जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 429/2010. तक्रार दाखल दिनांक: 23/07/2010. तक्रार आदेश दिनांक : 29/04/2011. संगिता विष्णू दणाणे, वय 30 वर्षे, व्यवसाय : शेती व घरकाम, रा. मुंगशी, ता. माढा, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. ओरिएंटल इन्शोरन्स कंपनी लि., नागपूर द्वारा विभागीय व्यवस्थापक तथा शाखाधिकारी, दी ओरिएंटल इन्शोरन्स कंपनी लि., 442, पश्चिम मंगळवार पेठ, टेलिफोन भवन, चाटी गल्ली, सोलापूर. 2. तालुका कृषि अधिकारी, तालुका कृषि कार्यालय, माढा. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : सतीश एन. माने विरुध्द पक्ष क्र.1 यांचेतर्फे विधिज्ञ : जी.एच. कुलकर्णी विरुध्द पक्ष क्र.2 गैरहजर / एकतर्फा आदेश सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांच्या कुटुंबाची मौजे मुंगशी, ता. माढा येथे जमीन गट नं.26/ब/1, क्षेत्र 4 हे. 25 आर. शेतजमीन असून ते क्षेत्र त्यांचे पती विष्णू मच्छिंद्र दणाणे (संक्षीप्त रुपामध्ये ‘मयत विष्णू’) यांचे नांवे 7/12 पत्रकात नोंदलेले आहे. महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील शेतक-यांना विरुध्द पक्ष क्र.1 (संक्षीप्त रुपामध्ये ‘विमा कंपनी’) यांच्याकडे शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेखाली रु.1,00,000/- चे विमा संरक्षण दिलेले आहे. मयत विष्णू हे दि.14/12/2008 रोजी मोटार सायकल घसरुन पडल्यामुळे गंभीर जखमी झाले आणि सोलापूर येथे वैद्यकीय उपचारादरम्यान दि.15/12/2008 रोजी मृत्यू पावले आहेत. सदर घटनेची नोंद परंडा पोलीस स्टेशन येथे करण्यात येऊन पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा करुन मयत विष्णू यांचे पोस्टमार्टेम करण्यात आलेले आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.2 (संक्षीप्त रुपामध्ये ‘तालुका कृषि अधिकारी’) यांच्याकडे रीतसर अर्ज करुन कागदपत्रे दाखल केली आणि सदर कागदपत्रे कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रा.लि., पुणे यांच्याकडे सादर केली आहेत. त्यांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता करुनही विमा रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन विमा रक्कम रु.1,00,000/- व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रार खर्चापोटी रु.2,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विमा कंपनीने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मयत विष्णू यांनी अतिवेगाने व निष्काळजीपणाने मोटार सायकल चालविल्यामुळे अपघात झालेला आहे आणि त्यांनी पॉलिसी व कायदेशीर तरतुदीचा भंग केला आहे. सूचना मिळताच त्यांनी तक्रारदार यांच्याकडून कागदपत्रे मागविली असता, तक्रारदार यांनी वेळोवेळी कागदपत्रे दाखल केली. त्यानंतर त्यांनी सर्व कागदपत्रांची छाननी केली असता, मयत विष्णू यांच्या विरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 279, 304 (ए) खाली गुन्हा नोंद झालेला असून त्यांनी मोटार वाहन कायदा व पॉलिसी तरतुदीचा भंग केला आहे. त्यामुळे तक्रारदार हे विमा रक्कम मिळविण्यास पात्र नाहीत आणि विमा दावा नाकारण्यास योग्य आहे. तक्रारदार यांचा क्लेम पॉलिसी कक्षेत येत नसल्यामुळे व त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तालुका कृषि अधिका-यांस मंचाच्या नोटीसची बजावणी झाल्यानंतर ते मंचासमोर हजर झाले. त्यांना वेळोवेळी उचित संधी देऊनही त्यांनी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे तक्रार कैफियतीशिवाय सुनावणीसाठी घेण्याचा आदेश करण्यात आला. 4. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 5. मुद्दा क्र. 1 ते 3 :- महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचा शासन निर्णयानुसार राज्यातील शेतक-यांचा ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ अंतर्गत विमा कंपनीकडे विमा उतरविण्यात आल्याचे आणि राज्यातील सर्व शेतक-यांना व्यक्तिगत अपघातापासून संरक्षण दिल्याविषयी विवाद नाही. 6. मयत विष्णू यांचा मृत्यू रस्ता अपघातामध्ये झाल्याविषयी विवाद नाही. मयत विष्णू यांच्या मृत्यूनंतर तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे क्लेम दाखल केल्याविषयी विवाद नाही. रेकॉर्डवर दाखल 7/12, फेरफार पत्रक, 6-क, 8-अ उता-याचे अवलोकन करता, मयत विष्णू यांचे नांवे शेतजमीन नोंद असल्याचे दिसून येते. तसेच रेकॉर्डवर दाखल एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा इ. पोलीस पेपर्सचे अवलोकन करता, मयत विष्णू यांचा वाहन अपघात झाल्याचे निदर्शनास येते. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये मयत विष्णू यांच्या डोक्यास गंभीर इजा होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास येते. मयत विष्णू यांना मृत्युसमयी त्यांना विमा संरक्षण लागू असल्याचे व त्यांचा मृत्यू अपघाती असल्याचे सिध्द होते. 7. प्रामुख्याने, मयत विष्णू यांनी अतिवेगाने व निष्काळजीपणाने मोटार सायकल चालविल्यामुळे अपघात झालेला आहे आणि त्यांनी पॉलिसी व कायदेशीर तरतुदीचा भंग केल्यामुळे विमा रक्कम देय होत नसल्याचे विमा कंपनीने नमूद केले आहे. 8. रेकॉर्डवर दाखल एफ.आय.आर. चे अवलोकन करता, मयत विष्णू यांनी मोटार सायकल भरधाव वेगात हयगयीने व निष्काळजीपणे रोडचे परिस्थितीकडे लक्ष न देता चालवून मोटार सायकल स्लीप होऊन खाली पडून डोक्यास गंभीर मार लागून स्वत:चे मरणास कारणीभूत झाल्याचे नमूद आहे. 9. मयत विष्णू यांनी अतिवेगाने व निष्काळजीपणाने मोटार सायकल चालविल्याचे व त्यामुळे अपघात झाल्याचे स्पष्ट करणारे पोलीस पेपर्सशिवाय इतर कोणतेही स्वतंत्र कागदपत्रे रेकॉर्डवर नाहीत. अपघात घडण्यास मयत विष्णू हे स्वत: जबाबदार असल्याचे किंवा तशी जोखीम स्वीकारल्याचे सिध्द करण्यासाठी कोणत्याही प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने पाहिल्याचे स्पष्ट होत नाही. मा.वरिष्ठ आयोगांनी अनेक निवाडयामध्ये ‘अपघात’ शब्दाची दिलेली व्याख्या पाहता, अचानक व अनपेक्षीत घडलेल्या अपघातास विमेदाराचा निष्काळजीपणा किंवा बेजबाबदार असे म्हणता येत नाही. विमा कंपनी मयत विष्णू यांनी स्वत:च्या जिविताविषयी जोखीम स्वीकारुन अपघात घडण्यास कारणीभूत असल्याचे सिध्द करण्यास असमर्थ ठरली आहे. त्यामुळे त्या कारणास्तव विमा क्लेम नाकारणे अत्यंत अनुचित व अयोग्य ठरते. तक्रारदार हे विमा रक्कम मिळविण्यास हक्कदार असल्याचे सिध्द होत असताना विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्कम न देऊन सेवेत त्रुटी केलेली आहे आणि तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत, या मतास आम्ही आलो आहोत. 10. वरिष्ठ आयोगांच्या निर्णयानुसार विमा क्लेम दाखल झाल्यानंतर तीन महिन्याचे आत त्याचा निर्णय घेणे विमा कंपनीवर बंधनकारक आहे. त्याप्रमाणे कार्यवाही न केल्यामुळे विमा कंपनीकडे क्लेम दाखल दि.20/3/2009 पासून पुढील तीन महिने जाता म्हणजेच दि.21/6/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने विमा रक्कम मिळविण्यास पात्र ठरतात. 11. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्कम रु.1,00,000/- (रु.एक लक्ष फक्त) दि.21/6/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रार खर्चापोटी रु.2,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. वर नमूद रक्कम तीस दिवसाचे आत न दिल्यास विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने त्यानंतर देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने द्यावी. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/29411)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |