जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 427/2010. तक्रार दाखल दिनांक: 19/07/2010. तक्रार आदेश दिनांक : 01/02/2011. श्री. नारायण बाबुराव चापले, वय 31 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. महागाव, ता. बार्शी, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं.लि., रा. तिसरा मजला, संगम प्रोजेक्ट, कमर्शियल कॉम्प्लेक्स, संगम पुलाजवळ, डॉ. आंबेडकर रोड, पुणे - 411 050. 2. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं.लि., शाखा सोलापूर, सन प्लाझा, दुसरा मजला, रा. 8516/11, मुरारजी पेठ, शिवपार्वत हॉटेलसमोर, लकी चौक, सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : बी.एम. महंत-गाजरे विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : व्ही.आर. राव आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, ते व्यवसायाने शेतकरी असून दुग्ध व्यवसायासाठी त्यांनी जर्शी गाय खरेदी केलेली आहे. सदर गाईचा विरुध्द पक्ष (संक्षीप्त रुपामध्ये 'विमा कंपनी') यांच्याकडे पॉलिसी क्र.17023830100001 अन्वये रु.25,000/- चा विमा उतरविण्यात आला आणि त्यांच्या गाईस बिल्ला क्र.60367 मिळाला आहे. तक्रारदार यांची गाय आजारी पडली आणि दि.26/9/2008 रोजी मृत्यू पावली. तक्रारदार यांनी त्याबाबत विमा कंपनीस कळविले आणि योग्य कागदपत्रांची पुर्तता केली. परंतु विमा कंपनीने दि.19/3/2009 च्या पत्राद्वारे क्लेम दाखल करण्यास उशिर झाल्याच्या कारणास्तव विमा क्लेम नामंजूर केला आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे विमा रक्कम रु.25,000/- व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी अनुक्रमे रु.10,000/- व रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विमा कंपनीने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांना कॅटल इन्शुरन्स पॉलिसी क्र.1702-38-3012-100001 अन्वये अटी व शर्तीस अधीन राहून पॉलिसी जारी केलेली आहे. पॉलिसीच्या अट क्र.6 नुसार विमा संरक्षीत गाईच्या मृत्यूनंतर जवळच्या विमा कंपनीस नोटीसद्वारे तात्काळ कळविणे आवश्यक असून ज्यामुळे त्यांना जनावराचे शव परिक्षण करता येऊ शकते. तसेच विमेदाराने 14 दिवसाचे आत गाईच्या मृत्यूची माहिती व कागदपत्रे दाखल करणे आवश्यक आहे. तक्रारदार यांची गाय दि.26/9/2008 रोजी मृत्यू पावली आहे आणि त्याबाबतची सूचना दि.17/12/2008 रोजी विमा कंपनीस देण्यात आलेली आहे. तक्रारदार यांचा विमा क्लेम पॉलिसी अट क्र.6 अंतर्गत येत असून तो मान्य करता येत नाही. त्याप्रमाणे तक्रारदार यांना क्लेम नाकारल्याबाबत कळविलेले आहे आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विमा कंपनीचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होत आहेत. मुद्दे उत्तर 1. विमा कंपनीने तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी कॅटल इन्शुरन्स पॉलिसी क्र.1702-38-3012-100001 अन्वये रु.25,000/- चा विमा कंपनीकडे त्यांच्या गाईचा विमा उतरविल्याविषयी विवाद नाही. तक्रारदार यांच्या विमा संरक्षीत गाईचा मृत्यू दि.26/9/2008 रोजी झाल्याविषयी विवाद नाही. तसेच दि.19/3/2009 च्या पत्राद्वारे अट क्र.6 चा आधार घेत विमा कंपनीने क्लेम नाकारल्याविषयी विवाद नाही. 5. विमा कंपनीने पॉलिसीतील अट क्र.6 चा आधार घेतलेला असून तक्रारदार यांनी विमा कंपनीस नोटीसद्वारे तात्काळ 24 तासाचे आत कळविले नाही आणि 14 दिवसाचे आत कागदपत्रे दाखल केली नसल्यामुळे क्लेम नाकारल्याचे निदर्शनास येते. तसेच त्यांनी आपल्या म्हणण्यामध्ये त्यांच्या पत्रामध्ये क्लेम नाकारण्यासाठी दिलेल्या कारणास पुष्ठी देत तक्रारदार यांचा विमा क्लेम अट क्र.6 नुसार देय होत नसल्याचे नमूद केले आहे. 6. विमा कंपनीच्या दि.19/3/2009 रोजीच्या क्लेम नाकारल्याच्या पत्रामध्ये अट क्र.6 खालीलप्रमाणे नमूद केलेली आहे. 6. On death of any animal hereby insured the insured, shall immediately give notice thereof to the nearest office of the Company and provide the Company opportunity of inspection the carcass untill at least the expiration of 24 after such notice shall have been given to the Company. The insured shall also furnish to the Company within 24 such information, veterinary certificate and all such satisfactory proof as to the death, identification and value of the animal as the Company may require. 7. तक्रारदार यांनी विमा कंपनीस सूचना दिल्याविषयी विवाद नाही. तथाकथित अट क्र.6 चे अवलोकन करता, विमा कंपनीस तात्काळ नोटीस देण्यामागे जनावराचे शव परिक्षण करता यावे, असे अपेक्षीत आहे. वास्तविक पाहता, तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय मृत्यू पावलेली नाही, असे विमा कंपनीने कथन केलेले नाही. अट क्र.6 प्रमाणे विहित मुदतीत सूचना किंवा कागदपत्रे न दिल्यास तक्रारदार यांना विमा क्लेम नाकारला जाईल, अशी पेनल्टी प्रोव्हीजन पॉलिसीमध्ये असल्याची तरतूद मंचासमोर दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे विमा कंपनीने नमूद केलेली तथाकथित अट क्र.6 विमा क्लेम नाकारण्यासाठी लाभदायक ठरु शकत नाही. 8. मा. महाराष्ट्र राज्य आयोगाने 'न्यू इंडिया एश्योरन्स कं.लि. /विरुध्द/ नानासाहेब हनुमंत जाधव', 2005 सी.टी.जे. 530 (सी.पी.) (एस.सी.डी.आर.सी.) या प्रकरणामध्ये असे म्हटले आहे की, Para. 8 :- The very purpose of giving intimation within one calendar month is to have sufficient time for making scrutiny of the claim to avoid delay. The full particulars are insisted for the effective scrutiny of the claim. The phraseology used in the above clause would also give some latitude provided there is sufficient reason for late reporting. There is no penalty clause provided in the above clause in case claim is not intimated within one calendar month. Therefore, we hold that condition with regard to the time limit is not mandatory. It is directory. This clause is meant for the interest of the insured in order to facilitate prompt scrutiny of the claim. This clause therefore cannot be used in detriment to the interest of the insured. Therefore the action of repudiation on the part of the Insurance Company is not at all justified. 9. उपरोक्त निवाडयात विषद तत्व पाहता, विमा कंपनीचा नमूद क्लॉज केवळ सूचनात्मक (directory) असून तो बंधनकारक (mandatory) ठरु शकत नाही. विमा कंपनीस विमा क्लेम त्वरेने सेटल करण्यास उपयोग होईल, इतक्याच मर्यादेत सदर अट अपेक्षीत ठरते. वरील सर्व विवेचनावरुन विमा कंपनीने अत्यंत तांत्रिक कारण देऊन विमा कंपनीने नाकारलेला असून सदर कृत्य त्यांच्या सेवेतील त्रुटी ठरते. अशाप्रकारे, तक्रारदार गाईच्या विम्याची रक्कम क्लेम नाकारल्याचे तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळविण्यास पात्र ठरतात, या मतास आलो आहोत. 10. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना विमा रक्कम रु.25,000/- दि.19/3/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष यांनी उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी नमूद मुदतीत न केल्यास मुदतीनंतर एकूण देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने अदा करावी. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/19111)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |