जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 375/2010. तक्रार दाखल दिनांक : 18/06/2010. तक्रार आदेश दिनांक : 10/05/2011. 1. सौ. भाग्यश्री देविदास पाटणे, वय 45 वर्षे, व्यवसाय : घरकाम. 2. कु. प्रिती देविदास पाटणे, वय 22 वर्षे, व्यवसाय : शिक्षण. 3. सौ. नागिण जगन्नाथ पाटणे, वय 70 वर्षे, व्यवसाय : घरकाम. 4. सोमनाथ देविदास पाटणे, वय 36 वर्षे, व्यवसाय : नोकरी, सर्व रा. कुंभार गल्ली, सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. मे. ओम फायनान्स अन्ड इन्व्हेस्टमेंट कार्पोरेशन (रजि.), सांगोला. 2. श्री. मल्लिकार्जून शंकर घोंगडे, रा. कुंभार गल्ली, सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापूर. 3. श्री. चंद्रशेखर गु. अंकलगी, रा. कुंभार गल्ली, सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापूर. 4. देविदास जगन्नाथ पाटणे, रा. कुंभार गल्ली, सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापूर. 5. मोहन शामराव शिर्के, रा. जुने न्यू इंग्लिश स्कुलजवळ, सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापूर. 6. प्रदीप दत्तात्रय चोथे, प्रियंका स्टील सेंटर, शिवाजी चौक, सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापूर. 7. आनंद शिवलिंग घोगडे, किर्ती गारमेंटस, शिवाजी चौक, सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापूर. 8. विश्वनाथ शामराव बेंगलोरकर, रा. कुंभार गल्ली, सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापूर. 9. नागेश मल्लिकार्जून लोखंडे, रा. द्वारा : अंबिका नागरी सहकारी पतसंस्था मर्या., एस.टी. स्टॅन्डजवळ, सांगोला, जि. सोलापूर. 10. सौ. सुवर्णा मिलिंद पतंगे, महादेव गल्ली, सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष कोरम :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : एल.ए. गवई विरुध्द पक्ष क्र.1, 2 व 4 यांचेतर्फे विधिज्ञ : डी.व्ही. तंडे विरुध्द पक्ष क्र.3, 5, 6 व 8 ते 10 यांचेतर्फे विधिज्ञ : एस.जे. पाटील आदेश सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला ग्राहक विवाद थोडक्यात असा आहे की, विरुध्द पक्ष क्र.1 भागिदारी संस्था असून विरुध्द पक्ष क्र.2 ते 10 तिचे भागिदार आहेत. विरुध्द पक्ष यांच्या विनंतीनुसार त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 संस्थेमध्ये त्यांनी खालीलप्रमाणे रक्कम गुंतवणूक केली आहे. तक्रारदार / ठेवीदाराचे नांव | ठेव रक्कम | पावती क्रमांक | गुंतवणूक तारीख | सौ. भाग्यश्री देविदास पाटणे | रु.30,000/- | 35 | 2/12/1998 | कु. प्रिती देविदास पाटणे | रु.25,000/- | 81 | 1/4/2001 | सौ. नागिन जगन्नाथ पाटणे | रु.25,000/- | 75 | 13/1/2000 | सोमनाथ जगन्नाथ पाटणे | रु.25,000/- | 80 | 1/4/2001 |
2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दि.31/3/2006 पर्यंत प्रतिमहा व्याज अदा केले आहे. परंतु त्यानंतरचे व्याज त्यांना दिलेले नाही. तसेच मुदत ठेव मागणी केल्यास परत करण्याचे असताना त्यांनी वेळोवेळी ठेव रक्कम मागणी करुनही त्या परत करण्यास विरुध्द पक्ष यांनी टाळाटाळ केली आहे. विरुध्द पक्ष यांनी त्यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केली आहे आणि त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे ठेव रक्कम व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.2,500/- व तक्रार खर्च रु.1,000/- मिळावा, अशी विनंती केली आहे. 3. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार हे विरुध्द पक्ष क्र.4 यांचे कुटुंबिय आहेत. विरुध्द पक्ष क्र.4 यांनी तक्रारदार यांचे नांवे विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे रक्कम गुंतवणूक केली असून त्याचे व्याज त्यांनीच स्वीकारले आहे. विरुध्द पक्ष क्र.4 यांच्या शिफारशीप्रमाणे श्री. सुभाष मारुती बनकर यांना रु.1,00,000/- कर्ज दिलेले असून त्याची वसुली अद्यापि झाली नाही. त्या कर्जाच्या वसुलीची जबाबदारी विरुध्द पक्ष क्र.4 यांनी स्वीकारल्यामुळे वसुलीनंतर हिशोबाप्रमाणे ठेव रक्कम परत करण्यास संमती आहे. संस्थेचे रेकॉर्ड विरुध्द पक्ष क्र.8 यांच्या ताब्यात आहे. शेवटी त्यांनी तक्रार नामंजूर करण्याची विनंती केली आहे. 4. विरुध्द पक्ष क्र. 5 ते 10 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून त्यांनी तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार त्यांचे ग्राहक नाहीत. तक्रारदार हे विरुध्द पक्ष क्र.4 यांचे कुटुंबिय आहेत. विरुध्द पक्ष क्र.4 यांनी तक्रारदार यांचे नांवे विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे रक्कम गुंतवणूक केली असून त्याचे व्याज त्यांनीच स्वीकारले आहे. विरुध्द पक्ष क्र.4 यांच्या शिफारशीप्रमाणे श्री. सुभाष मारुती बनकर यांना रु.1,00,000/- कर्ज दिलेले असून त्याची रक्कम विरुध्द पक्ष क्र.4 यांनी घेतली आहे आणि संस्थेच्या पैशाची अफरातफर केली आहे. तसेच संस्थेचा कार्यभार व रेकॉर्ड विरुध्द पक्ष क्र.8 यांच्या ताब्यात आहे. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे शेवटी त्यांनी तक्रार नामंजूर करण्याची विनंती केली आहे. 5. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार ठेव रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 6. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.1 संस्थेमध्ये ठेव पावतीद्वारे रक्कम गुंतवणूक केल्याविषयी विवाद नाही. प्रामुख्याने, ठेव रकमेची मागणी करुनही ठेव रक्कम परत करण्यात आली नसल्याची तक्रारदार यांची तक्रार आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार हे विरुध्द पक्ष क्र.4 यांचे कुटुंबिय असून त्यांनी तक्रारदार यांचे नांवे विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे रक्कम गुंतवणूक केली आहे आणि त्याचे व्याज त्यांनीच स्वीकारले आहे. तसेच विरुध्द पक्ष क्र.4 यांच्या शिफारशीप्रमाणे श्री. सुभाष मारुती बनकर यांना रु.1,00,000/- कर्ज दिलेले असून त्याची रक्कम विरुध्द पक्ष क्र.4 यांनी घेतली आहे आणि संस्थेच्या पैशाची अफरातफर केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 7. प्रामुख्याने, तक्रारदार यांना ठेव रक्कम परत केली नसल्याबद्दल विवाद नाही. निर्विवादपणे, ठेव योजनेमध्ये रक्कम गुंतवणूक करुन वित्तीय सेवा घेतलेली आहे. ठेवीची रक्कम मागणीनुसार परत करणे विरुध्द पक्ष यांची करारात्मक जबाबदारी व कर्तव्य आहे. तक्रारदार यांनी वेळोवेळी मागणी करुनही त्यांना ठेव रक्कम परत करण्यात आलेली नाही. विरुध्द पक्ष यांचे म्हणणे की, विरुध्द पक्ष क्र.4 यांनीच तक्रारदार कुटुंबियाचे नांवे रक्कम गुंतवणूक केली असून कर्जाची वसुली झाल्याशिवाय रक्कम परत करता येणार नाही, हे पुराव्याद्वारे सिध्द करण्यात आलेले नाही. निर्विवादपणे, तक्रारदार यांचे नांवे ठेव पावत्या जारी करण्यात आल्या असून त्या ठेव पावत्या किंवा त्यांच्या रकमेंवर इतर कोणाही व्यक्तीने हक्क प्रस्थापित केलेला नाही. त्यामुळे तक्रारदार यांच्या ठेव पावत्यांची रक्कम रोखून ठेवण्याचा विरुध्द पक्ष यांना अधिकार प्राप्त होत नाही. आमच्या मते, श्री. सुभाष मारुती बनकर यांच्या कर्जाची वसुली करण्यासाठी किंवा विरुध्द पक्ष क्र.4 यांच्या कृत्यामुळे होणा-या परिणामाविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याचे मार्ग विरुध्द पक्ष यांना उपलब्ध आहेत. विरुध्द पक्ष यांना तक्रारदार यांची ठेव रक्कम रोखून ठेवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही आणि तसे कोणतेही कायदेशीर आदेश त्यांना प्राप्त नाहीत. असे असताना, विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना ठेव रक्कम न देऊन निश्चितच सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे. वरील विवेचनावरुन विरुध्द पक्ष क्र. 1 ते 10 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांची ठेव रक्कम सव्याज परत करावी या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. 8. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 10 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना ठेव पावती क्र.000035, 00081, 00075 व 00080 ची ठेव रक्कम दि.1/4/2006 द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 10 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 10 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या नमूद मुदतीच्या आत उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी न केल्यास तेथून पुढे देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने द्यावी. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/7511)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |