जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 60/2010. तक्रार दाखल दिनांक : 09/02/2010. तक्रार आदेश दिनांक :28/04/2011. रियाजुद्दीन फजलूल शेख, वय 46 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. 29, कमला नेहरु नगर, कुमठा नाका, सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. स्टेट बँक ऑफ इंडिया (हेड ऑफीस), रा. बाळीवेस शाखा, सोलापूर. (समन्स/नोटीस मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावी.) 2. सिटी युनियन बँक, रा. 520/2, इ र्वा, एल.एल. बेनादीकर पथ, जिमस्टेनच्या समोर, शाहुपुरी, कोल्हापूर – 416 001. (समन्स/नोटीस मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावी.) विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : जी.एच. कुलकर्णी विरुध्द पक्ष क्र.1 यांचेतर्फे अभियोक्ता : एन.आर. खंडाळ विरुध्द पक्ष क्र.2 यांचेतर्फे अभियोक्ता : आशिष भूमकर आदेश सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, विरुध्द पक्ष क्र.1 बँकेमध्ये त्यांचे बचत खाते क्र.110878801077 आहे आणि त्यांचे मासिक वेतन त्या खात्यामध्ये जमा होते. तक्रारदार हे कोल्हापूर येथे सेवेत असताना दि.9/1/2010 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 बँकेच्या ए.टी.एम. बुथमधून रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता, कार्ड ऑपरेट झाले नाही आणि पावती किंवा रक्कम मिळाली नाही. त्यानंतर विरुध्द पक्ष क्र.1 बँकेच्या कोल्हापूर येथील दाभोळकर कॉर्नर येथील ए.टी.एम. बुथमधून त्यांना रक्कम मिळाली नाही, परंतु ‘सॉरी अनेबल टू प्रोसेस’ अशी स्लीप प्राप्त झाली. त्यानंतर तक्रारदार यांनी तेथेच खात्यावरील रकमेची स्लीप काढली असता रु.1,091.65 शिलकेची स्लीप मिळाली आणि त्यांनी रु.1,000/- काढले असता रु.91.65 शिल्लक दर्शविली. त्यांचे रु.6,436/- वेतन जमा झालेले असताना रु.1,091.65 नमूद केले आहे. त्यामुळे त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 बँकेकडे तक्रारी अर्ज दिला असता, दि.9/1/2010 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या ए.टी.एम. द्वारे रु.5,800/- काढल्यामळे काहीही करता येऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले. विरुध्द पक्ष क्र.2 यांनीही त्याबाबत दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन त्यांचे खात्यावरील रक्कम रु.5,800/- व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रारदार यांची तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार दि.9/1/2010 रोजी तक्रारदार यांना विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या ए.टी.एम. मशीनद्वारे रु.5,800/- मिळालेले आहेत. यांत्रिकी व संगणकीय दोषाचा लाभ घेत तक्रारदार यांनी तक्रार केलेली आहे. तक्रारदार यांची तक्रार प्राप्त होताच त्यांची तात्काळ विरुध्द पक्ष क्र.2 बँकेकडे पाठविली असता त्यांनी सदर व्यव्हार-प्रक्रिया यशस्वी होऊन ए.टी.एम. मशीनद्वारे रु.5,800/- अदा केल्याचे कळविले. त्याप्रमाणे त्यांनी तक्रारदार यांना रक्कम क्रेडीट करता येत नसल्याचे कळविलेले आहे. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रारदार यांची तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडील उपलब्ध रेकॉर्ड व माहितीनुसार तक्रारदार यांनी दि.9/1/2010 रोजी सायं.6.15.41 वाजता रु.5,800/- त्यांच्या ए.टी.एम. बुथमधून काढले आहेत. सदर व्यवहार-प्रक्रिया संगणकाद्वारे सॅटेलॉईटला जोडलेली आहे. तसेच तक्रारदार यांना रक्कम मिळाली नसल्यास त्यांनी तक्रार-पेटीमध्ये तक्रार नोंदविणे आवश्यक होते. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी त्यांच्याकडे तक्रार नोंदविलेली नाही. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी आपल्या म्हणण्यामध्ये ए.टी.एम. कार्डविषयी पध्दती नमूद केली आहे. शेवटी त्यांनी तक्रार रद्द करण्याची विनंती केली आहे. 4. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 5. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांचे विरुध्द पक्ष क्र.1 बँकेमध्ये बचत खाते क्र.110878801077 असल्याविषयी विवाद नाही. तसेच तक्रारदार हे विरुध्द पक्ष क्र.1 बँकेकडून प्राप्त झालेल्या ए.टी.एम. कार्डद्वारे व्यवहार पाहत असतात, याविषयी विवाद नाही. तसेच तक्रारदार यांना रु.5,800/- रक्कम प्राप्त न होताच ती कपात केल्यामुळे विरुध्द पक्ष यांच्याकडे तक्रार केल्याविषयी विवाद नाही. त्यांच्या तक्रारीनंतर दि.9/1/2010 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या ए.टी.एम. द्वारे रु.5,800/- काढल्यामुळे काहीही करता येऊ शकत नसल्याचे विरुध्द पक्ष यांनी सांगितल्याविषयी विवाद नाही. 6. तक्रारदार यांनी दि.9/1/2010 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 बँकेच्या कोल्हापूर येथील दाभोळकर कॉर्नर येथील ए.टी.एम. बुथमधून रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना रक्कम मिळाली नाही, परंतु ‘सॉरी अनेबल टू प्रोसेस’ अशी स्लीप प्राप्त झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी तेथेच खात्यावरील रकमेची स्लीप काढली असता रु.1,091.65 शिलकेची स्लीप मिळाली. त्यांनी रु.1,000/- काढले असता रु.91.65 शिल्लक दर्शविली आणि आणि त्यांचे रु.6,436/- वेतन जमा झालेले असताना रु.1,091.65 दर्शविल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 6. विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांची तक्रार प्राप्त होताच त्यांची तात्काळ विरुध्द पक्ष क्र.2 बँकेकडे पाठविली असता, सदर व्यव्हार-प्रक्रिया यशस्वी होऊन ए.टी.एम. मशीनद्वारे रु.5,800/- अदा केल्याचे कळविलचे नमूद केले आहे. तसेच विरुध्द पक्ष क्र.2 यांनीही त्यांच्याकडील उपलब्ध रेकॉर्ड व माहितीनुसार तक्रारदार यांनी दि.9/1/2010 रोजी सायं.6.15.41 वाजता रु.5,800/- त्यांच्या ए.टी.एम. बुथमधून काढल्याचे नमूद केले आहे. 7. तक्रारदार यांच्या बचत खात्याचे पासबुक पाहता, दि.7/1/2010 रोजी रु.6,436/- वेतन जमा झालेले असून पूर्वीची जमा रक्कम रु.955.65 व वेतनाचे रु.6,436/- असे एकूण रु.7,301.65 जमा होते, हे स्पष्ट आहे. त्यानंतर दि.9/1/2010 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या ए.टी.एम. बुथवरुन तक्रारदार यांच्या खात्यामधून दि.9/1/2010 रोजी सायं.6.15.41 वाजता रु.5,800/- काढल्याचे विरुध्द पक्ष यांचे म्हणणे आहे. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या ए.टी.एम. बुथ आय.डी. नं.एस 1 सीएन 00188702 मधून दि.9/1/2010 रोजी 18.00 वाजता रु.1,000/- काढले असता उपलब्ध शिल्लक रक्कम रु.91.65 दर्शविली आहे. त्याप्रमाणे पासबुकामध्येही त्याची नोंद आहे. निर्विवादपणे, रु.5,800/- काढल्याची तथाकथित बाब व रु.1,000/- काढण्यापूर्वी तक्रारदार यांनी कोणतीही रक्कम काढलेली नाही, हे स्पष्ट आहे. याचाच अर्थ, तक्रारदार यांच्या खात्यातून रु.5,800/- कपात झाल्यानंतर उर्वरीत शिल्लक रक्कम रु.591.65 दर्शविणे जरुरीचे असताना रु.91.65 दर्शविण्यात आलेले आहेत. त्याबाबत विरुध्द पक्ष हे उचित खुलासा करु शकले नाहीत. त्यानंतर विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या ए.टी.एम. बुथमधून दि.9/1/2010 रोजी 18.15.41 वाजता रु.5,800/- काढल्याची नोंद असणारी स्लीप रेकॉर्डवर दाखल आहे. वास्तविक पाहता, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या ए.टी.एम. बुथ आय.डी. नं.एस 1 सीएन 00188702 मधून दि.9/1/2010 रोजी 18.00 वाजता रु.1,000/- काढले असताना व रु.91.65 शिल्लक दर्शविली असताना विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या ए.टी.एम. बुथमधून त्याच दिवशी 18.15.41 वाजता रु.5,800/- रक्कम कशी मिळू शकते ? हे स्पष्ट होत नाही. वरील सर्व विवेचनावरुन विरुध्द पक्ष यांच्या ए.टी.एम. मशीनच्या संगणकीय व तांत्रिक दोषामुळे तक्रारदार यांना रक्कम प्राप्त न होताच रु.5,800/- काढल्याची नोंद होऊन रक्कम कपात झाल्याचे ग्राह्य धरणे उचित ठरते. त्यादृष्टीने तक्रारदार यांचा युक्तिवाद आम्ही मान्य करीत आहोत. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेमध्ये निश्चितच त्रुटी केलेली आहे आणि तक्रारदार विरुध्द पक्ष यांच्याकडून रु.5,800/- व्याजासह मिळविण्यास पात्र ठरतात. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना रु.5,800/- दि.9/1/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 2. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/27411)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |