जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 411/2010. तक्रार दाखल दिनांक : 08/07/2010. तक्रार आदेश दिनांक : 02/12/2010. श्री. भाग्यवंत बाबुराव घुगे, वय 33 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. भालगांव, ता. बार्शी, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. तहसीलदार, तहसील कार्यालय, बार्शी, जि. सोलापूर. 2. तालुका कृषि अधिकारी, कृषि कार्यालय, मार्केट यार्ड, बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर. 3. व्यवस्थापक, कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि., रा. 101, शिवाजी नगर, तिसरा मजला, मंगला टॉकीजजवळ, पुणे - 411 005. (नोटीस/समन्स व्यवस्थापक यांचेवर बजावण्यात यावे.) 4. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि., रा. 210, साई इन्फोटेक, आर.बी. मेहता मार्ग, पाटील चौक, घाटकोपन (ईस्ट), मुंबई - 400 077. (नोटीस/समन्स व्यवस्थापक यांचेवर बजावण्यात यावे.) विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : बबिता एम. महंत - गाजरे विरुध्द पक्ष गैरहजर आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेंतर्गत तक्रारदार यांच्या आईचा विरुध्द पक्ष क्र.4 यांच्याकडे रु.1,00,000/- रकमेकरिता अपघाती विमा उतरविण्यात आलेला आहे. कुत्रे चावल्यामुळे दि.1/5/2007 रोजी तक्रारदार यांच्या आईचा मृत्यू झालेला आहे. सदर घटनेची नोंद वैराग पोलीस स्टेशन येथे करण्यात येऊन पोस्टमार्टेम करण्यात आले. त्यानंतर तक्रारदार यांनी विमा रक्कम मिळविण्यासाठी विरुध्द पक्ष यांच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे दाखल केलेली आहेत. परंतु कोणतेही कारण नसताना त्यांचा क्लेम अद्यापि प्रलंबीत ठेवला असून विरुध्द पक्ष यांनी त्यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे. शेवटी त्यांनी विमा रक्कम रु.1,00,000/- व्याजासह मिळावी आणि तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे. 2. विरुध्द पक्ष यांना मंचाच्या नोटीसची बजावणी झालेली आहे. त्यांना उचित संधी देऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत किंवा म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात येऊन तक्रार सुनावणीसाठी घेण्यात आली. 3. तक्रारदार यांची तक्रार व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- रेकॉर्डवर दाखल शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेचे महाराष्ट्र शासनाने प्रसिध्द केलेल्या दि.7 जुलै, 2006 च्या परिपत्रकानुसार विरुध्द पक्ष क्र.4 विमा कंपनीकडे शेतक-यांचा अपघाती विमा उतरविल्याचे रेकॉर्डवर निदर्शनास येते. मयत कडुबाई बाबुराव घुगे यांचा कुत्रे चावल्यामुळे मृत्यू झाल्याचे पोलीस मरनोत्तर पंचनाम्यावरुन निदर्शनास येते. रेकॉर्डवर दाखल पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये मयत कडुबाई यांचा मृत्यू कुत्रे चावल्यामुळे झाल्याचे नमूद केलेले आहे. 5. विरुध्द पक्ष यांना उचित संधी देऊनही त्यांनी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशी करण्यात येऊन तक्रार निर्णयासाठी घेण्यात आली. 6. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे विमा प्रस्ताव दाखल केल्याविषयी पत्र दाखल केले असून सदर कागदपत्रे मिळाल्याची पोहोच त्यावर आहे. मयत कडुबाई शेतकरी असल्यासंबंधी रेकॉर्डवर 7/12, गाव नमुना नं.6, 8-अ, 6-क, फेरफार नक्कल इ. कागदपत्रे दाखल केलेली असून त्याद्वारे मयत कडुबाई विमेदार असल्याचे निदर्शनास येते. तसेच मयत कडुबाई यांचा मृत्यू कुत्रे चावल्यामुळे झालेला आहे आणि शासन परिपत्रकामध्ये जनावरांच्या चावण्यामुळे झालेल्या मृत्यूस विमा संरक्षण आहे. मयत कडुबाई यांचा मृत्यू अपघाती असल्याचे दर्शविणारी आवश्यक कागदपत्रे रेकॉर्डवर दाखल आहेत. विरुध्द पक्ष क्र.4 विमा कंपनीने मंचासमोर हजर होऊन तक्रारदार यांची तक्रार नाकारलेली नाही. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार त्यांना मान्य आहे, असेही अनुमान काढणे उचित ठरते. रेकॉर्डवर दाखल कागदपत्रांवरुन मयत कडुबाई यांचा मृत्यू अपघाती असल्याचे व ते विमा लाभधारक असल्यामुळे तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र असल्याचे दिसून येते. कोणत्याही कारणाशिवाय विमा रक्कम देण्यास टाळाटाळ करुन विमा कंपनीने तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते. तक्रारदार यांच्याकडून कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तीन महिन्याचे आत क्लेमबाबत निर्णय घेणे आवश्यक होते. परंतु विमा कंपनीने कोणत्याही कारणाशिवाय क्लेम प्रलंबीत ठेवला असल्यामुळे क्लेम दाखल केल्याचा दि.21/8/2009 पासून तीन महिन्यांचा कालावधी देऊन म्हणजेच दि.22/11/2009 पासून विमा रक्कम रु.1,00,000/- द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळविण्यास पात्र ठरतात, या मतास आलो आहोत. 7. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.4 विमा कंपनीने तक्रारदार यांना रक्कम रु.1,00,000/- दि.22/11/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाच्या आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष क्र.4 विमा कंपनीने तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी मुदतीत न केल्यास विरुध्द पक्ष क्र.4 यांनी तेथून पुढे द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने रक्कम द्यावी. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/21210)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONORABLE Miss Sangeeta S Dhaygude] PRESIDENT | |