जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. तक्रार दाखल दिनांक :09/03/2009. आदेश दिनांक : 27/07/2010. ग्राहक तक्रार क्रमांक : 117/2010. शिवराज संगप्पा बागलकोटी, वय 47 वर्षे, व्यवसाय : व्यापार, रा. 'काबणेवाडा', 783, शुक्रवार पेठ, सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. वर्धमान कार्डस मार्केटींग प्रायव्हेट लिमिटेड. 2. श्री. राजकुमार कस्तुरचंद शहा, सज्ञान, 4, सुयश अपार्टमेंट, कस्तुरबा मार्केटसमोर, चंडक बगीचा, बुधवार पेठ, सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : एन.ए. ठोकडे विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : एस.व्ही. न्हावकर आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, विरुध्द पक्ष यांनी चालू केलेल्या समृध्द ठेव योजनेमध्ये दि.24/4/2005 ते दि.18/8/2009 या कालावधीमध्ये एकूण 19 ठेव पावत्याद्वारे रु.3,11,000/- गुंतविले आहेत. सदर ठेवीचे व्याज त्यांना माहे ऑक्टोंबर, 2009 पर्यंत प्राप्त झाले आहे. त्यानंतर ठेवीची मुदत संपल्यानंतर तक्रारदार यांना रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन ठेव रक्कम रु.3,11,000/- द.सा.द.शे. 16 टक्के व्याज दराने मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.50,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे. 2. विरुध्द पक्ष यांना नोटीस मिळाल्यानंतर ते मंचासमोर हजर झाले. त्यांना उचित संधी देऊनही त्यांनी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द कैफियतीशिवाय तक्रार चालविण्याचा आदेश करण्यात आला. 3. तक्रारदार यांची तक्रार व रेकॉर्डवर दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच तक्रारदार यांच्याकरिता युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर ( 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार ठेव रक्कम व्याजासह मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विरुध्द पक्ष यांच्याकडे समृध्द ठेव योजनेमध्ये दि.24/4/2005 ते दि.18/8/2009 या कालावधीमध्ये एकूण 19 ठेव पावत्याद्वारे रु.3,11,000/- गुंतविल्याचे रेकॉर्डवर दाखल ठेव पावतीवरुन निदर्शनास येते. तक्रारदार यांच्या म्हणण्याप्रमाणे ठेवीचे व्याज त्यांना माहे ऑक्टोंबर, 2009 पर्यंत प्राप्त झाले असून ठेवीची मुदत संपल्यानंतर मागणी करुनही ठेव परत करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे, अशी तक्रारदार यांची प्रमुख तक्रार आहे. 5. विरुध्द पक्ष यांच्या समृध्द ठेव योजनेनुसार तक्रारदार यांना ठेव रकमेवर द.सा.द.शे. 16 टक्के दराने व्याज देण्याचे कबूल केल्याचे निदर्शनास येते. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे ठेवीद्वारे रक्कम गुंतवणूक करुन त्यावर व्याज मिळविण्यासाठी वित्तीय सेवा घेतलेली आहे. तक्रारदार यांनी ठेवीची मुदत संपल्यानंतर विरुध्द पक्ष यांना वेळोवेळी मागणी करुनही त्यांना ठेव रक्कम देण्यात आलेली नाही. ठेव रक्कम मुदत संपल्यानंतर किंवा मुदतपूर्व त्यावरील देय व्याजासह परत करणे, ही विरुध्द पक्ष यांची करारात्मक जबाबदारी व कर्तव्य आहे. विरुध्द पक्ष यांनी मंचासमोर म्हणणे दाखल केले नसले तरी ठेविदारांकडून त्यांनी ठेवी स्वीकारल्याचे व ठेव रक्कम देणे बाकी असल्याचे विरुध्द पक्ष क्र.2 यांनी मंचासमोर तोंडी कबूल केले आहे. 6. वरील विवेचनावरुन तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी ठेव रक्कम व त्यावरील व्याज परत न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे विरुध्द पक्ष हे तक्रारदार यांच्या ठेव रकमा माहे नोव्हेंबर, 2009 पासून द.सा.द.शे. 16 टक्के व्याज दराने परत करण्यास संपूर्णत: जबाबदार ठरतात. 7. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना रु.3,11,000/- (रुपये तीन लक्ष आकरा हजार फक्त) दि.1/11/2009 पासून द.सा.द.शे. 16 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी प्रत्येकी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/26710)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |