जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 178/2010. तक्रार दाखल दिनांक : 16/04/2010. तक्रार आदेश दिनांक :21/03/2011. सुधीर विष्णू पवार, वय 45 वर्षे, रा. मु.पो. तावशी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. व्यवस्थापक, पिऑजिओ व्हेईकल्स् प्रा.लि., 101-ब/102, फोयनेक्स बिल्डींग, बंडगार्डन रोड, पुणे – 1. 2. व्यवस्थापक, प्रेस्टीज व्हील्ज्, साई सत्यम हाईटस्, 27-बी, भवानी पेठ, तुळजापूर वेस, सोलापूर. 3. मॅनेजर, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कं.लि., सावरकर मैदान, लोकमंगल बँक इमारत, हुतात्मा बागेसमोर, सोलापूर. 4. मॅनेजर, गिताई एजन्सीज, गणेश नगर, पंढरपूर रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : एम.ए. कुलकर्णी विरुध्द पक्ष क्र.1 यांचेतर्फे अभियोक्ता : यु.बी. मराठे विरुध्द पक्ष क्र.2 यांचेतर्फे अभियोक्ता : ए.ए. करंदीकर विरुध्द पक्ष क्र.3 यांचेतर्फे अभियोक्ता : बी.एस. शेटे आदेश सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे रु.48,990/- डाऊनपेमेंट भरणा करुन व विरुध्द पक्ष क्र.3 यांच्याकडून रु.2,00,000/- कर्ज घेऊन पिएजिओ अप ट्रक मार्क-1 हे चारचाकी वाहन खरेदी केले असून त्याचा रजि. नं. एम.एच.13/ए.एन.0826 असा आहे. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी त्यांना वाहनाचे दिलेले सर्व्हीस बूक दुस-या व्यक्तीच्या नांवे आहे. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी त्यांना उत्पादकीय दोष असलेले वाहन दिलेले असून सदर वाहन हे पूर्वी श्री. नागनाथ व्हनमाने यांनी खरेदी केलेले होते. तक्रारदार यांना वाहनाचा दुरुस्ती खर्च करण्यास भाग पाडले आहे. तसेच त्यांनी विरुध्द पक्ष क्र.3 यांच्याकडे रु.29,000/- चा भरणा केला आहे. त्यांचे वाहन विरुध्द पक्ष क्र.3 यांच्या वसुली अधिका-यांनी दि.22/2/2010 रोजी ताब्यात घेतलेले आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे त्यांची खरेदी केलेले वाहन बदली करुन नवीन वाहन देण्याचा विरुध्द पक्ष क्र.1 यांना आदेश करावा आणि वाहनासाठी केलेला खर्च रु.1,10,936/- मिळावा, अशी विनंती केली आहे. तसेच त्यांनी मानसिक त्रासापोटी रु.30,000/- व तक्रार खर्चापोटी रु.15,000/- ची मागणी केली आहे. वैकल्पिकरित्या त्यांनी वाहनाची किंमत रु.2,87,968/- व्याजासह मिळावी, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार हे त्यांचे ग्राहक नाहीत. तक्रारदार यांनी वाहनाच्या उत्पाकदीय दोषाबाबत व सर्व्हीस बुकाच्या तक्रारीबाबत त्यांच्याकडे कधीही लेखी अथवा तोंडी तक्रार केलेली नाही. तक्रारदार यांनी वाहनाची दुरुस्ती अधिकृत विक्रेत्याकडून न करता इतर गॅरेजमध्ये केलेली आहे. तक्रारदार यांचे वाहन बदलून देण्यास ते जबाबदार नाहीत आणि तक्रार खर्चासह रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे. 3. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार दि.13/3/2009 रोजी त्यांनी वाहनाचा ताबा दिला असून तक्रारदार यांना सर्व्हीस पुस्तक, टूल कीट व प्रथमोपचार कीट इ. दिलेले आहे. त्यानंतर ते दि.1/7/2009 रोजी एजन्सी सोडेपर्यंत तक्रारदार सर्व्हीसिंगकरिता त्यांच्याकडे आलेले नाहीत. त्यांनी तक्रारदार यांना नवीनच वाहन विक्री केलेले आहे. तक्रारदार यांनी वाहनाचा वापर व्यवस्थित न केल्यामुळे पार्ट खराब झालेले आहेत. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे तक्रार खर्चासह रद्द करावी, अशी त्यांनी विनंती केली आहे. 4. विरुध्द पक्ष क्र.3 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार हे त्यांचे ग्राहक नाहीत आणि त्यांच्यातील कराराप्रमाणे ते वागत असल्यामुळे त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही व नव्हती. तक्रारदार यांनी त्यांच्याकडून मालवाहतूक अपे वाहन खरेदी करण्यासाठी दि.23/3/2009 रोजी रु.2,00,000/- कर्ज घेतले असून कर्जाची परतफेड 48 महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्याच्या 25 तारखेस प्रतिमहा रु.6,583/- याप्रमाणे करावयाची होती. तक्रारदार यांनी नियमीत व वेळेवर हप्ते भरणा केलेले नाहीत. त्यामुळे त्यांना दंड व्याजाची आकारणी केलेली आहे आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे तक्रार रद्द करण्याची विनंती त्यांनी केली आहे. 5. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारदार यांना जुने वाहन विक्री केल्याचे सिध्द होते काय ? नाही. 2. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? अंशत:. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 6. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे रु.48,990/- डाऊनपेमेंट भरणा करुन व विरुध्द पक्ष क्र.3 यांच्याकडून रु.2,00,000/- कर्ज घेऊन पिएजिओ अप ट्रक मार्क-1 हे चारचाकी वाहन खरेदी केल्याविषयी विवाद नाही. तसेच वाहनाचा रजि. नं. एम.एच.13/ए.एन.0826 असल्याविषयी विवाद नाही. 7. प्रामुख्याने, तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार विरुध्द पक्ष क्र.2 यांनी त्यांना उत्पादकीय दोष असलेले वाहन विक्री केलेले असून सदर वाहन पूर्वी श्री. नागनाथ व्हनमाने यांनी खरेदी केलेले होते. तसेच तक्रारदार यांना वाहनाचा दुरुस्ती खर्च करण्यास भाग पाडल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तक्रारदार यांनी रेकॉर्डवर वॉरंटी कार्ड दाखल केले असून त्यावर नागनाथ डी. होनमाने यांचे नांव आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष क्र.2 यांनी रेकॉर्डवर नागनाथ दुलप्पा होनमाने यांचे शपथपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून अपे ट्रक खरेदी केला नसल्याचे व वाहन परत करण्याचा प्रसंग आला नसल्याचे नमूद केले आहे. तसेच विरुध्द पक्ष क्र.2 यांनी त्यांना वाहनाचे सर्व्हीस पुस्तक दिले नव्हते व नाही, असे नमूद केले आहे. सदर शपथपत्रास तक्रारदार यांनी आक्षेप घेतलेला नाही किंवा प्रत्युत्तरादाखल पुरावे दाखल केले नाहीत. तक्रारदार यांना दिलेले वाहन जुने असल्याविषयी उचित पुरावे किंवा त्याबाबत योग्यवेळी तक्रारी केल्याविषयी पुरावे दाखल करण्यास तक्रारदार असमर्थ ठरल्याचे निदर्शनास येते. तक्रारदार यांना जुने वाहन विक्री केल्याचे सिध्द होत नसल्यामुळे त्यांची विनंती मान्य करता येत नाही. तसेच वाहनामध्ये उत्पादकीय दोष असल्याचे सिध्द करण्यासाठी तक्रारदार यांनी कोणतेही प्रयत्न केलेले नाही. तक्रारदार यांनी वाहनाच्या दुरुस्तीसाठी केलेल्या खर्चाच्या पावत्या दाखल केल्या असून त्या अधिकृत सर्व्हीस सेंटरमधील नाहीत. विरुध्द पक्ष क्र.1 किंवा 2 यांनी करण्यास भाग पाडल्याचे उचित पुराव्याअभावी सिध्द होत नाही. 8. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.3 यांच्याकडून वाहन खरेदीसाठी रु.2,00,000/- कर्ज घेतल्याविषयी विवाद नाही. तसेच तक्रारदार हे कर्ज हप्त्यांचा भरणा नियमीत करु शकले नसल्याविषयी विवाद नाही. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रारदार यांचे वाहन ताब्यात घेतल्याविषयी विवाद नाही. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी वाहन ताब्यात घेण्यापूर्वी उचित कायदेशीर मार्गाचा अवलंब केला असल्याचे कागदोपत्री सिध्द करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांची वाहन ताब्यात घेण्याची कृती गैर व अनुचित असल्याचे निदर्शनास येते आणि त्यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेमध्ये निश्चितच त्रुटी केलेली आहे. 9. मंचाने दि.18/5/2010 रोजी अंतरीम आदेशाप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.3 यांना वाहनाचा ताबा परत करण्याविषयी व रक्कम रु.73,413/- चा भरणा करण्याविषयी तक्रारदार यांना आदेश केलेले आहेत. आमच्या मते, कोणत्याही वित्तीय संस्थेला त्यांच्या कर्जदाराकडून थकीत कर्ज रक्कम वसूल करण्याचा निर्विवाद कायदेशीर हक्क आहे. वित्तीय संस्थेने थकीत रक्कम वसुलीची कार्यवाही त्यांच्यातील अग्रीमेंटनुसार व कायद्याने प्रस्थापित तरतुदीनुसार करणे आवश्यक असते. तसेच वित्तीय संस्थेचा कर्जवसुलीचा उद्देश व हेतू पूर्णत: स्वच्छ व प्रामाणिक असला पाहिजे आणि कर्जदाराने कर्जाची परतफेड करण्याचे त्यांचे कर्तव्य व जबाबदारी पूर्ण केली पाहिजे. युक्तिवादाचे वेळी, तक्रारदार यांनी थकीत हप्त्यांचा भरणा केल्यास विरुध्द पक्ष क्र.3 यांनी वाहनाचा ताबा परत करण्याची तयारी दर्शविली आहे. सबब, तक्रारदार यांनी त्यांच्यातील अग्रीमेंटप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.3 यांच्या कर्जाची परतफेड करावी, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. 10. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे कर्जाचे थकीत हप्ते भरणा करावेत आणि हप्ते प्राप्त होताच विरुध्द पक्ष क्र.3 यांनी वाहनाचा ताबा तात्काळ तक्रारदार यांना द्यावा. 2. तक्रारदार व विरुध्द पक्ष क्र.3 यांनी त्यांच्यातील कर्ज अग्रीमेंटप्रमाणे आपआपली कर्तव्ये व जबाबदा-या पूर्ण कराव्यात. 3. तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/25311)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |