जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 540/2010. तक्रार दाखल दिनांक : 06/09/2010. तक्रार आदेश दिनांक : 23/03/2011. श्री. गजानन तिपण्णा मोरडे, वय 35 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. मु.पो. मुस्ती, ता. द.सोलापूर, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि., विभागीय कार्यालय क्र.1, ए.डी. कॉम्प्लेक्स, माऊंट रोड, सदर, नागपूर – 01. 2. दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि., 442, पश्चिम मंगळवार पेठ, टेलिफोन भवनसमोर, चाटी गल्ली, सोलापूर. (समन्स/नोटीस शाखा व्यवस्थापक यांचेवर बजावण्यात यावी.) विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : एन.बी. घोडमारे विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : व्ही.एन. देशपांडे आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, ते व्यवसायाने शेतकरी असून शेतीसह जोडव्यवसाय म्हणून त्यांनी दुग्ध व्यवसायाकरिता वेगवेगळया जातीच्या गाई खरेदी केल्या आहेत. दि.12/3/2008 रोजी पशुधन विमा योजनेंतर्गत त्यांच्या घरगुती संकरीत गाईचा विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपामध्ये ‘विमा कंपनी’) यांच्याकडे पॉलिसी क्र.एसओएलपी-103683 अन्वये रु.16,000/- चा विमा उतरविण्यात आला असून गाईचा बिल्ला क्रमांक 103683 असा आहे. दि.6/10/2008 रोजी तक्रारदार यांची गाय अचानक मृत्यू पावली. त्यानंतर गाईचे पोस्टमार्टेम करण्यात आले आणि फोटो काढून पंचनामा करण्यात आला. तक्रारदार यांनी विमा रक्कम मिळविण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. परंतु त्यांना विमा रक्कम देण्याकरिता टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन विमा रक्कम रु.16,000/- व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.16,000/-, तक्रार खर्चापोटी रु.5,000/- व नुकसान भरपाईपोटी रु.25,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल करुन तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ व मे. जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि. यांना आवश्यक पक्षकार केले नसल्यामुळे तक्रारदार यांच्या तक्रारीस बाधा पोहोचते. त्यांच्यातील करारानुसार मयत जनावरांचे विमा दावे सेटल करण्याची विशिष्ट पध्दती आहे. तक्रारदार यांनी क्लेम सेटलमेंट पध्दतीचा भंग केला आहे. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही आणि तक्रार खर्चासह रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच त्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांच्या गाईचा विमा कंपनीकडे दि.12/3/2008 रोजी पॉलिसी नं.एसओएलपी-103688 अन्वये रु.16,000/- चा विमा उतरविण्यात आल्याचे पॉलिसीवरुन निदर्शनास येते. विमा संरक्षीत गाईच्या मृत्यूनंतर तक्रारदार यांनी क्लेम सादर केला असता, त्यांना विमा रक्कम देण्यात आलेली नाही, अशी त्यांची प्रमुख तक्रार आहे. उलटपक्षी, विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार करारानुसार मयत जनावरांचे विमा दावे सेटल करण्याची विशिष्ट पध्दती असून तक्रारदार यांनी त्याचा भंग केल्यामुळे त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. 5. तक्रारदार यांनी रेकॉर्डवर पॉलिसी, क्लेम फॉर्म, कॅटल डेथ सर्टिफिकेट, पोस्टमार्टेम रिपोर्ट, कॅटल व्हॅल्यऐशन रिपोर्ट, शवविच्छेदन फी पावती, पंचनामा, फोटो इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सदर कागदपत्रांवरुन तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय मृत्यू पावल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येते. तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय मृत्यू पावलेली असतानाही विमा कंपनीने तक्रारदार यांच्या क्लेमबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन विमा क्लेम सेटल करण्यास विमा कंपनी कशी असमर्थ ठरते ? याचे उचित स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. आमच्या मते, सदर कागदपत्रे तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय मृत्यू पावल्याचे सिध्द करण्यास पुरेशी आहेत. वरील सर्व विवेचनावरुन विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा क्लेम कोणत्याही उचित व सबळ कारणाशिवाय प्रलंबीत ठेवून सेवेत त्रुटी केल्यामुळे तक्रारदार हे विमा रक्कम रु.16,000/- तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळविण्यास पात्र ठरतात, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. 6. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना विमा रक्कम रु.16,000/- तक्रार दाखल दि.6/9/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष यांनी नमूद मुदतीच्या आत उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी न केल्यास तेथून पुढे देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने द्यावी. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) ( सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/17311)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |