रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग – रायगड.
तक्रार क्रमांक 567/2015
तक्रार दाखल दिनांक :- 16/12/2015
निकालपत्र दिनांक 28/09/2016
श्री. संजय प्रभाकर पोटफोडे,
रा. मातोश्री निवास, गुरवआळी,
निजामपूर, ता. माणगांव, जि. रायगड. ...... तक्रारदार
विरुध्द
1. अब्दुल्ला उस्मान उर्फ अब्दुल्ला हाजी ताहीर जालगांवकर,
2. कादीर हाजी जालगांवकर उर्फ अब्दुल कादीर,
3. उस्मान हाजी ताहीर जालगांवकर उर्फ शेख उस्मान
क्र. 1 ते 3 तर्फे अखत्यारी म्हणून
4. श्री. मुस्तफा महंमद सईद माणिकवारे,
मे. माणिकवारे कन्स्ट्रक्शन्स करीता,
मुन कॉम्प्लेक्स, दहिवली रोड,
मु. मोर्बा, ता. माणगांव, जि. रायगड. ...... सामनेवाले क्र 1 ते 4
समक्ष - मा. अध्यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर
मा. सदस्या श्रीमती उल्का अं. पावसकर
मा. सदस्य, श्री. रमेशबाबू बी. सिलीवेरी,
उपस्थिती - तक्रारदारतर्फे प्रतिनिधी श्री. अविनाश ओक
सामनेवाले क्र. 1 ते 4 तर्फे ॲड आर.एस. पवार,
ॲड प्राची पाटील व ॲड व्ही. डी. ठाकूर
- न्यायनिर्णय -
द्वारा मा. सदस्य, श्री. रमेशबाबू बि. सिलिवेरी
1. सामनेवाले यांनी तक्रारदारांस कराराप्रमाणे सदनिकेचा ताबा न देऊन सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदार यांनी मौजे उतेखोल, ता. माणगांव, जि. रायगड येथील स.नं. 34अ/1, व 34अ/2 या मिळकती विकसित करण्यासाठी सामनेवाले यांना करारामाणे दिलेल्या असल्याने त्यामध्ये असणाऱ्या जुन्या इमारतीमधील सर्व भाडेकरुंशी तडजोड करुन त्यांना फ्लॅट/ गाळे देण्याचे कबूल करुन करारनामे नोंदणीकृत केले. त्याप्रमाणे तक्रारदारांनी हाजी महंमद ताहीर प्लाझामधील “डी” विंग मधील तिसरा मजला, मजला सदनिका क्र. 103, क्षेत्रफळ 898.20 चौ. फूट, रक्कम रु. 7,05,000/- ला खरेदी करण्याचे निश्चित करुन सदनिकेचा लेखी करारनामा दि. 24/02/11 रोजी सामनेवाले सोबत केला. व तक्रारदारांनी सामनेवाले क्र. 4 यांस रु. 25,000/- रोख दिले आहेत. त्याची पावती सामनेवाले क्र. 4 ने तक्रारदारांस दिली आहे. त्यानंतर सामनेवाले क्र. 4 यांनी तक्रारदारांना सदर करार झाल्यानंतर सामनेवाले क्र. 4 ने तक्रारदारांना प्लॅनमध्ये दुरुस्ती करुन नवीन प्लॅन दाखविला व जुन्या सदनिकेच्या बदली हाजी महंमद ताहीर प्लाझा या इमारतीमधील सी विंगमधील तिसऱ्या मजल्यावरील सदनिका क्र. 301 क्षेत्रफळ 750.60 चौ. फूट रक्कम रु. 8,60,000/- ला खरेदी देण्याचे कबूल केले व तसा करार दुय्यम निबंधक, माणगांव यांचे कार्यालयात दि. 17/11/11 रोजी नोंदविण्यात आला आहे. तक्रारदारांनी सामनेवाले यांना सदनिका व्यवहारापोटी दि. 12/11/10 रोजी रु. 25,000/-, दि. 17/11/11 रोजी रु. 86,000/-, दि. 18/05/12 रोजी रु. 26,000/-, व दि. 10/06/12 रोजी रु. 60,000/- असे एकूण रक्कम रु. 1,97,000/- अदा केले आहेत. तक्रारदाराने करारनाम्याप्रमाणे बांधकाम करण्यासाठी सामनेवाले यांना रक्कम अदा केली मात्र सामनेवाले यांनी कराराप्रमाणे कोणत्याही विंगचे बांधकाम केले नाही. सामनेवाले यांनी अत्यंत कमकुवत बांधकाम करुन अर्धवट सोडून दिले. तसेच दि. 30/05/14 पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे अभिवचन सामनेवाले यांनी तक्रारदारांस दिले होते. परंतु सामनेवाले यांनी बांधकाम सुरु करुन अर्धवट अवस्थेत सोडल्यामुळे तक्रारदारांनी तज्ञ परिक्षक श्री. प्रसाद बाळाराम पाटील यांच्यामार्फत इमारतीची पाहाणी केली असता, सदर इमारत रहाण्यायोग्य नसल्याचे शपथपत्र श्री. प्रसाद पाटील यांनी दि. 12/02/13 रोजी दिले. तज्ञ परिक्षकांच्या अहवालामध्ये सामनेवाले यांनी कराराप्रमाणे मजबूत बांधकाम केले नसून ते रहाण्यायोग्य नाही असा स्पष्ट अभिप्राय नमूद केला आहे.
3. तक्रारदारांनी सामनेवाले यांस दि. 20/11/13 रोजी नोटीस पाठविली. सदर नोटीस सामनेवाले यांस प्राप्त होऊनही सामनेवाले यांनी कोणतेही प्रतिउत्तर दिलेले नाही तसेच सदनिकेचे बांधकाम पूर्ण करण्यास टाळाटाळ केल्याने तक्रारदारांना अन्यत्र भाडयाने रहावे लागत आहे व त्यांची गैरसोय होत असून त्यांना मानसिक व शारिरिक त्रास होत आहे म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
4. तक्रार दाखल झाल्यानंतर सामनेवाले क्र. 1 ते 4 यांना मंचाने लेखी जबाब दाखल करण्यासाठी नोटीस पाठविली. मंचाची नोटीस प्राप्त झाल्यावर सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी कुलमुखत्यार सामनेवाले क्र. 4 द्वारे मंचासमक्ष हजर होऊन लेखी म्हणणे दाखल केले. लेखी म्हणण्यामध्ये सामनेवाले यांनी तक्रारीतील मुद्दयांचे खंडन करुन तक्रारदाराने सामनेवाले यांच्या बांधकामाबाबत वेगवेगळया सरकारी कार्यालयांमध्ये केलेल्या तक्रारींमुळे ग्रामपंचायत माणगांव यांनी सामनेवाले यांच्या बांधकामास स्थगिती दिली आहे. सदरकामी चौकशी चालू असून चौकशी पूर्ण होईपर्यंत सामनेवाले यांना पुढील बांधकाम करता येणार नाही. सामनेवाले यांनी तक्रारदारांसोबत दि. 21/12/11 रोजी केलेल्या करारातील मुद्दा क्र. 4 नुसार सामनेवाले यांच्या नियंत्रणाबाहेरील कारणांमुळे बांधकामास विलंब झालेला असून त्यामुळे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. तक्रारदारांनी दाखल केलेल्या तज्ञ अहवाल पाहणीची नोटीस सामनेवाले यांना दिलेली नसल्याने सामनेवाले यांना सदर तज्ञ अहवाल मान्य नसून तक्रारीमधील विनंती न्यायोचित नसल्याने अमान्य करण्यात यावी अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.
5. तक्रारदारांनी दाखल केलेली कागदपत्रे, भाडे पावत्या, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, सामनेवाले यांचा लेखी जबाब, पुरावा शपथपत्र, व लेखी युक्तीवादाचे अवलोकन केले असता, तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
| |
मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले यांनी तक्रारदारांस कराराप्रमाणे सदनिकेचा ताबा न देऊन तसेच सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारदार सिध्द करतात काय ॽ उत्तर - होय. मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले तक्रारदारांस नुकसान भरपाई देण्यास पात्र आहेत काय ॽ उत्तर - होय. मुद्दा क्रमांक 3 - आदेश ॽ उत्तर - तक्रार अंशतः मान्य. -: कारणमिमांसा :- 6. मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले हे विकसक असून करारनाम्याप्रमाणे तक्रारदारांकडुन 25% पेक्षा जास्त रक्कम स्विकारल्यानंतर विहित मुदतीत सदनिकेचे बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरुन करणे ही जबाबदारी सामनेवाले यांचेवर होती. ती पार पाडण्यासाठी सामनेवाले यांनी कोणतीही निश्चित उपाययोजना केली नसल्याची बाब तक्रारदारांनी नियुक्त केलेल्या तज्ञ परिक्षकाच्या अहवालातील नोंदीवरुन दिसून येते. तसेच सदनिकेच्या बांधकामाच्या दर्जाविषयी सुरुवातीपासूनच विशेष खबरदारी घेण्याची जबाबदारी देखील सामनेवाले यांनी पार पाडली नाही. तक्रारदारांनी वेळोवेळी सदनिकेच्या सद्य:स्थितीबाबत विचारणा केली असता, सामनेवाले यांनी कोणतेही संयुक्तिक कारण दिले नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांनी पाठविलेल्या पाठविलेल्या नोटीसला कोणतेही उत्तर दिले नाही. सबब, तक्रारीतील कथने सत्य असल्याचे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते. 7. मुद्दा क्र. 2 - सामनेवाले यांनी कराराप्रमाणे दि. 30/05/14 रोजी सदनिकेचा ताबा तक्रारदार यांना देण्याविषयी अभिवचन दिले आहे. त्याप्रमाणे जोत्याचे बांधकाम सुरु झाल्यानंतर त्याची मजबूती ही संपूर्ण बांधकामाचा व त्यावर येणाऱ्या वजनाचा विचार करुन करणे आवश्यक होते. तक्रारदारांनी गुंतविलेली रक्कम सामेनेवाले यांनी बांधकामासाठी न वापरता वैयक्तिक उपयोगासाठी वापरली असल्याने बांधकामाचा दर्जा मजबूत नसल्याची बाब तज्ञ परिक्षकांच्या अहवालात नमूद आहे. तक्रारदारांना सदनिकेचा ताबा वेळेत न मिळाल्याने त्यांना अन्यत्र भाडयाने रहावे लागत आहे, व त्यासाठी त्यांनी दरमहा रु. 5,000/- प्रमाणे भाडे भरावे लागत आहे असे तक्रारदारांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे व त्याबाबत भाडेपावत्या तक्रारदारांनी तक्रारीसोबत जोडल्या आहेत परंतु त्यासोबत भाडेपट्टा करार (लीव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट) जोडलेला नाही त्यामुळे तक्रारदारांची घरभाडयाच्या रकमेची मागणी अमान्य करण्यात येते. एकंदरीत सामनेवाले यांनी तक्रारदारांस विहित मुदतीत पक्के रहाण्यायोग्य सदनिकेचे बांधकाम न करुन देऊन आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरणारे कृत्य केले आहे. ही बाबही सिध्द होते. सबब, सामनेवाले तक्रारदारांस नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते. 9. वर नमूद निष्कर्षावरुन खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीतकरण्यात येतो. -: अंतिम आदेश :- 1. तक्रार क्र. 567/2015 अंशत: मंजूर करण्यात येते. 2. सामनेवाले क्र. 1 ते 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदारांस कराराप्रमाणे वर नमूद सदनिकेचा ताबा न देऊन सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते. 3. सामनेवाले क्र. 1 ते 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदारांस हाजी महंमद ताहीर प्लाझा या इमारतीचे बांधकाम या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत सुरु करुन तद्नंतर या इमारतीमधील “सी” विंग मधील तिसरा मजला सदनिका क्र. 301, क्षेत्रफळ 750.60 चौ. फूट, या सदनिकेचा कायदेशीर ताबा 90 दिवसांत तक्रारदारांस द्यावा व ताबा देतेवेळी तक्रारदारांकडून करारनाम्याप्रमाणे उर्वरित रक्कम स्विकारावी. 4. सामनेवाले क्र. 1 ते 4 यांना वैयक्तिक व संयुक्तिकपणे वर नमूद क्र. 3 चे पालन करणे शक्य नसल्यास सामनेवाले क्र. 1 ते 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदारांना त्यांनी वर नमूद सदनिका व्यवहारापोटी अदा केलेली रक्कम रु. 1,97,000/- (रु. एक लाख सत्त्याण्णव हजार मात्र) दि. 30/05/14 पासून ते सदर रक्कम तक्रारदारांना प्रत्यक्ष अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 10% दराने व्याजासहीत अदा करावी. 5. सामनेवाले क्र. 1 ते 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदारांस मानसिक व शारिरिक त्रासापोटी व न्यायिक खर्चापोटी एकूण रक्कम रु. 50,000/- (रु. पन्नास हजार मात्र) या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत अदा करावेत. 6. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना तात्काळ पाठविण्यात याव्यात. ठिकाण- रायगड-अलिबाग. दिनांक – 28/09/2016 (रमेशबाबू बी. सिलीवेरी) (उल्का अं. पावसकर) (उमेश वि. जावळीकर) सदस्य सदस्या अध्यक्ष रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग. | |
| |
| |