जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. निकाल दि.05/01/2011. ग्राहक तक्रार क्रमांक : 510/2010. तक्रार दाखल दि.26/08/2010. 1. श्री. राजेंद्र बळीराम थोरात, वय 35 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. मु.पो. भानसाळे, ता. बार्शी, जि. सोलापूर. तक्रारदार ग्राहक तक्रार क्रमांक : 511/2010. तक्रार दाखल दि.26/08/2010. 1. श्री. नागनाथ दिगंबर पाटील, वय 47 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. मु.पो. भानसाळे, ता. बार्शी, जि. सोलापूर. तक्रारदार ग्राहक तक्रार क्रमांक : 513/2010. तक्रार दाखल दि.26/08/2010. 1. श्री. संतोष उध्दव कुंभार, वय 30 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. मु.पो. चाकोरे, ता. माळशिरस, जि. सोलापूर. 2. शिवामृत दुध उत्पादक सह. संघ मर्या., अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर तर्फे डॉ. श्री. जयवंत शशिकांत बागल वय 42 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. सदर. तक्रारदार ग्राहक तक्रार क्रमांक : 514/2010. तक्रार दाखल दि.26/08/2010. 1. श्री. फत्तुभाई धोंडीभाई अत्तार, वय 65 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. मु.पो. निमगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर. तक्रारदार ग्राहक तक्रार क्रमांक : 515/2010. तक्रार दाखल दि.26/08/2010. 1. श्री. पोपट काशिनाथ वाघ, वय 47 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. मु.पो. पिसेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर. तक्रारदार ग्राहक तक्रार क्रमांक : 516/2010. तक्रार दाखल दि.26/08/2010. 1. श्री. इलाई फत्तुभाई अत्तार, वय 43 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. मु.पो. निमगांव, ता. माळशिरस, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि., विभागीय कार्यालय क्र.1, ए.डी. कॉम्प्लेक्स, माऊंट रोड, सदर, नागपूर - 01. (समन्स/नोटीस डिव्हीजनल मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावी.)
2. दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि., रा. 442, पश्चिम मंगळवार पेठ, टेलिफोन भवन समोर, सोलापूर. (समन्स/नोटीस डिव्हीजनल मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावी.) विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : पी.पी. कुलकर्णी विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : रोहिणी एस. झिंगाडे आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत सर्व तक्रारींचे स्वरुप, विषय, विरुध्द पक्ष व त्यांचे म्हणणे इ. मध्ये साम्य असल्यामुळे त्यांचा निर्णय एकत्रितरित्या देण्यात येत आहे. 2. तक्रारदार यांच्या तक्रारी थोडक्यात अशा आहेत की, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, अकोला यांनी केंद्र शासन पुरस्कृत पशुधन विमा योजना सन 2007-08 राबविली आहे. सदर योजनेंतर्गत विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपामध्ये 'विमा कंपनी') यांच्याकडे तक्रारदार यांच्या घरगुती होस्टर्न जातीच्या गाईंचा विमा कंपनीकडे विमा उतरविण्यात आलेला असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. ग्राहक तक्रार क्रमांक | विमा पॉलिसी क्रमांक | टॅग क्रमांक | विमा रक्कम (रुपयामध्ये) | जनावराचा मृत्यू दिनांक | 510/2010 | एस.ओ.एल.पी.101163 | 101163 | 30,000/- | 13/08/2008 | 511/2010 | एस.ओ.एल.पी.109882 | 109882 | 30,000/- | 11/01/2010 | 512/2010 | एस.ओ.एल.पी.111455 | 111455 | 25,000/- | अपंगत्व | 514/2010 | एस.ओ.एल.पी.100403 | 100403 | 20,000/- | 20/10/2008 | 515/2010 | एस.ओ.एल.पी.100402 | 100402 | 20,000/- | 28/02/2008 | 516/2010 | एस.ओ.एल.पी.100404 | 100404 | 20,000/- | 25/02/2008 |
3. तक्रारदार यांची गाय आजारी पडली आणि उपचारादरम्यान त्यांचा वरीलप्रमाणे नमूद तारखेस मृत्यू झालेला आहे. त्यानंतर पोस्टमार्टेम करण्यात येऊन विहीत नमुन्यामध्ये सर्व कागदपत्रे पाठवून विमा कंपनीकडे विमा रकमेची मागणी केली. ग्राहक तक्रार क्र.512/2010 मध्ये तक्रारदार यांची गाय कधीही गाभन राहू शकणार नाही आणि तिला कायमचे अपंगत्व आले. क्लेम सादर केल्यानंतर पाठपुरावा करुनही विमा कंपनीने त्यांना क्लेमबाबत काहीच न कळविता क्लेम प्रलंबीत ठेवला आणि त्यानंतर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या क्लेम नाकारण्यात आला. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन विमा रक्कम व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी प्रत्येकी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी प्रत्येकी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 4. विमा कंपनीने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पशुधन विम्याचा करार हा जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि. व विमा कंपनीमध्ये झालेला असून कराराविषयी निर्माण झालेला वाद लवादाकडून सोडविणे आवश्यक आहे आणि केवळ अकोला कोर्टास त्याचे अधिकारक्षेत्र आहे. त्यांनी क्लेम योग्य कारणास्तव नाकारल्यामुळे त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. तक्रारदार यांच्याकडून त्यांनी कागदपत्रे मागवूनही आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आलेली नाहीत. तसेच क्लम फॉर्म व पॉलिसीतील माहितीमध्ये तफावत आढळून आली. इन्व्हेस्टीगेशनमध्ये तक्रारदार यांनी खोटी माहिती दिल्याचे आढळून आले आणि त्यांच्या रिपोर्टच्या आधारे क्लेम नाकारण्यात आले आहेत. तसेच गाईचा मृत्यू विमा जोखीम चालू झाल्यापासून पंधरा दिवसाचे आत झाल्यामुळे क्लेम नाकारण्यात आला आहे. शेवटी त्यांनी तक्रार रद्द करण्याची विनंती केली आहे. 5. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. तक्रार चालविण्यास मंचाला अधिकारक्षेत्र प्राप्त होते काय ? होय. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 3. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 4. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 6. मुद्दा क्र. 1 :- विमा कंपनीने तक्रारदार यांच्या गाईस विमा संरक्षण दिल्याविषयी विवाद नाही. विमा कालावधीमध्ये तक्रारदार यांची गाय मृत्यू पावल्याविषयी व अपंगत्व आल्याविषयी विवाद नाही. प्रामुख्याने, विमा कंपनीने कोणतेही कारण नसताना त्यांचा क्लेम प्रलंबीत ठेवून त्यानंतर ते नाकारल्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारी मंचासमोर दाखल केलेल्या आहेत. 7. तत्पूर्वी, विमा कंपनीने सर्वप्रथम पॉलिसी अग्रीमेंटमधील क्लॉजचा आधार घेत अधिकारक्षेत्र केवळ अकोला कोर्टास असल्याचे नमूद केले आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 अंतर्गत 'विमा' हा 'सेवा' या कलमामध्ये अंतर्भुत आहे. तक्रारदार यांच्या गाईस विमा कंपनीने विमा संरक्षण दिलेले असल्यामुळे निश्चितच त्यांची तक्रार या मंचाच्या कार्यकक्षेत येते. तसेच मा.राष्ट्रीय आयोगाने 'मॅग्मा फिनकॉप लि. /विरुध्द/ पंडीत ईश्वर देव ठाकूर', 2010 सी.टी.जे. 913 (सीपी) (एनसीडीआरसी) या निवाडयामध्ये असे न्यायिक तत्व प्रस्थापित केले आहे की, Para. 3 : As regards submissions referable to arbitration, it may be stated that the provisions of Section 3 of the Consumer Protection Act, 1986 is in addition and not in derogation of the proceedings of any other law for the time being in force. Thus, even if the Hire Purchase agreement contained arbitration clause, the complaint by the respondent under the Act was legally maintainable under the Act. 8. वरील न्यायिक तत्वानुसार लवादाच्या क्लॉजमुळे जिल्हा मंचाचे कार्यक्षेत्रास बाधा पोहोचत नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे विमा कंपनीने उपस्थित केलेला सदर मुद्दा निरर्थक व तथ्यहीन ठरतो आणि या मंचाला तक्रारदार यांची तक्रार चालविण्यास अधिकारक्षेत्र प्राप्त होते, या मतास आम्ही आलो असून मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते. 9. मुद्दा क्र. 2 ते 4 :- तक्रारदार यांनी रेकॉर्डवर विमा पॉलिसी, विमा दावा प्रपत्र, पोस्टमार्टेम रिपोर्ट, कॅटल व्हॅल्युऐशन रिपोर्ट, कॅटल डेथ सर्टिफिकेट इ. कागदपत्रांसह इतर पुरक कागदपत्रे दाखल केलेली आहे. सदर कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन करता, विमा पॉलिसीमध्ये नमूद असणा-या टॅग क्रमांकाची गाय मृत्यू पावल्याचे व एका गाईस अपंगत्व आल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येते. 10. विमा कंपनीने इन्व्हेस्टीगेटरच्या अहवालाचा आधार घेत विमा क्लेम नकारले आहेत. निर्विवादपणे, संबंधीत इन्व्हेस्टीगेटरने क्लेम फॉर्म व त्यांच्या चौकशीमध्ये मिळालेल्या माहितीमध्ये तफावत व विसंगती आल्यामुळे क्लेम खोटा असल्याचे अनुमान काढलेले आहे. 11. आमच्या मते, रेकॉर्डवर उपलब्ध असणा-या कागदपत्रांद्वारे विमा क्लेम सेटल करण्यास विमा कंपनी कशी असमर्थ आहे ? याचे उचित स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. इन्व्हेस्टीगेटरचा रिपोर्ट व त्या पृष्ठयर्थ दाखल केलेल्या शपथपत्राद्वारे तक्रारदार यांचा क्लेम बनावट व खोटा असल्याचे सिध्द होण्याइतपत सबळ पुरावा निदर्शनास येत नाही. तसेच केवळ चौकशीमध्ये मिळविलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळल्यास विमा संरक्षीत जनावराचा विमा क्लेम नाकारला जावा, हे असंयुक्तिक वाटते. तक्रारदार यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली कागदपत्रे विमा संरक्षीत गाय मृत्यू पावल्याचे सिध्द करण्यास पुरेशी आहेत. तसेच गाईचा मृत्यू विमा जोखीम चालू झाल्यापासून पंधरा दिवसाचे आत झाल्यास क्लेम नाकारण्यात येईल, अशी कोणतीही स्पष्ट तरतूद मंचासमोर दाखल करण्यात आलेली नाही. वरील सर्व विवेचनावरुन विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा क्लेम अयोग्य व अनुचित कारणास्तव नाकारुन सेवेत त्रुटी केल्यामुळे तक्रारदार हे गाईंच्या विम्याची रक्कम क्लेम नाकारल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दरासह मिळविण्यास पात्र ठरतात. 12. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. ग्राहक तक्रार क्रमांक 510/2010 मध्ये विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्कम रु.30,000/- क्लेम नाकारल्याचा दि.5/8/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. ग्राहक तक्रार क्रमांक 511/2010 मध्ये विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्कम रु.30,000/- क्लेम नाकारल्याचा दि.29/9/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 3. ग्राहक तक्रार क्रमांक 512/2010 मध्ये विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्कम रु.25,000/- क्लेम नाकारल्याचा दि.25/11/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 4. ग्राहक तक्रार क्रमांक 514/2010 मध्ये विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्कम रु.20,000/- क्लेम नाकारल्याचा दि.15/3/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 5. ग्राहक तक्रार क्रमांक 515/2010 मध्ये विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्कम रु.20,000/- क्लेम नाकारल्याचा दि.8/10/2008 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 6. ग्राहक तक्रार क्रमांक 516/2010 मध्ये विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्कम रु.20,000/- क्लेम नाकारल्याचा दि.14/10/2008 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 7. विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी प्रत्येकी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 8. विरुध्द पक्ष विमा कंपनीने उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी नमूद मुदतीत न केल्यास मुदतीनंतर एकूण देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने अदा करावी. (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/4111)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Miss Sangeeta S Dhaygude] PRESIDENT | |