(आदेश पारीत व्दारा - श्रीमती चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 30 डिसेंबर, 2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून, तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे आहे.
2. तक्रारकर्ताने विरुध्दपक्षाकडून भूखंड क्रमांक 92, मौजा – खापरी (राजा), तालुका उमरेड, जिल्हा नागपुर, शेत सर्व्हे क्रमांक 92/1, प.ह.क्र.10, भूखंडाचे क्षेत्रफळ 1210.95 चौरस फुट एकूण रुपये 1,81,642/- ला खरेदी करण्याबाबत सौदा केला. त्यावेळी दिनांक 31.12.2010 रोजी रुपये 1,000/- नोंदणी रक्कम देवून त्याबाबत विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास रितसर पावती दिलेली आहे. परंतु, त्यावेळी विरुध्दपक्ष यांनी सदर पावत्यावर भूखंड क्रमांक 92 ऐवजी भूखंड क्र.43 तात्पुरते नमूद केले असून उर्वरीत रकमेच्या पावत्या देतांना भूखंड क्र.92 हा सर्व पावत्यांवर नमूद आहे. तकारकर्त्याने खालील ‘परिशिष्ट-अ’ प्रमाणे विरुध्दपक्ष यांना रकमा अदा केल्या असल्याचा तपशिल पुढील प्रमाणे.
‘परिशिष्ट – अ’
अ.क्र. | रक्कम दिल्याचा दिनांक | पावती क्रमांक | दिलेली रक्कम |
1) | 31.12.2010 | 2091 | 1,000/- |
2) | 18.01.2011 | 1801 | 10,000/- |
3) | 31.03.2011 | 10141 | 2,000/- |
4) | 12.05.2011 | 10069 | 20,000/- |
5) | 03.08.2011 | 10113 | 4,400/- |
6) | 20.10.2011 | 10464 | 18,000/- |
7) | 03.01.2012 | | 10,000/- |
8) | 04.01.2012 | 10957 | 10,000/- |
9) | 16.03.2012 | | 10,000/- |
10) | 09.03.2013 | 10957 | 26,157/- |
11) | 09.03.2012 | 10958 | 20,000/- |
12) | 29.06.2013 | 11196 | 20,000/- |
| | एकूण रक्क्म | 1,51,557/- |
3. तक्रारकर्त्याने वेळोवेळी ‘परिशिष्ट–अ’ प्रमाणे एकूण रक्कम रुपये 1,51,557/- विरुध्दपक्षाकडे दिले. तक्रारकर्ता पुढे असे नमूद करतो की, त्यांनी विरुध्दपक्षास उपरोक्त नमूद भूखंडा संदर्भात प्रर्याप्त रक्कम दिलेली असून उर्वरीत रक्कम रुपये 30,085/- तक्रारकर्ता विरुध्दपक्षास एकमुस्त देण्यास तयार आहे. तसेच, विरुध्दपक्ष यांनी करारातील अटी व शर्ती प्रमाणे उपरोक्त भूखंड असलेली जमीन तक्रारकर्त्याकडून प्रर्याप्त मोबदला प्राप्त झाला असल्या कारणाने मुलभुत सुविधासह विकसीत गरजेचे होते. परंतु, अद्याप पर्यंत विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याकडून उर्वरीत रक्कम स्विकारुनही भूखंडाचे कायदेशिर खरेदीखत तक्रारकर्त्याचे नावे करुन दिले नाही व भूखंडाचा प्रत्यक्ष जागेचा ताबा मुलभुत सुविधांसह तक्रारकतर्यास दिला नाही. परिणामतः विरुध्दपक्ष यांनी त्यांच्या सेवेत सेवेत त्रुटी केली असून अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास वारवांर प्रत्यक्ष भेटून भूखंडाचे कायेदशिर खरेदीखत करुन देण्याची विनंती केली, परंतु विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास वेगवेगळ्या कारणास्तव प्रत्येकवेळी प्रतिसाद देण्याचे टाळले, त्यामुळे तक्रारकर्त्याने खालील प्रमाणे प्रार्थना केली आहे.
1) विरुध्दपक्ष यांनी तक्रारकतर्यास वादातीत भूखंडाबाबत उर्वरीत रक्कम स्विकारुन मुलभूत सुविधासह भूखंड विकसीत करुन व त्याचे कायदेशिर खरेदीखत तक्रारकर्त्याचे नावे करुन द्यावे व प्रत्यक्ष जागेचा ताबा द्यावा.
2) ते जर याकरीता असमर्थ असतील तर भूखंडाचे आजच्या बाजार मुल्या एवढी रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी.
3) त्याचप्रमाणे, वार्षीक द.सा.द.शे. 18 % व्याजाने तक्रार दाखल दिनांकापासून ते प्रत्यक्ष अदायगी पर्यंत देण्याचे आदेशीत करावे.
4) विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रुपये 50,000/- द्यावे व न्यायालयीन खर्च म्हणून रुपये 20,000/- द्यावे.
4. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष यांना मंचा मार्फत दिनांक 2.8.2016 ला मंचात उपस्थित राहण्यासाठी नोटीस पाठविण्यात आली होती. परतु, ते उपस्थित झाले नाही, त्यामुळे त्याचे विरुध्द वृत्तपत्राव्दारे दिनांक 12.11.2016 रोजी नोटीस प्रसिध्द करण्यात आला, तरी सुध्दा विरुध्दपक्ष मंचात हजर झाला नाही. करीता त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश निशाणी क्र.1 वर दिनांक 23.2.2017 ला पारीत केला.
5. तक्रारकर्ता तर्फे वकीलांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारकर्ता तर्फे अभिलेखावर दाखल केलेली तक्रार व दस्ताऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : होय.
2) आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
6. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे मौजा – खापरी (राजा), ता. उमरेड, जिल्हा – नागपुर, शेत सर्व्हे नं.92/1, प.ह.क्र.10, येथील भूखंड क्रमांक 92 क्षेत्रफळ 1210.95 चौरस फुट हा एकूण रक्कम रुपये 1,81,642/- खरेदी करण्याबाबत सौदा केला. त्यानंतर, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे वेळोवेळी वरील ‘परिशिष्ट-अ’ प्रमाणे एकूण रुपये 1,51,557/- भरले आहे व करारपत्रातील ठरलेल्या अटी व शर्ती प्रमाणे उर्वरीत रक्कम रुपये 30,085/- विरुध्दपक्षाकडे जमा करुन त्यांचेकडून कायदेशिर खरेदीखत करुन घ्यावयाचे होते. विरुध्दपक्षास ठरलेल्या अटी व शर्ती प्रमाणे सदर जागा मुलभूत सुविधासह विकसीत करणे गरजेचे होते, परंतु विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचे नावे उर्वरीत रक्कम स्विकारुन कायदेशिर खरेदीखत करुन दिले नाही व सदर जागेचा ताबा देखील मुलभूत सुविधासह उपलब्ध करुन दिला नाही. यावरुन, विरुध्दपक्षाने त्यांच्या सेवेत त्रुटी केली असल्याचे व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला असल्याचे दिसून येते. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांच्यात झालेल्या करारपत्र दिनांक 19.1.2012 ची प्रत निशाणी क्र.3 नुसार दस्त क्र.1 वर जोडली आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे भरलेल्या पैशाच्या पावत्या जोडल्या आहेत, ते दस्त क्र.2 ते 13 वर दाखल आहे. यावरुन, तक्रारकर्त्याने सेवेत त्रुटी केली असल्याचे दिसून येत आहे. करीता खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याकडून वादातीत भूखंडाबाबत उर्वरीत रक्कम रुपये 30,085/- स्विकारुन मुलभूत सुविधासह तक्रारकर्त्याच्या नावे कायदेशिर खरेदीखत करुन द्यावे व जागेचा प्रत्यक्ष ताबा द्यावा.
याकरीता, विरुध्दपक्ष कायदेशिररित्या असमर्थ असल्यास सदर भूखंडाचे महाराष्ट्र शासनाचे, शासकीय नोंदणी, मुद्रांक व शुल्क विभागाचे रेडीरेकनरच्या आजच्या मुल्याप्रमाणे उपरोक्त भूखंडाचे क्षेत्रफळा एवढे येणा-या रकमेमधून भूखंडाची उर्वरीत रक्कम रुपये 30,085/- वजा करुन येणारी रक्कम तक्रारकर्त्यास देण्यात यावी.
(3) तसेच, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5,000/- द्यावे.
(4) विरुध्दपक्ष यांनी आदेशाची पुर्तता निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावी.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 30/12/2017