द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार
निकालपत्र
दिनांक 27 एप्रिल 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांना व्हाईट डिस्चार्ज, ओटीपोटात दुखणे, पाठदुखी मुळे जाबदेणार डॉक्टरांकडे उपचारांसाठी गेल्या. त्यावेळी जाबदेणार डॉक्टरांनी तक्रारदारांना हिस्टरेक्टमी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर जाबदेणार यांनी तक्रारदारांच्या अनेक चाचण्या करुन ऑपरेशन साठी तारीख दिली. दिनांक 19/06/2008 रोजी तक्रारदार जाबदेणार यांच्या हॉस्पिटल मध्ये ऑपरेशनसाठी दाखल झाल्या. दिनांक 20/06/2008 रोजी संध्याकाळी 4 वा. ऑपरेशन झाले. ऑपरेशन करतांना जाबदेणार डॉक्टरांनी तक्रारदारांचे युरिनरी ब्लॅडर कापले. ही चुक ऑपरेशन करतेवेळीच जाबदेणार यांच्या लक्षात आली होती. जाबदेणार यांनी दिनांक 30/06/2008 रोजी तक्रारदारांना डिस्चार्ज दिला. ऑपरेशन पुर्वी तक्रारदारांना कुठलाच युरिनरी प्रॉब्लेम नव्हता. त्यानंतर मात्र तक्रारदारांना त्रास होऊ लागला आणि त्यांच्या हालचालींवर बंधने आली. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या उपचारांची सर्व बिले अदा केली. जाबदेणार यांनी डिस्चार्ज कार्डवर युरिनरी ब्लॅडर कापले गेले असे लिहून दिलेले आहे. त्यामुळे तक्रारदारांना अपंगत्व आले. तक्रारदारांना जवळजवळ रुपये 50,000/- खर्च आला. खर्च करुनही त्रासापासून सुटका झाली नाही. त्यामुळे तक्रारदारांना शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. युरिनरी ब्लॅडर जाबदेणार यांनी कापले हा जाबदेणार यांच्या वैद्यकीय निष्काळजीपणा आहे. जाबदेणार यांनी ऑपरेशन करतांना काळजी घेतली नाही. जाबदेणार यांनी झालेली चुक दुरुस्त केली नाही. तक्रारदारांना टोटल हिस्टरेक्टमी, युट्रस, ओव्हरीज आणि सर्व्हिक्स ऑपरेशन करण्याचा सल्ला देण्यात आलेला होता, परंतु जाबदेणार यांनी सर्व्हिक्स काढलेच नाही व ब्लॅडर कापले. जाबदेणार यांनी सर्जन कडून त्यास टाके [suture] घातले होते. जाबदेणार यांनी ऑपरेशनच्या वेळी योग्य काळजी घेतली नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 10,00,000/- 18 टक्के व्याजासह व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार डॉक्टरांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार chronic cervicitis आजाराने ग्रस्त होत्या. त्यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता. जाबदेणार डॉक्टरांनी स्वत:, डॉ. स्नेहा बक्षी, डॉ. डोंगरे यांनी मिळून तक्रारदारांचे हिस्टरेक्टमी चे ऑपरेशन केले. ऑपरेशन करतेवेळी सर्व्हिक्स हे ब्लॅडर पासून तुटले गेले. हे ऑपरेशनचा छेद घेतेवेळी घडले. त्यामुळे नजरचुकीने ब्लॅडर उघडे झाले. कुठलीही पेल्व्हिक सर्जरी करतांना ब्लॅडर ओपन होणे ही माहित असलेली गुंतागूंत [कॉम्प्लीकेशन] आहे. तसे टेक्स्ट बुक मधेही नमूद करण्यात आलेले आहे. ही डॉक्टरांची चूक नाही. Chronic cervicitis ऑपरेशनच्या वेळी छेद घेत असतांना असे घडू शकते. याबद्यलचे मेडिकल लिटरेचर जाबदेणार यांनी दाखल केलेले आहे. ब्लॅडर ओपन झाल्याचे लक्षात आल्याबरोबर डॉक्टरांनी त्यांच्या सोबत जनरल सर्जन डॉ. डोंगरे असतांनाही त्यांनी युरोसर्जन डॉ. पै यांना बोलवले व त्यांच्या मार्फत ब्लॅडरला दुहेरी टाके [suture] घालण्यात आले. या सर्वांमुळे ऑपरेशनला विलंब झाला. त्यामुळे सर्व्हिक्स काढून टाकायचे राहून गेले आणि याबद्यलची माहिती जाबदेणार डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना ताबडतोब माहिती दिली होती. वैद्यकीय तत्वानुसार गुंतागूंत [कॉम्प्लीकेशन] निर्माण झाली असली तरी त्याबाबतची माहिती पेशंट व नातेवाईकांना सांगणे गरजेचे असते. त्यानुसार जाबदेणार यांनी माहिती पेशंटच्या नातेवाईकांना ताबडतोब दिली होती. तक्रारदारांनी ऑपरेशनंतर त्यांना दोन वर्षापर्यन्त त्रास होत होता याबद्यल तक्रारीत जरी नमूद केले तरी कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. जाबदेणार यांनी वैद्यकीय निष्काळजीपणा केला याबद्यलचा ठोस पुरावा तक्रारदारांनी दाखल करणे गरजेचे होते. तसेच तज्ञाचा अहवाल देणे गरजेचे आहे. यासर्वांवरुन तक्रार खर्चासह नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र आणि मेडिकल लिटरेचर दाखल केले.
3. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पहाणी केली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार त्या टोटल हिस्टरेक्टमीसाठी जाबदेणार यांच्याकडे दाखल झाल्या होत्या. परंतु जाबदेणार यांनी पार्शल हिस्टरेक्टमी केली म्हणजेच सर्व्हिक्स काढून टाकले नाही. त्यामुळे त्यांना पाठदुखी, व्हाईट डिस्चार्ज, हालचालींवर बंधने आली. जाबदेणार यांनी लेखी जबाबात आणि हॉस्पिटल मधील नोट्स मध्ये “Incision attempted Vagina but bladder was cut and was noted immediately. Bladder wall sutured by Dr. Dongre and Dr. Pai Urologist. Surgery closed keeping behind cervix which was affected. Subtotal hysterectomy done” असे नमूद केलेले आहे. ऑपरेशन करतांना छेद घेतेवेळी ब्लॅडर कट झाले होते व लगेचच ते शिवले गेले असे लेखी जबाबात जाबदेणार यांनी नमूद केलेले आहे. जाबदेणार यांनी कुठलीही पेल्व्हिक सर्जरी करतांना ब्लॅडर ओपन होणे ही माहित असलेली गुंतागूंत [कॉम्प्लीकेशन] आहे असे लेखी जबाबामध्ये नमूद केलेले आहे. याबद्यल जाबदेणार यांनी Complication of Hysterectomy हे मेडिकल लिटरेचर दाखल केलेले आहे. लिटरेचर मध्ये “ Urinary complication - Injury to the bladder occurs either on opening the abdomen or during the dissection of the bladder from the anterior aspect of the cervix and vaginal vault. In both instances, it should be immediately recognized and repaired at once, after which an indwelling catheter is left in situ for fourteen days.” असे नमूद करण्यात आलेले आहे. यावरुन हिस्टरेक्टमी ऑपरेशन करतेवेळी गुंतागूंत [कॉम्प्लीकेशन] होतेच ही बाब स्पष्ट होते. ब्लॅडर कापले गेल्यास ताबडतोब रिपेअर करणे गरजेचे असते असेही वर नमूद लिटरेचर मध्ये नमूद केलेले आहे. त्यानुसार जाबदेणार यांनी ताबडतोब युरोसर्जन यांच्याकडून ते शिवून [suture] घेतले. हे सर्व होईपर्यन्त तक्रारदारांना दिलेला अनेस्थिशिआची वेळ संपत आली होती. त्यामुळे सर्व्हिक्स काढणे जमले नाही. जर ब्लॅडर शिवले नसते आणि सर्व्हिक्स काढले असते तर तक्रारदारांची प्रकृती अजून खालावली असती. पेशंटचा प्राण वाचवणे, प्रकृती व्यवस्थित ठेवणे, उपचार नीट करणे डॉक्टरांचे कर्तव्य असते. त्यामुळे मेडिकल एथिक्स नुसार जाबदेणार डॉक्टरांनी युरिनरी ब्लॅडर शिवण्यास प्राधान्य देऊन सर्व्हिक्स तसेच ठेवले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सर्व्हिक्सचे ऑपरेशन नंतरही होऊ शकते. परंतु युरिनरी ब्लॅडर कट झाल्यानंतर तसेच ठेवले असते तर तक्रारदारांच्या जीवास धोका झाला असता. म्हणून जाबदेणार यांनी घेतलेला निर्णय योग्य होता आणि ही माहिती जाबदेणार यांनी लपवून न ठेवता तक्रारदारांच्या नातेवाईकांना दिली होती. यामुळे प्रस्तूत तक्रारीमध्ये जाबदेणार डॉक्टरांचा वैद्यकीय निष्काळजीपणा सिध्द होत नाही. मेडिकल एथिक्स नुसारच डॉक्टरांची वर्तणूक आहे असे मंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्टयर्थ्य पुरावा म्हणून डॉ. माया गाडे यांचा दिनांक 10/1/2012 चा तपासणी अहवाल दाखल केला. त्यात त्यांनी तक्रारदारास “Removal of certix in view of chronic cervicitis” करावे असा सल्ला दिला. याचाच अर्थ सर्व्हिक्स काढुन टाकावे असा सल्ला दिला. डॉ. माया गाडे यांनी जाबदेणार डॉक्टरांनी तक्रारदारांवर हिस्टरेक्टमीचे ऑपरेशन करतांना निष्काळजीपणा केला होता असे कुठेही नमूद केलेले नाही. जाबदेणार यांनी ऑपरेशन केल्यानंतर तक्रारदारांना युरिनरी त्रास झाला होता याबद्यलचा पुरावा तक्रारदारांनी दाखल केलेला नाही. केवळ पाठदुखी, ओटीपोटात दुखणे, हालचालींवर बंधन आली असे तक्रारीमध्ये नमूद केलेले आहे. परंतु त्याबद्यलचा पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी 2010 ALL SCR 2180 व्ही किशन राव विरुध्द निखिल सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल व इतर हा निवाडा दाखल केलेला आहे. मंचाने मा. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा श्री. अच्युतराव हरिभाऊ खोडवा विरुध्द स्टेट ऑफ महाराष्ट्र IV 2006 CPJ Page 8 चा आधार घेतला. या निवाडयामध्ये पुढीलप्रमाणे नमूद केलेले आहे
“पेशंटवर उपचार करतांना, प्रत्येक डॉक्टरांची वैद्यकीय मते आणि कौशल्ये वेगवेगळी असू शकतात. परंतु ते उपचार मेडिकल प्रोफेशनला मान्यता प्राप्त असणारे असले पाहिजेत, डॉक्टरांनी पेशंटवर उपचार करतांना त्यांचे पुर्ण कौशल्य वापरले, दक्षता घेतली आणि तरीही पेशंटचा मृत्यू झाला किंवा त्यास कायमचे अपंगत्व आले तर अशा वेळी तो डॉक्टरांचा निष्काळजीपणा ठरत नाही. ”
वरील विवेचनावरुन, दाखल कागदपत्रांवरुन व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडयावरुन तक्रारदारांची तक्रार नामंजुर करण्यात येत आहे.
:- आदेश :-
1. तक्रार नामंजुर करण्यात येत आहे.
2. खर्चाबद्यल आदेश नाही.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.