::निकालपत्र::
(पारीत व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या )
(पारीत दिनांक–09 मार्च, 2018)
01. तक्रारकर्त्याने मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष बिल्डर फर्म विरुध्द बयानापत्रा प्रमाणे नमुद भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून न दिल्याचे कारणावरुन ही तक्रार दाखल केली आहे.
02. तक्रारकर्त्याचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष क्रं-(1) आधार रियॉलिटीज ही भूखंड विक्री करणारी एक फर्म असून, विरुध्दपक्ष क्रं-(2) ते (5) हे त्या फर्मचे संचालक आहेत. (विरुध्दपक्ष क्रं-5 यांचे तक्रार चालू असताना निधन झाल्याने त्यांचे नाव तक्रारीतून वगळण्यात आले) विरुध्दपक्ष आधार रियॉलिटीज फर्मचे कार्यालय हे सिताबर्डी नागपूर येथे असून, फर्मव्दारे माहवारी किस्तीने भूखंडाची विक्री केल्या जाते. सध्या फर्मचे कार्य हे विरुध्दपक्ष क्रं-(4) व क्रं-(5) यांचे राहते घरातून पार पाडल्या जात आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष फर्मचे प्रस्तावित मौजा बेंडोली, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर येथील खसरा क्रं-31, पटवारी हलका क्रं-13 मधील भूखंड क्रं-3-ए, एकूण क्षेत्रफळ 1452.60 चौरसफूट, प्रतीचौरसफूट दर रुपये-125/- प्रमाणे एकूण रुपये-1,81,575/- मध्ये विकत घेण्याचे बयानापत्र सन-2008 मध्ये केलेआणि बयानापत्राचे वेळी तक्रारकर्त्या कडून इसारा दाखल रुपये-91,575/- विरुध्दपक्ष फर्मला प्राप्त झाल्याची बाब मान्य करण्यात आली. भूखंडाची उर्वरीत रक्कम प्रतीमाह रुपये-3750/- प्रमाणे एकूण-24 मासिक किस्तीं मध्ये दिनांक-28/03/2008 पासून ते दिनांक-28/03/2010 पर्यंत देण्याचे मान्य करण्यात आले. प्लॉट अकृषक करणे व विक्रीपत्र रजिस्ट्रीचा खर्च हा प्लॉट घेणा-याकडे राहिल असेही बयानापत्रत नमुद आहे.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने बयानापत्रा प्रमाणे करारातील भूखंडापोटी विरुध्दपक्ष फर्म मध्ये वेळोवेळी दिनांक-13/04/2008 पासून ते दिनांक-13/03/2010 पर्यंत एकूण रुपये-1,77,825/- जमा केलेत व पावत्या प्राप्त केल्यात.
तक्रारकर्त्याचे असेही म्हणणे आहे की, त्याने करार केलेल्या ले आऊट मधील जमीनीचे मालकी हक्क विरुध्दपक्ष फर्मचे नव्हते, विरुध्दपक्ष फर्म तर्फे फक्त मूळ शेत जमीन मालका सोबत जमीन खरेदी बाबत फक्त करारनामा करण्यात आलेला होता, करारनाम्याच्या आधारे विरुध्दपक्ष फर्म तर्फे भूखंड विक्रीचे करार करण्यात आल्याने तक्रारकर्त्याला त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने मानसिक धक्का बसला. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष फर्मचे सिताबर्डी नागपूर स्थित कार्यालयात जाऊन भेट घेतली असता विरुध्दपक्षाने त्या ले आऊट मधील भूखंडा ऐवजी अन्य ले आऊट मधील भूखंड विक्री करुन देण्याचे आश्वासित केले. त्यानंतर जुलै, 2011 मध्ये तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाचे बर्डी येथील कार्यालयास भेट दिली असता ते कार्यालय विरुध्दपक्ष क्रं-4) व क्रं-5) यांचे राहत्या घरी हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं 2 ते 5 यांचेशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क केला असता त्यांनी योग्य तो प्रतिसाद न दिल्याने तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षांचे विरोधात सिताबर्डी पोलीस स्टेशन येथे दिनांक-31/10/2013 रोजी तक्रार नोंदवली. त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं-3) व क्रं-5) यांनी पोलीसां समोर तक्रारकर्त्याने भूखंडा पोटी जमा केलेली रक्कम 03 महिन्यात परत करण्या बाबत लेखी समझोता पत्र लिहून देऊन तक्रार मागे घेण्यास प्रवृत्त केले. परंतु पुढे भ्रमणध्वनी सुध्दा घेणे विरुध्दपक्षानीं बंद केले म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) ते 5) यांना दिनांक-30/07/2014 रोजी नोंदणीकृत डाकेने कायदेशीर नोटीस पाठविली परंतु ती नोटीस विरुध्दपक्षानीं न स्विकारल्याने पोस्टाचे शे-यासह परत आली म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष सादर करुन पुढील मागण्या केल्यात-
(1) विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-5) यांनी तक्रारकर्त्या कडून करारातील भूखंडापोटी वेळोवेळी स्विकारलेली एकूण रक्कम रुपये-1,77,825/-दिनांक-13/03/2010 पासून वार्षिक 18% व्याजासह परत करण्याचे विरुध्दपक्षास आदेशित व्हावे.
(2) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-25,000/- तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-15000/- विरुध्दपक्षा कडून देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं-(2) सौ.मृदुला अनिल टेंभूर्णे आणि विरुध्दपक्ष क्रं-(3) अनिल वसंतराव टेंभूर्णे यांचे नावे दैनिक नवभारत दिनांक-21 जुलै, 2015 रोजीच्या अंकातून जाहिर नोटीस प्रकाशित करण्यात आली, सदर नोटीसचे वृत्तपत्रीय कात्रण अभिलेखावर दाखल आहे परंतु अशी जाहिर नोटीस प्रकाशित होऊनही विरुध्दपक्ष क्रं-(2) व क्रं-(3) तर्फे कोणीही अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष हजर झाले नाहीत वा दोघानींही आपले लेखी निवेदनही सादर केले नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं-(2) व क्रं-(3) विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश अतिरिक्त ग्राहक मंचाने दिनांक-10/09/2015 रोजी पारीत केला.
04. विरुध्दपक्ष क्रं-(4) श्रीमती विजयालक्ष्मी नागेश्वरराव नायडू हिने प्रतिज्ञालेखावर आपले लेखी उत्तर दाखल केले, तिने सदर तक्रार ग्राहक मंचा समक्ष चालू शकत नसल्या बाबत प्राथमिक आक्षेप घेऊन असे नमुद केले की, तक्रारकर्त्याने भूखंड खरेदी बाबत कोणताही करार केलेला नसल्याने तो ग्राहक या सज्ञेत मोडत नसल्याने तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. विरुध्दपक्ष क्रं- 3) व क्रं-5) यांनी तक्रारकर्त्याला जे लेखी समझोता पत्र लिहून दिले, त्या प्रमाणे कारवाई न झाल्यास तक्रारकर्त्याला दिवाणी न्यायालयात जाऊन तेथेच दाद मागता येते. विरुध्दपक्ष क्रं-(3) श्री अनिल वसंतराव टेंभूर्णे व विरुध्दपक्ष क्रं-(5) श्री नागेश्वरराव व्ही.नायडू हे विरुध्दपक्ष क्रं-1) फर्म आभार रियॉलिटीजचे कार्यकारी संचालक कधीही नव्हते, तर ते फक्त त्यांच्या पत्नींना म्हणजे विरुध्दपक्ष क्रं-(2) सौ.मृदुला अनिल टेंभूर्णे आणि विरुध्दपक्ष क्रं-(4) सौ.विजयालक्ष्मी नागेश्वरराव नायडू हयांना फर्मचे व्यवस्थापन सुचारु चालावे म्हणून मदत करीत होते. तक्रारकर्त्या कडून विरुध्दपक्ष क्रं-(4) हिने कधीही किस्तीची रक्कम स्विकारलेली नाही, तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे दिलेली रक्कम, पावत्या इत्यादी माहिती अभावी नाकबुल केले. विरुध्दपक्ष क्रं-(4) हिने तक्रारकर्त्याला कधीही अन्य ले आऊट मधील भूखंडाची विक्री करुन देण्याचे आश्वासन दिले नव्हते. तक्रारकर्त्याने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली होती परंतु कोणताही पुरावा नसल्याने विरुध्दपक्ष क्रं-(2) व क्रं-(4) विरुध्द गुन्हा नोंदविल्या गेला नाही. विरुध्दपक्ष क्रं-(1) फर्म आणि विरुध्दपक्ष क्रं-(2) व क्रं-(4) यांचेशी तक्रारकर्त्याचा कोणताही करार झालेला नाही, त्यामुळे तक्रारकर्ता हा ग्राहक होत नाही. समझोतापत्रा नुसार कार्यवाही न झाल्यास त्या संबधीचे अधिकारक्षेत्र हे फक्त दिवाणी न्यायालयासच येते, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र असल्याचे विरुध्दपक्ष क्रं-(4) हिने नमुद केले.
05. तक्रारकर्त्याने प्रतीउत्तरात विरुध्दपक्ष क्रं-(3) श्री अनिल वसंतराव टेंभूर्णे व विरुध्दपक्ष क्रं-(5) श्री नागेश्वरराव व्ही.नायडू हे विरुध्दपक्ष क्रं-1) फर्म आभार रियॉलिटीजचे कार्यकारी संचालक कधीही नव्हते हे विरुध्दपक्ष क्रं-(4) श्रीमती विजयालक्ष्मी नागेश्वरराव नायडू हिने उत्तरात केलेले विधान नाकारले, तक्रारकर्त्याने असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं-(2) सौ.मृदुला अनिल टेंभूर्णे आणि विरुध्दपक्ष क्रं-(4) सौ.विजयालक्ष्मी नागेश्वरराव नायडू हया आधार रियॉलिटीज फर्मच्या संचालीका असून त्यांचे पती अनुक्रमे विरुध्दपक्ष क्रं-(3) श्री अनिल वसंतराव टेंभूर्णे व विरुध्दपक्ष क्रं-(5) श्री नागेश्वरराव व्ही.नायडू हे त्या फर्मचे कार्यकारी संचालक आहेत. तक्रारकर्त्याने बयानापत्र सोबत जोडलेले आहे, तसेच पेमेंटच्या रसिदा सुध्दा जोडलेल्या असल्याचे नमुद केले.
06. तक्रारकर्त्याने निशाणी क्रं 3 वरील यादी नुसार दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात ज्यामध्ये प्रामुख्याने विरुध्दपक्ष फर्म तर्फे तक्रारकर्त्याचे नावे लिहून दिलेल्या बयानापत्राची प्रत, विरुध्दपक्ष फर्म तर्फे त्याला दिलेल्या पावत्यांच्या प्रती, भूखंडाचे मासिक किस्ती जमा केल्या बाबत नोंदीचा दस्तऐवज, पोलीस स्टेशन मध्ये दिलेली तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-(3) श्री अनिल वसंतराव टेंभूर्णे व विरुध्दपक्ष क्रं-(5) श्री नागेश्वरराव व्ही.नायडू यांनी तक्रारकर्त्याचे नावे लिहून दिलेले समझोता पत्र, तक्रारकर्त्याने पाठविलेली कायदेशीर नोटीस व पोस्टाच्या पावत्या अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला.
07. विरुध्दपक्ष क्रं-(4) सौ.विजयालक्ष्मी नागेश्वरराव नायडू हिने लेखी उत्तरा सोबत लेखी युक्तीवाद दाखल केला, अन्य कोणतेही दस्तऐवज दाखल केले नाहीत.
08. तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री घुग्गुसकर यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. विरुध्दपक्षा तर्फे मौखीक युक्तीवादाचे वेळी कोणीही उपस्थित नव्हते.
09. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-(4) सौ.विजयालक्ष्मी नागेश्वरराव नायडू हिचे लेखी उत्तर तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजांच्या प्रती इत्यादींचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले त्यावरुन अतिरिक्त न्यायमंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
::निष्कर्ष::
10. तक्रारकर्त्याने (“विरुध्दपक्ष” म्हणजे आधार रियॉलिटीज प्रायव्हेट लिमिटेड नोंदणी क्रं-U45201 MH 2006 PTC 163603 मुख्य कार्यालय-465, गुरुछाया भवन, बुटी मार्ग, सिताबर्डी नागपूर आणि तिचे तर्फे तिचे संचालक विरुध्दपक्ष क्रं-(2) सौ.मृदुला अनिल टेंभूर्णे व क्रं-(4) सौ.विजयालक्ष्मी नागेश्वरराव नायडू असे समजण्यात यावे) विरुध्दपक्ष फर्मचे प्रस्तावित मौजा बेंडोली, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर येथील खसरा क्रं-31, पटवारी हलका क्रं-13 मधील भूखंड क्रं-3-ए, एकूण क्षेत्रफळ 1452.60 चौरसफूट, प्रतीचौरसफूट दर रुपये-125/- प्रमाणे एकूण रुपये-1,81,575/- मध्ये विकत घेण्याचे बयानापत्र सन-2008 मध्ये केले आणि बयानापत्राचे वेळी तक्रारकर्त्या कडून इसारा दखल रुपये-91,575/- विरुध्दपक्ष फर्मला प्राप्त झाल्याची बाब बयानापत्रात मान्य करण्यात आली. भूखंडाची उर्वरीत रक्कम प्रतीमाह रुपये-3750/- प्रमाणे एकूण-24 मासिक किस्तीं मध्ये दिनांक-28/03/2008 पासून ते दिनांक-28/03/2010 पर्यंत देण्याचे बयानापत्रात नमुद करण्यात आले. प्लॉट अकृषक करणे व विक्रीपत्र रजिस्ट्रीचा खर्च हा प्लॉट घेणा-याकडे राहिल असेही बयानापत्रात नमुद केलेले आहे. तक्रारकर्त्याने पुराव्यार्थ सदर बयानापत्राची प्रत अभिलेखावर दाखल केली यावरुन त्याचे कथनास पुष्टी मिळते.
11. तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने बयानापत्रा प्रमाणे करारातील भूखंडापोटी विरुध्दपक्ष फर्म मध्ये वेळोवेळी दिनांक-13/04/2008 पासून ते दिनांक-13/03/2010 पर्यंत एकूण रुपये-1,77,825/- जमा केलेत व पावत्या प्राप्त केल्यात, या आपल्या म्हणण्याचे पुराव्यार्थ त्याने विरुध्दपक्ष फर्म तर्फे निर्गमित पावत्यांच्या प्रती दाखल केल्यात, यावरुन त्याने विरुध्दपक्ष फर्म मध्ये करारातील भूखंडापोटी एकूण रुपये-1,77,825/- जमा केल्याची बाब सिध्द होते.
12. येथे नमुद करणे आवश्यक आहे की, प्रस्तुत तक्रार अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष चालू असताना विरुध्दपक्ष क्रं-(4) सौ.विजयालक्ष्मी नागेश्वरराव नायडू हिने दिनांक-04/07/2015 रोजीची पुरसिस दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्ष क्रं-(5) श्री नागेश्वरराव व्ही.नायडू (तिचे पती) यांचे निधन जानेवारी-2015 मध्ये झाल्याचे नमुद केले, त्यानुसार अतिरिक्त ग्राहक मंचाचे दिनांक-01/10/2015 रोजीचे आदेशा नुसार विरुध्दपक्ष क्रं-(5) श्री नागेश्वरराव व्ही.नायडू यांचे नाव तक्रारी मधून वगळण्यात आले.
13. विरुध्दपक्ष क्रं-(4) श्रीमती विजयालक्ष्मी नागेश्वरराव नायडू हिने लेखी उत्तराव्दारे प्रथम प्राथमिक आक्षेपात असे नमुद केले की, तक्रारकर्त्याने भूखंड खरेदी बाबत कोणताही करार केलेला नसल्याने तो “ग्राहक” या सज्ञेत मोडत नसल्याने तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
या आक्षेपाचे संदर्भात मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत विरुध्दपक्ष फर्म तर्फे लिहून दिलेल्या बयानापत्राची प्रत पुराव्यार्थ दाखल केलेली आहे, त्यावरुन सदर फर्म ही नोंदणीकृत फर्म असल्याची बाब सुध्दा दिसून येते आणि ज्याअर्थी विरुध्दपक्ष फर्म तर्फे एका भागीदाराने जरी एखाद्दे कृत्य केले असेल तर ती फर्म रजिस्टर्ड असो अथवा रजिस्टर्ड नसो त्या कृत्यासाठी सर्व भागीदारांची एक सारखी जबाबदारी येते अशी भागीदारी कायद्दा नुसार कायदेशीर तरतुद आहे. विरुध्दपक्ष फर्म तर्फे तक्रारकर्त्याला भूखंडाचे बयानापत्र लिहून दिलेले असल्याने तसेच भूखंडापोटी रकमा मिळाल्या बाबत पावत्या निर्गमित केलेल्या असल्याने तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक होत असल्याने ही तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र हे अतिरिक्त ग्राहक मंचास येते, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-(4) हिने घेतलेला आक्षेप फेटाळण्यात येतो.
14. विरुध्दपक्ष क्रं-(4) श्रीमती विजयालक्ष्मी नागेश्वरराव नायडू हिने लेखी उत्तराव्दारे दुसरा प्राथमिक आक्षेप असाही घेतला की, विरुध्दपक्ष क्रं-(3) श्री अनिल वसंतराव टेंभूर्णे व विरुध्दपक्ष क्रं-(5) श्री नागेश्वरराव व्ही.नायडू (तिचे पती) हे विरुध्दपक्ष क्रं-1) फर्म आभार रियॉलिटीजचे कार्यकारी संचालक कधीही नव्हते, तर ते फक्त त्यांच्या पत्नींना म्हणजे अनुक्रमे विरुध्दपक्ष क्रं-(2) सौ.मृदुला अनिल टेंभूर्णे आणि विरुध्दपक्ष क्रं-(4) सौ.विजयालक्ष्मी नागेश्वरराव नायडू हयांना फर्मचे व्यवस्थापन सुचारु चालावे म्हणून मदत करीत होते. विरुध्दपक्ष क्रं-(3) श्री अनिल वसंतराव टेंभूर्णे व विरुध्दपक्ष क्रं-(5) श्री नागेश्वरराव व्ही.नायडू (तिचे पती) हे विरुध्दपक्ष क्रं-(1) आधार रियॉलिटीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक नव्हते या आपल्या कथनाचे पुष्टयर्थ विरुध्दपक्ष क्रं-(4) सौ.विजयालक्ष्मी नायडू हिने कोणताही पुरावा दाखल दस्तऐवज दाखल केलेला नाही. तसेच तक्रारकर्त्याने प्रतीउत्तरा मध्ये विरुध्दपक्ष क्रं-(4) हिने केलेले उपरोक्त विधान नाकारलेले असून विरुध्दपक्ष क्रं-(3) श्री अनिल वसंतराव टेंभूर्णे व विरुध्दपक्ष क्रं-(5) श्री नागेश्वरराव व्ही.नायडू हे त्या फर्मचे कार्यकारी संचालक असल्याचे नमुद केले. आता विरुध्दपक्ष क्रं-(5) श्री नागेश्वरराव नायडू यांचे निधन झालेले असल्याने त्यांचे विरुध्द कोणताही आदेश देता येणार नाही.
या आक्षेपा संदर्भात मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, दिनांक-02/01/2014 रोजी तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष क्रं-(3) श्री अनिल वसंतराव टेंभूर्णे व क्रं-5) श्री नागेश्वरराव नायडू यांनी स्टॅम्प पेपरवर जे समझोतापत्र लिहून दिले त्यामध्ये त्यांनी नमुद केले आहे की, ते अनुक्रमे विरुध्दपक्ष क्रं-(2) सौ.मृदुला अनिल टेंभूर्णे आणि विरुध्दपक्ष क्रं-(4) श्रीमती विजयालक्ष्मी नागेश्वरराव नायडू यांचे पती आहेत आणि विरुध्दपक्ष क्रं-(2) सौ. मृदुला अनिल टेंभूर्णे व विरुध्दपक्ष क्रं-(4) श्रीमती विजयालक्ष्मी नागेश्वरराव नायडू हया आधार रियॉलिटीज फर्मच्या संचालीका असून, विरुध्दपक्ष क्रं-(3) श्री अनिल वसंतराव टेंभूर्णे व विरुध्दपक्ष क्रं-5) श्री नागेश्वरराव नायडू हे पत्नींना मदत म्हणून फर्मचे कार्य पाहत आहेत. यावरुन असे दिसून येते की, विरुध्दपक्ष क्रं-(1) आधार रियॉलिटीज फर्मच्या संचालिका म्हणून विरुध्दपक्ष क्रं-(2) सौ.मृदुला अनिल टेंभूर्णे आणि विरुध्दपक्ष क्रं-(4) श्रीमती विजयालक्ष्मी नागेश्वरराव नायडू आहेत, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-(4) हिने घेतलेल्या या आक्षेपा मध्ये मंचास तथ्य दिसून येते.
15. विरुध्दपक्ष क्रं-(4) श्रीमती विजयालक्ष्मी नागेश्वरराव नायडू हिने लेखी उत्तराव्दारे तिसरा प्राथमिक आक्षेप असाही घेतला की, विरुध्दपक्ष क्रं- 3) श्री अनिल वसंतराव टेंभूर्णे व विरुध्दपक्ष क्रं-5) श्री नागेश्वरराव नायडू यांनी तक्रारकर्त्याला जे लेखी समझोता पत्र लिहून दिले, त्या प्रमाणे कारवाई न झाल्यास तक्रारकर्त्याला दिवाणी न्यायालयात जाऊन तेथेच दाद मागता येते.
या आक्षेपा संदर्भात अतिरिक्त ग्राहक मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, केवळ लिहून दिलेले आपसी समझोतापत्रच या तक्रारीचा भाग नाही आणि दुसरी बाब अशी आहे विरुध्दपक्ष फर्म तर्फे तक्रारकर्त्याचे नावे बयानापत्र लिहून देण्यात आलेले आहे, तसेच रकमा स्विकारल्या बाबत विरुध्दपक्ष फर्म तर्फे पावत्या सुध्दा तक्रारकर्त्याचे नावे निर्गमित करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक होत असून त्या संबधीचे तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र अतिरिक्त ग्राहक मंचास येते. अशापरिस्थितीत आपसी समझोता पत्रा प्रमाणे कारवाई न झाल्यास केवळ दिवाणी न्यायालयात जाऊन तेथेच दाद मागता येऊ शकते हा विरुध्दपक्ष क्रं-(04) श्रीमती विजयालक्ष्मी नायडू हिने घेतलेला आक्षेप मान्य होण्या सारखा नाही कारण की, समझोता पत्रा प्रमाणे या प्रकरणात कुठलीच कार्यवाही घडलेली नाही, त्यामुळे ग्राहक मंचास तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र येते.
16. तक्रार मुदतीत दाखल आहे या संदर्भात हे ग्राहक मंच पुढील मा.वरिष्ठ न्यायालयाच्या निवाडयावर आपली भिस्त ठेवीत आहे-
“Juliet V. Quadros-Versus-Mrs.Malti
Kumar & Ors.” - 2005(2) CPR-1 (NC).
उपरोक्त मा.वरिष्ठ न्यायालयाचे निवाडयां मध्ये असे नमुद केले आहे की, जर भूखंडाचा विकास करणारा विकासक करारा प्रमाणे भूखंडाचा कब्जा संबधित ग्राहकास देण्यास किंवा त्याने जमा केलेली रक्कम परत करण्यास असमर्थ ठरला तर तक्रार दाखल करण्यास सतत कारण (Continuous cause of action) घडत असते. मा. राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयात असेही नमुद केले आहे की, जर भूखंडाचा विकास करण्यास विकासक/बांधकाम व्यवसायिक काही प्रयत्न करीत नसेल किंवा त्याठिकाणी कुठलेच बांधकाम होत नसेल तर खरेदीदारास मासिक हप्ते नियमित भरणे अपेक्षित नाही. त्यामुळे असा आक्षेप जर विरुध्दपक्ष घेत असेल तर त्या आक्षेपाचा कुठलाही विचार करण्याची गरज नसते.
17. विरुध्दपक्ष फर्मचे मालकीची शेत जमीन नसताना आणि मूळ शेतमालका सोबत फक्त खरेदीचा व्यवहार झालेला असताना भूखंडाचे विक्रीचे करार करणे, बयानापत्र लिहून देणे, संबधित ग्राहका कडून भूखंडापोटी रकमा स्विकारुन पुढे विक्री संदर्भात कोणतीही कार्यवाही न करणे ही विरुध्दपक्ष फर्म तर्फे केलेली फसवणूक आहे आणि पुढे बयानापत्रा प्रमाणे भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून न दिल्याने तक्रारकर्त्याला निश्चीतच शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. बयानापत्रातील जमीनीची मालकीच विरुध्दपक्ष फर्मची झालेली नसल्याने तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष फर्म मध्ये करारातील भूखंडापोटी वेळोवेळी जमा केलेली एकूण रक्कम रुपये-1,77,825/- (अक्षरी रुपये एक लक्ष सत्त्यात्तर हजार आठशे पंचविस फक्त) शेवटची मासिक किस्त अदा केल्याचा दिनांक-13/03/2010 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह परत मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे, त्याच बरोबर तक्रारकर्त्याल झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- विरुध्दपक्ष क्रं-1) फर्म आणि तिचे तर्फे संचालक म्हणून विरुध्दपक्ष क्रं-(2) सौ.मृदुला अनिल टेंभूर्णे व क्रं-(4) श्रीमती विजयालक्ष्मी नायडू श्रीमती विजयालक्ष्मी नायडू यांचे कडून मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे.
18. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
1) तक्रारकर्ता श्री नरेश ईश्वर सोनटक्के यांची, विरुध्दपक्ष क्रं-(1) आधार रियॉलिटीज प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर या फर्म तर्फे तिचे संचालक विरुध्दपक्ष क्रं-(2) सौ.मृदुला अनिल टेंभूर्णे आणि विरुध्दपक्ष क्रं-(4) श्रीमती विजयालक्ष्मी नागेश उर्फ नागेश्वरराव नायडू यांचे विरुध्दची तक्रार वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
2) “उपरोक्त नमुद विरुध्दपक्षांना ” आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष फर्म मध्ये करारातील भूखंडापोटी वेळोवेळी जमा केलेली एकूण रक्कम रुपये-1,77,825/- (अक्षरी रुपये एक लक्ष सत्त्यात्तर हजार आठशे पंचविस फक्त) शेवटची मासिक किस्त अदा केल्याचा दिनांक-13/03/2010 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह येणारी रक्कम तक्रारकर्त्याला परत करावी.
3) “उपरोक्त नमुद विरुध्दपक्षांना ” असेही आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) तक्रारकर्त्यास द्दावेत.
4) विरुध्दपक्ष क्रं-(3) श्री अनिल वसंतराव टेम्भूर्णे याने स्टॅम्प पेपरवरील समझोता पत्रात तो विरुध्दपक्ष फर्म मध्ये संचालिका म्हणून असलेली त्याची पत्नी सौ.मृदुला अनिल टेम्भूर्णे हिचे कामात मदत करतो असे लिहून दिलेले असल्याने विरुध्दपक्ष क्रं-(3) विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
5) विरुध्दपक्ष क्रं-(5) श्री नागेश्वरराव उर्फ नागेश व्ही. नायडू यांचे तक्रार चालू असताना निधन झालेले असल्याने व त्यांचे नाव तक्रारीतून वगळण्यात आलेले असल्याने त्यांचे विरुध्द कोणताही आदेश देण्याचे प्रयोजन उदभवत नाही.
6) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(1) आधार रियॉलिटीज प्रायव्हेट लिमिटेड या फर्म तर्फे तिचे संचालक विरुध्दपक्ष क्रं-(2) सौ. मृदुला अनिल टेंभूर्णे आणि विरुध्दपक्ष क्रं-(4) श्रीमती विजयालक्ष्मी नागेश उर्फ नागेश्वरराव नायडू यांनी “वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या” निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे.
7) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.