(पारीत व्दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य)
(पारीत दिनांक– 27 नोव्हेंबर, 2019)
01. तक्रारकर्ता यांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचे विरुध्द अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब व दोषपूर्ण सेवा या बाबत ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता यांनी, विरुध्दपक्ष क्रं 2 रिषभ फायनान्स लिमिटेड यांचे कडून कर्ज काढून, विरुध्दपक्ष क्रं 1 अभिजीत मोटर्स साकोली यांचे कडून दुचाकी वाहन बजाज प्लॅटीना रंग निळा 125 सी.सी. वाहन क्रं –एम.एच.-36/ई-8227 खरेदी केले. सदर वाहन खरेदी करीता विरुध्दपक्ष क्रं 2 यांचे कडून कर्ज घेतले होते व वाहन विकत घेताना तक्रारकर्त्याने नगदी स्वरुपात रुपये-20,000/- डाऊन पेमेंट विरुध्दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता यांना दिले. तसेच कर्जाच्या परतफेडीच्या रकमेपोटी प्रतीमाह रुपये-1625/- प्रमाणे एकूण 23 किस्ती पाडण्यात आलेल्या होत्या, त्यानुसार तक्रारकर्ता यांनी मासिक किस्तीव्दारे एकूण रुपये-37,375/- जमा केलेत. अशाप्रकारे तक्रारकर्ता यांनी वि.प.क्रं 2 यांना देणे असलेली कर्जाची संपूर्ण रक्कम अदा केलेली आहे.
तक्रारकर्ता यांनी पुढे असे नमुद केले की, दिनांक-16.09.2014 रोजी ते खाजगी कामा करीता मौजा सडक अर्जुनी येथे गेले असता तेथे विरुध्दपक्ष क्रं 2 चे प्रतिनिधी तक्रारकर्ता यांचेशी भेटले व म्हणाले की, तुम्ही वाहनाच्या संपूर्ण किस्ती भरलेल्या नाहीत त्यामुळे आम्हाला सदरचे वाहन ताब्यात घ्यावयाचे आहे. तक्रारकर्ता यांनी त्यास विनंती करुन किस्ती भरल्या बाबतच्या पावत्या दाखविल्यात परंतु त्यालाही न जुमानता वि.प.क्रं 2 चे प्रतिनिधी यांनी तक्रारकर्ता यांचे वाहन हिसकावून घेतले व त्यांना धमकी दिली की, जा तुझ्याने बनेल ते करुन घ्या.
तक्रारकर्ता यांनी पुढे असे नमुद केले की, ते एल.आय.सी.एजंट असल्यामुळे त्यांना ठिक-ठिकाणी जाण्या करीता दुचाकी वाहनाची अत्यंत गरज असते व त्यांचे कुटूंब हे त्यांचेवरच अवलंबून आहे. अशा परिस्थिती मध्ये विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी तक्रारकर्ता यांचे वाहन दमदाठी करुन स्वतःकडे ठेऊन घेतले. सदरची विरुध्दपक्ष क्रं 2 यांची कृती अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब व सेवेत त्रृटी देणारी आहे. त्यामुळे तक्रारदार यांना मोठया प्रमाणावर शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला व त्यांना व्यवसाया निमित्य ठिकठिकाणी भेटी देणे वाहना अभावी शक्य होऊ शकले नाही करीता तक्रारकर्ता यांचे आर्थिक प्रतीमाह रुपये-1,50,000/- चे नुकसान झाले.
तक्रारकर्ता यांनी पुढे असे नमुद केले की, सदर बाबी संबधाने त्यांनी दिनांक-12.03.2015 रोजी वकीलांचे मार्फतीने विरुध्दपक्षांना कायदेशीर नोटीस पाठविली परंतु त्या बाबत विरुध्दपक्षां कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन विरुध्दपक्ष यांचे विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
(01) विरुध्दपक्षांना आदेशित करण्यात यावे की, तक्रारकर्ता यांचे जप्त केलेल्या वाहनामुळे झालेले नुकसान प्रतीमाह रुपये-1,50,000/- प्रमाणे तक्रारकर्ता यांना द्यावे.
(02) तक्रारकर्ता यांचे जप्त केलेले वाहन क्रं एम.एच.-36/ई-8227 व त्या सोबत सदर वाहनाचे दसतऐवज तसेच तक्रारकर्ता यांनी कर्ज परतफेडीपोटी विरुध्दपक्ष क्रं 2 यांचे कडे जमा केलेले कोरे धनादेश तक्रारकर्ता यांना परत करण्याचे आदेशित व्हावे.
(03) तक्रारकर्ता यांना प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-5000/- विरुध्दपक्षां कडून मिळावा.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता यांनी पान क्रं 31 ते 34 वर लेखी उत्तर दाखल केले. त्यांनी आपले लेखी उत्तरात असे नमुद केले की, तक्रारकर्ता यांनी दुचाकी वाहन विकत घेण्या करीता त्यांचे कडे दिनांक-24.03.2009 रोजी प्रथम रुपये-5000/- व नंतर दिनांक-01.09.2009 रोजी रुपये-10,000/- असे मिळून एकूण रुपये-15,000/- नगदी स्वरुपात दिले. जेंव्हा वाहनाची डाऊन पेमेंट रक्कम ही रुपये-16,466/- एवढी होती व फॉयनान्स चॉर्जेस रुपये-2100/- असे एकूण रुपये-18,566/- तक्रारकर्ता यांना देणे होते. परंतु तक्रारकर्ता यांनी वाहन विकत घेताना फक्त रुपये-15,000/- डाऊन पेमेंटपोटी दिले व आजही रुपये-3,566/- तक्रारकर्ता यांचे कडून घेणे बाकी आहे. तसेच ही रक्कम घेणे असून सुध्दा तक्रारकर्ता यांनी बळजबरीने दुचाकी वाहनाचे पासिंग करुन घेतले व सदरची रक्कम देण्यासाठी नेहमीच टाळाटाळ केली. बरेच वेळा उर्वरीत रक्कम देण्या बाबत तक्रारकर्ता यांचे जवळ विचारणा केली असता ते शिवीगाळ करीत होते व तुमच्या विरुध्द खोटी तक्रार दाखल करेल अशी खोटी धमकी देत होते.
विरुध्दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता यांनी पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्ता यांचे वादाशी त्यांचा काहीही संबध येत नाही. ग्राहक मंचाने तक्रारकर्ता यांना आदेशित करावे की, तक्रारकर्ता यांना विरुध्दपक्ष क्रं 1 यांना उर्वरीत देणे असलेली रक्कम 3 टक्के व्याजासह येणारी रक्कम द्यावी.
04. विरुध्दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणारी कंपनी यांनी पान क्रं 26 ते 30 वर लेखी उत्तर ग्राहक मंचा समक्ष दाखल केले आणि असे नमुद केले की, तक्रारकर्ता यांनी दुचाकी वाहन क्रं-एम.एच.-36/ई-8227 विरुध्दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता यांचे कडून खरेदी केले होते व त्या करीता विरुध्दपक्ष क्रं 2 कंपनी कडून रुपये-30,000/- एवढया रकमेचे कर्ज घेतले होते. सदरचे कर्जाची परतफेड करारा प्रमाणे प्रतीमाह रुपये-1625/- प्रमाणे एकूण 24 मासिक किसती मध्ये करावयाचे होते. परंतु तक्रारकर्ता हे कर्ज परतफेडीच्या किसती विहित मुदतीत भरत नसल्याने दंड (Penalty) भरत होते. या बाबत तक्रारकर्ता यांना अनेक वेळा सुचना देण्यात येत होत्या व मासिक किस्तीच्या रकमा वेळेवर न मिळाल्यामुळे दुरध्वनीव्दारे क्रित्येक वेळा सुचना दिल्या जात होत्या.
पुढे विरुध्दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणारी कंपनी तर्फे असे नमुद करण्यात आले की, तक्रारकर्ता यांनी आपल्या तक्रारीत असे नमुद केले की, दिनांक-16.09.2014 रोजी मौजा सडकअर्जुनी येथून तक्रारकर्ता यांचे वाहन विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी बळजबरीने हिसकावून घेतले व त्यांना धमकी दिली की, तुमच्याने जे होते ते करुन घ्यावे ही बाब पूर्णपणे खोटी आहे. तक्रारकर्ता यांचे वाहन विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी जप्त केलेले नाही किंवा बळजबरीने हिसकावून नेलेले नाही अशी कोणतीही घटना घडलेली नाही. तसेच तक्रारकर्ता यांनी या बाबत पोलीस स्टेशन मध्ये तक्रार सुध्दा नोंदविली नाही. तक्रारकर्ता हे विनाकारण विरुध्दपक्ष क्रं 2 यांचेवर खोटे आरोप करीत आहेत तसेच विरुध्दपक्ष क्रं 2 यांची प्रतिष्ठा मलीन करण्यासाठी प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल केलेली आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी तक्रारकर्ता यांचे सोबत कोणताही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब अथवा सेवेत त्रृटी दिलेली नाही. या उलट तक्रारकर्ता यांनी स्वतः कर्ज परतफेडीच्या किस्ती भरलेल्या नाहीत. करीता तक्रारकर्ता यांची सदरची खोटी तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
05. तक्रारकर्ता यांनी पान क्रं 11 वरील यादी नुसार अक्रं 1 ते 18 प्रमाणे दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये प्रामुख्याने भंडारा अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक भंडारा येथे वेळोवेळी भरलेल्या मासिक किस्तीच्या पावत्या, वाहनाचे माहितीचा दस्तऐवज, अशा दस्तऐवजाचे प्रतींचा समावेश आहे.
06. विरुध्दपक्ष क्रं 2 कर्ज पुरवठा करणारी कंपनी यांनी पान क्रं 37 वरील यादी नुसार अक्रं 1 व 2 वर दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, त्यामध्ये प्रामुख्याने कर्ज कराराची प्रत व तक्रारकर्ता यांचे कर्ज खात्याचा उता-याचा समावेश आहे.
07. तक्रारकर्ता यांची तक्रार तसेच वि.प.क्रं 1 व 2 यांचे लेखी उत्तर आणि प्रकरणातील लेखी दस्तऐवज व लेखी युक्तीवाद यावरुन ग्राहक मंचा समोर खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
(1) | त.क. हे विरुध्दपक्षांचे ग्राहक होतात काय? | होय. |
(2) | वि.प.यांनी त.क. यांचे सोबत अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब व दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | नाही. |
(3) | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
:: कारण मिमांसा ::
मुद्दा क्रं-1 बाबत-
08. सदर तक्रारीत तक्रारकर्ता यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता ही बाब सिध्द होते की, तक्रारकर्ता यांनी वाहन क्रं-एम.एच.-36/ई-8227 हे दुचाकी वाहन विरुध्दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता यांचे कडून, विरुध्दपक्ष क्रं 2 यांचे कडून कर्ज घेऊन विकत घेतलेले आहे ही बाब तक्रारकर्ता यांनी स्वतः तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तऐवज क्रं 16 वाहन माहितीचा दस्तऐवजा यावरुन दिसून येते, त्यामुळे तक्रारकर्ता हे विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचे ग्राहक आहेत ही बाब स्पष्ट होते, करीता मुद्या क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
मुद्दा क्रं-2 व 3 बाबत-
09. तक्रारकर्ता यांनी आपल्या तक्रारीत असे नमुद केले आहे की, विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी तक्रारकर्ता यांचे दुचाकी वाहन दिनांक-16.09.2014 रोजी मौजा सडकअर्जुनी येथून बळजबरीने जप्त केले परंतु असे वाहन बळजबरीने जप्त केल्या बाबतचा कोणताही पुरावा तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर दाखल केलेला नाही. तसेच विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी आपल्या लेखी उत्तरात ही बाब स्पष्ट केली आहे की, त्यांनी तक्रारकर्ता यांचे दुचाकी वाहन जप्त केलेले नाही तसेच ही घटना घडली तेंव्हा तक्रारकर्ता यांनी सदर घटने बाबत कोणतीही पोलीस तक्रार केलेली नाही. अशी घटना घडली असती तर तक्रारकर्ता यांनी पोलीस तक्रार नककीच केली असती.
10. ग्राहक मंचाचे मते, विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी त्यांचे लेखी उत्तरात तक्रारकर्ता यांचे विरुध्द केलेले आरोप खोडून काढण्यासाठी तक्रारकर्ता यांनी स्वतःचे पुराव्याचे शपथपत्र ग्राहक मंचा समोर दाखल केलेले नाही, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी त्यांचे लेखी उत्तरात त्यांनी तक्रारकर्ता यांचे वाहनच जप्त केलेले नाही या विधानास बळकटी प्राप्त होते. तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 वाहन विक्रेता यांनी आपल्या लेखी उत्तरात असे नमुद केले की, वाहनाची डाऊन पेमेंटची उर्वरीत राहिलेली रक्कम सुध्दा तक्रारकर्ता यांनी आज पर्यंत विरुध्दपक्ष क्रं 1 यांचे कडे जमा केलेली नाही, उर्वरीत रकमेची मागणी केली असता तक्रारकर्ता हे विरुध्दपक्ष क्रं 1 यांचे विरुध्द पोलीस मध्ये तक्रार करेल अशी खोटी धमकी देत होते.
11. सदर तक्रारीमध्ये तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचे विरुध्द कायदेशीर नोटीस पाठविल्याचे नमुद केले आहे परंतु सदर कायदेशीर नोटीसची प्रत सुध्दा अभिलेखावर दाखल केलेली नाही. तसेच सदर प्रकरण हे मौखीक युक्तीवादासाठी नेमलेले असताना तक्रारकर्ता हे ग्राहक मंचा समोर सतत अनुपस्थित असल्याचे कारणास्तव ग्राहक मंचाने दिनांक-01.01.2019 रोजी नोटीस बजावून दिनांक-18.01.2019 रोजी मौखीक युक्तीवादा करीता ग्राहक मंचा समोर उपस्थित राहावे अशी लेखी सुचना तक्रारकर्ता यांना दिली होती तरी सुध्दा तक्रारकर्ता हे ग्राहक मंचा समक्ष मौखीक युक्तीवादाचे वेळी उपस्थित झाले नाहीत, तक्रारकर्ता यांचे अनुपस्थिती अभावी तक्रारीतील विविदास्पद मुद्यांवर योग्य तो खुलासा झालेला नाही.
12. तक्रारीचे एकंदरीत स्वरुप पाहता व तक्रारकर्ता यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता ग्राहक मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्ता यांचे विरुध्दपक्षांचे विरुध्द केलेल्या तक्रारीत योग्य त्या सक्षम पुराव्या अभावी कोणतेही तथ्य दिसून येत नाही, करीता तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे ग्राहक मंचाचे स्पष्ट मत आहे. मूळ ग्राहक तक्रार निकाली निघालेली असल्यामुळे तक्रारकर्ता यांनी तक्रारी सोबत अंतरिम आदेश मिळण्यासाठी केलेला अर्ज क्रं-एम.ए.-15/5 हा आपोआप निकाली निघतो.
13. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
:: अंतिम आदेश ::
- तक्रारकर्ता यांची, विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं-2 यांचे विरुध्दची तक्रार योग्य त्या पुराव्या अभावी खारीज करण्यात येते.
- खर्चा बद्यल कोणतेही आदेश नाहीत.
- मूळ ग्राहक तक्रार निकाली निघालेली असल्यामुळे तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रारी सोबत अंतरिम आदेश मिळण्यासाठी दाखल केलेले किरकोळ प्रकरण क्रं-एम.ए.-15/5 हे आपोआप निकाली निघते.
- निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- तक्रारकर्ता यांना तक्रारी सोबत दाखल केलेल्या “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.