(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार- सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 27/12/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 02.03.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीत नमुद केले आहे की, गैरअर्जदार हे कोट, सुट, बेझर बनविण्याचा व्यवसाय करतात. तसेच न्यायमंदीर, नागपूर येथून नवीन कोट बनविण्याचे ऑर्डर घेत असतात. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, गैरअर्जदार या कोटचा ऑर्डर मिळवीण्याकरता दि.30.09.2008 ला आला त्यावेळी तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराला कोटचा ऑर्डर दिला. गैरअर्जदाराने कापडाचा नमुना दाखविला तेव्हा तक्रारकर्त्याने गैरअर्जदारास उचित फीटींग साईजचा कोट बनविण्यास सांगितले. गैरअर्जदाराने त्याकरता तक्रारकर्त्याचे माप घेतले व त्याचक्षणी तक्रारकर्त्याने रु.200/- अग्रिम म्हणून गैरअर्जदारास दिले, त्याची पावती नंतर तक्रारकर्त्यास दिली. 3. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, सदर कोट घेते वेळी तो कामात व्यस्त असल्यामुळे बघीतला नाही व त्याने कोट न तपासता उर्वरित रक्कम रु.700/- गैरअर्जदारास दिली. त्यानंतर सदर कोट बघितला असता गैरअर्जदाराने कमी प्रतिचा कापड कोट बनविण्याकरता वापरल्याचे तक्रारकर्त्याचे लक्षात आले, तसेच सदर कोटची फिटींग उचित नव्हती. सदर बाब तक्रारकर्त्याने गैरअर्जदारास सांगितली त्यानुसार गैरअर्जदाराने कोट बदलवुन देईल व दिलेला कोट परत घेईल असे वचन दिले, परंतु तसे काहीही केले नाही व तक्रारकर्त्यास सेवेत त्रुटी दिली. त्यामुळे सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली असुन त्याव्दारे मानसिक व शारीरिक त्रासाकरीता रु.2,000/-, कोर्ट स्टेशनरी पेट्रोल खर्चाकरीता रु.2,000/-, नोटीस खर्च रु.1,000/-, नवीन कोटचे रु.1,000/- व गैरअर्जदाराला दिलेली कोटाची रक्कम रु.900/- असे एकूण रु.5,900/- ची मागणी केलेली आहे. 4. प्रस्तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदारावंर नोटीस बजावण्यांत आली असता, त्यांना नोटीस मिळाल्यानंतर ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपले लेखी उत्तर खालिल प्रमाणे दाखल केलेले आहे. 5. गैरअर्जदाराने आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, तो 12 ते 15 वर्षांपासुन वकील मंडळींना कोट पुरविण्याचा व्यवसाय करतो व कोट करीता लागणारे सर्व साहीत्य बाजार भावाप्रमाणे स्थानीय बाजारपेठेतून खरेदी करतो. तसेच तक्रारकर्त्याने खोटी तक्रार दाखल केली असुन त्यात काहीही तथ्य नसल्याचे नमुद केले आहे. गैरअर्जदाराने पुढे नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याचे पूर्ण समाधान झाल्यानंतरच त्याने उर्वरित रक्कम रु.700/- दिलेले आहे व यात त्याची कोणतीही त्रुटी नसुन सदर तक्रार खारिज करण्यांची मंचास विनंती केलेली आहे. 6. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.07.12.2010 रोजी आली असता युक्तिवादाचे वेळी दोन्ही पक्ष गैरहजर होते, त्यामुळे सदर प्रकरण गुणवत्तेवरील निकालाकरता ठेवण्यांत आले. दोन्ही पक्षांचे कथन व मंचासमक्ष दाखल दस्तावेज, युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 7. तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराकडून कोट खरेदी केला होता ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.2 वरुन स्पष्ट होत असल्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा ‘ग्राहक’ ठरतो. 8. तक्रारकर्त्याने तक्रारीत कथन केले आहे की, गैरअर्जदाराने कोट खरेदी करते वेळी त्याला दाखविलेले कापड व कोट बनवुन दिल्यानंतरचे कापडात तफावत होती, तसेच कोटचे कापड चांगल्या दर्जाचे नव्हते. तक्रारकर्त्याने आपल्या कथनाच्या पृष्ठयर्थ कोणताही दस्तावेज मंचासमक्ष दाखल केलेला नाही. तसेच गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास कोणत्या प्रतिचे कापड दाखविले होते व कोट बनविण्याकरता वापरलेले कापड हे कोणत्या प्रतिचे आहे याबाबत कोणताही पुरावा तक्रारकर्त्याने दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारीतील सदर कथन हे पुराव्या अभावी अमान्य करण्यांत येते. 9. तक्रारकर्त्याने तक्रारीत कथन केले आहे की, गैरअर्जदाराने दिलेला कोट हा सरस फिटींग साईजमध्ये नव्हता, ही बाब सिध्द करतांना तक्रारकर्त्याने कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदाराने दिलेला कोट हा योग्य बनवून दिला होता किंवा नव्हता हे सिध्द होत नाही, म्हणून तक्रारकर्त्याचे सदर कथन सुध्दा योग्य पुराव्या अभावी अमान्य करण्यांत येते. 10. तक्रारकर्त्याने सदर कोट गैरअर्जदाराकडून स्विकारला तेव्हा तो साईजमध्ये आहे किंवा नाही व कापड योग्य प्रतिचे आहे किंवा नाही हे पाहणे गरजेचे होते. तसे न करता तक्रारकर्त्याने तो स्विकारला ही बाब तक्रारकर्त्याचेच कथनावरुन स्पष्ट होते. त्यामुळे सदर तक्रार ही पश्च्यात बुध्दीने दाखल केलेली आहे असे मंचाचे मत आहे. 11. वरील सर्व कथनाच्या आधारे तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथन पुराव्या अभावी सिध्द होऊ शकत नसल्यामुळे सदर तक्रार खारिज होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. करीता मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यांत येते. 2. उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |