(घोषित दि. 30.07.2013 श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांचे पती श्री.कैलास शंकर सोनवणे हे शेतकरी असुन दिनांक 18.05.2010 रोजी नगर-औरंगाबाद रोडवर झालेल्या मोटार अपघातात मृत्यू पावले. सदर घटने बाबत वाळूज पोलीस स्टेशन, औरंगाबाद यांनी ट्रक चालकाच्या विरुध्द भारतीय दंड विधान कलम 304 (अ), 279 व 427 अन्वये गुन्हा नोंदविला.
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर जूलै 2010 मध्ये शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह तालूका कृषी अधिकारी, भोकरदन यांचे कार्यालयात दाखल केला. तालूका कृषी अधिकारी यांनी प्रस्तावाची तपासणी करुन जिल्हा कृषी अधिकारी, जालना यांचेकडे पाठवला. तक्रारदारांना प्रस्तावा संदर्भात कोणतीही माहीती न मिळाल्यामूळे कार्यालयात फोन द्वारे संपर्क केला असता मोटार सायकल चालविण्याचे ड्रायव्हिंग लायसन्स, पी.एम.रिपोर्ट, व्हीसेरा रिपोर्ट वगैरे कागदपत्र दाखल करण्याबाबत सांगितले. त्याप्रमाणे मूत्यूचे अंतीम कारण दर्शविणारे घाटी दवाखान्याचे पत्र दिनांक 19.10.2010 रोजीचे तसेच श्री.सुनील रघुनाथ पाटील (मोटार सायकल चालक) यांचे वाहन चालविण्याचा परवाना व इतर कागदपत्रे पुन्हा ऑक्टोबर 2010 मध्ये दाखल केली. परंतू प्रस्तावा संदर्भात कोणतीही माहीती तक्रारदारांना मिळाली नाही. तक्रारदारांनी दिनांक 25.07.2011 रोजी जिल्हा नियंत्रण समिती, जालना यांचेकडे तक्रार दाखल केली. परंतू तक्रारदारांची तक्रार बैठकीत न ठेवता विमा कंपनीकडे पाठवली असे समजते. परंतू विमा कंपनीने तक्रारदारांचा प्रस्ताव प्रलंबित ठेवला अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
गैरअर्जदार 1 जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी दिनांक 28.12.2011 रोजी दाखल केलेल्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांचा प्रस्ताव दिनांक 03.08.2010 रोजी प्राप्त झाल्यानंतर दिनांक 06.09.2010 रोजीचे पत्रानुसार प्रस्तावामध्ये व्हिसेरा रिपोर्ट व ड्रायव्हिंग लायसन्सची पुर्तता करण्याबाबत पत्र क्रमांक 5596 दिनांक 22.10.2012 अन्वये कळविण्यात आले. तक्रारदारांनी सदर कागदपत्र (व्हिसेरा रिपोर्ट व ड्रायव्हिंग लायसन्स) कार्यालयात दाखल केले असून पत्र क्रमांक 1311/11 दिनांक 02.03.2011 अन्वये गैरअर्जदार 2 यांचेकडे सादर केले.
गैरअर्जदार 2 यांचे लेखी म्हणण्यानुसार वर नमूद केलेल्या कागदपत्रांची पुर्तता न झाल्यामूळे तक्रारदारांचा प्रस्ताव गैरअर्जदार 3 यांचेकडे अपूर्ण प्रस्ताव या शे-यासह दिनांक 21.12.2010 रोजी पाठविला. गैरअर्जदार 3 विमा कंपनीने दिनांक 31.12.2010 रोजीच्या पत्रानुसार तक्रारदारांच्या प्रस्तावाची फाईल बंद करण्यात आली.
गैरअर्जदार 3 यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांचा विमा प्रस्ताव मूदतीत तसेच आवश्यक कागदपत्रासह दाखल केला नाही अशा परिस्थितीत विमा कंपनीची सेवेतील त्रुटी स्पष्ट होत नाही.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, लेखी युक्तीवाद गैरअर्जदार 1 ते 3 यांचे लेखी म्हणणे यांचे सखोल वाचन केले. गैरअर्जदार क्रमांक 3 यांचे विद्वान वकील श्री.संदीप देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदारांचे पती श्री.कैलास शंकर सोनवणे यांचा दिनांक 15.05.2010 रोजी अपघाती मृत्यू झाल्यानंतर तक्रारदारांचा विमा प्रस्ताव दिनांक 03.08.2010 रोजी गैरअर्जदार 1 यांचेकडे दाखल झाला असून दिनांक 06.09.2010 रोजी गैरअर्जदार 2 यांचेकडे पाठविण्यात आला. त्याच प्रमाणे तक्रारदारांनी व्हिसेरा रिपोर्ट व ड्रायव्हिंग लायसन्सची पुर्तता दिनांक 02.03.2011 रोजी गैरअर्जदार 2 यांचेकडे केल्याबाबत गैरअर्जदार 1 यांनी सन 2009-2010 मधील दाव्यामध्ये पुर्तता केलेल्या प्रकरणाच्या यादी वरुन स्पष्ट होते.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी विहीत मुदतीत व आवश्यक कागदपत्रांसहीत सदर योजने अंतर्गत विमा प्रस्ताव दाखल केला असून व्हिसेरा रिपोर्ट व ड्रायव्हिंग लायसन्स या कागदपत्रांची पुर्तता केली आहे. सदर कागदपत्रे गैरअर्जदार 2 कबाल इन्शुरन्स कंपनीकडे दिनांक 02.03.2011 रोजी सादर केल्याचे तक्रारीत दाखल पुराव्यावरुन स्पष्ट होते. तसेच तक्रारीतील दाखल पुराव्यानुसार तक्रारदारांचे पती शेतकरी असून त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे दिसून येते. यावरुन तक्रारदार सदर योजने अंतर्गत लाभ घेण्यास पात्र असल्याचे स्पष्ट होते असे मंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी सदर योजने अंतर्गत आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पुर्तता करुनही गैरअर्जदार 3 विमा कंपनीने अपूर्ण कागदपत्रांच्या कारणास्तव तक्रारदारंच्या प्रस्तावाची फाईल बंद केली. गैरअर्जदार 3 यांची सदरची कृती सेवेतील त्रूटी असल्याचे स्पष्ट होते.
तक्रारदार सदर योजने अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र असल्याचे तक्रारीत आलेल्या पुराव्यावरुन स्पष्ट होत असल्यामूळे गैरअर्जदार 3 विमा कंपनीने सदर योजने अंतर्गत देय असलेली विमा लाभ रक्कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) तक्रारदारांना देणे न्यायोचित होईल असे मंचाचे मत आहे.
सदरची योजना महाराष्ट्र शासनाने शेतक-यांकरीता कल्याणकारी योजना राबवलेली असून नूकसान भरपाईची रक्कम विहीत मूदतीत शेतक-यांच्या कुंटूंबियांना म्हणजेच तक्रारदारांना न मिळाल्यामूळे निश्चित मानसिक त्रास झाला आहे, तसेच सदरची तक्रार दाखल करावी लागली. त्यामुळे गैरअर्जदार 3 यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रुपये 2,500/- तसेच तक्रारीचा खर्च रुपये 1,500/- देणे उचित होईल असे मंचाचे मत आहे.
सबब मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- गैरअर्जदार 3 विमा कंपनीला आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत देय असलेली विमा लाभ रक्कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त), मानसिक त्रासाची रक्कम रुपये 2,500/- (अक्षरी रुपये दोन हजार पाचशे फक्त), तक्रारीचा खर्च रुपये 1,500/- (अक्षरी रुपये एक हजार पाचशे फक्त) आदेश मिळाल्यापासून 30 दिवसात देण्यात यावी.
- वरील आदेश क्रमांक 2 मध्ये नमूद केलेल्या रकमा विहीत मूदतीत अदा न केल्यास 9 टक्के व्याज दरासहीत द्याव्यात.
- ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.