द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
** निकालपत्र **
(26/04/2013)
प्रस्तुतची तक्रार, तक्रारदारांनी मोबाईलच्या दुकानाच्या मालकाविरुद्ध दाखल केलेली आहे. सदर तक्रारीमधील कथने खालीलप्रमाणे आहेत.
1] तक्रारदार यांनी जाबदेणार यांचेकडून दि. 12/07/2010 रोजी मॅक्स कंपनीचा मोबाईल संच रक्कम रु. 2600/- देऊन खरेदी केला. सदरचा मोबाईल पाच दिवसांच्या आंत नादुरुस्त झाला. जाबदेणारांनी तक्रारदार यांना, जर मोबाईल संच सात दिवसांमध्ये नादुरुस्त झाला, तर नवीन मोबाईल संच मिळेल अशी खात्री दिलेली होती. त्याप्रमाणे तक्रारदार जाबदेणारांकडे मोबाईल बदलून देण्याची मागणी करण्यासाठी गेले, परंतु जाबदेणारांनी तक्रारदार यांना सदरील मोबाईल संच दुकानामध्ये जमा करुन त्याची पावती घेऊन येण्याची विनंती केली. जाबदेणारांनी दिलेल्या मोबाईलमध्ये दोन सिम कार्ड दिलेले होते. सदरचे कार्ड इतर मोबाईलमध्ये वापरता येत नव्हते. त्यामुळे तक्रारदारांचे कधीही न भरुन निघणारे नुकसान झाले आले. जाबदेणारांनी सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे, म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदारांनी जाबदेणारांकडून मोबाईल संचाची किंमत रक्कम रु. 2600/-, नुकसान भरपाई व दाव्याच्या खर्चाची मागणी केलेली आहे.
2] जाबदेणार यांना नोटीस पाठविली असता, त्यांनी सदरची नोटीस घेण्यास नकार दिला म्हणून त्यांच्याविरुद्ध एकतर्फा चोकशीचा आदेश करण्यात आला. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत शपथपत्र, मोबाईलची पावती, वॉरंटी कार्ड, नोटीशीची स्थळप्रत इ. कागदपत्रे दाखल केलेले आहेत.
3] तक्रारदारांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, लेखी व तोंडी युक्तीवाद विचारात घेतले असता खालील मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. सदरचे मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालीलप्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | निष्कर्ष |
1 | जाबदेणार यांनी तक्रारदार यांना नादुरुस्त मोबाईल संच देऊन सेवेत कमतरता केलेली आहे का? | होय |
2 | आदेश काय? | तक्रार अंशत: मंजूर |
कारणे :
4] या प्रकरणामध्ये जाबदेणार गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या वतीने कोणताही कागदोपत्री किंवा अन्य कुठलाही पुरावा दाखल करण्यात आलेला नाही. तक्रारदारांनी तक्रारीसोबत त्यांचे शपथपत्र, मोबाईलची पावती, वॉरंटी कार्ड, नोटीशीची स्थळप्रत इ. कागदपत्रे दाखल केलेले आहेत. या कागदपत्रांवरुन असे दिसून येते की, तक्रारदारांनी सदरचा मोबाईल संच रक्कम रु. 2600/- देऊन खरेदी केलेला होता. सदर मोबाईल संच नादुरुस्त झाल्यामुळे तक्रारदार यांनी जाबदेणार यांना नोटीस पाठविली, परंतु जाबदेणार यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सदरचा मोबाईल सर्व्हिस स्टेशनमध्ये जमा करण्यास सांगितले. परंतु ज्यावेळी तक्रारदार सर्व्हिस स्टेशनमध्ये गेले, त्यावेळी त्यांना असे समजले की, सदरचा मोबाईल हा अधिकृत वितरकाकडून खरेदी केलेला नाही, म्हणून तक्रारदार यांना सदरचा मोबाईल बदलून मिळणार नाही. अशा परिस्थितीमध्ये जाबदेणार यांनी सेवेमध्ये कमतरता केलेली आहे, हे सिद्ध होते. तक्रारदारांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदोपत्री पुरावा खोडून काढण्यासाठी जाबदेणार यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सबब, तक्रारदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीतील कथने, कागदपत्रे व शपथपत्र यांचा विचार करुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणारांनी तक्रारदारांना दिलेल्या सेवेमध्ये त्रुटी
ठेवलेली आहे, त्यासाठी जाबदेणार यांनी तक्रारदारांना
मोबाईल संचाची किंमत रक्कम रु.2,600/- (रु. दोन
हजार सहाशे फक्त) या आदेशाची प्रत मिळाल्यापासून
एका महिन्याचा आंत द्यावेत.
3. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना मानसिक व शारीरिक
त्रासापोटी रक्कम रु. 500/-(रु. पाचशे फक्त) व रक्कम
रु. 300/- (रु. तीनशे फक्त) प्रकरणाच्या खर्चापोटी या
आदेशाची प्रत मिळाल्यापासून एका महिन्याचा आंत द्यावेत.
4. आदेशाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.