार अर्ज स्विकृत करुन सामनेवाले यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाले यांचेवरती काढलेली नोटीस नॉट क्लेमड् या शे-यानिशी परत आली. सबब, सामनेवाले क्र.1 व 2 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. तक्रारदारांचे वकीलांनी तोंडी युक्तीवाद केला. तक्रारदारांचा तक्रार अर्ज, दाखल कागदपत्रे यांचा विचार करीता, प्रस्तुत कामी गुणदोषावरती निकाल पारीत करणेत येतो.
तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की–
3 मिळकतीचे वर्णन:-
जिल्हा व तुकडी कोल्हापूर, पोट तुकडी तहसिल करवीर, कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील, बी वॉर्ड, मंगळवार पेठ येथील रि.स.नं.2304 या मिळकतीवर बांधणेत आलेल्या “सप्रेम अपार्टमेंट” या नावाने बांधलेल्या निवासी व्यापारी संकुलामधील पहिल्या मजल्यावरील रहिवासी सदनिका नंबर एफ-2 क्षेत्र-61.15 चौ.मी. (सुपर बिल्टअपसह) ही फ्लॅट मिळकत यांसी चतु:सिमा:-
पूर्वेस - सि.स.नं.2305 ची मिळकत
पश्चिमेस - सि.स.नं.2303 ची मिळकत
दक्षिणेस - सदर अपार्टमेंटमधील फ्लॅट नं.एफ-1
उत्तरेस - सार्वजनिक रस्ता
4 उक्त कलम-3 मध्ये नमुद केलेली सि.स.नं.2304, ही मिळकत मुळ अभिजीत वसंत साखरे, श्री.राजेंद्र मारुती साखरे व श्रीमती सुलभा मारुती नाकील यांचे मालकीची असून त्यांनी असून त्यांनी सदर मिळकत दि.29.01.2004 रोजीच्या नोंदणीकृत रजि.दस्त क्र.546/2004 या रजिस्टर विकसनपत्राने यातील सामनेवाले क्र.2-महेश बाबुराव जाधव यांना विकसनाकरीता दिलेली असून दि.29.01.2004 रोजी महेश बाबुराव जाधव यांचे नावे कधीही रद्द न होणारे वटमुखत्यारपत्र लिहून दिलेले आहे. सदरहू मिळकत सामनेवाले यांनी विकसीत करुन त्या ठिकाणी सप्रेम अपार्टमेंट या नावाने तीन मजली इमारत बांधलेली आहे. सदर इमारतीमध्ये कलम-3 मध्ये नमुद फ्लॅट सामनेवाले यांनी तक्रारदारांना दि.27.05.2005 रोजीच्या रजि.दस्त.नं.1822/2005 या करारपत्रान्वये रक्कम रु.5,50,000/- खरेदी देणेचे मान्य व कबुल करुन त्याप्रमाणे तक्रारदारांचेकडून सदर खरेदीचे मोबदल्याची संपूर्ण रक्कम करारात ठरलेल्या अटी व शर्तीनुसार स्विकारुन फ्लॅटचा प्रत्यक्ष खुला कब्जा सामनेवाले यांनी तक्रारदारांना दिलेला आहे. करारातील अटीनुसार जी काही पुर्तता करावयाची होती ती पूर्तता करुन तक्रारदार हे ठरलेप्रमाणे सदर फ्लॅटचे नोंदणीकृत खरेदीपत्र करुन घेणेस केव्हाही तयार होते व आहेत. सदर फ्लॅटचे खरेदीपत्र पूर्ण करुन देणेबाबत तक्रारदारांना सामनेवाले यांचेकडे वेळोवेळी विनंती केली असता, सदर फ्लॅटचे नोंदणीकृत खरेदीपत्र सामनेवाले यांनी जाणूनबुजून व हेतुपुरस्पर तक्रारदारांचे नांवे करुन देण्याचे टाळाटाळ, निष्काळजीपणा केला, म्हणून सदरचे फ्लॅटचे नोंदणीकृत खरेदीपत्र पूर्ण करुन दयावे असा आदेश होऊन मिळणेसाठी तक्रारदारांना सामनेवाले यांचे विरुध्द प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल केला आहे. उक्त कलम-3 मधील वर्णन केलेल्या सदर फ्लॅटचे नेांदणीकृत खरेदीपत्र, तक्रारदारांचे नावे पूर्ण करुन दयावे असा आदेश करण्यात यावा. तसेच खरेदीपत्र पूर्ण करुन न दिलेस कोर्ट कमिशन मार्फत पूर्ण करुन न दिलेस कोर्ट कमिशनर मार्फत सदर खरेदीपत्र मार्फत सदर खरेदीपत्र पूर्ण होऊन मिळावी. तसेच तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व अर्जाचा खर्च, रु.10,000/- वसुल होऊन मिळावी ही विनंती केली आहे.
5 तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत निशाणी-3 कडे यादीने अ.क्र.1 कडे रजि.दस्त नं.1822/2005 चा इंडेक्स उतारा, अ.क्र.2 कडे 1822/2005 चे करारपत्र, अ.क्र.3 कडे अर्जदार यांनी सामनेवाले यांना वकीलामार्फत पाठविलेली नोटीस दि.27.02.2012, अ.क्र.4 कडे नोटीसीचा परत आलेला लखोटा, अ.क्र.5 चे नोटीसीचा परत आलेला लखोटा, इत्यादी कागदपत्राचे झेरॉक्स प्रती, दाखल केल्या आहेत.
6 तक्रारदारांची तक्रार, तक्रारीसोबत दाखल कागदपत्रे व युक्तीवादाचा विचार करीता, पुढील मुद्दे निष्कर्षाप्रत उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय, |
2 | तक्रारदार हे सामनेवालांकडून मानसिक, शारिरीक त्रासापोटी रक्क्म मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय |
3 | आदेश काय ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
कारणमिमांसा:-
मुद्दा क्र.1:- प्रस्तुतची तक्रार यातील तक्रारदारांनी सामनेवाले यांचे विरुध्द तक्रार अर्जात कलम-1 मध्ये नमुद मिळकतीचे वर्णन केलेल्या सप्रेम अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील रहिवासी सदनिका क्र.एफ-2 क्षेत्र 61.15 चौ.मी.चे खरेदीपत्र तक्रारदारांचे नावे पूर्ण करुन दयावे, याकरीता या मंचात दाखल केली आहे. प्रस्तुत कामी तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत अ.क्र.2 कडे सदर पलॅटचे दि.27.05.2005 चे करारपत्र (Sale of Agreement) दाखल केलेले आहे. सदरच्या करारपत्राचे या मंचाने बारकाईने अवलोकन केले असता, सदरचे करारपत्र तक्रारदार व सामनेवाले यांच्या दरम्यान वर नमूद प्लॅट नं.एफ-2 यांचेबाबत झालेचे दिसुन येते. सदर करारपत्रावरती तक्रारदार व सामनेवाले –श्री.महेश बाबुराव जाधव यांचे प्रमोटर, बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स् म्हणून सहया आहेत. सदर करारपत्राचे कलम-4 मध्ये वर नमुद प्लॅटचे खरेदीची किंमतीचा तपशील नमुद केला असुन सदर तपशीलाप्रमाणे तक्रारदाराने सामनेवाले यांना एकूण रक्कम रु.5,50,000/- देणेचे ठरले आहे. तक्रारदारांनी या कामी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले असुन त्यामध्ये त्यांनी सामनेवाले यांनी प्लॅटची संपूर्ण रक्कम रु.5,50,000/- दिल्याचे नमुद केले असुन त्यामध्ये तक्रारदारांना सामनेवाले यांनी प्लॅटचा प्रत्यक्ष ताबा दि.27.05.2005 रोजी दिला आहे असे नमुद केले आहे.
प्रस्तुत कामी तक्रारदारांनी सामनेवाले यांना वकीलामार्फत नोटीसा पाठविलेचे दि.27.02.2012 ची ऑफीस प्रतची झेरॉक्स दाखल केली असून सदर नोटीस पाहीली असता, त्यामध्ये त्यांनी वर नमुद प्लॅटचे खरेदीपत्र पूर्ण करुन मागितले आहे. सदरची नोटीस सामनेवाले यांना पाठविली असता ती नॉट क्लेम्ड चे शे-यानिशी परत आल्याचे लखोटाचे झेरॉक्स प्रत दाखल केली आहे. तसेच प्रस्तुत कामी या मंचात तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर सामनेवाले यांना नोटीसी काढली असता, ती देखील नॉट क्लेम्ड म्हणून परत आलेली आहे. यांचा विचार करीता, सामनेवाले यांना संधी असूनदेखील ते या कामी हजर झालेले नाहीत. सबब, वरील सर्व बाबींचा विचार करीता, सामनेवाले यांनी तक्रार अर्जात नमुद प्लॅटची संपूर्ण रक्कम घेऊन देखील तक्रारदारांना प्लॅटचे खरेदीपत्र करुन न देऊन तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2:- वर नमुद 1 मधील विवेचनाचा विचार करीता, सामनेवाले यांनी तक्रारदारांना खरेदीपत्र पुर्ण करुन न दिल्याने सेवेत त्रुटी ठेवली आहे. सबब, त्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास झाला व प्रस्तुतची तक्रार दाखल करावी लागली. सबब, तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रार अर्ज खर्च रक्कम रु.2,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.3:- प्रस्तुत कामातील तक्रारदारांनी दाखल केलेले दि.27.05.2005 चे करारपत्र (Sale of Agreement) त्याचप्रमाणे सदर करारपत्रामध्ये नमुद केलेल्या अटी व शर्ती यांचे या मंचाने बारकाईने अवलोकन केले असता, त्यामध्ये development Agreement 546/2004 व वटमुख्त्यारपत्राचा उल्लेख असून त्यामध्ये सामनेवाले यांना मुळ जमीन मालक यांनी दिलेल्या पॉवर ऑफ अॅर्टोनी (वटमुख्त्यारपत्राने) प्रस्तुत कामातील वर नमूद प्लॅट विक्री, ट्रान्सफर करणेचे अधिकार दिल्याचे स्पष्ट होते. तसेच सदरचे कारापत्र हे महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप अॅक्ट, (मोफा) 1970 आणि महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप रुल्स, 1972 चे तरतुदीप्रमाणे केल्याचे नमुद आहे.
सबब, या सर्व बाबींचा विचार करीता, सामनेवाले यांनी प्रस्तुत तक्रार अर्जात नमुद सप्रेम अपार्टमेंट मधील पहिल्या मजल्यावरती रहिवासी सदनिका नंबर एफ-2 क्षेत्र-61.15 चौ.मी. (सुपर बिल्टअपसह) चे नोंदणीकृत खरेदीपत्र तक्रारदारांचे नांवे करुन दयावे या निष्कर्षाप्रत हे मंच आहे. सबब, मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- सामनेवाले यांनी तक्रार अर्जात नमुद मिळकतीचे वर्णनमधील “सप्रेम अपार्टमेंट” या नावाने बांधलेल्या निवासी व्यापारी संकुलामधील पहिल्या मजल्यावरील रहिवासी सदनिका नंबर एफ-2 क्षेत्र-61.15 चौ.मी. (सुपर बिल्टअपसह) चे नोंदणीकृत खरेदीपत्र पूर्ण करुन दयावे.
- यातील सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/-(रु.पाच हजार फक्त) व तक्रार अर्जाचा खर्च रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) अदा करावेत.
- वरील आदेशाची पूर्तता सामनेवाले यांनी सदर आदेशाच्या तारखेपासून सहा आठवडयांचे आत करणेचे आहे.
- आदेशाच्या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.