जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 359/2010. तक्रार दाखल दिनांक : 15/06/2010. तक्रार निर्णय दिनांक : 01/02/2011. महादेव तुळशिराम जावीर, वय 54 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. नेहरु नगर, सोलापूर. तक्रारदार विरुध्द व्यवस्थापक, परिवहन वाहन व्यवहार व परिवहन मंडळ, सोलापूर, महानगरपालिका, सोलापूर. विरुध्द पक्ष कोरम :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : एस.एस. मचाले विरुध्द पक्ष यांचेतर्फे प्रतिनिधी : ए.एम. गोरे आदेश सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, ते विरुध्द पक्ष यांच्याकडे चालक पदावर नोकरीस आहेत. त्यांनी सोलापूर महानगर पालिका वरिष्ठ श्रेणी पतसंस्थेकडून वैद्यकीय कारणास्तव कर्ज घेतले होते आणि कर्जाच्या हप्त्याची रक्कम त्यांच्या वेतनातून दरमहा कपात करुन पाठविण्याची जबाबदारी विरुध्द पक्ष यांनी घेतलेली होती. विरुध्द पक्ष यांनी डिसेंबर 1999 ते नोव्हेंबर 2000 कालावधीत त्यांच्या वेतनातून कर्जापोटी कपात केलेली रक्कम पतसंस्थेकडे पाठविली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी कर्जापोटी पतसंस्थेकडे स्वत: रक्कम भरणा केली. विरुध्द पक्ष यांच्याकडे त्यांची रु.7,825/- रक्कम जमा असून त्यावरील रु.12,204/- व्याजासह होणारे एकूण रु.20,029/- व्याजासह मिळविण्यासाठी प्रस्तुत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. तसेच तक्रारदार यांनी नुकसान भरपाईपोटी रु.10,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केलेली आहे. 2. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार व त्यांच्यामध्ये नोकर व मालक संबंध होते आणि तक्रारदार पतसंस्थेचे ग्राहक असून विरुध्द पक्ष यांचे ग्राहक नाहीत. त्यांची संस्था मागील 10 वर्षापासून आर्थिक संकटात सापडल्याने कर्मचा-यांचे वेतन देता आले नाही आणि त्यांच्या वेतनातून रक्कम कपात करुन पतसंस्थेकडे पाठविता आलेली नाही. तक्रारदार यांची तक्रार चालविण्यास मंचाला अधिकारक्षेत्र नाही आणि शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 5. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांनी सोलापूर महानगर पालिका वरिष्ठ श्रेणी पतसंस्थेकडून कर्ज घेतल्याविषयी विवाद नाही. तसेच विरुध्द पक्ष तक्रारदार यांच्या वेतनातून कर्जाचे हप्ते कपात करुन पतसंस्थेकडे पाठविण्याचे होते, याविषयी विवाद नाही. तक्रारदार यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम रु.7,725/- पतसंस्थेकडे न पाठविल्यामुळे थकीत कर्जापोटी पतसंस्थेकडे त्यांनी स्वत: सदर रक्कम भरणा केलेली आहे. 6. रेकॉर्डवर दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तक्रारदार यांना माहे डिसेंबर 1999 ते नोव्हेंबर 2000 या कालावधीच्या देय वेतनातून सोसायटीकरिता कपात करण्यात आलेले रु.7,825/- विरुध्द पक्ष यांच्याकडे जमा असल्याचे निदर्शनास येते. तक्रारदार यांच्या वेतनातून कर्ज हप्ते कपात करुन पतसंस्थेस पाठविण्याची विरुध्द पक्ष यांची जबाबदारी असताना सदर कर्तव्य पार पाडलेले नाही आणि त्यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केल्याचे निदर्शनास येते. अशा परिस्थितीत, विरुध्द पक्ष यांनी रु.7,825/- तक्रारदार यांच्या वेतनातून कपात केल्याच्या तारखेपासून तक्रारदार यांना संबंधीत पतसंस्थेने कर्जापोटी आकारणी केलेल्या व्याज दराने अदा करणे आवश्यक ठरते. तसेच तक्रारदार सदर तक्रारीचा खर्च मिळविण्यास पात्र ठरतात. 7. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी रु.7,825/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत तक्रारदार यांना द्यावेत. 2. विरुध्द पक्ष यांनी रु.7,825/- रकमेवर सदर रक्कम कपात केल्याच्या तारखेपासून तक्रारदार यांना संबंधीत पतसंस्थेने कर्जापोटी आकारलेल्या दराने होणारे व्याज या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे द्यावे. 3. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/25111)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |