निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 24/01/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 03/02/2012 तक्रार निकाल दिनांकः- 14/03/2014
कालावधी 02 वर्ष.01महिने.11 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
प्रेमा कांतीचंद गोलेच्छा, अर्जदार
वय 70 वर्षे. धंदा.घरकाम व व्यापार, अॅड.एस.एन.वेलणकर.
रा. कारेगांव, ता. जि. परभणी.
विरुध्द
1 अधिक्षक अभियंता, गैरअर्जदार.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि. अॅड.एस.एस.देशपांडे.
मंडळ कार्यालय, जिंतुर रोड,परभणी.
2 कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि.मंडळ कार्यालय, जिंतुर रोड, परभणी.
3 सहाय्यक अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि.मंडळ कार्यालय, जिंतुर रोड, परभणी.
_____________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचे धमकी देवुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, ती कारेगाव येथील रहिवाशी असून तिने तिच्या कुटूंबाच्या चरितार्थ चालविण्यासाठी छोटा उद्योग उभा केला व त्या अनुषंगाने अर्जदाराने गैरअर्जदाराकडून सदर उद्योगाकरीता दिनांक 16/08/1997 रोजी 45170/- रु. चे कोटेशन भरुन दिनांक 12/01/1998 रोजी ग्राहक क्रमांक 530336208237 अन्वये विद्युत पुरवठा घेतला. व सदर विद्युत पुरवठयाचे बिल अर्जदार नियमितपणे गैरअर्जदाराकडे भरतो व कोणतीही थकबाकी नाही.
अर्जदाराचे म्हणणे की, सदर उद्योगास विद्युत पुरवठा कमी पडत होता म्हणून तिने इ.स. 2003 मध्ये वाढीव विद्युत पुरवठयासाठी रु. 52420/- दिनांक 20/08/2003 मध्ये अर्जदाराने गैरअर्जदाराकडे भरले व त्यानुसार गैरअर्जदाराने वाढीव विद्युत पुरवठा अर्जदारास दिला.
अर्जदाराचे म्हणणे की, इ.स. 2009 मध्ये गैरअर्जदारानी अर्जदाराची सदरची विद्युत जोडणी ही त्यांच्या बाजुला असणा-या एक्सप्रेस फिडरवरुन दिली, त्यावेळी अर्जदाराने सदरच्या कृत्यास विरोध दर्शविला होता, पण त्याकडे गैरअर्जदाराने दुर्लक्ष केले व सांगीतले की, यामुळे तुमच्या विद्युत पुरवठ्यावर कोणताही परीणाम होणार नाही, त्याप्रमाणे सदर विद्युत पुरवठा सुरळीत सुरु राहिला.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराच्या सदर उद्योगास असलेल्या विद्युत पुरवठ्याची दिनांक 05/01/2012 रोजी गैरअर्जदाराच्या अधिका-यांनी पहाणी केली व त्यावेळीस संबंधीत अधिका-याने अर्जदारास असे सांगीतले की, सदरचा विद्युत पुरवठा जो एक्सप्रेस फिडरवरुन दिलेला आहे, तो काढून घ्यावे व अर्जदाराने जर ती काढली नाही तर विद्युत पुरवठा बंद करु. असे अधिका-याने अर्जदारास बजावले व लगेच गैरअर्जदाराने सदरचे विद्युत पुरवठा सात दिवसाच्या आत पर्यायी व्यवस्था करुन काढून घ्यावी अन्यथा गैरअर्जदाराची कंपनी नियमा प्रमाणे कार्यवाही करेल अर्जदारास नोटीस दिली.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराचे सदरचे कृत्य हे धक्कादायक व बेकायदेशिर आहे. सदरचा विद्युत पुरवठा हा गैरअर्जदारानेच दिलेला आहे व आता बेकायदेशिर नोटीस देत आहेत. ही बाब अर्जदारावर अन्यायकारक आहे. कारण एवढया कमी वेळात पर्यायी व्यवस्था करणे अशक्य आहे. म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारांना आदेश करावा की, अर्जदाराचा ग्राहक क्रमांक 530336208237 अन्वये असलेला विद्युत पुरवठा थकीत विज बिला शिवाय इतर कोणत्याही कारणास्तव खंडीत करु नये व तसेच गैरअर्जदारानी अर्जदारास दिनांक 05/01/2012 रोजी पाठविलेली नोटीस बेकायदेशिर घोषीत करावी. तसेच मानसिक त्रासापोटी 10,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 5,000/- गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयार्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 4 वर 7 कागदपत्राच्या यादीसह 7 कागदपत्राच्या प्रती दाखल केले आहेत. ज्यामध्ये 45,170/- रु.ची कोटेशन पावती, सदर कोटेशन रक्कम भरल्याची पावती अर्जदाराच्या नावे 52,420/- रु. ची कोटेशन पावती, सदर कोटेशनची रक्कम भरल्याची पावती, लाईट बिल, 5340/- ची पावती, गैरअर्जदाराने पाठविलेली नोटीसची प्रत, कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या.
गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर गैरअर्जदारास तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे अनेक संधी देवुनही मुदतीत लेखी जबाब सादर न केलेमुळे त्यांचे विरुध्द विनाजबाबाचा आदेश पारीत करण्यात आला.
तक्रार अर्जावरुन व दाखल केलेल्या कागदपत्रावरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे.
मुद्दे. उत्तर.
1 सदरची तक्रार मंचासमोर चालवण्यास पात्र आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
प्रस्तुत प्रकरणात अर्जदार हा ग्राहक होतो की नाही हा महत्वाचा कायदेशिर मुद्दा असा उपस्थित होतो. ग्राहक संरक्षण कायदा – 1986 च्या कलम 2 ( i )
( D ) ( ii ) च्या तरतुदीनुसार अर्जदार हा ग्राहक या संज्ञेत पात्र नाही, कारण अर्जदाराने स्वतः आपल्या तक्रारीमध्ये नमुद केले आहे की, त्याने त्याच्या उद्योगासाठी गैरअर्जदाराकडून दोनदा ग्राहक क्रमांक 530336208237 अन्वये विद्युत पुरवठा घेतला होता. व सदरचा विद्युत पुरवठा व्यवसायिक उद्योगासाठी घेतलेला आहे असे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 2 ( i ) ( D ) ( ii ) च्या तरतुदीनुसार अर्जदार हा ग्राहक या संज्ञेत बसत नाही. असे मंचाचे मत आहे. व सदरची तक्रार वरील कारणास्तव अर्जदार ग्राहक म्हणून प्रस्तुत तक्रार मंचासमोर दाखल करु शकत नाही व चालवू शकत नाही.
याबाबत मा.राष्ट्रीय आयोग दिल्ली याने Revision Petition No. 4038, 4050 and 5051 of 2012 Rajasthan State Industrial Development. V/s NKM Pvt. Ltd. मध्ये दिलेला निकाल तसेच मा.राष्ट्रीय आयोग दिल्ली याने 2014 CPJ 146 (NC) Bhardwaj Industries V/s Premier limited. या प्रकरणा मध्ये दिलेला निकाल प्रस्तुत प्रकरणास लागु पडते.
तसेच दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अर्जदाराने सदर तक्रारीमध्ये विनंती मध्ये त्याचा विद्युत पुरवठा गैरअर्जदाराने खंडीत करुनये. असा आदेश द्यावा म्हंटले आहे व अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 13 वरील अर्जात म्हंटले आहे की, सदरचा विद्युत पुरवठा गैरअर्जदाराने खंडीत केलेला आहे.या कारणास्तव सदरची तक्रार चालवणेस कांहीच अर्थ उरलेला नाही, असे मंचास वाटते. म्हणून सबब मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी करावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.