जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 98/2010.
तक्रार दाखल दिनांक: 29/09/2009.
आदेश दिनांक :18/08/2010.
गणेश रोहिदास साळुंखे, वय 28 वर्षे,
व्यवसाय : शेती, रा. माढा, ता. माढा, जि. सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
1. दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि.,
नागपूर क्षेत्रीय कार्यालय, मंडलीय कार्यालय क्र.1,
ए.डी. कॉम्प्लेक्स, माऊंट रोड, सदर, नागपूर - 10.
3. डिव्हीजनल मॅनेजर, दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि.,
चाटी गल्ली, मंगळवार पेठ, सोलापूर. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष
सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य
सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : आर.व्ही. पाटील
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : एन.आर. खंडाळ
आदेश
सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य यांचे द्वारा :-
1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, ते व्यवसायाने शेतकरी असून दुग्धव्यवसायाकरिता त्यांनी जर्सी गाय खरेदी केलेली आहे. त्यांच्या जर्सी गाईचा विरुध्द पक्ष (संक्षीप्त रुपामध्ये 'विमा कंपनी') यांच्याकडे रु.30,000/- रकमेचा विमा उतरविण्यात आलेला आहे. त्यांच्या गाईस टॅग क्र.ओ.आय.सी.103171 दिलेला असून पॉलिसीचा क्रमांक एस.ओ.एल.पी.103171 असा आहे. तक्रारदार यांची गाय आजारी पडली आणि दि.26/3/2009 रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. गाईच्या मृत्यूबाबत विमा कंपनीस फोनद्वारे कळविले आणि सर्व कागदपत्रे विमा कंपनीकडे पाठविण्यात आली. परंतु विमा कंपनीने दि.19/1/2010 रोजीचा रु.21,000/- चा धनादेश नं.007494 पाठविला आहे. त्यांचा गाईचा रु.30,000/- चा विमा असताना फुल्ल अन्ड फायनल सेटलमेंट म्हणून रु.21,000/- मंजूर करुन सेवेत त्रुटी केली आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे विरुध्द पक्ष यांच्याकडून उर्वरीत विमा रक्कम रु.9,000/- व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रार खर्चापोटी रु.3,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे.
2. विमा कंपनीने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कराराविषयी निर्माण झालेला वाद लवादाकडून सोडविणे आवश्यक आहे आणि केवळ अकोला कोर्टास त्याचे अधिकारक्षेत्र आहे. त्यांनी तक्रारदार यांचा विमा क्लेम सेटल करुन रु.21,000/- चा धनादेश नं.007494, दि.19/1/2010 नुसार फुल्ल अन्ड फायनल सेटलमेंटद्वारे रक्कम अदा केली आहे. तक्रारदार यांनी सदरची रक्कम स्वीकारलेली असून त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. शेवटी त्यांनी तक्रार रद्द करण्याची विनंती केली आहे.
3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. तक्रार चालविण्यास मंचाला अधिकारक्षेत्र प्राप्त होते काय ? होय.
2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा
दिली आहे काय ? होय.
3. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय.
4. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्ष
4. मुद्दा क्र. 1 :- विमा कंपनीने पॉलिसी नं. एसओएलपी-103171 अन्वये तक्रारदार यांच्या गाईस रु.30,000/- चे विमा संरक्षण दिल्याचे विवादीत नाही. विमा कालावधीमध्ये म्हणजेच दि.26/3/2009 रोजी तक्रारदार यांची गाय मृत्यू पावल्याचे विवादीत नाही. तक्रारदार यांच्या गाईचा विमा रु.30,000/- असताना त्यांना रु.21,000/- विमा रक्कम मंजूर केल्याची त्यांची प्रमुख तक्रार आहे.
5. परंतु त्यापूर्वी विमा कंपनीने सर्वप्रथम कराराविषयी निर्माण झालेले वाद सामंजस्याने न सुटल्यास ते लवादाकडे पाठविण्यात यावेत आणि त्याचे अधिकारक्षेत्र केवळ अकोला कोर्टास असतील, असे नमूद केले आहे.
6. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 अंतर्गत 'विमा' हा 'सेवा' या तरतुदीमध्ये अंतर्भुत आहे. तक्रारदार यांच्या गाईस विमा कंपनीने विमा संरक्षण दिलेले असल्यामुळे निश्चितच त्यांची तक्रार या मंचाच्या कार्यकक्षेत येते. मा.राष्ट्रीय आयोग व मा.राज्य आयोग यांनी अनेक निवाडयामध्ये लवादाचा क्लॉज असला तरी जिल्हा मंचाचे कार्यक्षेत्रास बाधा पोहोचत नाही, असे न्यायिक तत्व विषद केलेले आहे. त्यामुळे विमा कंपनीने उपस्थित केलेला सदर मुद्दा निरर्थक व तथ्यहीन ठरतो आणि या मंचाला तक्रारदार यांची तक्रार चालविण्यास अधिकारक्षेत्र प्राप्त होते, या मतास आम्ही आलो आहोत. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
7. मुद्दा क्र. 2 ते 4 :- रेकॉर्डवर दाखल विमा पॉलिसीचे अवलोकन करता, तक्रारदार यांच्या गाईचा रु.30,000/- रकमेचा विमा उतरविल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येते. विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार गाईचे शवविच्छेदन करणा-या वैद्यकीय अधिका-याने गाईची खोटी किंमत नमूद केलेली आहे. कॅटल डेथ सर्टिफिकेट व कॅटल व्हॅल्युएशन रिपोर्टमध्ये गाईची किंमत रु.37,000/- नमूद केलेली असली तरी कमाल मर्यादेत रु.30,000/- च्या गाईचे विमा संरक्षण देण्यात आहे. तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय मृत्यू पावल्याचे व गाईचा विमा रु.30,000/- असल्याचे स्पष्ट असताना कोणत्याही उचित कारणाशिवाय तक्रारदार यांच्या गाईकरिता अपूर्ण रक्कम रु.21,000/- मंजूर करुन विमा कंपनीने सेवेत त्रुटी केलेली आहे. त्यामुळे तक्रारदार हे गाईच्या विम्याची उर्वरीत रक्कम रु.9,000/- दि.19/1/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दरासह मिळविण्यास पात्र ठरतात. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना विमा रक्कम रु.9,000/- दि.19/1/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.
2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
3. विरुध्द पक्ष यांनी उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी नमूद मुदतीत न केल्यास मुदतीनंतर एकूण देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने अदा करावी.
(सौ. संगिता एस. धायगुडे÷)
अध्यक्ष
(सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/23810)
|
[HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER |