जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 676/2009. तक्रार दाखल दिनांक : 09/12/2009. तक्रार आदेश दिनांक : 28/06/2011. श्री. बाळासाहेब भास्करराव पाटील, वय सज्ञान, व्यवासय : शेती, रा. मु.पो. नान्नज, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. श्रीमती मल्लव्वाबाई वल्याळ चॅरिटेबल डेंटल हॉस्प्टिल, 2, 3, गणेश पेठ, शॉपिंग सेंटर, सोलापूर – 413 005. 2. श्री. नागेश वल्याळ, वय सज्ञान, व्यवसाय : अध्यक्ष, नं.1 प्रमाणे. 3. श्री. संदिप वल्याळ, वय सज्ञान, व्यवसाय : सचिव, नं.1 प्रमाणे. 4. डॉ. श्री. प्रशांत वाले, वय सज्ञान, व्यवसाय : डॉक्टर, नं.1 प्रमाणे. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : एम.जी. थोरात विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : ए.एम. देवधर आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांची डावी दाढ दुखत असल्यामुळे दि.19/9/2009 रोजी उपचार घेण्यासाठी ते विरुध्द पक्ष यांचे दवाखान्यामध्ये गेले असता विरुध्द पक्ष क्र.4 (संक्षिप्त रुपामध्ये ‘डॉ. वाले’) यांनी रु.50/- चा भरणा करुन एक्स-रे काढण्यास सांगितले. त्याप्रमाणे रकमेचा भरणा करुन एक्स-रे दाढेचा फोटो काढून डॉ. वाले यांना दाखविला. त्यानंतर दाढेचा उपचार करताना डॉ. वाले यांच्या निष्काळजीपणामुळे व हलगर्जीपणामुळे दाढ साफ करण्याची सुई निसटून तक्रारदार यांच्या पोटामध्ये गेली. त्यामुळे तक्रारदार यांना वेदना होऊ लागल्या आणि डॉ. वाले यांनी गांभिर्य ओळखून तक्रारदार यांना मार्केंडेय सहकारी रुग्णालयामध्ये पाठविले. तेथे त्यांची एंडोस्कोपी करण्यात आली. तसेच अश्विनी रुग्णालयामध्ये स्कॅनिंग केले असता पोटामध्ये सुई आढळून आली. तक्रारदार यांना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला असून प्रस्तुत तक्रारीद्वारे त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून रु.1,65,000/- नुकसान भरपाईची मागणी केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार डाव्या दाढेमध्ये वेदना होत असल्यामुळे तक्रारदार दि.19/9/2009 रोजी 5.30 वाजता त्यांच्याकडे आले आणि रुट कॅनल ट्रीटमेंटकरिता त्यांना दुस-या दिवशी येण्यास सांगितले. परंतु तक्रारदार हे मद्याच्या अंमलाखाली होते आणि त्यांनी उपचाराबाबत आग्रह केला. उपचारादरम्यान तक्रारदार हे सहकार्य करीत नव्हते आणि तोंड बंद न करण्याची सूचना देऊनही त्यांनी तोंड बंद केले आणि उपकरण गिळंकृत केले. त्यामध्ये विरुध्द पक्ष यांना कोणताही निष्काळजीपणा व दोष नाही. पोटातून ते उपकरण काढणे त्यांना शक्य नसल्यामुळे त्यांनी मार्केंडेंय रुग्णालयास पत्र लिहून वस्तुस्थिती कळविली. तसेच तक्रारदार यांनी नंतर त्यांच्याकडे परत येऊन पुढील दंतचिकित्सा पूर्ण करुन घेतलेली आहे. शेवटी त्यांनी तक्रार रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांना दाढेमध्ये वेदना होत असल्यामुळे दि.19/9/2009 रोजी विरुध्द पक्ष क्र.4 डॉ. वाले यांच्याकडे जाऊन उपचार घेतल्याविषयी विवाद नाही. डॉ. वाले यांनी त्यांच्या दाढेवर रुट कॅनल ट्रीटमेंट केल्याविषयी विवाद नाही. प्रामुख्याने, दाढेचा उपचार करताना डॉ. वाले यांच्या निष्काळजीपणामुळे व हलगर्जीपणामुळे दाढ साफ करण्याची सुई निसटून पोटामध्ये गेल्याची तक्रारदार यांची प्रमुख तक्रार आहे. उलटपक्षी, तक्रारदार हे उपचारादरम्यान मद्याच्या अंमलाखाली होते आणि उपचारादरम्यान तक्रारदार हे सहकार्य करीत नव्हते. तसेच तोंड बंद न करण्याची सूचना देऊनही त्यांनी तोंड बंद केले आणि उपकरण गिळंकृत केल्याचे विरुध्द पक्ष यांनी नमूद केले आहे. 5. तक्रारदार यांच्या दाढेवर रुट कॅनल ट्रीटमेंट करताना तक्रारदार यांच्या पोटामध्ये सुई / उपकरण गेल्याविषयी विवाद नाही. वास्तविक पाहता, सुई / उपकरण पोटामध्ये गेल्याबाबत दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केलेले आहेत. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर सुई / उपकरण दाखल केलेले आहे. त्याचे अवलोकन करता, सदर सुई / उपकरण हा एक स्वतंत्र भाग असला तरी उपचारादरम्यान त्यास इतर उपकरण जोडून त्याचा वापर होतो, हे सकृतदर्शनी निदर्शनास येते. निश्चितच सदर सुई / उपकरण हे दुस-या जोडलेल्या उपकरणातून निसटून किंवा तुटून तोंडात पडल्यामुळे तक्रारदार यांच्या पोटात गेल्याचे स्पष्ट आहे. 6. विरुध्द पक्ष यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार हे उपचारादरम्यान मद्याच्या अंमलाखाली होते आणि उपचारादरम्यान तक्रारदार हे सहकार्य करीत नव्हते. तसेच तोंड बंद न करण्याची सूचना देऊनही त्यांनी तोंड बंद केले आणि सुई / उपकरण गिळंकृत केल्याचे नमूद केले आहे. आमच्या मते, ज्यावेळी एखादा पेशंट पूर्णत: मद्याच्या अंमलाखाली असेल आणि तो शस्त्रक्रिया किंवा ट्रीटमेंटसाठी सहकार्य करीत नसेल, अशावेळी रुट कॅनल ट्रीटमेंट करणे कसे अत्यावश्यकच होते ? या प्रश्नाचा उकल होऊ शकत नाही. निर्विवादपणे, यदाकदाचित तक्रारदार हे मद्याच्या अंमलाखाली असतील आणि त्यांनी उपचारास असहकार्य केल्याचे मान्य केले तरी रुट कॅनल ट्रीटमेंट न केल्यामुळे तक्रारदार यांच्या जिवितास कोणताही अपाय किंवा धोका ठरु शकत नव्हता, हे स्पष्ट होते. डॉ. वाले यांनी मार्केंडेय रुग्णालयास लिहिलेल्या पत्रामध्येही रुट कॅनल ट्रीटमेंट करताना पेशंटने सुई / उपकरण गिळंकृत केल्याचे नमूद करुन पुढील उपचार करण्याबाबत सूचित केल्याचे दिसून येते. तक्रारदार हे उपचारादरम्यान मद्याच्या अंमलाखाली होते आणि तक्रारदार यांच्या गैरवर्तनामुळेच सुई / उपकरण त्यांच्या पोटात गेले, याविषयी कोणताही निर्णायक व विश्वसनिय पुरावा सादर करण्यास विरुध्द पक्ष हे असमर्थ ठरले आहेत. 7. वरील सर्व विवेचनावरुन डॉ. वाले यांनी तक्रारदार यांची रुट कॅनल ट्रीटमेंट करताना सुई / उपकरण हे दुस-या जोडलेल्या उपकरणातून निसटून किंवा तुटून तोंडात पडल्यामुळे तक्रारदार यांच्या पोटात गेल्याचे मान्य करावे लागते. तसेच आमच्या मते, प्रस्तुत प्रकरणामध्ये तज्ञाचे मत घेण्याची आवश्यकता वाटत नाही आणि तशी मागणी कोणत्याही पक्षाने केलेले नाही. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या वैद्यकीय सेवेमध्ये निष्काळजीपणा केल्याचे सिध्द होते आणि तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र ठरतात. निर्विवादपणे, तक्रारदार यांच्या पोटामध्ये सुई / उपकरण गेल्यामुळे त्यांना इतरत्र वैद्यकीय उपचार घ्यावे लागले आहेत. तसेच त्यामुळे त्यांना निश्चितच मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागल्याचे स्पष्ट होते. योग्य विचाराअंती आम्ही तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांच्याकडून रु.1,00,000/- नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र आहेत, या निर्णयाप्रत आलो आहोत. 8. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना रु.1,00,000/- (रुपये एक लक्ष फक्त) नुकसान भरपाई या आदेशाच्या प्राप्तपासून तीस दिवसाच्या आत द्यावी. (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/9611)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |