(घोषित दि. 17.10.2013 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार क्रमांक 1 यांची पत्नी व तक्रारदार क्रमांक 2 यांची आई कृष्णाबाई उर्फ किसनाबाई बांगर यांचे मालकीचे शेत जमीन मौजे अंतरवाली सराटी, ता.अंबड जि.जालना येथे सर्वे नंबर/गट नंबर 205 मध्ये असून त्यांचा शेती हा व्यवसाय होता दूदैवाने दिनांक 20.05.2010 रोजी कृष्णाबाई व त्यांचा मुलगा आप्पा रुस्तुम मोटार सायकलवरुन जात असताना समर्थ सहकारी साखर कारखान्यासमोर ट्रकने धडक दिल्याने अपघातात दोघेही मृत्यू पावले. सदर अपघाताची फिर्याद मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा केला. मयताचे प्रेत शवविच्छेदना करीता पाठवले. तक्रारदारांनी सदर पोलीस पेपर्स न्याय मंचात दाखल केले आहेत.
तक्रारदार क्रमांक 1 यांनी आईच्या मृत्यू नंतर दिनांक 18.09.2010 रोजी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासह गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे दाखल केला. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे पाठवला. गैरअर्जदार 2 यांनी विमा प्रस्ताव गैरअर्जदार 3 यांचेकडे पूढील कार्यवाहीस्तव पाठवल्यानंतर प्रस्ताव मयताच्या पतीच्या नावाने म्हणजेच तक्रारदार क्रमांक 2 यांचे नावे दाखल करण्याबाबत सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार क्रमांक 2 यांचे नावे सदर क्लेम दाखल केला तसेच आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली. परंतू गैरअर्जदार यांनी नुकसान भरपाई रक्कम अद्याप पर्यंत अदा केली नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार क्रमांक 1 यांना न्याय मंचाची नोटीस मिळूनही गैरहजर असल्यामुळे त्यांचे विरुध्द “एकतर्फा” आदेश दिनांक 27.08.2013 रोजी करण्यात आला.
गैरअर्जदार 2 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार क्रमांक 1 यांनी सदर योजने अंतर्गत विमा प्रस्ताव दिनांक 18.09.2010 रोजी तालुका कृषी अधिकारी, अंबड येथे दाखल केला. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी दिनांक 20.10.2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 3 कबाल इन्शुरन्स कंपनीकडे पाठवला. गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी दिनांक 12.11.2010 व 06.12.2010 रोजीच्या पत्रान्वये प्रस्तावमध्ये काही कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत कळवले. या संदर्भातील माहिती तालुका कृषी अधिकारी व उप विभागीय कृषी अधिकारी यांना कळवले आहे.
गैरअर्जदार 4 यांच्या लेखी म्हणण्यानुसार सदरची तक्रार मुदतबाह्य आहे. अपघात सन 2010 मध्ये झालेला असून तक्रार सन 2013 मध्ये दाखल केली आहे. अपघाता बाबतची माहिती विमा कंपनीला दिलेली नाही. तक्रारदारांचा प्रस्ताव विमा कंपनीकडे प्राप्त झालेला नाही. त्यामुळे सदर प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही होवू शकत नाही. अशा परिस्थितीत गैरअर्जदार 4 यांनी सेवेत त्रुटी केली नाही.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री एन.डी.खरात व गैरअर्जदार क्रमांक 4 यांचे विद्वान वकील श्री.संदीप देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे म्हणजेच गैरअर्जदार 4 यांनी तक्रारदारांना दिनांक 12.11.2010, 06.12.2010 रोजी पाठवलेल्या पत्राचे अवलोकन केले असता जनता शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव मयताच्या मूलाचे नावे/अर्जदार क्रमांक 1 दाखल केला असून सदर प्रस्ताव मयताच्या पतीच्या नावे/अर्जदार क्रमांक 2 दाखल करण्याबाबत नमूद केल्याचे दिसून येते. तसेच मयत कृष्णाबाई/किसनाबाई एकाच नावाच्या व्यक्ती असल्या बाबत स्टँप पेपरवर शपथपत्राची पुर्तता करण्याबाबत नमूद केल्याचे दिसून येते. तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 यांना दिनांक 01.04.2011 रोजीच्या पत्रानुसार मयत सौ.कृष्णाबाई यांचे सोबत सदर अपघातात मृत्यू पावलेल्या त्यांचा मुलगा मयत अप्पा रुस्तुम बांगर यांचा सदर योजने अंतर्गत विमा प्रस्ताव मंजूर केल्याचे दिसून येते.
तक्रारीत आलेल्या पुराव्यानुसार तक्रारदार क्रमांक 2 यांनी दिनांक 18.01.2011 रोजी त्यांचे नावावर सदर प्रस्ताव पुन्हा पाठविल्याचे तसेच कृष्णाबाई/किसनाबाई एकच व्यक्ती असल्या बाबतचे शपथपत्र अशा गैरअर्जदार 3 यांच्या सूचने नुसार विमा प्रस्तावातील कागदपत्रांची पुर्तता केल्याचे स्पष्ट होते. तक्रारदार क्रमांक 1 यांची आई व तक्रारदार क्रमांक 2 यांची पत्नी कृष्णाबाई शेतकरी असून अपघाती मृत्यू पावल्याचे तक्रारीत आलेल्या पुराव्या नुसार स्पष्ट होते. अशा परिस्थितीत तक्रारदार क्रमांक 2 सदर योजने अंतर्गत लाभ घेण्यास पात्र असल्याचे स्पष्ट होते.
गैरअर्जदार 4 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांचा प्रस्ताव त्यांचेकडे दाखल नाही. सदर प्रकरणात गैरअर्जदार 1 गैरहजर असल्यामुळे तसेच तक्रारदारांनी गैरअर्जदार 3 यांना सदर प्रकरणातून वगळण्याबाबत दिलेल्या दिनांक 28.05.2013 रोजीच्या पुर्सीस नुसार गैरअर्जदार 3 यांना प्रस्तुत प्रकरणातून वगळण्यात आले आहे. गैरअर्जदार 3 यांनी विमा प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविला किंवा काय ? याबाबत खुलासा होत नाही. महाराष्ट्र शासनाने सदरची योजना शेतक-यांकरीता कल्याणकारी योजना राबवलेली असल्यामुळे, तसेच तक्रारीत दाखल कागदपत्रांनुसार तक्रारदारा क्रमांक 2 सदर योजने अंतर्गत लाभ घेण्यास पात्र असल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत देय असलेली नुकसान भरपाईची रक्कम रुपये 1,00,000/- गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी देणे न्यायोचित होईल असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- गैरअर्जदार 4 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदार क्रमांक 2 यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई रक्कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) आदेश मिळाल्या नंतर 30 दिवसात द्यावी.
- खर्चा बाबत आदेश नाही.
- ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच अर्जदाराला परत करावेत.