श्रीमती स्मिता चांदेकर, मा. सदस्या यांचे आदेशांन्वये.
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अन्वये वि.प.ने त्याला दिलेल्या सेवेतील त्रुटीकरीता दाखल केली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे.
2. तक्रारकर्ता हा उपरोक्त पत्यावर राहतो. वि.प. ही कुरीयर सर्व्हीस देण्याचा व्यवसाय करणारे प्रस्थान आहे. तक्रारकर्त्याने दि.19.04.2016 रोजी एका स्पॉय ग्लॉस कॅमेरा किंमत रु.22,000/- चे पार्सल लखनौ येथे कुणी समीर यास पोहचविण्यासाठी रु.2,000/- चे सेवा शुल्क भरुन वि.प.कडे पार्सल बुक केले. त्यानुसार उभय पक्षात असे ठरले होते की, वि.प. हे सदर पार्सल बुक करण्यात आलेल्या व्यक्तीला पोहचवून त्याचेकडून रु.22,000/- स्विकारतील व ती रक्कम तक्रारकर्त्याला आणून देतील. त्याकरीता तक्रारकर्त्याने रु.2,000/- वि.प.ला दिले होते व त्याबाबतची पावती वि.प. एजंट पंकज नेवारे यांनी दिली होती. तक्रारकर्ता पुढे असे नमूद करतो की, वि.प.ने ठरल्याप्रमाणे सदर पार्सल ठरलेल्या व्यक्तीस पोहचविले व त्याच्याकडून रु.22,000/- घेतले. त्यानंतर तक्रारकर्त्याने वि.प.सोबत संपर्क साधला असता वि.प.ने तक्रारकर्त्याला रक्कम देण्यास नकार दिला व त्याला सांगितले की, त्याला सदर व्यक्ती समीरकडून रक्कम मिळाली नाही. परंतू तक्रारकर्त्याला इंटरनेट अहवाल प्राप्त झाला होता व त्यानुसार वि.प.ने सदर पार्सल समीर या व्यक्तीस पोहचवून त्याच्याकडून तक्रारकर्त्याला देण्याकरीता रु.22,000/- स्विकारले होते. वि.प.हा केवळ तक्रारकर्त्याची रक्कम हडप करण्याच्या उद्देशाने तक्रारकर्त्याला रक्कम परत देण्यास नकार देत आहे. पार्सल स्विकारणा-या व्यक्ती समीरने वि.प.ला रु.22,000/- दिले नसते तर वि.प.ने त्याला कॅश ऑन डिलीवरी प्रक्रीयेत रक्कम स्विकारल्याशिवाय पार्सल दिले असता ती त्याच्या सेवेतील त्रुटीच आहे. तक्रारकर्ता पुढे असे नमूद करतो की, वि.प.ने त्याला पार्सलची रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे त्याने वि.प.विरुध्द पो.स्टे.हुडकेश्वर येथे तक्रार केली असता पोलिसांनी त्याला सदर प्रकरण अदखल पात्र असल्यामुळे न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार वि.प.विरुध्द दाखल केली असून वि.प.ने स्विकारलेली कॅमे-याच्या मोबदल्याची रक्कम रु.22,000/- तक्रारकर्त्याला देण्याचा आदेश व्हावा, तसेच वि.प.ने केलेल्या सेवेतील त्रुटीकरीता नुकसान भरपाई रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.8,000/- वि.प.कडून मिळावे अशी विनंती केली आहे.
3. मंचाद्वारे पाठविलेली नोटीस प्राप्त झाली असता वि.प.ने नि.क्र. 8 वर त्याचे लेखी उत्तर दाखल केले असून तक्रारकर्त्याच्या तक्रारीस सक्त विरोध केला आहे. वि.प.ने ही बाब मान्य केली आहे की, तक्रारकर्त्याने दि.19.04.2016 रोजी Spy Glasses Camera चे पार्सल लखनौ येथे समीर नावाच्या व्यक्तीस देण्याकरीता कॅश ऑन डिलीवरी तत्वावर बुक केले होते. वि.प.पुढे असे कथन करतो की, तक्रारकर्त्याने सदर पार्सल बुक केले तेव्हा तो त्याचे कार्यालयात उपस्थित नव्हता व त्याचा कार्यालयीन मुलगा होता. कार्यालयात आल्यावर वि.प.ने कॅमे-याचे बिलाबाबत चौकशी केली असता असे कळले की, तक्रारकर्त्याने कॅमे-याचे बील अगोदरच समीर या व्यक्तीस पाठविले असल्याने बील उपलब्ध नाही. समीर या व्यक्तीकडून रु.22,000/- तक्रारकर्त्याला देणार नव्हता, कारण उभय पक्षात असे ठरले होते की, रु.22,000/- प्राप्त झाल्यावर वि.प. हा सदर रकमेतून त्याचे सेवा शुल्क रु.2,000/- कपात करुन उर्वरित रु.20,000/- तक्रारकर्त्याला देईल. तक्रारकर्त्याने वि.प.ला सेवाशुल्क रु.2,000/- दिल्याची बाब वि.प.ने अमान्य केली आहे. वि.प.ने लेखी उत्तरात हे मान्य केले आहे की, त्याने सदर पार्सल हे लखनौ येथे पोहचते केले असून कॅमे-याचा मोबदला रु.22,000/- देखील त्याला लखनौ येथील व्यक्ती समीरकडून प्राप्त झाले आहे. वि.प.ने पुढे असे कथन केले आहे की, त्यांनी तक्रारकर्त्याचे पार्सल बुक झाल्यावर एरामेक्स इंडिया प्रा.लि. नरेंद्रनगर शाखा यांच्याकडे डिलीवरी करीता दिले होते व पार्सल लखनौ येथे पोहोचविल्यावर एरामेक्स कंपनीने दि.04.05.2016 ला वि.प.च्या खात्यात रु.22,000/- जमा केले. वि.प.ने सदर रक्कम मिळताच दि.20.05.2016 ला तक्रारकर्त्याला रु.10,000/- रोख रक्कम दिली व रु.9,700/- धनादेश क्र. 958936 द्वारे दिले असून तक्रारकर्त्याने सदर धनादेश वटविलादेखील आहे. वि.प.ने तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील इतर परिच्छेदनिहाय कथन नाकबूल केले असून तक्रारकर्त्याची तक्रार खोटी असल्यामुळे खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
4. तक्रारकर्त्याने त्याच्या तक्रारीच्या पुष्टयर्थ एकूण 5 दस्तऐवज दाखल केले असून त्यामध्ये कंसाईनमेंट नोट (पार्सल बुकींग पावती), ईनव्हाईस, तक्रारकर्त्याने वि.प.विरुध्द केलेल्या पोलिस तक्रारींची प्रत इ.चा प्रामुख्याने समावेश आहे. वि.प.ने त्याच्या लेखी उत्तरासोबत त्याचे बँक खात्याच्या उता-याची छायांकित प्रत दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने नि.क्र. 9 वर त्याला प्रतिउत्तर दाखल करावयाचे नाही, म्हणून पुरसिस दाखल केली. तक्रारकर्त्याने नि.क्र. 12 वर त्याच्या लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला.
5. उभय पक्षातील परस्पर विरोधी कथन, अभिलेखावरील दस्तऐवज इ.चे अवलोकन केले असता मंचाचा निष्कर्ष खालीलप्रमाणे.
- // निष्कर्ष // -
6. तक्रारकर्त्याने वि.प.कडे Spy Glasses Camera असलेले पार्सल लखनौ येथे पोहोचविण्यासाठी कॅश ऑन डिलीवरी तत्वावर बुक केले होते. तसेच वि.प.ने ठरल्यानुसार सदर पार्सल हे लखनौ येथे पाठवावयाच्या पत्यावर पोहोचविले व सदर कॅमे-याच्या मोबदल्याची रक्कम रु.22,000/- ही प्राप्तकर्त्याकडून स्विकारली इ. बाबत उभय पक्षात वाद नाही. अभिलेखावर दाखल कंसाईनमेंट नोट (पार्सल बुकींग पावती), ईनव्हाईसची प्रत, तसेच वि.प.च्या बँक खात्याचे विवरण यावरुनही सदर बाबी स्पष्ट होतात.
7. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, वि.प.ने पार्सलमधील कॅमे-याच्या मोबदल्याची रक्कम रु.22,000/- जी त्याने पार्सल प्राप्तकर्त्याकडून स्विकारली आहे ती त्याला दिलेली नाही व सेवेत त्रुटी केली आहे.
8. याऊलट, वि.प.ने त्याचे बचावार्थ असा युक्तीवाद केला की, तक्रारकर्त्याने त्याच्याकडे लखनौ येथे पोहोचविण्यासाठी स्पाय कॅमे-याचे पार्सल बुक केले होते. त्याकरीता वि.प.ला सेवाशुल्क रु.2,300/- घ्यावयाचे होते. परंतू वि.प.च्या ऑफिसमधील कर्मचा-याने तक्रारकर्त्याला पार्सल बुकींगच्या पावतीमध्ये चुकीने रु.2,000/- लिहून दिले. तक्रारकर्त्याने बुकींगच्या वेळी सदर मोबदल्याची रक्कम वि.प.ला दिलेली नव्हती. त्यामुळे सदर रक्कम वगळून वि.प.ने तक्रारकर्त्याला रु.10,000/- रोख व रु.9,700/- चा धनादेश असे एकूण रु.19,700/- परत दिलेले आहे. त्यामुळे त्याने सेवेत त्रुटीपूर्ण व्यवहार केलेला नाही. वि.प.ने त्याचे वरीलप्रमाणे कथनापुष्ट्यर्थ त्याच्या बँक खात्याचे दि.01.10.2015 ते 30.09.2016 पर्यंतचे विवरण अभीलेखावर दाखल केले आहे. सदर खात्यातील नोंदीचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, वि.प.ने तक्रारकर्त्याला दि.18.04.2016 रोजी रु.20,000/- चा धनादेश दिला होता. परंतू सदर रकमेचा प्रस्तुत वादातील रकमेशी संबंध जोडता येणार नाही, कारण तो व्यवहार उभय पक्षातील या वादाच्या पूर्वी झाल्याचे दिसून येते. मात्र यावरुन असे म्हणता येईल की, तक्रारकर्ता व वि.प. यांच्यामध्ये यापूर्वीही व्यवहार झाला होता. वि.प.ने कथन केल्यानुसार त्याला ऐरामेक्स इंडिया प्रा. लि. कडून तक्रारकर्त्याच्या पार्सलमधील कॅमे-याची रक्कम दि.04.05.2016 रोजी प्राप्त झाल्याचे दि.04.05.2016 च्या बँक खात्याचे विवरणावरुन स्पष्ट होते. त्याचप्रमाणे विप.ने दि.14.06.2016 रोजी तक्रारकर्त्याला धनादेशाद्वारे रु.9,700/- दिल्याची सदर विवरणात नोंद आहे. तक्रारकर्त्याने त्याचे लेखी युक्तीवादात असे नमूद केले आहे की, सदर रक्कम ही वि.प. व त्याच्यामध्ये दि.18.04.2016 रोजी झालेल्या व्यवहारातील रु.20,000/- वि.प.कडून प्राप्त झाल्यावर तक्रारकर्त्याने त्यापैकी रु.10,000/- वि.प.ला हात उसने दिले होते, ते वि.प.ने सदर धनादेशाद्वारे परत केलेले आहे. परंतू वादातील दि.19.04.2016 च्या व्यवहारातील एकही पैसा वि.प.ने तक्रारकर्त्याला दिलेला नाही. तक्रारकर्त्याने वरीलप्रमाणे वि.प.ला हातउसनी रक्कम दिल्याबाबतचा कोणताही कागदोपत्री पुरवा अभिलेखावर दाखल केलेला नाही. त्यामुळे सदर रक्कम रु.9,700/- ही वि.प.ने तक्रारकर्त्याकडून उसने घेतलेल्या रकमेची परत फेड केली होती असे म्हणता येणार नाही. वि.प.चे असेही म्हणणे आहे की, त्याने दि.20.05.2016 रोजी तक्रारकर्त्याला रु.10,000/- रोख रक्कम दिली होती. परंतू सदर बाब ही योग्य पुराव्याअभावी ग्राह्य धरता येणार नाही. त्यामुळे वि.प.ने जरी असे म्हटले असले की, त्याने तक्रारकर्त्याला रु.10,000/- रोख व रु.9,700/- धनादेशाद्वारे दिले व रु.2,300/- त्याने दिलेल्या सेवेचा मोबदला म्हणून रु.22,000/- मधून वजा केले आहे व त्याच्यातील झालेल्या करारानुसार संपूर्ण रक्कम तक्रारकर्त्याला दिली आहे तरीही अभिलेखावरील दस्तऐवजावरुन हे स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने वि.प.ला दि.19.04.2016 रोजी लखनौ येथे पोहोचविण्यासाठी पार्सल दिले होते व त्याकरीता वि.प.ला रु.2,000/- शुल्क दिले होते व सदर पार्सलमधील कॅमे-याची किंमत रु.22,000/- वि.प.ला कॅश ऑन डिलीवरीनुसार प्राप्त झाल्यावरही त्याने ती संपूर्ण रक्कम तक्रारकर्त्याला दिलेली नसून त्यापैकी केवळ रु.9,700/- तक्रारकर्त्याला दिलेले आहेत. वि.प.ने करारानुसार तक्रारकर्त्याला पार्सलची संपूर्ण रक्कम देणे ही वि.प.ची जबाबदारी होती. परंतू वि.प.ने त्याची जबाबदारी योग्यरीतीने पार पाडली नसून तक्रारकर्त्याला दिलेल्या सेवेत कसूर केलेला आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे तक्रारकर्ता सदर प्रकरणात दाद मिळण्यास पात्र आहे. वि.प.ने तक्रारकर्त्याला कॅमे-याची रक्क्म रु.22,000/- पैकी केवळ रु.9,700/- परत दिले आहेत. त्यामुळे तक्रारकर्ता हा वि.प.कडून कॅमे-याची उर्वरित रक्कम रु.12,300/- व्याजासह परत मिळण्यास पात्र आहे.
9. तक्रारकर्त्याला वि.प.ने दिलेल्या त्रुटीपूर्ण सेवेमुळे निश्चितपणे मानसिक व शारिरीक त्रास झाला आहे व त्याला सदर तक्रार दाखल करावी लागली आहे, म्हणून तक्रारकर्ता वि.प.कडून नुकसान भरपाईपोटी रु.5,000/- व तक्रारीचा खर्चाबाबत रु.3,000/- मिळण्यास पात्र आहे. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- आ दे श –
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत असून वि.प.ला आदेश देण्यात येतो की, त्याने तक्रारकर्त्याला रु.12,300/- ही रक्कम दि.04.05.2016 पासून तर रकमेच्या अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याजासह परत करावी.
2. वि.प.ने तक्रारकर्त्याला शारिरीक, मानसिक, आर्थिक त्रासाच्या नुकसान भरपाईबाबत रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चादाखल रु.3,000/- द्यावे.
3. वि.प.ने आदेशाची पुर्तता निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावी.
4. आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.