न्या य नि र्ण य : (व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा)
1) तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986, कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे
तक्रारदार हे बालिंगा, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथील रहिवाशी आहेत. वि.प. यांची ‘राज हॉलिडे मेकर्स’ ही प्रोपा. टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनी आहे. सदर ट्रॅव्हल्स कंपनी कोल्हापूर येथे ही टूर्स व ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करते. सदर दोन्ही ट्रॅव्हल्सचा वि.प. यांचे मालकी च्या आहेत. सदर व्यवसायाप्रमाणे ग्राहकांना दिले हमी व खात्रीप्रमाणे तसेच सांगितलेल्या सर्व सुविधा-मोबदला घेऊन देणे वि.प. चे कार्य आहे.
वि.प.यांनी तक्रारदार व त्यांची पत्नी सौ. अर्चना दिपक शिंदे यादोघांकरिता शिमला-कुलू-मनाली ही ट्रीप 8 दिवस 7 रात्रीसाठी हनीमून ट्रीप पॅकेज देणेचे ठरले होते. सदर ट्रीपमध्ये शिमला-कुलू-मनाली, आग्रा, दिल्ली, चंदीगड ही प्रेक्षणीय स्थळे दाखवणेचे होते. सदर सर्व ठिकाणी राहणे, खाणे प्रवास सर्व सुविधा वि.प. यांनी पुरविण्याच्या होत्या. सदर ट्रीपसाठी रक्कम रु. 65,000/- भरलेले होते. प्रस्तुत रक्कमेपैकी तक्रारदार दि. 30-04-2016 रोजी रक्कम रु. 25,000/- व दि. 14-05-2016 रोजी रक्कम रु. 40,000/- भरलेली होती, रक्कम रु. 25,000/- भरलेली पावती वि. प. ने तक्रारदाराला ‘अ हेवन हॉलिडे’ या नावे दिले आहे तर रु. 40,000/- भरलेली पावती राज हॉलीडे मेकर्स या नावे दिली आहे. त्यावर वि.प. ची सही आहे. सदरचे रक्कम रु. 65,000/- वि.प.ने स्विकारलेली असून त्यांनी त्यांच्या सोयीकरिता दोन वेगवेगळया पावत्या दिल्या आहेत. वि.प. ने तक्रारदाराला सदर ट्रीपचा दाखवले चार्टप्रमाणे सर्व सुविधा वि.प. ने तक्रारदाराला देणे आवश्यक होते. वि.प. ने दाखवले चार्ट/माहितीपत्रक यावर विसंबून तक्रारदाराचे पत्नीने सदर ट्रिपचे आयोजन स्वीकारले.
वि. प. यांनी तक्रारदार यांना सदर दुस-या ट्रिपच्या अनुषंगाने दुस-या राज्यात होणा-या सोयी सुविधाबद्दल चौकशी करणे आवश्यक व गरजेचे होते. वि.प. यांनी तक्रारदार यांना दिल्लीतून सिमलाकडे रवाना होताना पिंजोरे गार्डन हे स्थळ दाखवण्याचे मान्य केले होते परंतु वि.प. यांनी दिले ड्रायव्हरने उशिराचे कारण सांगून सदरचे स्थळ दाखवणेस नकार दिला. वि.प. ने आयोजीत केले ट्रिपचे शेडयूलप्रमाणे तक्रारदार पत्नीसह रात्री 10.30 ते 10.45 चे दरम्यान पोहचले होते. वास्तविक सदर ठिकाणी 9.30 ला पोहचणे आवश्यक होते. कारण 9.30 वाजता वर जाणारी लिफ्ट बंद होते. वि.प. ने सदर बाब माहिती असूनही वेळेवर नमूद ठिकाणी पोहचवले नाही. त्यामुळे तक्रारदार व त्यांचे पत्नीस रात्री दीड ते 2 तास खालीच वाट पहावी लागली. त्यानंतर तक्रारदाराने वि.प. शी संपर्क साधलेनंतर स्वतंत्र जाणेस सांगितले. परंतु खाजगी वाहनांना वर जाणेस जाणेस प्रवेश नसलेने तक्रारदाराला दिले ड्रायव्हरने वर जाणेस नकार दिला.
अशाप्रकारे तक्रारदार यांना सदर ट्रीपचे बाबत वि.प. ने दाखवले चार्टप्रमाणे सर्व सुविधा देणे आवश्यक व गरजेचे असताना व प्रस्तुत सुविधा पोटीची रक्कम तक्रारदारा- कडून वि.प. यांनी स्विकारलेली असताना वि.प. यांनी चार्टमध्ये नमूद केलेप्रमाणे कोणतीही सेवा-सुविधा न पुरविता तक्रारदार यांची गैरसोय केलेली आहे. त्यामुळे तक्रारदाराने वि.प. यांना त्यांच्या कार्यालयात भेटून वस्तुस्थिती सांगितली असता वि.प. ने तक्रारदारालाच धमकी दिली त्यामुळे तक्रारदाराने शाहुपूरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली असता वि. प. हे पोलिस स्टेशनमध्ये हजर होणेचे टाळत होता त्यामुळे तक्रारदाराने वकिलामार्फत वि.प. ला नोटीस पाठविली. सदर नोटीस वि.प. ला दि. 1-10-2016 रोजी पोहचूनही वि.प. ने कोणतीही दखल घेतली नाही. सबब, तक्रारदार यांना रक्कम रु. 4,85,000/- द.सा.द.शे.18 % प्रमाणे व्याजासह वि.प. यांचेकडून वसुल होऊन मिळणेसाठी प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदाराने या कामी दाखल केला आहे.
2) तक्रारदाराने प्रस्तुत कामी वि.प. यांचेकडून तक्रारदाराने ट्रीपसाठी वि.प.कडे जमा केलेली रक्कम रु. 65,000/-, मनाली हॉटेलमध्ये तक्रारदाराने भरलेली रक्कम व दिल्ली येथील सायकल रिक्षाने केलेला प्रवास खर्च रु. 4200/-, तसेच कोल्हापूर ते संपूर्ण ट्रीपमध्ये तक्रारदार व त्यांचे पत्नीला झालेला मानपसिक व शारिरीक त्रासाची रक्कम रु. 4,00,000/-, तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.15,800/- अशी एकूण रक्कम रु. 4,85,000/- वि.प. यांचेकडून वसूल होऊन मिळावी. प्रस्तुत रक्कमेवर द.सा.द.शे.18 % प्रमाणे व्याज मिळावे अशी विनंती तक्रारदाराने या कामी केली आहे.
3) तक्रारदाराने प्रस्तुत कामी अॅफिडेव्हीट, कागद यादीसोबत अ.क्र. 1 ते 13 कडे अनुक्रमे वि.प. ने दिलेले माहितीपत्रक, तक्रारदाराची फ्लाईट बुकींग पावती, वि.प. कडे पैसे भरलेल्या पावत्या, आरमान रिसॉर्टची पावती, एअरलाईन्सचे बील, तक्रारदाराच्या हॉटेल बुकींगच्या पावत्या, तक्रारदाराने वि.प. यांना वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, सदर नोटीस वि.प. ला पोहचलेची पोहच पावती, पुराव्याचे शपथपत्र, साक्षीदार यांचे पुरावा शपथपत्र, पुरावा संपलेची पुरसीस वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने या कामी दाखल केलेली आहेत.
4) प्रस्तुत कामी तक्रार अर्जाची नोटीस वि.प. यांना पाठवली होती. सदरची नोटीस ‘नॉट क्लेम्ड’ या शे-यानिशी परत आली आहे. सबब, वि.प. या कामी नोटीस लागू होऊनही हजर झालेले नाहीत अथवा कोणतेही म्हणणे दिलेले नाही. सबब, वि.प. यांचे विरुध्द नि. 1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. वि.प. यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही.
5) वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ प्रस्तुत कामी पुढील मुद्दे विचारात घेतले आहेत.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय |
2 | वि.प. ने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार वि.प.कडून नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे |
वि वे च न –
मुद्दा क्र. 1 ते 3 –
6) वर नमूद मुद्दा क्र. 1 ते 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण तक्रारदारने स्वत:करिता व पत्नीकरिता वि.प. यांचेकडे शिमला-कुलू-मनाली, आग्रा,दिल्ली चंदीगड ही प्रेक्षणीय स्थळे पाहणेसाठी ‘हनिमून ट्रिप पॅकेज’ म्हणून 8 दिवस व 7 रात्रीसाठी ट्रिपची रक्कम रु. 65,000/- वि.प. कडे जमा केली होती ही बाब तक्रारदाराने कागद यादीसोबत दाखल रक्कम जमा केलेल्या पावत्यांवरुन स्पष्ट होते. तसेच वि.प. विरुध्द ‘एकतर्फा’ आदेश पारीत झाला आहे. कारण वि.प. ने प्रस्तुत तक्रार अर्जाचा म्हणणे दाखल केले नाही अथवा वि.प. हजरही झालेले नाहीत. सबब, वि.प. ने तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब, सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
तसेच प्रस्तुत वि.प. यांनी तक्रारदाराला ट्रीपबाबतचे दाखवले माहितीपत्रकात नमूद सोयी-सुविधा पुरविल्या नाहीत हे स्पष्ट होते कारण तक्रारदाराने दाखल केले तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही अथवा या कामी आक्षेप नोंदवलेले नाहीत. सबब, तक्रारदाराने तक्रार अर्जात केले कथनावर विश्वासर्हता दाखवणे न्यायोचित वाटते. सबब, तक्रारदाराचे कथनाप्रमाणे वि.प. ने तक्रारदाराला माहितीपत्रकात नमूद केलेप्रमाणे सेवा-सुविधा पुरविल्या नाहीत त्यामुळे तक्रारदाराची व त्याचे पत्नीची सदर ट्रिपमध्ये मोठी गैरसोय झाली व अनेक अडचणींना तक्रारदाराला तोंड दयावे लागले. सबब वि.प. यांनी तक्रारदाराला सेवात्रुटी दिली आहे हे दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट व सिध्द होते. तसेच तक्रारदाराने वकिलांमार्फत वि.प. यांना नोटीस पाठविली होती. ती नोटीस वि.प. यांना मिळूनदेखील वि.प. ने प्रस्तुत नोटीसीला उत्तरही दिले नाही म्हणजेच नोटीसमधील मजकूर वि.प. यांना मान्य आहे असा अर्थ होतो. सबब, तक्रारदार यांना तक्रार अर्जात नमूद केलेप्रमाणे वि.प. यांनी सेवात्रुटी दिलेचे स्पष्ट व सिध्द झाले आहे. सबब, मुद्दा क्र. 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
वरील सर्व विवेचन दाखल कागदपत्रे या बाबींचा उहापोह करता तक्रारदाराने तक्रार अर्जात नमूद केलेल्या बाबी निर्विवादपणे सिध्द केल्या आहेत. सबब, तक्रारदार यांना वि.प. यांचेकडून ट्रिपसाठी भरलेली रक्कम रु. 65,000/-(रक्कम रुपये पासष्ट हजार मात्र), मनाली येथे हॉटेलमध्ये तक्रारदाराला भरावी लागलेली रक्कम रु. 4,200/-/-(रक्कम रुपये चार हजार दोनशे मात्र), मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/-(रक्कम रुपये पंचवीस हजार मात्र) व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 5,000/- रक्कम रुपये पाच हजार मात्र) वि.प. यांचेकडून वसुल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे.
सबब, प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत. सबब, आदेश.
- आ दे श -
1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प. यांनी तक्रारदारानी ट्रीपसाठी जमा केलेली रक्कम रु. 65,000/- (रक्कम रुपये पासष्ट हजार मात्र) परत अदा करावेत.
3) मनाली येथे हॉटेलसाठी तक्रारदाराने भरलेली रक्कम रु. 4,200/-(रक्कम रुपये चार हजार दोनशे मात्र) वि.प. ने तक्रारदाराला अदा करावी.
4) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- (रक्कम रुपये पंचवीस हजार मात्र) वि.प. ने तक्रारदाराला अदा करावी.
5) अर्जाचे खर्च रक्कम रु. 5,000/- (रक्कम रुपये पाच हजार मात्र) वि.प. ने तक्रारदाराला अदा करावेत.
6) वरील सर्व रक्कमेवर तक्रार अर्ज दाखल तारखेपासून रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 % व्याज वि.प. ने तक्रारदाराला अदा करावे.
7) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
8) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
9) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.