जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 46/2010. तक्रार दाखल दिनांक : 04/02/2010. तक्रार आदेश दिनांक : 20/04/2011. श्रीमती छाया कैलास भुसनर, रा. आहेरगांव, ता. माढा, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. तहसीलदार, ता.माढा, जि. सोलापूर. 2. कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि., 101, शिवाजी नगर, तिसरा मजला, मंगला टॉकीजजवळ, पुणे - 411 005. (नोटीस/समन्स व्यवस्थापक यांचेवर बजावण्यात यावे.) 3. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी. विभागीय कार्यालय क्र.1, ए.डी. कॉम्प्लेक्स, माऊंट रोड, सदर नागपूर-1. (नोटीस/समन्स व्यवस्थापक यांचेवर बजावण्यात यावे.) विरुध्द पक्ष कोरम :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : पी.पी. कुलकर्णी विरुध्द पक्ष गैरहजर/एकतर्फा आदेश सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेंतर्गत त्यांचे पती कैलास (संक्षिप्त रुपामध्ये 'मयत कैलास') यांचा विरुध्द पक्ष क्र.2 (संक्षिप्त रुपामध्ये 'कबाल इन्शुरन्स') यांच्या मार्फत विरुध्द पक्ष क्र.3 (संक्षिप्त रुपामध्ये 'विमा कंपनी') यांच्याकडे रु.1,00,000/- चा विमा उतरविण्यात आलेला आहे. दि.18/3/2008 रोजी मयत कैलास हे मोटार सायकलवरुन प्रवास करीत असताना ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद टेभुर्णी पोलीस स्टेशन येथे करण्यात येऊन घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, साक्षीदारांचे जबाब, फिर्यादी जबाब इ. नोंदविण्यात आले. त्यानंतर तक्रारदार यांनी विमा कंपनी यांच्याकडे विमा रक्कम मिळविण्यासाठी सर्व कागदपत्रे पाठवून दिलेली आहेत. परंतु विमा कंपनीने त्यांचा क्लेम विनाकारण प्रलंबीत ठेवला आहे. त्यामुळे प्रस्तुत तक्रारीद्वारे तक्रारदार यांनी विमा रक्कम रु.1,00,000/- व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांना मंचाची नोटीस बजावणी होऊनही ते मंचासमोर हजर राहिले नाहीत आणि म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले. 3. तक्रारदार यांची तक्रार व त्यांनी दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होत आहेत. मुद्दे उत्तर 1. विमा कंपनीने तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 6. मुद्दा क्र. 1 व 2 :- महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या शासन निर्णय क्र.पीएआयएस 1207/प्र.क्र.266/11ए, दि.24 ऑगस्ट, 2007 चे अवलोकन करता, शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेखाली विरुध्द पक्ष क्र.3 विमा कंपनीकडे दि.15/8/2007 ते 14/8/2008 कालावधीकरिता शेतक-यांचा प्रत्येकी रु.1,00,000/- रकमेचा अपघाती विमा उतरविल्याचे निदर्शनास येते. 7. तक्रारदार यांचे पती कैलास यांचा मृत्यू विमा कालावधीमध्ये म्हणजेच दि.18/3/2008 रोजी झाल्याचे निदर्शनास येते. मयत कैलास हे शेतकरी असल्याबद्दल 7/12 उतारा रेकॉर्डवर दाखल आहे. तक्रारदार यांनी तहसीलदार व कबाल इन्शुरन्समार्फत विमा क्लेम दाखल केल्याचे रेकॉर्डवर दाखल पत्रावरुन निदर्शनास येते. 8. विमा कंपनीस उचित संधी देऊनही त्यांनी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशी करण्यात येऊन तक्रार निर्णयासाठी घेण्यात आली. 9. रेकॉर्डवर दाखल कागदपत्रांवरुन मयत कैलास हे शेतकरी असल्याचे व त्यांचा मृत्यू अपघाती झाल्याचे सिध्द होते. अशा परिस्थितीत, विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा क्लेम कोणतेही कारण न देता प्रलंबीत ठेवून सेवेमध्ये त्रुटी केली आहे. त्यामुळे तक्रारदार विमा रक्कम रु.1,00,000/- तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळविण्यास पात्र ठरतात, या मतास आलो आहोत. 10. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.3 विमा कंपनीने तक्रारदार यांना रक्कम रु.1,00,000/- दि.4/2/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाच्या आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष क्र.3 विमा कंपनीने तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष क्र.3 विमा कंपनीने उपरोक्त आदेशाची विहीत मुदतीत न केल्यास एकूण देय रक्कम मुदतीनंतर 12 टक्के दराने अदा करावी. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/13411)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |