न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
यातील वि.प. हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील ए वॉर्ड, कसबा करवीर येथील रि.स.नं. 1028/2 पैकी बिगर शेती प्लॉट नं.बी 3, क्षेत्र 246.60 चौ.मी. ही मिळकत विकसीत केली असून त्यावर व्ही.एम.प्लाझा फेज-2 या इमारतीचे बांधकाम केलले आहे. या इमारतीमधील तिस-या मजल्यावरील फ्लॅट नं.एफ-7 याचे क्षेत्र 586.10 चौ.फूट (54.47 चौ.मी.) ही मिळकत कायम खुष खरेदी देणेचे ठरवून वि.प. यांनी तक्रारदार यांचेबरोबर दि.30/11/2015 रोजी रजि.करारपत्र दस्त नं. 4004/2015 अन्वये लिहून दिले आहे. सदर मिळकतीचा एकूण मोबदला रु.19,10,000/- इतका ठरलेला असून सदर रजिस्टर खरेदी करारपत्र करताना रक्कम रु.1,10,000/- अॅडव्हान्स दाखल रोख दिली असून उर्वरीत रकमेबाबत तक्रारदार यांनी लार्सन अॅण्ड टुब्रो फायनान्स कंपनीकडून रक्कम रु.18,00,000/- इतके कर्ज घेतले असून सदर संपूर्ण मोबदला वि.प. यांना दि. 30/12/2015 रोजी अदा केला आहे. परंतु वि.प. यांनी सदर इमारतीतील फ्लॅटधारक व तक्रारदार यांची संमती न घेता सदर फ्लॅट नं.एफ-7 असले इमारतीचे टेरेसवर मोबाईल टॉवर बसवणेचे ठरवून मोबाईल कंपनीशी करार करुन टॉवर बसवणेस प्रत्यक्ष कब्जा दिला. सदरचे कृत्यास तक्रारदार व इतर फ्लॅटधारक श्री राहुल शामराव बजागे व विष्णू नाना पाटील यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर वि.प. व तक्रारदार व अन्य फ्लॅटधारक यांचेमध्ये तडजोड होवून वि.प. हे श्रीराम योगी नगर ता. करवीर येथे बांधत असले नियोजीत नवीन स्कीममधील त्याच मजल्यावरील व नमूद क्षेत्रफळाचा फ्लॅट देणेचे मान्य करुन दि. 27/1/2016 रोजी करारपत्र लिहून दिले आहे. तसेच सदर नियोजीत इमारतीमधील फ्लॅटचा ताबा रजि. खरेदीपत्राने देणेचे व सदरचे खरेदीपत्र वि.प. यांनी स्वखर्चाने पूर्ण करुन देणेचे ठरले आहे. तसेच दि. 27/1/2016 रोजी वि.प. यांनी लिहून दिले करारानुसार संभाव्य इमारतीमधील फ्लॅटचा ताबा तक्रारदार यांचा देणेचे व तक्रारदार यांनी घेतलेल्या एल. अॅण्ड टी.फायनान्स कंपनीकडील कर्जाचे हप्ते भरणेची जबाबदारीही वि.प. यांनी स्वीकारली असून सदर संभाव्य इमारतीमधील फ्लॅटकरिता कर्जाचे नव्याने प्रपोजल करणेचे असून त्याचा संपूर्ण खर्च वि.प. यांनी करणेचे लिहून दिले आहे. तसेच तक्रारदारांनी वि.प. यांना मोबदल्याची संपूर्ण रक्कम दिली असलेने श्रीमान योगी नगर येथील संभाव्य इमारतीमधील फ्लॅटचा ताबा वि.प. कडून तक्रारदार यांना मिळेपावेतो तक्रारदार यांचे राहणेसाठी येणारे दरमहाचे भाडेची रक्कम देणेची जबाबदारीही वि.प. यांनी दि. 27/1/2016 चे करारामध्ये स्वीकारली आहे. परंतु तकारदारांनी अनेकवेळा विचारणा करुन वि.प. यांनी तक्रारदारांना श्रीमान योगी नगर येथील फ्लॅटचा ताबा दिलेला नाही. म्हणून तक्रारदारांनी वि.प. यांना दि. 16/9/2017 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली. परंतु सदरची नोटीस स्वीकारणेस वि.प. यांनी नकार दिला आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदारास सेवात्रुटी दिली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून श्रीमानयोगी नगर मधील फ्लॅटचा प्रत्यक्ष कब्जा व खरेदीदस्त करुन मिळावा, तक्रारदार यांनी फायनान्स कंपनीकडे कर्जाचे हप्त्यापोटी भरलेली रक्कम रु.4,09,000/- वि.प. यांचेकडून परत मिळावी, भाडेपोटी भरलेली रक्कम रु.2,73,000/- मिळावी, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व कोर्ट खर्च वि.प. कडून वसूल होवून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 4 कडे अनुक्रमे तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये झालेला दि. 27/1/16 रोजीचा नोंदणीकृत करार, तक्रारदाराने वि.प. यांना पाठविलेली नोटीस, सदर नोटीसीचे परत आलेले लखोटे वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र, साक्षीदाराचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत तक्रारदार व वि.प. यांचेमधील कराराची प्रत, तक्रारदाराने वि.प. यांना लिहून दिलेले करारपत्र, तक्रारदाराविरुध्द वर्तमानपत्रामध्ये आलेले बातमीपत्र, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. वि.प. ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) लार्सन अॅण्ट टुब्रो फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची संपूर्ण रक्कम भरण्याची जबाबदारी ही तक्रारदार यांचेवर होती. त्यास वि.प. यांना कोणत्याही प्रकारे जबाबदार धरता येणार नाही.
iii) तक्रारदार यांना द्यावयाचे व्ही.एम. प्लाझा इमारतीतील फ्लॅट नं.एफ-7 चे खरेदीपत्र एक वर्षाचे आत करणचे होते. त्याप्रमाणे वि.प. हे खरेदीपत्र पूर्ण करुन देणेस तयार होते. परंतु खरेदीपत्राचा खर्च टाळणेसाठी तसेच टॅक्सची बाकी असलेली रक्कम वि. यांना द्यावी लागू नये म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार या मंचासमोर केली आहे.
iv) तक्रारदारांना लिहून दिलेल्या करारामध्ये व्ही.एम. प्लाझा या इमारतीतील टेरेसचे हक्क वि.प. यांचेकडे राहतील असे नमूद केले आहे. त्यामुळे सदर टेरेसचा वापर करणेबाबतचा संपूर्ण हक्क वि.प. यांना आहे.
v) दि.27/1/16 रोजीच्या कराराप्रमाणे नवीन अपार्टमेंटमध्ये फ्लॅट देणेचे जरी नमूद केले असले तरी सदर करारावर लिहून घेणार म्हणून नमूद असलेल्या अन्य श्री राहुल बजागे व विष्णू पाटील यांनी त्यांना देवू केलेल्या व्ही.एम. प्लाझा मधील फ्लॅट युनिटचे खरेदीपत्र वि.प. यांना सर्व खर्च देवून पूर्ण करुन घेतलेले आहे.
vi) दि.27/1/16 चे करारानंतर तक्रारदार यांनी स्वतः वि.प. यांची भेट घेवून तक्रारदार यांना देवू केलेल्या व्ही.एम. प्लाझा मधील फ्लॅटचे खरेदीपत्र पूर्ण करुन घेणेचे दि. 9/11/16 चे करारपत्राने मान्य केले आहे.
vii) तक्रारदार हा उदगांव येथील मतिमंद मुलांची शाळा या शाळेचा अध्यक्ष होता. तेथे त्याने शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांच्याकडून रकमा घेवून फसवणूक केली आहे.
viii) वि.प. हे दि.30/11/2015 चे कराराप्रमाणे खरेदीपत्र करुन देणेस तयार आहेत परंतु तक्रारदाराकडून व्हॅट व सर्व्हिस टॅक्सची रक्कम रु.88,433/- व लाईट पाणीबाबतची रक्कम रु.50,000/- येणे बाकी आहे. सदरची रक्कम द्यावी लागू नये म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतची खोटी तक्रार केली आहे.
ix) तक्रारदार यांना व्ही.एम. प्लाझा मधील फ्लॅट नं.एफ-7 चा ताबा दि. 30/11/15 च्या करारपत्राने दिलेला आहे. परंतु तक्रारदाराने घेतलेले फायनान्स कंपनीचे कर्ज वेळेत न भरता आलेमुळे सदरचा फ्लॅट तक्रारदार यांनी श्री रोहीत चव्हाण यांना भाडयाने दिला आहे. तथापि एल अॅण्ड टी फायनान्स कंपनीने कर्जाचे हप्ते थकीत राहिल्याने सदरचा फ्लॅट सील केल्याचे वि.प. यांना नुकतेच समजले आहे. सबब, तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून फ्लॅटचे खरेदीपत्र पूर्ण करुन मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांनी, वि.प. यांनी कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील ए वॉर्ड, कसबा करवीर येथील रि.स.नं. 1028/2 पैकी बिगर शेती प्लॉट नं.बी 3, क्षेत्र 246.60 चौ.मी. या मिळकतीवर विकसीत केलेल्या व्ही.एम.प्लाझा फेज-2 या इमारतीतील तिस-या मजल्यावरील फ्लॅट नं.एफ-7 याचे क्षेत्र 586.10 चौ.फूट (54.47 चौ.मी.) ही मिळकत कायम खुष खरेदी देणेचे ठरवून वि.प. यांनी तक्रारदार यांचेबरोबर दि.30/11/2015 रोजी रजि.करारपत्र दस्त नं. 4004/2015 अन्वये लिहून दिले आहे. सदर मिळकतीचा एकूण मोबदला रु.19,10,000/- इतका ठरलेला असून सदर रजिस्टर खरेदी करारपत्र करताना रक्कम रु.1,10,000/- अॅडव्हान्स दाखल रोख दिली असून उर्वरीत रकमेबाबत तक्रारदार यांनी लार्सन अॅण्ड टुब्रो फायनान्स कंपनीकडून रक्कम रु.18,00,000/- इतके कर्ज घेतले असून सदर संपूर्ण मोबदला वि.प. यांना दि. 30/12/2015 रोजी अदा केला आहे. वि.प. यांनी सदरचा मोबदला मिळालेबाबतचे कथन स्पष्टपणे आपल्या म्हणण्यामध्ये नाकारलेले नाही. तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये झालेल्या करारपत्राची प्रत याकामी दाखल आहे. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कथनानुसार वि.प. यांनी सदर इमारतीतील फ्लॅटधारक व तक्रारदार यांची संमती न घेता सदर फ्लॅट नं.एफ-7 असले इमारतीचे टेरेसवर मोबाईल टॉवर बसवणेचे ठरवून मोबाईल कंपनीशी करार करुन टॉवर बसवणेस प्रत्यक्ष कब्जा दिला. सदरचे कृत्यास तक्रारदार व इतर फ्लॅटधारक श्री राहुल शामराव बजागे व विष्णू नाना पाटील यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर वि.प. व तक्रारदार व अन्य फ्लॅटधारक यांचेमध्ये तडजोड होवून वि.प. हे श्रीमानयोगी नगर ता. करवीर येथे बांधत असले नियोजीत नवीन स्कीममधील त्याच मजल्यावरील व नमूद क्षेत्रफळाचा फ्लॅट देणेचे मान्य करुन दि. 27/1/2016 रोजी करारपत्र लिहून दिले आहे. तसेच सदर नियोजीत इमारतीमधील फ्लॅटचा ताबा रजि. खरेदीपत्राने देणेचे व सदरचे खरेदीपत्र वि.प. यांनी स्वखर्चाने पूर्ण करुन देणेचे ठरले आहे असे तक्रारदाराचे कथन आहे. सदरचे दि. 27/1/16 चे करारपत्र तक्रारदाराने याकामी दाखल केले आहे. त्यामध्ये नियोजित श्रीमान योगी नगर येथील फ्लॅटचे खरेदीपत्र वि.प. यांनी स्वखर्चाने करुन देणेचे नमूद आहे. परंतु वि.प. यांनी याकामी दि. 9/1/2016 चे नोटरी करारपत्र याकामी दाखल केले आहे. सदरचे करारपत्र हे दि. 27/1/2016 रोजीचे करारपत्रास आधीन राहून केलेले असून त्यामध्ये सदर करारपत्राच्या पान नं.3 वर असे नमूद आहे की, ज्या मजल्यावर नमूद स्कीममध्ये सदनिका आहेत, त्याच मजल्यावर अथवा लिहून देणार व घेणार यांचे समझोत्याने योग्य त्या मजल्यावर नवीन स्कीममध्ये पूर्ण अवस्थेत लिहून घेणार यांना सदनिका देणेचे ठरले आहे. तसेच सदर सदनिकेचे खरेदीपत्र लिहून घेणार यांना लिहून देणार यांनी स्वखर्चाने करुन देणेचे आहे. तसेच त्यामध्ये तक्रारदार यांनी श्रीमान योगी नगर येथील नवीन स्कीममधील फ्लॅट क्र.एफ-7 चा इतराना विकणेस वि.प. यांना ना हरकत दिली आहे व अगोदर ठरलेला व्ही.एम.प्लाझा मधील फ्लॅट क्र.एफ-7 चे खरेदीपत्र करुन घेणेचे तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये ठरलेचे दिसून येते.
8. वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदाराकडून व्हॅट व सर्व्हिस टॅक्सची रक्कम रु.88,433/- व लाईट पाणीबाबतची रक्कम रु.50,000/- येणे बाकी आहे असे कथन केले आहे. जर सदरची रक्कम वि.प. यांना तक्रारदाराकडून येणे असेल तर त्याबाबतचा उल्लेख दि. 9/11/2016 चे करारपत्रात का करण्यात आला नाही याचा कोणताही खुलासा वि.प. यांनी याकामी केलेला नाही. जर सदरची रक्कम तक्रारदाराकडून येणे असती तर सदर रकमेबाबत सदरचे करारपत्रामध्ये नमूद करणे आवश्यक होते. परंतु तसे काहीही करारपत्रात नमूद नाही. सबब, तक्रारदार वि.प. यांना काही रक्कम देणे लागतात ही बाब वि.प. यांनी शाबीत केली नाही असे या मंचाचे मत आहे.
9. सदरकामी दि.9/11/2016 रोजी झालेल्या करारपत्रानुसार तक्रारदारांनी जरी व्ही.एम.प्लाझा मधील फ्लॅटचे खरेदीपत्र करुन घेणेचे मान्य केले असले तरी सदरचे करारपत्र हे दि. 27/1/2016 रोजीचे करारपत्रास आधीन राहून केलेले असून त्यामध्ये सदर करारपत्राच्या पान नं.3 वर असे नमूद आहे की, व्ही.एम.प्लाझा मधील ज्या मजल्यावर नमूद स्कीममध्ये सदनिका आहेत, त्याच मजल्यावर अथवा लिहून देणार व घेणार यांचे समझोत्याने योग्य त्या मजल्यावर श्रीमान योगी नगर येथील नवीन स्कीममध्ये पूर्ण अवस्थेत लिहून घेणार यांना सदनिका देणेचे ठरले आहे. तसेच सदर सदनिकेचे खरेदीपत्र लिहून घेणार यांना लिहून देणार यांनी स्वखर्चाने करुन देणेचे आहे. सबब, सदरकामी व्ही.एम. प्लाझा या इमारतीतील ज्या मजल्यावरील सदनिका तक्रारदार यांना खरेदी देण्याचे वि.प. यांनी कबूल केले होते, त्याच मजल्यावर श्रीमान योगी नगर येथील स्कीममधील फ्लॅटचे खरेदीपत्र वि.प. यांनी करुन देणेचे आदेश करणे न्यायोचित ठरेल असे या मंचाचे मत आहे. वि.प. यांनी सदर इमारतीतील फ्लॅटधारक व तक्रारदार यांची संमती न घेता सदर फ्लॅट नं.एफ-7 असले इमारतीचे टेरेसवर मोबाईल टॉवर बसवणेचे ठरवून मोबाईल कंपनीशी करार केल्यामुळे प्रस्तुतचा वाद उद्भवला व त्यामुळे सदरचे फ्लॅटचे खरेदीपत्र करण्यास विलंब झाल्याचे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. Maharashtra Ownership & Flats Act मधील तरतुदींनुसार तक्रारदाराने खरेदी केलेल्या फ्लॅटचे खरेदीपत्र करुन देणे ही वि.प. यांचेवरील कायदेशीर जबाबदारी आहे. परंतु सदरची जबाबदारी ही वि.प. यांनी प्रस्तुत प्रकरणी पार पाडलेली नाही ही बाब याकामी शाबीत होते. सबब, वि.प. यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
10. सबब, दि.27/1/16 चे करारपत्रातील अटी व शर्तींचा विचार करता सदरचे फ्लॅटचे खरेदीपत्राचा खर्च वि.प. यांनी करणे संयुक्तिक ठरेल असे या मंचाचे मत आहे. तसेच सदर करारपत्रातील अटी व शर्तीप्रमाणे तक्रारदार यांनी वि.प. यांना फ्लॅटचे खरेदीपोटी अदा केलेल्या रकमेवर रक्कम दिल्याचे तारखेपासून सदनिकेचा ताबा देईपर्यंतचे तारखेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत. तसेच तक्रारदार यांना श्रीमान योगी नगर येथील स्कीममधील फलॅटचे खरेदीसाठी जे नवीन कर्ज प्रकरण करणेचे आहे, त्याचा सर्व खर्च दि.27/1/16 चे करारपत्रातील अटी शर्तीनुसार वि.प. यांनी करणेचा आहे. तक्रारदाराने याकामी त्यांनी भाडेपोटी भरलेली रक्कम रु. 2,73,000/- ची मागणी केली आहे. परंतु तक्रारदार यांनी याकामी योग्य तो पुरावा दाखल केलेला नाही. परंतु वि.प. यांनी तक्रारदारांना फ्लॅटचा ताबा दिला नसलेने तक्रारदार यांना भाडयाने इतरत्र रहावे लागले या बाबीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सबब, तक्रारदार हे भाडेपोटी रु.1,00,000/- वि.प.क्र.1 व 2 यांचेकडून मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
11. सबब, तक्रारदार हे दि.27/1/16 चे करारानुसार वि.प. यांच्या श्रीमान योगी नगरमधील अपार्टमेंटमधील फ्लॅटचे खरेदीपत्र वि.प. यांच्या खर्चाने पूर्ण करुन मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.3,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना दि.27/1/16 चे करारानुसार त्यांच्या रि.स.नं. 1028/5 पैकी प्लॉट नं.1, ए वॉर्ड, श्रीमान योगी नगर, ता. करवीर जि. कोल्हापूर येथे विकसीत केलेल्या इमारतीतील फ्लॅटचे खरेदीपत्र स्वखर्चाने पूर्ण करुन द्यावे.
3) तक्रारदार यांना फ्लॅटचे खरेदीपोटी वि.प. यांना अदा केलेल्या रकमेवर वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या रक्कम दिल्याचे तारखेपासून सदनिकेचा ताबा देईपर्यंतचे तारखेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज अदा करावे.
4) वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना श्रीमान योगी नगर येथील स्कीममधील फ्लॅटचे खरेदीसाठी जे नवीन कर्ज प्रकरण करणेचे आहे, त्याचे होणा-या सर्व खर्चाची रक्कम अदा करावी.
5) वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना भाडेपोटी रु. 1,00,000/- अदा करावेत.
6) वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व अर्जाचा खर्च रु.3,000/- तक्रारदारास अदा करावेत.
7) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प.क्र.1 व 2 यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
8) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25 व 27 अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
9) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.