(मंचाचे निर्णयान्वये, श्री. सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य)
तक्रारकर्तीने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असुन तक्रारीचा आशय थोडक्यात खालिल प्रमाणे..
1. तक्रारकर्ती ही राह. रामनगर, गडचिरोली येथील रहीवासी असुन तिने विरुध्द पक्षाचे दुकानातून दि.07.05.2018 रोजी Sansui Company चा 32 इंच टिव्ही रु.15,800/- ला खरेदी केला होता. त्यानंतर सदर टिव्ही घरी नेला असता चालू केल्यानंतर 1 तासानंतर आपोआप बंद पडला. तक्रारकर्तीने आपल्या तक्रारीत नमुद केले आहे की, तिने सदर बंद टिव्ही विरुध्द पक्षाकडे परत नेला असता त्यांनी टिव्ही परत घेऊन दुसरा त्याच कंपनीचा नवीन टिव्ही दिला. तक्रारकर्तीने सदरचा टिव्ही घरी आल्यानंतर चालू केला असता पुन्हा 1 तासाचे आत बंद पडला. तक्रारकर्तीने सदरचा टिव्ही विरुध्द पक्षाकडे नेला असता तो कंपनीकडे पाठवावा लागेल व एक महिन्यानंतर तुम्हाला तो मिळेल असे सांगितले. त्यानंतर विरुध्द पक्षांना वारंवार विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र तक्रारकर्तीस टिव्ही दुरुस्त करुन दिला नाही. म्हणून तक्रारकर्तीने सदरची तक्रार मंचात दाखल करुन खालिलप्रमाणे मागण्या केलेल्या आहेत.
अ) विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस टिव्हीची किंमत रु.15,800/-, 15% व्याजासह परत करावे.
ब) विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारीचा खर्च रु.3,000/- देण्याचे आदेशीत करावे.
3. तक्रारकर्तीच्या तक्रारीचे अनुषंगाने विरुध्द पक्षांना नोटीस बजावण्यात आली असता विरुध्द पक्षाने प्रकरणात हजर होऊन निशाणी क्र.7 वर आपले लेखीउत्तर दाखल केले. त्यात तक्रारकर्तीने त्यांचेकडून टिव्हीची खरेदी केल्याचे मान्य केले असुन सदरचा टिव्ही घरी नेल्यानंतर 1 तासाचे आत बंद पडला ही बाब अमान्य केलेली आहे. तसेच विरुध्द पक्षांनी आपल्या विशेष कथनात नमुद केले आहे की, ते विविध नामांकित कंपनीचे अधिकृत विक्रेते असुन त्यांनी तक्रारकर्तीला टिव्ही खरेदीचे वेळी त्याचा वापर कश्या प्रकारे करावा हे समजावुन सांगितले होते. तसेच वारंटी कार्डनुसार तक्रारकर्तीला सदरचा टिव्ही कंपनीकडून बदलवुन किंवा दुरुस्त करुन घेण्याचा अधिकार असल्याचे नमुद केले आहे. विरुध्द पक्षाने आपल्या उत्तरात पुढे असे नमुद केले आहे की, तक्रारकर्तीने कंपनीसोबत कोणत्याही प्रकारे संपर्क साधला नाही व कंपनीला आवश्यक पक्ष म्हणून तक्रारीत जोडले नाही व वारंटी कार्डमधील अटींनुसार कार्यवाही न करता सदरची तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे. त्यामुळे तक्रारकर्तीने टि.व्ही. कशाप्रकारे वापरला याची तपासणी करणे गरजेचे आहे, तसेच तक्रार दाखल करण्यापूर्वी विरुध्द पक्षास किंवा संबंधीत कंपनीला टि.व्ही. बदलवुन देण्याची मागणी तक्रारकर्तीने केलेली नाही म्हणून सदरची तक्रार खारिज होण्यास पात्र आहे, असे नमुद केले आहे.
4. तक्रारकर्तीव्दारे दाखल तक्रार, विरुध्द पक्षाव्दारे दाखल लेखीउत्तर, शपथपत्र, लेखी व तोंडी युक्तीवादाचे अवलोकन केले असता मंचसमक्ष खालील मुद्दे निघतात.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ती विरुध्द पक्षाची ग्राहक आहे काय ? होय
2) विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीप्रती सेवेत त्रुटी देऊन अनुचित
व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे दिसुन येते काय ? होय
3) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
- // कारण मिमांसा // –
5. मुद्दा क्र.1 बाबतः- तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाचे दुकानातून दि.07.05.2018 रोजी Sansui Company चा 32 इंच टिव्ही रु.15,800/- ला खरेदी केला होता, ही बाब तक्रारीसोबत दाखल दस्त क्र.6 वरुन सिध्द होते. म्हणून तक्रारकर्ती ही विरुध्द पक्षाची ग्राहक आहे.
6. मुद्दा क्र.2 बाबतः- तक्रारकर्तीने बंद टिव्ही विरुध्द पक्षाकडे परत नेला असता त्यांनी टिव्ही परत घेऊन दुसरा त्याच कंपनीचा नवीन टिव्ही दिला असता तक्रारकर्तीने सदरचा टिव्ही घरी आल्यानंतर चालू केल्यानंतर तो पुन्हा 1 तासाचे आत बंद पडला. तक्रारकर्तीने सदरचा टिव्ही विरुध्द पक्षाकडे नेला असता तो कंपनीकडे पाठवावा लागेल व एक महिन्यानंतर परत मिळेल असे सांगितले, परंतु त्यानंतर विरुध्द पक्षांना वारंवार विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र तक्रारकर्तीस टिव्ही दुरुस्त करुन दिला नाही. तसेच विरुध्द पक्षाने निशाणी क्र.11 वर अर्ज देऊन टिव्ही कंपनीला आवश्यक पक्ष म्हणून जोडण्यात यावे अशी मागणी केलेली आहे. परंतु तक्रारकर्त्याने सदर टिव्ही कंपनी कडून न घेता विरुध्द पक्षाकडून घेतलेला आहे व विरुध्द पक्षाने स्वतःचे बिल दिलेले असल्यशने विरुध्द पक्षाची जबाबदारी आहे की, त्याने तक्रारकर्त्यास सेवा द्यावी. सेच विरूध्द पक्षाने आपल्या विशेष कथनात सर्व्हीस सेंटरचा पत्ता दाखल केलेला आहे जो की ऑरंगाबाद शहराचा आहे म्हणजे विरुध्द पक्षाचे असे म्हणणे आहे की, टिव्ही मध्ये बिघाड आला असता तक्रारकर्त्याने औरंगाबाद इथे जाऊन दुरुस्ती करावी का ? एकंदरीत विरुध्द पक्षाने वस्तु विकतांना ग्राहकास सर्व सायी आम्ही करुन देऊ असे आमीश दाखवल्यानंतर सेवा द्यायची वेळ आली तर पळवाटा काढून ग्राहकास त्रास द्यायचा ही विरुध्द पक्षांचे सेवेतील त्रुटी असुन विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीप्रती अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे सिध्द होते. सबब मंच खालिल प्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यांत येतो.
- // अंतिम आदेश // -
1. तक्रारकर्तीची ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल विरुध्द पक्षांविरुध्दची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस टिव्हीची किंमत रु.15,800/- तक्रार दाखल दिनांक 27.09.2018 पासुन ते प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याजासह परत करावी.
3. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थीक त्रासापोटी रु.500/- व तक्रारीचा खर्च रु.500/- अदा करावे.
4. दोन्ही पक्षांना आदेशाची प्रथम प्रत विनामुल्य द्यावी.
5. तक्रारकर्तीस प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.