निकालपत्र :- (दि.24.11.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 यांना नोटीस पाठविली असता सदरची नोटीस सामनेवाला क्र.1 स्विकारली नसल्याने नोटीसीचा लखोटा या मंचाकडे परत आलेला आहे. सामनेवाला क्र.2 ते 4 यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील ए वॉर्ड येथील सि.स.नं.2684/2-अ, क्षेत्र 56.8 चौरस मिटर ही मिळकत सामनेवाला क्र.2 ते 4 यांच्या मालकी वहिवाटीची आहे. सदर सामनेवाला यांनी सामनेवाला क्र.1 बांधकाम व्यावसायिक यांना दि.20.04.2006 च्या विकसन करारपत्रान्वये सदर मिळकत विकसित करणेकरिता करार केलेला आहे. तक्रारदार व सामनेवाला क्र.1 यांचेमध्ये सामनेवाला बांधकाम करीत असलेल्या सदर मिळतीतील इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावरील फलॅट युनिट 550 चौरस फूट घेणेबाबतचा करार दि.01.08.2006 रोजी झालेला आहे. सदर युनिटची एकूण किंमत रुपये 5 लाख इतकी ठरली होती. त्यापैकी रक्कम रुपये 3,50,000/- सामनेवाला यांना अदा केलेली आहे व उर्वरित रक्कम खरेदीखताचेवेळेस देणेचे ठरले होते. परंतु, सामनेवाला यांनी फलॅटचे खरेदीपत्र व ताबा तक्रारदारांना दिलेला नाही. परंतु, तक्रारदारांची सदर विनंती सामनेवाला क्र.1 यांनी दुर्लक्षित केली. त्यानंतर सामनेवाला क्र.1 यांनी दि.21.05.2008 रोजी लेखी स्टॅम्पपेपरवर फलॅट युनिट देणेस असमर्थता दर्शविली व रक्कम रुपये 3,50,000/- परत करणेचे अभिवचन दिले. सबब, सदर संचकारापोटी दिलेली रक्कम रुपये 3,50,000/- कर्जप्रकरणासाठी झालेली खर्च रुपये 7,500/-, तसेच तक्रारीचा खर्च रुपये 7,500/-, तसेच संचकार रक्कमेवरती दि.01.08.2006 पासून द.सा.द.शे.12 टक्केप्रमाणे होणारी रक्कम रुपये 1,26,000/- देणेचा आदेश व्हावा. तसेच, खरेदीखताची उर्वरित रक्कम रुपये 1,50,000/- स्विकारुन फलॅट युनिट देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत दि.20.04.2006 रोजीचे विकसन करारपत्र, दि.01.08.2006 रोजीचे खरेदीपत्र, रुपये 1,50,000/-, रुपये 1 लाखाच्या दोन अशा सामनेवाला यांनी दिलेल्या तीन पावत्या, इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला क्र.2 ते 4 यांनी एकत्रित म्हणणे देवून तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारीत उल्लेख केलेली मिळकत ही सामनेवाला क्र.2 ते 4 यांच्या मालकीची आहे. सदर सामनेवाला यांनी सामनेवाला क्र.1 यांना सदर मिळकत विकसित करणेकरिता विकसन करार लिहून दिलेला होता. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांच्याकडून अडव्हान्स रककम स्विकारुन तथाकथित करार केलेचा दिसून येतो. तसेच, तक्रारदारांची रक्कम सामनेवाला क्र.1 यांनी स्विकारलेली आहे. त्याचा सदर सामनेवाला यांचेशी काहीही संबंध नाही. सामनेवाला क्र.1 यांनी सदर सामनेवाला यांची दिशाभूल करुन करारपत्राप्रमाणे इमारत बांधली नाही. सदर सामनेवाला क्र.1 यांनी कराराप्रमाणे मिळकत विकसित करता येणे शक्य नाही. त्यामुळे विकसन करारपत्र रद्द केले आहे. तसेच, सदर विकसन करारपत्रास अनुसरुन काही व्यवहार झालेस त्याची जबाबदारी सामनेवाला क्र.1 यांची आहे असे त्यांनी लिहून दिले आहे. तक्रारदारांच्या तक्रार कलम 4 मध्ये तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये दि.01.10.2008 रोजी करार होवून त्याप्रमाणे सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांची रक्कम भागविणेची जबाबदारी स्विकारलेचे दिसून येते. सबब, सदर समनेवला यांचेविरुध्दची तक्रार नामंजूर करावी अशी विनंती केली आहे. (5) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत सामनेवाला क्र.1 यांचेबरोबर केलेला विकसन करार रद्द करणेचा कराराची प्रत दाखल केलेली आहे. (6) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे; तक्रारीत उल्लेख केलेली मिळकत ही सामनेवाला क्र. 2 ते 4 यांच्या मालकीची आहे. सदर सामनेवाला यांनी सामनेवाला क्र.1 बांधकाम व्यावसायिक यांना सदर मिळकत विकसित करणेसाठी विकसन करारपत्र लिहून दिले आहे. त्या अनुषंगाने तक्रारदारांनी सदर मिळकतीत विकसित होणा-या इमारतीमध्ये सदनिका घेणेबाबतचा करार दि.29.07.2006 रोजी केलेला आहे व त्यानुसार एकूण रक्कम रुपये 5 लाखापैकी रक्कम रुपये 3,50,000/- सामनेवाला क्र.1 यांनी स्विकारलेली आहे. त्याबाबतच्या पावत्या प्रस्तुत कामी दाखल आहेत. इत्यादी वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येते. (7) सामनेवाला क्र.2 ते 4 व सामनेवाला क्र.1 यांचेमध्ये उपरोक्त उल्लेख केलेप्रमाणे झालेला विकसन करारपत्र रद्द करणेबाबतचा करार दि.21.02.2008 रोजी झालेला आहे. सदरचा करार रद्द झालेनंतर तक्रारदार व सामनेवाला क्र.1 यांचेमध्ये तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीतील कलम 4 मध्ये उल्लेख केलेप्रमाणे दि.01.10.2008 रोजी करार झालेला आहे व सदर करारानुसार सामनेवाला क्र.1 यांनी संचकारापोटी स्विकारलेली रक्कम रुपये 3,50,000/- तक्रारदारांना देत असलेबाबतची हमी दिली आहे. सदर वस्तुस्थितीचा विचार करता सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना ठरलेप्रमाणे रक्कम रुपये 3,50,000/- परत केलेली नाही. याचा विचार करता सामनेवाला क्र.1 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना सदर रक्कम रुपये 3,50,000/- व्याजासह परत करावी तसेच उपरोक्त विवेचन विचारात घेता तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (8) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये संचकारापोटी दिलेली रक्कम रुपये 3,50,000/- ची व्याजासह मागणी केली आहे. तसेच, कराराप्रमाणे सदनिकेचे खरेदीपत्र करुन देणेची मागणी केली आहे. परंतु, उपरोक्त विवेचन विचारात घेता विकसन करारपत्र रद्द केले आहे. तसेच, तक्रारदार व सामनेवाला क्र.1 यांनी आपापसामध्ये रक्कम रुपये 3,50,000/- तक्रारदारांना देणेचा करार केलेला आहे. याचा विचार करता तक्रारदार हे उपरोक्त उल्लेख केलेप्रमाणे संचकाराची रक्कम व्याजासह परत मिळणेस पात्र आहेत. उपरोक्त विवेचन विचारात घेवून हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना संचाकारापोटी स्विकारलेली रक्कम रुपये 3,50,000/- (रुपये तीन लाख पन्नास हजार फक्त) द्यावी. सदर रक्कमेवर दि.01.08.2006 पासून संपूर्ण रक्कम मिळेपोवतो द.सा.द.शे.9 टक्के व्याज द्यावे. 3. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- (रुपये दहा हजार फक्त) द्यावेत. 4. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |