(दि. 03/10/2012) द्वारा : मा. प्रभारी अध्यक्ष, सौ. ज्योती अभय मांधळे 1. उभय पक्ष हे दोघेही संगम अर्पाटमेंट, नेरुळ, नवी मुंबई, येथील रहीवासी आहेत. तक्रारदाराच्या घरामध्ये 2 वर्षापासुन पाण्याच्या गळतीचा त्रास होत असल्याने त्यांनी त्याबाबत सोसायटीकडे अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रार केली. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार विरुध्द पक्ष यांच्या सदनिकेतुन पाण्याच्या गळतीचा त्रास होत आहे. त्यांनी सोसायटीकडे अनेक वेळा तक्रारी करुनही काही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी प्लंबरच्या सांगण्यावरुन विरुध्द पक्ष यांच्या फ्लोरिंगला स्वतःच्या स्वखर्चाने सिमेंट लावले परंतु तरीही त्यांचे स्वतःचे सदनिकेतील बाथरुम व हॉलच्या भिंतीतुन पाण्याची .. 2 .. (तक्रार क्र. 232/2010) गळती सतत होत होती. तक्रारदाराने विरुध्द पक्ष यास सांगितले की, ते स्वखर्चाने त्यांच्या घरातील बाथरुम व टॉयलेटचे फ्लोरिंगचे काम करुन घ्यायला तयार आहेत परंतु विरुध्द पक्षाने त्यांना तशी परवानगी दिली नाही. 2. विरुध्द पक्ष घरात नसतांना पाण्याच्या गळतीचा त्रास वाढल्यामुळे तक्रारदाराने स्वतः विरुध्द पक्ष यांचा पाण्याचा पाईप बाहेरुन वेगळा केला. त्यामुळे पाण्याची गळती पुर्णपणे थांबली होती मात्र कालांतराने विरुध्द पक्षाने पुन्हा बाहेरुन पाईपची जोडणी केल्याने पाण्याची गळती पुन्हा सुरु झाली. विरुध्द पक्ष यांच्या सदनिकेतुन होणा-या पाण्याच्या गळतीमुळे तक्रारदाराच्या सदनिकेतील मुख्य हॉल मधील भिंत पुर्णपणे खराब झालेली आहे. तरीही विरुध्द पक्ष दुरूस्ती करण्यासाठी काहीही प्रतिसाद देत नसल्यामुळे तक्रारदाराला मंचात तक्रार दाखल करणे भाग पडले. तक्रारदाराने आतापर्यंत विरुध्द पक्षाच्या सदनिकेच्या गळतीसाठी रु.10,000/- चा खर्च केलेला आहे. 3. तक्रारदाराची विनंती आहे की, विरुध्द पक्षाने कन्सिल वॉटर पाईपची बदली करावी व बाथरुम मधली खालची फ्लोरिंग बदलुन घ्यावी तसेच विरुध्द पक्ष यांच्या वृत्तीमुळे त्यांना झालेल्या त्रासाबद्दल व त्यांनी त्यांच्या सदनिकेसाठी केलेल्या स्वखर्चाची रक्कम त्यांना देण्यात यावी तसेच त्यांना झालेल्या मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई देण्यत यावी असा आदेश मंचाने पारीत करावा असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. 4. तक्रारदारांनी आपली सदरची तक्रार पतिज्ञापत्रासह दाखल केली. निशाणी 3 अन्वये कागदपत्रांची यादी दाखल केली. तसेच त्यांनी दि.08/09/2009 रोजी संगम अर्पाटमेंटच्या अध्यक्ष यांना पाठवलेली लेखी तक्रार दाखल केलेली आहे. दि.20/09/2009 रोजी सामनेवालेंच्या मिटींगमध्ये झालेल्या बोलणीबाबतचे पत्र दाखल केलेले आहे. त्यांनी दि.23/09/2010 रोजी पोलीस कंप्लेंट केल्याबाबतचे दस्तएवज दाखल केले. तसेच Jt. Registrar को.ऑप.सो. सिडको, एन.एम.एम.सी वार्ड ऑफीसर, नेरूळ डिव्हीजन, इस्टेट ऑफीस सिडको, नेरुळ, नवी मुंबई यांना पाठवलेले पाण्याच्या गळतीबाबतची लेखी तक्रारीची प्रत दाखल केलेली आहे. मंचाने निशाणी 4 अन्वये विरुध्द पक्षास नोटिस पाठवुन आपला लेखी जबाब दाखल करण्याचा निर्देश दिला. निशाणी 11 अन्वये विरुध्द पक्षाने आपला लेखी जबाब प्रतिज्ञापत्रासह दाखल केला आहे. विरुध्द पक्ष आपल्या लेखी जबाबात म्हणतात की, केवळ त्रास देण्याच्या हेतुने तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल केलेली आहे. .. 3 .. (तक्रार क्र. 232/2010) 5. तक्रारदार हे संगम अपार्टमेंटमध्ये 1ला मजल्यावर राहतात तसेच विरुध्द पक्ष हे अर्पाटमेंटमध्ये 2रा मजल्यावर राहतात. विरुध्दपक्ष यांच्या म्हण्यानुसार तक्रारदाराच्या घरामध्ये गळती असल्याने त्यांनी ज्या-च्या वेळी त्यांना सदर गळतीबाबत दुरूस्तीचे विचारले असता त्यांनी त्यांना मदत केली आहे. तक्रारदाराने अनेक वेळा सदरची दुरूस्ती केलेली असतांनाही गळती थांगलेली नाही. ती म्हणणे चुकीचे आहे की, त्यांनी तक्रारदाराला दुरूस्ती करण्यास मदत केलेली नाही. अनेक वेळा त्यांनी त्याना सहकार्य करुनही तक्रारदार त्याचेशी अपमानास्पद व असमान्यस्पद वागलेले आहेत व स्वतः एकबाजुनी निर्णय घेऊन बेकायदेशीरपणे पाण्याचे कनेक्शन तोडले आहे तक्रारदारानी अनेकवेळा सोसायटीच्या कमीटीकडे सदर गळतीची तक्रार केलेली आहे पण माझ्या म्हण्यानुसार सदर इमारतीत सोसायटी निर्माण झालेली नाही. 6. विरुध्द पक्ष पुढे असे म्हणतात की, तक्रारदाराला हा त्यांचा ग्राहक नसल्याने तक्रारदाराला या मंचात तक्रार चालविण्याचा अधिकार नाही म्हणुन सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 26 अन्वये खर्चासह खारीज करावी. 7. निशाणी 14 अन्वये तक्रारदारानी त्याच्या सदनिकेच्या गळतीसंबंधी छायाचित्र दाखल केले आहे. दि.03/09/2012 रोजी सदरची तक्रार अंतीम सुनावणीसाठी आली असता तक्रारदार स्वतः हजर होते त्यांचा युक्तिवाद ऐकुण मंचाने सदरची तक्रार अंतीम आदेशासाठी निश्चित केली. 8. तक्रारदाराने दाखल केलेला तक्रार अर्ज, दस्तऐवज, छायाचित्र व तोंडी युक्तिवाद तसेच विरुध्द पक्षाने दाखल केलेला लेखी जबाब, कागदपत्र या सर्वांचा विचार केले असता मंचासमोर खालील मुद्दा उपस्थित झाला - 1. तक्रारदार हा विरुध्द पक्ष क्र. 1 यांचा ग्राहक आहे काय? उत्तर – नाही. स्पष्टिकरण मुद्दा क्र. 1 – मुद्दा क्र. 1 बाबत विचार केले असता मंच या निदर्शनास येते की, तक्रारदार हा विरुध्द पक्षाचा ग्राहक नाही. तक्रारदार गेल्या दोन वर्षापासुन त्यांचे सदनिकेमध्ये पाण्याची गळती होत असल्यामुळे त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे अनेकवेळा त्याचेबाबत तक्रार केली. तक्रारदाराचे म्हणणे असे की, त्यांच्या घरातील गळती विरुध्द पक्षाच्या सदनिकेतील गळतीमुळे होत आहे. मंचाच्या मते तक्रारदार सहकारी सोसायटीचा सदस्य असल्याने सोसायटी चा ग्राहक आहे परंतु त्याचा विरुध्द पक्ष क्र. 1 यांच्याशी वाद आहे. सोसायटीच्या सदस्या दुस-या सदस्याशी वाद आहे. मंचाच्या मते तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे कुठल्याही प्रकारच्या शुल्काचा भरणा करुन सेवा घेतलेली नाही त्यामुळे ग्राहक तक्रार कायद्याचे कलम 2(1)ड .. 4 .. (तक्रार क्र. 232/2010) अन्वये तक्रारदार हे विरुध्द पक्ष 1 यांचे ग्राहक होत नाही सबब तक्रारदार हे ग्राहक नसल्याने स्वभाविकपणे सदर प्रकरणाचे निराकरण करणे मंचाच्या न्यायिक कार्यकक्षेत येत नाही. आवश्यक वाटल्यास तक्रारदार योग्य त्या न्याय यंत्रणेसमोर आपली तक्रार दाखल करण्यास स्वतंत्र आहेत.
9. सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो- आदेश 1. तक्रार क्र. 232/2010 खारीज करण्यात येते. 2. आवश्यक वाटल्यास योग्य त्या न्याय यंत्राणे समोर तक्रार दाखल करण्यास ते पात्र राहतील व त्या स्थितीमध्ये या मंचातील या तक्रारीचा कालावधी कालगणणेतुन वगळण्यात यावा 3. खर्चाचे वहन उभय पक्षांनी स्वतः करावे. दिनांक - 03/10/2012 ठिकाण- कोंकण भवन. |