जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 442/2010. तक्रार दाखल दिनांक : 27/07/2010. तक्रार आदेश दिनांक : 14/01/2011. श्री. रामचंद्र भगवान कदम, वय 63 वर्षे, व्यवसाय - पेन्शनर, रा. 36, दमाणी नगर, सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. शरद नागरी सहकारी बँक लि., 218/219-बी, गोल्डफींच पेठ, सोलापूर. 2. दी जनरल मॅनेजर, शरद नागरी सहकारी बँक लि., 218/219-बी, गोल्डफींच पेठ, सोलापूर. 3. दी ब्रँच मॅनेजर, मेन ब्रँच, शरद नागरी सहकारी बँक लि., 218/219-बी, गोल्डफींच पेठ, सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : आर.एम. मनुरे विरुध्द पक्ष गैरहजर आदेश सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, ते विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपामध्ये 'शरद बँक') यांचे भागधारक आहेत आणि त्यांचे शरद बँकेमध्ये बचत खाते क्र.1009 व कर्ज खाते आहे. दि.30/10/1999 रोजी त्यांनी कर्ज घेतले असून कर्जाची रक्कम त्यांच्या बचत खात्यावर वर्ग करण्यात आली. त्यांच्या घरगुती व आर्थिक अडचणीमुळे दि.31/12/2008 रोजी रु.1,64,174/- कर्ज देय राहिले. जानेवारी 2009 मध्ये त्यांनी शरद बँकेशी सपंर्क साधून वन-टाईम सेटलमेंट योजनेद्वारे कर्ज भरण्याची तयारी दर्शवली असता, रु.1,40,000/- भरणा केल्यास उर्वरीत रु.24,174/- सूट देण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी रु.1,40,000/- चा भरणा केला. त्यानंतर तक्रारदार यांनी कर्ज निरंक झाल्याबद्दल नाहरकत प्रमाणपत्राची मागणी केली असता, त्यांचे कर्ज खाते चालू ठेवण्यात येऊन दि.31/5/2010 पर्यंत रु.43,653/- देय असल्याचे दर्शविण्यात आले आहे. तक्रारदार यांचा मुलगा अभिजीत यांनीही शरद बँकेकडून रु.60,000/- चे कर्ज घेतले आहे. तक्रारदार यांना रु.1,50,000/- कर्ज घेण्यास सांगण्यात आले आणि तक्रारदार यांनी रु.1,37,886/- उचल करुन रु.48,467/- त्यांच्या मुलाच्या कर्ज खात्यावर, रु.72,419/- त्यांच्या स्वत:च्या कर्ज खात्यावर, रु.1,910/- कर्ज कपात करुन उर्वरीत रु.10,000/- त्यांच्या बचत खात्यावर जमा आहेत. शरद बँकेने त्यांच्या मुलाचे नांवे नादेय प्रमाणपत्र दिलेले आहे, परंतु त्यांचे हक्कामध्ये अद्याप प्रमाणपत्र जारी करण्यात आले नाही. वारंवार विनंती करुनही शरद बँकेने दखल घेतली नाही आणि त्यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केली आहे. प्रस्तुत तक्रारीद्वारे तक्रारदार यांनी नादेय प्रमाणपत्र देण्याबाबत शरद बँकेस आदेश करावा आणि रु.1,910/- परत मिळण्यासह रु.50,000/- नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष शरद बँकेस मंचाच्या नोटीसची बजावणी झालेली आहे. त्यांना उचित संधी देऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत किंवा म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले. 3. तक्रारदार यांची तक्रार, त्यांची दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? अशंत: 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांनी रेकॉर्डवर दाखल केलेला कर्ज खाते उतारा, बचत खाते उतारा, रक्कम भरणा पावत्या इ. चे अवलोकन करता, तक्रारदार यांचे शरद बँकेमध्ये कर्ज खाते व बचत खाते असल्याचे निदर्शनास येते. प्रामुख्याने, तक्रारदार यांच्या कर्ज खात्यावर दि.17/1/2009 रोजी असलेली रु.1,64,174/- थकबाकी पूर्णत: एकाच वेळी फेड करण्यासाठी कबूल केल्याप्रमाणे त्यांनी रु.1,40,000/- चा भरणा केलेला असतानाही त्यांना रु.24,174/- ची सूट न देता कर्ज खाते चालू ठेवून नादेय प्रमाणपत्र देण्यात येत नसल्याची त्यांची प्रमुख तक्रार आहे. 5. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कर्ज खाते उता-यावर 'श्री. कैची, एक लाख चाळीस हजार रोख भरुन घेणे. बाकी रक्कम सूट देणे. बाकी बाद करणे' असे लिहून त्याखाली स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी रु.1,40,000/- चा भरणा केल्याचे दाखल पावत्यांवरुन निदर्शनास येते. तसेच तक्रारदार यांनी कर्ज खाते बेबाक करुन नाहरकत प्रमाणपत्र देण्याबाबत शरद बँकेस दि.18/6/2010 रोजी अर्ज केला आहे. वास्तविक पाहता, शरद बँकेने तक्रारदार यांच्या तक्रारीकरिता कोणतेही म्हणणे मंचासमोर दाखल केलेले नाही. इतकेच नव्हेतर, त्यांनी तक्रारदार यांच्या दि.18/6/2010 रोजीच्या अर्जावर काय कार्यवाही केली ? याचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे वन-टाईम सेटलमेंटकरिता रु.1,40,000/- भरणा करुन घेण्यात आल्याचे तक्रारदार यांचे कथन ग्राह्य धरणे भाग पडते. 6. आमच्या मते, कोणत्याही वित्तीय संस्थेला त्यांच्या कर्जदाराकडून थकीत कर्ज रक्कम वसूल करण्याचा निर्विवाद कायदेशीर हक्क आहे. वित्तीय संस्थेचा कर्जवसुलीचा उद्देश व हेतू पूर्णत: स्वच्छ व प्रामाणिक असला पाहिजे. त्याच प्रमाणे कर्जदाराने वित्तीय संस्थेचे कर्ज परतफेड करण्याबाबत प्रामाणिक व कर्तव्यपरायण असले पाहिजे. 7. तक्रारदार हे शरद बँकेचे कर्जदार आहेत. त्यांचे थकीत कर्ज परतफेड करण्यासाठी शरद बँकेने वन-टाईम सेटलमेंटचे कारण समोर करुन रु.1,40,000/- चा भरणा करुन घेतल्याचे निदर्शनास येते. वास्तविक पाहता, 'कर्ज' हा विषय वित्तीय संस्था व कर्जदार यांच्यातील करारामध्ये अंतर्भूत होतो. ज्यावेळी कर्जाच्या परतफेडीचे वन-टाईम सेटलमेंट करण्याचे ठरले, त्यावेळी त्याप्रमाणे शरद बँकेकडून वन-टाईम सेटलमेंटसाठी आवश्यक असणारी उचित कार्यपध्दती अवलंबणे आवश्यक होते. केवळ शरद बँकेच्या पदाधिकारी किंवा अधिका-यांनी 'श्री. कैची, एक लाख चाळीस हजार रोख भरुन घेणे. बाकी रक्कम सूट देणे. बाकी बाद करणे' असे लिहून दिल्यामुळे कर्ज पूर्णत: निरंक होईल, असे अपेक्षीत नाही. तक्रारदार यांचा कर्ज परतफेड स्वच्छ हेतू असल्याचे निदर्शनास येते. परंतु शरद बँकेची कर्ज वसुलीची वर नमूद प्रक्रिया निश्चितच सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब ठरते, या मतास आम्ही आलो आहोत. तक्रारदार यांचे कर्ज पूर्णत: परतफेड झालेले नाही आणि त्याशिवाय तक्रारदार यांना नादेय प्रमाणपत्र मिळविता येणार नाही, हे स्पष्ट आहे. परंतु त्याच बरोबर शरद बँकेने अवलंबलेल्या अनुचित व्यापारी प्रथेमुळे तक्रारदार यांना जो त्रास व खर्च करावा लागला, त्याकरिता तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र आहेत. योग्य विचाराअंती, आम्ही रु.10,000/- नुकसान भरपाई मिळविण्यास तक्रार पात्र असल्याच्या निर्णयाप्रत आलो आहोत. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना रु.10,000/- नुकसान भरपाई या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/19111)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |