जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 106/2010. तक्रार दाखल दिनांक : 06/03/2010. तक्रार आदेश दिनांक : 22/03/2011. श्रीमती आशा हनुमंत चव्हाण, वय सज्ञान, व्यवसाय : घरकाम, रा. सवतगव्हाण, ता. माळशिरस, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं., तिसरा मजला, चेंबर 4, नरिमन पॉईंट, मुंबई. 2. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं.लि., तिसरा मजला, संगम प्रोजेक्ट कमर्शियल कॉम्प्लेक्स, संगम पुलाजवळ, डॉ. आंबेडकर रोड, पुणे – 411 001. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : पी.जी. शहा विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : विदुला आर. राव आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांचे पती हणमंत विठ्ठल चव्हाण यांनी सुमित्रा सहकारी पतसंस्था, माळशिरस यांच्याकडे दि.21/5/2005 रोजी त्यांची मुलगी प्रतिक्षा यांचे नांवे दामदुप्पट ठेवीद्वारे रु.30,000/- गुंतवणूक केले आहेत. ठेवीच्या अनुषंगाने सदर पतसंस्थेने ग्रुप पर्सनल अक्सीडेंट शेडयुल पॉलिसी क्र.17-29-14-00026-06 अन्वये ठेवीदारांचा दि.5/6/06 ते 4/6/07 कालावधीकरिता रु.1,00,000/- चा विमा उतरविला आहे. तक्रारदार यांचे पती मयत हणमंत हे दि.14/2/2007 रोजी वाहन अपघातामध्ये मृत्यू पावले. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र असल्यामुळे विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली असता पॉलिसी अट क्र.3 चा आधार घेत विमा रक्कम देण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे विमा रक्कम रु.1,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार खर्चापोटी रु.10,000/- व्याजासह मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारीमध्ये नमूद पॉलिसी त्यांनी जारी केलेली आहे. तक्रारदार यांनी सुमित्रा ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था लि. यांना आवश्यक पक्षकार केलेले नाही. विमेदाराकडून दाखल झालेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तक्रारदार यांचा क्लेम पॉलिसी अट क्र.3 नुसार पॉलिसी कक्षेत येत नाही. त्यामुळे तक्रारदार हे विमा रक्कम मिळविण्यास पात्र नाहीत आणि दि.10/5/2007 च्या पत्राद्वारे क्लेम नाकारण्यात आला. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे तक्रार खर्चासह रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांचे पती मयत हणमंत विठ्ठल चव्हाण यांनी सुमित्रा सहकारी पतसंस्था, अकलूज यांच्या जयशंकर उद्यान शाखेमध्ये दि.21/5/2005 रोजी त्यांची मुलगी प्रतिक्षा यांचे नांवे दामदुप्पट ठेवीद्वारे रु.30,000/- गुंतवणूक केले असल्याविषयी विवाद नाही. तसेच सुमित्रा सहकारी पतसंस्थेने त्यांच्या ठेवीदारांचा ग्रुप पर्सनल अक्सीडेंट शेडयुल पॉलिसी क्र.17-29-14-00026-06 अन्वये दि.5/6/06 ते 4/6/07 कालावधीकरिता प्रत्येकी रु.1,00,000/- चा विमा उतरविल्याविषयी विवाद नाही. तक्रारदार यांचे पती मयत हणमंत हे दि.14/2/2007 रोजी वाहन अपघातामध्ये मृत्यू पावल्याविषयी विवाद नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे विमा क्लेम दाखल केल्याविषयी विवाद नाही. तसेच विरुध्द पक्ष यांनी पॉलिसी अट क्र.3 चा आधार घेत तक्रारदार यांचा विमा क्लेम नाकारल्याविषयी विवाद नाही. 5. विमा कंपनीने प्रामुख्याने पॉलिसी अट क्र.3 चा आधार क्लेम नाकारण्यासाठी घेतलेला असून सदर अट खालीलप्रमाणे नमूद आहे. 3. In the event of a claim under the policy, the onus of proving, providing documentary evidence that the person in respect of whom the claim is made was / is a Depositor of the Path Sanstha as on date of inception of policy, shall lie with the insured. 6. याचाच अर्थ, पॉलिसी अंतर्गत दावा करताना ज्याच्याकरिता विमा दावा करण्यात आलेला आहे, तो व्यक्ती पतसंस्थेचा ठेवीदार असल्याचे कागदोपत्री सिध्द करण्याची जबाबदारी विमेदारावर असल्याचे निदर्शनास येते. 7. तक्रारदार यांनी रेकॉर्डवर दामदुप्पट ठेव पावती क्र.00112 दाखल केलेली आहे. सदर पावतीवर ‘प्रतिक्षा हणमंत अपाक हणमंत विठ्ठल चव्हाण’ असे नांव असल्याचे निदर्शनास येते. पॉलिसीच्या अटीप्रमाणे पतसंस्थेचा ठेवीदार असल्याचे सिध्द झाल्यास विमेदार गृहीत धरण्यात येते. दामदुप्पट ठेव पावती जरी ‘प्रतिक्षा’ यांचे नांवे असली तरी अज्ञान पालनकर्ता म्हणून त्यावर हणमंत विठ्ठल चव्हाण यांचेही नांव आहे. ‘प्रतिक्षा’ ही अज्ञान असल्यामुळे ठेव पावतीची रक्कम ठेवणे, उचलणे, त्यावर कर्ज घेणे इ. करिता अज्ञान पालनकर्ता म्हणून हणमंत विठ्ठल चव्हाण हे कायदेशीरदृष्टया जबाबदार होते. त्यामुळे मयत हणमंत विठ्ठल चव्हाण हे सुध्दा ‘प्रतिक्षा’ यांच्यासोबत संयुक्त ठेवीदार ठरतात. त्याशिवाय, विरुध्द पक्ष यांनी पॉलिसीमध्ये ‘ठेवीदार’ शब्दाची काय व्याख्या आहे ? हे सिध्द केले नाही. वरील विवेचनावरुन मयत हणमंत हे सुध्दा सुमित्रा सहकारी पतसंस्थेचे ‘ठेवीदार’ बनतात आणि त्या अनुषंगाने त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर देय विमा रक्कम मिळविण्यास तक्रारदार हक्कदार आहेत, या मतास आम्ही आलो आहोत. 8. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचा विमा क्लेम नाकारुन सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे आणि तक्रारदार हे विमा रक्कम रु.1,00,000/- विमा दावा नाकारल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळविण्यास पात्र आहेत. 9. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना विमा रक्कम रु.1,00,000/- (रु.एक लक्ष फक्त) दि.10/5/2007 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. वर नमूद रक्कम तीस दिवसाचे आत न दिल्यास विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना त्यानंतर देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने द्यावी. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/15311)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |