न्या य नि र्ण य
(दि.08-07-2024)
व्दाराः- मा. श्री अरुण रा. गायकवाड, अध्यक्ष
1. सामनेवाला यांनी भरुन दिलेल्या चुकीच्या फॉर्ममुळे तक्रारदाराच्या रिक्षाचे नोंदणीसाठी उपप्रादेशीक परिवहन अधिकारी, रत्नागिरी यांचेकडून वेळेत CNG ची नोंदणीची पूर्तता न झालेने तक्रारदाराच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणेसाठी तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथने थोडक्यात पुढीलप्रमाणे —
तक्रारदार हे रिक्षा व्यवसाय करुन त्यातून मिळणा-या उत्पन्नावर स्वत:चा व त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. सदर व्यवसायासाठी तक्रारदार यांनी नवीन रिक्षा खरेदी करणेसाठी सामनेवाला यांचेकडून दि.10/08/2021 रोजी Maxima X Wide CNG + Petrol या मॉडेलच्या बजाज रिक्षाचे एकूण रक्कम रु.2,69,783/- चे कोटेशन घेतले होते. सदर कोटेशनमध्ये रिक्षा खरेदी रक्कम, रिक्षाचे इन्शुरन्स, आरटीओ टॅक्स व अन्य खर्चाची रक्क्म अंतर्भूत होती. सदर रिक्षा खरेदी करणेसाठी तक्रारदार स्वत:जवळची रक्कम रु.50,000/- जमा केली व उर्वरित रक्कमेसाठी बँक ऑफ इंडिया, शाखा लोटे यांचेकडून कर्ज घेतले.त्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडून दि01/09/2021 रोजी रिक्षा खरेदी केली त्याचा Invoice No.2021/IR/188 असा आहे. सामनेवाला क्र.1 यांचे सांगणेवरुन तक्रारदार सदर वाहनाचे नोंदणीकरिता आरटीओ ऑफिसला वाहन घेऊन गेले असता आरटीओ ऑफिसने सदर वाहनामध्ये असलेली CNG टाकीचा रजिस्ट्रेशन नंबर फॉर्म नं.21 मध्ये चुकीचा लिहिला असलेचे सांगून वाहनाची नोंदणी केली नाही. फॉर्म नं.21 मध्ये वाहनाची माहिती भरण्याची जबाबदारी सामनेवाला क्र.1 यांची असलेने तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडे त्याबाबत विचारणा केली. त्यावेळी सामनेवाला क्र.1 यांनी पुढील वाहन नोंदणीवेळी तक्रारदारासोबत त्यांचे प्रतिनिधी पाठवून दिला व वाहनाची नोंदणी करुन वाहनास नंबर देणेची हमी दिली. आरटीओ यांचेकडे तक्रारदार पुन्हानोंदणीसाठी वाहन घेऊन गेले असता सदर वाहनाची तपासणी आरटीओ यांनी केली. तेव्हा सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास वाहनाचे नोंदणीचे काम पूर्ण झाले असलेचे सांगितले. परंतु अदयाप तक्रारदाराचे वाहनास नंबर प्राप्त झालेला नाही. दि.01/09/2021 रोजी सामनेवाला यांचेकडून वाहन खरेदी केल्यानंतर 10 महिने झाले तरी नोंदणी नंबर न मिळालेने तक्रारदारास सदर वाहनाचा वापर व्यवसायाकरिता करता येईना त्यामुळे तक्रारदाराने सदर वाहन खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचा मासिक हप्ता रक्कम रु.3,642/- भरणेसाठी तक्रारदारास खुप आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. सामनेवाला क्र.1 यांचे निष्काळजीपणामुळे तक्रारदाराची रिक्षाची नोंदणी झालेली नसल्याने तक्रारदारास मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांना दि.12/04/2022 रोजी वकीलांमार्फत कायदेशीर नोटीस पाठविली आहे. त्यानुसार सामनेवाला क्र.1 यांनी सदर वाहनाची आरटीओकडे नोंदणी केलेली आहे. तक्रारदाराचे दर दिवशीचे सरासरी उत्पन्न रु.1,000/- प्रमाणे प्रतिमहिना रु.30,000/- इतके नुकसान झालेले आहे तसेच प्रति महिना कर्जाच्या हप्त्याची रक्कम रु.3,642/- प्रमाणे 10 महिन्याचे एकूण रक्कम रु.36,420/- तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.15,000/- अशी एकूण रक्कम रु.4,01,420/- सामनेवालाकडून मिळणेसाठी प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल केला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारास योग्य तो मोबदला घेऊन वाहनाची विक्री करुन अदयापपर्यंत सदर वाहनाचे आरटीओकडे नोंदणी केलेली नाही. ही सामनेवाला क्र.1 व 2 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारास दयावयाच्या सेवेतील त्रुटी आहे. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज मंजूर करावा अशी विनंती तक्रारदाराने केली आहे.
तक्रारदाराचे त्याचे तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.6 कडे एकूण 6 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये सामनेवाला यांनी तक्रारदारास विक्री केलेल्या वाहनाची इन्व्हॉईस दाखल केली आहे, गो डिजीट जनरल इन्शुरन्स् कंपनीचे सर्टीफिकेट, वादातील वाहनाचे फोटो, तक्रारदार यांनी दि.12/04/2022 रोजी सामनेवाला यांना पाठविलेली वकीलांमार्फतची नोटीस, सदर नोटीसची पोष्टाची पोहोच पावती, तक्रारदाराचे आधारकार्ड व ड्रायव्हींग लायसन्स इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.16 कडे दोन कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये व्ही.के.वाहन यांचेकडून वाहनाचे रजिस्ट्रेशन नंबरबाबतचा मेसेज व रामा सिलेंडर्स प्रा.लि.यांचे पत्र, नि.27 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.28 कडे सामनेवाला क्र.2 कंपनीचे मॅन्यूअल बुक दाखल केले आहे. नि.30 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि43 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. नि.45 कडे सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास दिलेली पावती दाखल केली आहे.
नि.14 कडे व 20 कडे तक्रारदाराने तक्रारीमध्ये दुरुस्ती करणेसाठी व सामनेवाला क्र.2यांना आवश्यक पक्षकार म्हणून सामील करण्याबाबतचा अर्ज दिला. सदर अर्जावर युक्तीवाद ऐकूण अर्ज मंजूर करण्यात आला. त्याप्रमाणे तक्रारदाराने दुरुस्ती केली. तसेच सामनेवाला क्र.2 यांना आयोगामार्फत नोटीस पाठविण्यात आली. सामनेवाला क्र. 2 हे वकीलामार्फत याकामी हजर झाले व त्यांनी नि.26 कडे लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.
सामनेवाला क्र.1 यांनी सदर कामी वकीलांमार्फत हजर होऊन नि.11 कडे लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदारास रिक्षा वाहनाचे कोटेशन दिले होते व त्याप्रमाणे तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडून रिक्षा खरेदी केलेचे मान्य केले आहे. सदर सामनेवाला क्र.1हे बजाज कंपनीच्या व्यावसायिक वाहनाचे रत्नागिरी व सांगली साठी अधिकृत वितरक आहेत. ग्राहकांनी रिक्षा खरेदीबाबतची ऑर्डर दिली की, ती ऑर्डर सदर सामनेवाला क्र.1 हे सामनेवाला क्र.2 यांना पाठवितात. त्याप्रमाणे सामनेवाला क्र.2 हे रिक्षा उत्पादित करुन व संपूर्ण तयार करुन वितरकांकडे पाठवितात व ते वाहन वितरक ग्राहकांना देतो. वाहनाचा चेसिस नंबर, इंजिन नंबर, सिलेंडर नंबर हे सर्व फॉर्म नं.21 मध्ये भरुन सामनेवाला क्र.2 या उत्पादित कंपनीकडून येतो. सामनेवाला क्र.2 यांचेकडून वाहनाचा चेसिस नंबर, इंजिन नंबर, सिलेंडर नंबर आलेवर सदर सामनेवाला यांनी फॉर्म नं.21 भरला असून सिलेंडर नंबर चुकीचा लिहीला गेला आहे ही गोष्ट जरी मान्य असली तरी सदरची चुक ही सामनेवाला क्र.1यांचा दोष नसून ती मानवी चूक होती. सदरची चुक ही आरटीओ दुरुस्त करु शकते. त्यासाठी सदर सामनेवाला यांचे प्रतिनिधी श्री शशिकांत जाधव हे आरटीओ ऑफिसला भेट देत होते. परंतु आरटीओ ऑफिस त्यांना काही दिवसांनी या असे सांगत होते. शेवटी दि.27/04/2022 रोजी आरटीओ यांनी जुना नोंदणी फॉर्म वाहन पोर्टलवर रद्द केला व नवीन फॉर्म भरणेस सांगितले. त्यानंतर सामनेवाला क्र.1 यांनी दि.04/05/2022 रोजी नवीन नोंदणी फॉर्म भरला व दि.08/06/2022रोजी आरटीओ कार्यालयाने तक्रारदाराचे रिक्षा या वाहनाला MH-08-AQ-7433 हा नंबर दिला. तसेच तक्रारदार यांनी खरेदी घेतलेली रिक्षाला तीन सर्व्हीस फ्री असतात परंतु तक्रारदार यांना चार सर्व्हीस फ्री दिलेल्या आहेत. त्या तक्रारदाराने दि.09/10/2021, दि.30/11/2021, 15/01/2022 व 29/06/2022 रोजी घेतलेले आहे. त्यावेळी सदर वाहनाचे रनिंग हे 862, 4500, 8649 व 12450 कि.मि. इतके झाले होते. त्यामुळे सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास दयावयाच्या सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नसलेने सदरची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती सामनेवाला क्र.1 यांनी केली आहे.
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ नि.12 कडे एकूण 11 कागदपत्रे दाखल केली असून त्यामध्ये तक्रारदाराचे वाहनामध्ये CNG बसवलेबाबतचे प्रमाणपत्र, दि.17/09/2021 व दि.04/05/2022 रोजीचा फॉर्म नं.21, शशिकांत जाधव यांचे वॉटसॲपचा स्क्रिन शॉट, पहिल्या सर्व्हिसिंगची एन्ट्री व जॉब कार्ड, दुस-या सर्व्हिंसिंगचे जॉब कार्ड, तिस-या सर्व्हिसिंगची एन्ट्री व जॉब कार्ड, चौथ्या सर्व्हिसिंगची एन्ट्री व जॉब कार्ड, नि.34 इंग्रजीमध्ये व 36 कडे मराठीमध्ये पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.37 कडे शशिकांत वसंत जाधव यांचे ॲफिडेव्हीट दाखल केले आहे. नि.46 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
सामनेवाला क्र.2 यांनी नि.26 कडे दाखल केलेल्या लेखी म्हणणेमध्ये सामनेवाला यांनी तक्रारदाराची तक्रार खोटी व खोडसाळ असलेचे कथन करुन नाकारलेली आहे. सदर सामनेवाला पुढे कथन करतात की, तक्रारदाराची तक्रार पाहता तक्रारदारास रिक्षा वाहनाचे आरटीओ यांचेकडून रजिस्ट्रेशन करुन देणेची जबाबदारी ही सामनेवाला क्र.1 यांची होती. सामनेवाला क्र.1 हे वितरक असून ग्राहकांना वाहन विक्री करुन त्यांना वाहनाचे रजिस्ट्रेशन करुन देणेची जबाबदारी त्यांचीच होती. तक्रारदारास वाहनाचे रजिस्ट्रेशन करुन देणेसाठी सामनेवाला क्र.2यांचा कोणताही संबंध येत नाही. तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्रे पाहता तक्रारदारास दि.08/06/2022 रोजी वाहनाचे रजिस्ट्रेशन झालेचे दिसून येते. त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास दयावयाच्या सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार नामंजूर करुन तक्रारदारास सामनेवाला क्र.2 यांना दंडाची रक्कम रु.2,00,000/- देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ नि.39 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.40 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.47 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
4. तक्रारदार यांची तक्रार व दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे व उभयतांचा लेखी व तोंडी युक्तीवाद याचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. आयोगाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | सामनेवाला यांनी तक्रारदारास रिक्षाची नोंदणी वेळेत न करुन देऊन तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय? | होय. |
3 | तक्रारदार हे सामनेवालाकडून नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
-वि वे च न –
5. मुददा क्र.1 :- तक्रारदार यांनी रिक्षा व्यवसाय करुन त्यातून मिळणा-या उत्पन्नावर स्वत:चा व त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नवीन रिक्षा खरेदी करणेसाठी सामनेवाला क्र.1 यांचेकडून दि.10/08/2021 रोजी बजाज कंपनीची Maxima X Wide CNG + Petrol या मॉडेलच्या रिक्षाचे एकूण रक्कम रु.2,69783/- चे कोटेशन घेतले होते. तसेच नि.6/1 कडे सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास रिक्षा वाहन खरेदीचे इन्व्हॉईस दाखल केले आहे. सदर इन्व्हॉईसचे अवलोकन केले असता त्यावर तक्रारदाराचे नांव असून दि.01/09/2021 एकूण रक्कम रु.2,67,783/- चे इन्व्हॉईस असलेचे दिसून येते. तसेच नि.6/2 कडे सदर वाहनाचे गो डिजीट इन्शुरन्स कंपनीकडे विमा उतरविलेचे दिसून येते. यावरुन तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक असलेचे सिध्द होते तसेच तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये ग्राहक व सेवापुरवठादार हे नाते असलेचे सिध्द होते. तसेच सामनेवाला यांनी सदरची बाब याकामी हजर होऊन नाकारलेली नाही. त्यामुळे मुददा क्र.1 चे उत्तर या आयोगाने होकारार्थी दिले आहे.
6. मुद्दा क्र.2 :- तक्रारदार यांनी स्वत:चा व त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करिता व्यवसायासाठी सामनेवाला यांचेकडून Maxima X Wide CNG + Petrol या मॉडेलची बजाज रिक्षा रक्कम रु.2,67,783/- ला दि.01/09/2021 रोजी खरेदी घेतली. परंतु तक्रारदार जेव्हा रिक्षाच्या नोंदणीसाठी आरटीओ ऑफिसला गेले तेव्हा आरटीओ ऑफिसने सदर वाहनामध्ये असलेली CNG टाकीचा रजिस्ट्रेशन नंबर फॉर्म नं.21 मध्ये चुकीचा लिहिला असलेचे सांगून वाहनाची नोंदणी केली नाही. सदरची बाब तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांचे निदर्शनास आणून दिली. सामनेवाला क्र.1यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये सदरची बाब मान्य केली असून सामनेवाला कथन करतात की, सामनेवाला क्र.2 यांचेकडून वाहनाचा चेसिस नंबर, इंजिन नंबर, सिलेंडर नंबर आलेवर सदर सामनेवाला क्र.1 यांनी फॉर्म नं.21 भरला असून सिलेंडर नंबर चुकीचा लिहीला गेला आहे ही मानवी चूक होती असे कबूल केले आहे. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे नि.26 कडील म्हणणेमध्ये ग्राहकांना वाहन विक्री केलेनंतर वाहनाचे रजिस्ट्रेशन हे सामनेवाला क्र.1 यांनी म्हणजे वितरकांनी करुन देणेचे असते. तसेच तक्रारदाराने नि.6/1 कडे दाखल केलेले इन्व्हॉईस क्र.2021/IR/188 दि.01/09/2021 चे अवलोकन केले असता त्यामध्ये R T O Regn. Charges Rs.8,000/- घेतलेचे नमुद आहे. म्हणजेच सामनेवाला यांनी तक्रारदारास वाहनाचे रजिस्ट्रेशन करुन देणे आवश्यक होते ही बाब स्पष्ट होते. सामनेवाला यांनी तक्रारदाराचे वाहनाचे रजिस्ट्रेशन करताना CNG टाकीचा रजिस्ट्रेशन नंबर फॉर्म नं.21 मध्ये चुकीचा लिहिला त्यामुळे तक्रारदाराचे वाहनाचे रजिस्ट्रेशन होऊ शकले नाही ही बाब सामनेवाला यांनी मान्य केलेली आहे. त्यानंतर सामनेवाला यांनी आरटीओ ऑफिसकडून सदर फॉर्म रद्द करुन नवीन फॉर्म नं.21 भरला व तक्रारदाराला त्यानंतर म्हणजे दि.08/06/2022 रोजी नविन रजिस्ट्रेशन नंबर मिळाला ही बाब तक्रारदाराने नि.16 कडे दाखल केलेल्या दि.17/06/2022 रोजीच्या संदेशावरुन स्पष्ट होते. सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून रिक्षाच्या नोंदणीसाठी RTO Tax and Charges ची रक्कम रु.8,000/- घेऊनही तक्रारदारास आरटीओ, रत्नागिरी यांचेकडून वेळेत रिक्षाची नोंदणी करुन दिलेली नाही ही सामनेवालाने तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी असलेचे स्पष्ट होते.
7. वास्तविक कोणत्याही वाहनाचे नोंदणी/पासिंग झालेशिवाय वाहन खरेदीदाराचे ताब्यात द्यायचे नसते असा नियम असतानाही सामनेवालाने सदर नियमाचा भंग करुन वादातील रिक्षा नोंदणीशिवाय तक्रारदाराचे ताब्यात देऊन कायदेशीर तरतुदींचा भंग केला आहे. नोंदणी नसलेमुळे तक्रारदार यांनी वेळोवेळी सामनेवाला यांना भेटून सदर रिक्षाची नोंदणी करुन देणेची विनंती केली. परंतु सामनेवालांनी वेळोवेळी वेगवेगळी कारणे देवून रिक्षाची नोंदणी करुन देणेस टाळाटाळ केली आहे.तसेच सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये सामनेवाला यांन आरटीओ ऑफिसला वाहन रजिस्ट्रेशनसाठी दयावयाचा फॉर्म नं.21 हा चुकीचा भरला असलेचे कबुल केले आहे.
वरील सर्व मुद्दे, दाखल कागदपत्रे व विस्तृत विवेचन यांचा ऊहापोह करता सामनेवाला यांनी तक्रारदाराला वादातील रिक्षाची नोंदणी वेळेत करुन न देऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवेत त्रुटी दिलेचे स्पष्ट व सिध्द झाले आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर आयोगाने होकारार्थी दिले आहे.
9. मुद्दा क्र.3 :- वरील विवेचनात नमूद केलेप्रमाणे तक्रारदार यांना सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सदोष सेवा दिलेचे शाबीत झाले आहे. तक्रारदाराची वादातील रिक्षा नोंदणी न केलेने तक्रारदारास सदर रिक्षावर व्यवसाय करता आला नाही व तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झाले असे तक्रारदाराचे कथन आहे. त्यासाठी तक्रारदाराने नमूद वादातील रिक्षाचे व्यवसायामध्ये नेमके किती नुकसान झाले हे दाखवणेसाठी कोणताही कागदोपत्री पुरावा याकामी दाखल केलेला नाही. तक्रारदाराने तक्रारअर्जात वादातील रिक्षा नोंदणी नसलेमुळे 10 महिन्याच्या आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रु.3,00,000/- ची मागणी केली आहे. तक्रारदाराने त्याची रिक्षा नोंदणी नसलेने वापरता आली नाही असे कथन केले आहे. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदारास वाहनाच्या विक्रीपश्चात देण्यात येणारी फ्री सर्व्हीसिंग दिलेबाबतचे जॉब कार्ड याकामी नि.12 कडे दाखल केलेली असून त्याचे अवलोकन करता तक्रारदाराचे वाहनाचे पहिल्या सर्व्हिसिंगचे जॉब कार्डवर वाहन चालविलेबाबतचे रिडींग K.M. Reading-862 दुस-या सर्व्हींसिंगच्या जॉब कार्डवर K.M. Reading-4500 तिस-या सर्व्हींसिंगच्या जॉब कार्डवर K.M. Reading-8649 व चौथ्या सर्व्हींसिंगच्या जॉब कार्डवर K.M. Reading-12450 असलेचे दिसून येते. म्हणजेच तक्रारदार सदर वाहन नोंदणी नसलेने बंद न ठेवता व्यवसायाकरिता वापर करत असलेचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदारची आर्थिक नुकसानीची मागणी हे आयोग नामंजूर करीत आहे. त्याचप्रमाणे तक्रारदार यांनी वादातील रिक्षा खरेदीसाठी बँक ऑफ इंडिया या बँकेचे कर्ज काढलेले होते. तक्रारदाराला हप्त्याची प्रति महिना रक्क्म रु.3,642/- प्रमाणे 10महिन्याची कर्जाची एकूण रक्कम रु.36,420/- बँकेला अदा करावी लागली. सदरची रक्कम सामनेवालाकडून मिळावी अशी विनंती केली आहे. तथापि सदरची रक्कम सामनेवाला यांनी तक्रारदाराला अदा करणे योग्य व न्यायोचित वाटत नाही कारण कर्जाचे हप्ते व व्याज भरणेची जबाबदारी तक्रारदाराची आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
11. तसेच सामनेवालाच्या चुकीच्या कृत्यामुळे तक्रारदाराला जो मानसिक व शारिरिक त्रास झाला आहे, त्यासाठी रक्कम रु.20,000/- व अर्जाचा खर्च रु.10,000/- सामनेवाला क्र.1 व 2 कडून तक्रारदाराला मिळणे न्यायोचित होईल या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
12. प्रस्तुत कामी आम्ही मे. वरिष्ठ न्यायालयाचा खालील नमूद न्यायनिवाडा व त्यातील दंडकाचा आधार घेतला आहे.
2015 CJ (NCDRC) 883
Managing Director M/s Fortune Care Pvt. Ltd. Vs. Hari Krishan S. Hirani
Para 6 – The complainant has not been able to use the vehicle because the registration could not be done. It was the duty of petitioner to fulfill the requirements of Motor Vehicles Act before delivering the vehicle to the consumer. The impugned car was lying idle for the last 5 years i.e. since the date of its purchase in 2010 due to non-registration and inuring depreciation and parking and security cost. The revision petition should, therefore, be dismissed and the order passed by the consumer fora below upheld.
वर नमूद न्यायनिवाडयामध्ये मे. वरिष्ठ न्यायालयाने असा निर्वाळा दिला आहे की, मोटर व्हेईकल अॅक्ट (मोटर वाहन कायद्यातील) तरतुदीप्रमाणे गाडीची विक्री करणा-या डिलर/कंपनीने कायद्याप्रमाणे विक्री करणेत आले गाडीचे नोंदणी/पासिंग रजिस्ट्रेशन व पासिंग करुन देणेची सर्वस्वी जबाबदारी ही नमूद डिलर अथवा कंपनीची असते. प्रस्तुत जबाबदारी पार पाडणेत कसूर करणे म्हणजे सेवात्रुटी असते.
13. मुद्दा क्र.4 :- सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदाराला नोंदणीविना दिलेल्या रिक्षामुळे झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/-(रक्कम रुपये वीस हजार फक्त) व अर्जाचा खर्च रु.10,000/-(रक्कम रुपये दहा हजार फक्त) तक्रारदाराला अदा करावेत.
3) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
4) सामनेवाला क्र.1 व 2 यांनी विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 71 व 72 अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
5) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.