जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 51/2011. तक्रार दाखल दिनांक : 22/03/2011. तक्रार आदेश दिनांक : 29/04/2011. श्रीमती मंगल बापुसाहेब जाधव, वय 47 वर्षे, व्यवसाय : शेती, मु.पो. खंडाळी, ता. माळशिरस, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. तहसीलदार, ता. माळशिरस, जि. सोलापूर. 2. कबाल इन्शुरन्स कंपनी लि. प्रा.लि. , 101, शिवाजी नगर, तिसरा मजला, मंगला टॉकीजजवळ, पुणे - 411 005. (नोटीस/समन्स व्यवस्थापक यांचेवर बजावण्यात यावे.) 3. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं.लि., रा. 210, साई इन्फोटेक, आर.बी. मेहता मार्ग, पाटील चौक, घाटकोपर (ईस्ट), मुंबई – 400 077. 4. रिलायन्स जनरल इन्शु. कं.लि., रा. एच.डी.एफ.सी. बँकेच्या वर, लकी चौक, सोलापूर. (नोटीस/समन्स डिव्हीजनल यांचेवर बजावण्यात यावे.) विरुध्द पक्ष कोरम :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : पी.पी. कुलकर्णी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 गैरहजर/एकतर्फा विरुध्द पक्ष क्र. 3 व 4 यांचेतर्फे : आर.एम. कोनापुरे आदेश सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेंतर्गत त्यांचे पती बापुसाहेब (संक्षिप्त रुपामध्ये 'मयत बापुसाहेब') यांचा विरुध्द पक्ष क्र.2 (संक्षिप्त रुपामध्ये 'कबाल इन्शुरन्स') यांच्या मार्फत विरुध्द पक्ष क्र.3 (संक्षिप्त रुपामध्ये 'विमा कंपनी') यांच्याकडे रु.1,00,000/- चा विमा उतरविण्यात आलेला आहे. विमा कालावधी दि.15 ऑगस्ट, 2007 ते 14 ऑगस्ट 2008 असा आहे. दि.26/8/2007 रोजी मयत बापुसाहेब यांना राहते घरी इलेक्ट्रीक वायरचा शॉक बसून मृत्यू झाला आहे. अपघातानंतर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आणि घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, साक्षीदारांचे जबाब, फिर्यादी जबाब नोंदण्यात आले. तसेच पोस्टमार्टेम करण्यात आला आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी विमा रक्कम मिळविण्यासाठी सर्व कागदपत्रे पाठवून दिलेली आहेत. परंतु त्यांचा क्लेम प्रलंबीत ठेवून विमा रक्कम देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रारीद्वारे तक्रारदार यांनी विमा रक्कम रु.1,00,000/- व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष क्र.3 व 4 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पॉलिसी अटी प्रमाणे तक्रारदार यांनी त्यांच्याकडे एफ.आय.आर., पंचनामा, पी.एम. रिपोर्ट, पॉलिसी इ. कागदपत्रे दाखल करणे आवश्यक असून ती कागदपत्रे अप्राप्त आहेत. तक्रारदार याची तक्रार मुदतबाह्य आहे. शेवटी त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे तक्रार खर्चासह रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे. 3. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना मंचाची नोटीस बजावणी होऊनही ते मंचासमोर हजर राहिले नाहीत आणि म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले. 4. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र.2 यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होत आहेत. मुद्दे उत्तर 1. विमा कंपनीने तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 6. मुद्दा क्र. 1 व 2 :- महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या शासन निर्णय क्र.पीएआयएस 1207/प्र.क्र.266/11ए, दि.24 ऑगस्ट, 2007 चे अवलोकन करता, शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेखाली विरुध्द पक्ष क्र.3 विमा कंपनीकडे दि.15/8/2007 ते 14/8/2008 कालावधीकरिता शेतक-यांचा प्रत्येकी रु.1,00,000/- रकमेचा अपघाती विमा उतरविल्याचे निदर्शनास येते. 7. तक्रारदार यांचे पती बापुसाहेब यांचा मृत्यू विमा कालावधीमध्ये म्हणजेच दि.26/8/2007 रोजी झाल्याचे निदर्शनास येते. मयत बापुसाहेब हे शेतकरी असल्याबद्दल 7/12 व 8-अ उतारा रेकॉर्डवर दाखल असून त्यानुसार मयत बापुसाहेब यांचे नांवे खंडाळी, ता. माळशिरस या गावी भूमापन क्र.357 शेतजमीन असल्याचे निदर्शनास येते. तसेच रेकॉर्डवर क्लेम फॉर्म, मृत्यू प्रमाणपत्र, पोस्टमार्टेम रिपोर्ट, इन्क्वेस्ट पंचनामा, घटनास्थळ पंचनामा, तपास टिपण इ. कागदपत्रे दाखल आहेत. सदर कागदपत्रांवरुन मयत बापुसाहेब हे शेतकरी असल्याचे व त्यांचा मृत्यू इलेक्ट्रीक शॉकमुळे झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. 8. विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार पॉलिसी अटी प्रमाणे तक्रारदार यांनी त्यांच्याकडे एफ.आय.आर., पंचनामा, पी.एम. रिपोर्ट, पॉलिसी इ. कागदपत्रे दाखल करणे आवश्यक असून ती कागदपत्रे अप्राप्त असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. निर्विवादपणे, तक्रारदार यांचा विमा क्लेम विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. विमा योजनेची अंमलबजावणी पाहता, विमा क्लेम तहसीलदार यांच्याकडे दाखल केल्यानंतर सदरचा विमा दावा कबाल इन्शुरन्सकडे पाठविला जातो आणि त्यानंतर विमा कंपनीकडे सादर करण्यात येतो. सदर कार्यपध्दतीचा अवलंब करता, विमा क्लेम विमा कंपनीकडे पोहोचण्यास निश्चितच उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 9. रेकॉर्डवर दाखल कागदपत्रांवरुन मयत बापुसाहेब हे शेतकरी असल्याचे व त्यांचा मृत्यू इलेक्ट्रीक शॉकमुळे झाल्याचे सिध्द होते. अशा परिस्थितीत, विमा कंपनीने अत्यंत तांत्रिक कारण देऊन विमा रक्कम दिलेली नाही आणि सदर कृत्य त्यांच्या सेवेतील त्रुटी ठरते. त्यामुळे तक्रारदार विमा रक्कम रु.1,00,000/- तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळविण्यास पात्र ठरतात, या मतास आलो आहोत. 10. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.3 व 4 विमा कंपनीने तक्रारदार यांना रक्कम रु.1,00,000/- दि.22/3/2011 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाच्या आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष क्र.3 व 4 विमा कंपनीने तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.2,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष क्र.3 व 4 विमा कंपनीने उपरोक्त आदेशाची विहीत मुदतीत न केल्यास एकूण देय रक्कम मुदतीनंतर 12 टक्के दराने अदा करावी. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/29411)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |