तक्रारदार : प्राचार्य श्री. शानबाग हजर.
सा.वाले : वकील श्री. एन.एम. देसाई हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री.एस.एस.व्यवहारे, अध्यक्ष. ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. सा.वाले ए.के अॅटो एजन्सी नावाने सुकॅम इन्हवरटर्स यांचे वितरक असून त्यांचे ऑफीस तक्रारीत नमुद केलेल्या ठिकाणी आहे.
2. तक्रारदार हे बॉम्बे पब्लीक ट्रस्ट कायद्याप्रमाणे नोंदणीकृत ट्रस्ट आहे. सदर शाळेमार्फत प्राथमिक व माध्यमिक शाळा चेंबुर येथे कार्यान्वयीत आहे. सदर शाळेमध्ये 2000 विद्यार्थी असून सदर शाळेचे व्यवहार वरील नोंदणीकृत ट्रस्ट मार्फत करण्यात येतात. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, 2009 सालामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये अखंडीत विजेचा पुरवठा एस.एस.सी व एच.एस.सी. परिक्षांसाठी पुरविण्या संबंधीची आदेश पारीत करण्यात आले होते. सदरच्या आदशान्वये मुंबई उच्च न्यायालयाने अखंडित विजेचा पुरवठा प्राप्त होण्यासाठी तक्रारदार ट्रस्टला इन्हरटर घेण्या विषयी आदेश पारीत केले होते. वरील आदेशा प्रमाणे तक्रारदार ट्रस्ट यांनी त्यांच्या शाळेसाठी लागणारा विद्युत पुरवठा विचारात घेऊन इन्हरटर आणि विद्युत बॅटरीज यांची निविदा जाहीर केली होती. सदर निविदामध्ये इन्हवरटर आणि बॅटरी यांचे मुल्य वरील वस्तु तक्रारदार शाळांमध्ये कार्यान्वयीत करण्यासाठी लागणारा खर्च व वरील वस्तुंचे मुल्य हे वरील वस्तु दिल्यानंतरच द्यावयाच्या बाबींच्या अटी दिनांक 27.10.2009 रोजी तक्रारदार यांनी 16 सुकाम कॉसमिक इन्हरटर व 16 एक्सीड बॅटरीज विकत घेण्यासाठी सा.वाले यांचेकडे प्रस्ताव दिला. वरील गोष्टी सा.वाले यांचे कडून विकत घेताना वरील वस्तुसाठी तक्रारदारांनी दिलेली निविदा त्या बाबतच्या अटी व शर्थी तसेच पैसे देण्या बाबतच्या शर्थी या बाबतचा उल्लेख तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे केला. तसेच वरील वस्तु तक्रारदार शाळेमध्ये लावण्याची जबाबदारी सा.वाले यांची होती.
3. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, दिनांक 14.12.2009 रोजी सा.वाले यांनी तक्रारदार यांना 16 इन्हरटर व 16 बॅाटरी विकत दिल्या. त्या बाबत 75 टक्के मुल्य सा.वाले यांना देण्यात आले व उर्वरित 25 टक्के मुल्य वरील वस्तु लावल्यानंतर देण्यात येतील असे सा.वाले यांना सांगण्यात आले. वर नमुद वस्तु तक्रारदार शाळेत जावण्यासाठी लावण्यासाठी सा.वाले यांचे सांगण्यावरुन मे. दिव्या इलेक्ट्रीकल्स यांना ठेका देण्यात आला व दिव्या इलेक्ट्रकल्स यांना धनादेशाव्दारे रु.8,000/- अदा करण्यात आले. इन्हवरट आणि बॅटरी तक्रारदार शाळेत लावल्यानंतर सा.वाले यांनी उर्वरित बिलाची रक्कम अदा करण्यात आली.
4. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, वर नमुद इन्हरटर व बॅटरी तक्रारदार यांचे शाळेत लावल्यानंतर त्यात बिघाड निर्माण होऊ लागला. त्या बाबत तक्रारदारांनी सा.वाले यांना दूरध्वनीव्दारे विचारणा केली असता तक्रारदारांना त्या बाबत समाधानकारक उत्तर मिळाले नाही. उलटपक्षी दिनांक 22.10.2010 चे पत्राने इन्हवरटर व बॅटरी तक्रारदार शाळेत कार्यान्वयीत करण्याची जबाबदारी सा.वाले यांची नाही असा युक्तीवाद सा.वाले यांनी केला. तक्रारदार यांचे सांगण्यावरुन सा.वाले यांनी तज्ञांची समिती तक्रारदार यांचे शाळेत पाठवून शाळेत होणारा विद्युत पुरवठा खंडीत होण्याबद्दल काय कारण असावे याचा तपास केला. या बाबत तक्रारदारांनी सा.वाले यांना स्मरणपत्र देऊनसुध्दा सा.वाले यांनी त्या बाबत कोणतीही दखल न घेतल्यामुळे सा.वाले यांची वरील कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर या कृतीत येते असे कथन करुन तक्रारदारांनी सा.वाले यांचे विरुध्द प्रस्तुतची तक्रार दाखल करुन शाळेत बसविलेल्या बॅटरीज व इन्हवरटर बदलून देण्याची विनंती केली व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चाची मागणी केली.
5. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल करुन तक्रारदारांचे म्हणणे व मागणे तसेच तक्रारीतील कथने नाकारली. सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने, म्हणणे व मागणे खोटे व लबाडपणाचे असून सत्य परिस्थितीचा विपर्यास करणारे आहे. तक्रारदारांच्या तक्रारीतील सा.वाले यांचे कडून सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केल्या बद्दलची विधाने सा.वाले साफ नाकारतात. सा.वाले यांचे कडून तक्रारदारांनी 16 सुकाम इन्हरटर व 16 बॅटरी विकत घेतल्या होत्या ही बाब सा.वाले मान्य करुन तक्रारदारांनी त्या बाबत सा.वाले यांना दिलेली किंमत देखील सा.वाले मान्य करतात. परंतु सदर वस्तुंच्या निविदांमध्ये वस्तुंच्या दरासोबत व्हॅटचा समावेश होता तसेच वरील वस्तु लाऊन देण्याबाबत लावण्याचा खर्च प्रत्यक्षात जेवढा आला तेवढा द्यावयाचा होता. तसेच वस्तुंची किंमत वस्तुंचा ताबा मिळाल्यावर द्यावयाची होती. तसेच नविन वस्तुंच्या उपभोगा बाबत 2 वर्षाचा हमीचा कालावधी होता. या बाबींचा उल्लेख तक्रारदारांनी केलेला नाही.
6. सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदारांनी दिनांक 10.1.2012 रेाजी वरील वस्तुंच्या कार्यान्वीत बाबीबाबत मिळालेल्या पत्रावरुन सा.वाले यांचे प्रतिनिधी श्री. योगेश पटेल यांनी शाळेला भेट देऊन शाळेतील खोली क्र. 19 व 30 या ठिकाणी लावलेल्या इन्हरटरमध्ये बिघाड असल्यामुळे त्या बाबत तक्रार सुकाम यांचेकडे केली. त्या प्रमाणे सुकाम कंपनीतर्फे त्यांचे प्रतिनिधी तक्रारदार शाळेत येऊन इन्हरटरमध्ये आढळून येणारा दोष हा वापरण्यात आलेल्या वायरिंगमुळे येत असून वरील वस्तुंच्या उपभोगाबद्दल देण्यात आलेली हमी ही वस्तुंच्या उपयोगा संबंधी असून वायरीमुळे वाढळून येणारा दोष हमी पत्रकात समाविष्ट होऊ शकत नाही असा अहवाल संबंधित प्रतिनिधीनी दिला. त्यामुळे सा.वाले यांनी इन्हरटरच्या कार्यान्वयीतेबद्दल निर्माण झालेला दोष हा करण्यात आलेल्या वायरिंगच्या दर्जामुळे झालेला असून त्या बद्दल दिव्या इलेक्ट्रीकल्स यांची त्या बाबत जबाबदारी असल्याचे कळविले. सा.वाले यांचे असे देखील म्हणणे आहे की, दिनांक 16.11.2010 रेाजी खोली क्र.19 मधील लावण्यात आलेल्या इनव्हरटर मधील ट्रान्सफॉरमर बदलण्यात आला. त्यामुळे सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार शाळेत लावण्यात आलेल्या इन्हरटर व बॅटरी बाबत ते कोणत्याही परिस्थितीत जबाबदार नाहीत. दिनांक 11.10.2011 रोजी सा.वाले यांच्या तक्रारी वरुन सा.वाले यांचे प्रतिनिधी श्री. जावेद हे तक्रारदारांचे शाळेत गेले असता खोटी क्र.14,1619 व 20 आणि 24,30,31 येथील बॅटरी कार्यान्वयीत होत नव्हत्या. तसेच खोली क्र.19 मध्ये चुकीच्या पध्दतीने लावण्यात आलेल्या वायरमुळे बॅटरी कार्यान्वयीत होत नव्हती. रुम क्र.30 व 31 मध्ये देखील वायर अयोग्य रितीने लावल्या होत्या. सा.वाले यांच्या म्हणण्या प्रमाणे वरील इन्हरटर आणि बॅटरी यातील दुरुस्ती हमीच्या कालावधीत असल्यामुळे त्यांनी सदर दुरुसती करुन दिली व तक्रारदार शाळेतील इनव्हरटर व बॅटरी कार्यान्वयीत करुन दिल्या. सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, बॅटरी संबंधी अस्तीत्वात असलेला हमीचा कालावधी हा दिनांक 13.6.2011 रोजी समाप्त झाला. त्यामुळे संबंधीत बॅटरी बाबत नविन तक्रारी आल्यास त्या संबंधातील बदल बॅटरी संबंधातील हमीच्या तरतुदी नुसार बदल करण्यास सा.वाले तंयार आहेत. परंतु तक्रारदार हे संपूर्ण बॅटरींचे बदल करुन मागत असल्यामुळे सा.वाले यांना ते शक्य नाही. सबब सा.वाले इन्व्हरटर व बॅटरीच्या व्यवहारा संबंधी सेवा सुविधा पुरविण्यात कसुर ही त्यांची कृती नाकारतात व सदर तक्रार रद्द करुन मिळावी अशी विनंती करतात.
7. तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, इन्व्हरटर व बॅटरीज यांचे वापरा संबंधी महाराष्ट्र राज्य शासनाने पारीत केलेले परिपत्रक, इन्व्हरटर आणि बॅटरीज या संबधी सा.वाले यांचे कडून मागविण्यात आलेली व अंतीम संमत करण्यात आलेली निवीदा, वरील वस्तु बाबत विक्रीच्या पावत्या, सुकाम पॉवर लिमिटेड यांनी दिलेले अहवाल, तक्रारदार व सा.वाले यांच्यातील पत्र व्यवहाराच्या प्रती दाखल केल्या आहेत.
8. या उलट सा.वाले यांनी आपल्या कैफीयती सोबत पुरावा श्यापथपत्र, लेखी युक्तीवाद, दाखल केले.
9. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, कागदपत्रे, शपथपत्र व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. उभय पक्षकारांचा तोंडी युक्तीवाद एैकण्यात आला. त्यानुसार तक्रारीचे निकालाकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | तक्रार या मंचासमोर चालु शकते काय ? | नाही. |
2 | सा.वाले यांनी तक्रारदार यांना इन्व्हरटर आणि बॅटरीज यांच्या व्यवहारा संबंधी सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ?? | निरंक. |
3 | तक्रारदार तक्रारीत मागीतलेल्या मागण्या मिळण्यास पात्र आहेत काय | .नाही. |
4 | अंतीम आदेश ? | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
मान्य मुद्देः- तक्रारदार हे बॉम्बे पब्लीक ट्रस्ट कायद्याप्रमाणे नोंदणीकृत ट्रस्ट आहे. तक्रारदार व सा.वाले यांच्यातील महाराष्ट्र राज्य शासनाच्या परिपत्रका प्रमाणे तक्रारदार यांच्या शाळेत वापरण्यासाठी इन्व्हरटर आणि बॅटरीज यांच्यातील खरेदीचा व्यवहार व त्या संबंधीचा पत्र व्यवहार उभय पक्षकारांना मान्य आहे.
10. तक्रारदार यांच्या स्वतःच्या कथना प्रमाणे तक्रारदार हे बॉम्बे पब्लीक ट्रस्ट अॅक्ट नुसार नोंदणीकृत ट्रस्ट असल्यामुळे सा.वाले यांनी मा.राष्ट्रीय आयोगाच्या प्रतिभा प्रतिष्टान विरुध्द अलाहाबाद बँक IV (2007) CPJ Page 33 या न्यायनिर्णयाचा आधार घेऊन पब्लीक ट्रस्ट नुसार नोंदणीकृत ट्रस्टला कायदेशीर अस्तीत्व नसते व त्यामुळे पब्लीक ट्रस्ट हे “ व्यक्ती ( Person)” शब्दाच्या व्याख्येत येत नसल्यामुळे ग्राहक तक्रार कायद्यातील तरतुदी नुसार पब्लीक ट्रस्ट हे ग्राहक तक्रार मंचासमोर तक्रार दाखल करु शकत नाही. त्यामुळे पब्लीक ट्रस्ट हे ग्राहक या संज्ञेत येत नसल्यामुळे देखील नोंदणीकृत ट्रस्टने दाखल केलेली तक्रार मंचासमोर चालु शकत नाही. असा युक्तीवाद सा.वाले यांच्या वकीलांनी केला.
11. वास्तविक सदरचा आक्षेप सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीत घेतलेला नव्हता त्यावर विचारलेल्या प्रश्नास सा.वाले यांच्यातर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, तक्रारदार यांच्या स्वतःच्यात म्हणण्याप्रमाणे ते बॉम्बे पब्लीक ट्रस्ट नुसार नोंदणीकृत ट्रस्ट असल्यामुळे त्या संबंधी आक्षेप न घेता मा. राष्ट्रीय आयोगाच्या न्यायनिर्णया नुसार सदरची तक्रार ग्राहक मंचासमोर कशी ग्राहय होऊ शकत नाही हे सिध्द करु शकतात. सा.वाले यांच्या युक्तीवादात तथ्य आढळल्यामुळे तक्रारीच्या ग्राहयतेबाबत स्वतंत्र आक्षेप नसतानासुध्दा सा.वाले यांचेतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद योग्य वाटतो.
12. तक्रारदार यांचेतर्फे मा. सर्वोच्च न्यायालयाच्या ऑफीसियन ट्रस्टी ऑफ वेस्ट बेंगोल फॉर ट्रस्ट ऑफ चित्रा दासी विरुध्द जी.आय.पी. वेस्ट बेंगॉल कलकत्ता (1974) 3 SCC कोर्ट केसेस पेज 616 यावर आधार देऊन हिंदु डायटी यास स्वतंत्र व्यक्ती म्हणून समजण्यात येऊन त्या मिळकत सांभाळण्यास समर्थ आहे असा निर्वाळा इनकम टॅक्स कायद्याखाली मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असल्यामुळे सदर न्यायनिर्णयावर अवलंबून प्रस्तुत तक्रारीत ट्रस्टसुध्दा स्वतंत्र व्यक्ती संबोधिल्यास अयोग्य होणार नाही असा युक्तीवाद तक्रारदार यांचेतर्फे करण्यात आला. तसेच तक्रारदारांतर्फे पंजाब राज्य आयोगाच्या रॉयल कॉम्प्युटर विरुध्द राजेंदर सिंग व मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या सुशांत रोडे विरुध्द रामदेव बाबा इंजीनियंरिंग कॉलेज अपील क्र. 485/1992 निकाल दिनांक 13.8.1993 या निकालांचा आधार घेण्यात आला. परंतु सदर न्यायनिर्णय प्रस्तुतच्या प्रकरणास तंतोतंत लागू होत नाहीत. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयामध्ये नमुद केल्या प्रमाणे सदर न्यायनिर्णय हा इनकम टॅक्स कायद्यास अनुसरुन आहे तर सा.वाले यांचेतर्फे दाखल करण्यात आलेला मा. राष्ट्रीय आयोगाचा न्यायनिर्णय हा ग्राहक तक्रार कायद्यानुसार आहे. त्यामुळे सा.वाले यांनी दिलेला न्यायनिर्णय प्रस्तुतच्या प्रकरणात योग्य आहे व त्यास अनुसरुन तक्रारदार हे नोंदणीकृत ट्रस्ट असल्यामुळे स्वतंत्र व्यक्ती अथवा पर्सन या व्याख्येत येत नसल्यामुळे सदरची तक्रार मंचासमोर चालु शकत नाही असा निष्कर्ष मंच काढत आहे. सदर तक्रार मंचासमोर चालण्यास योग्य नसल्यामुळे तक्रारदार व सा.वाले यांच्यातील इन्व्हरटर आणि बॅटरीज याच्या व्यवहाराबाबत सा.वाले यांची कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर आहे वा नाही हा मुद्दा निरंक ठरतो. त्यामुळे मुद्दा क्र.1 नकारार्थी ठरवून मुद्दा क्र.2 निरंक ठरविण्यात येतो. म्हणून मंच खालील प्रमाणे आदेख पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार क्रमांक 429/2011 रद्द करण्यात येते.
2. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 26/05/2015