जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक 496/2014 तक्रार दाखल करणेत आलेची तारीखः- 30/09/2014.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-10/2/2016.
श्री.तुकाराम मोहन पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः शेती,
रा. म्हसावद,ता.जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि,
तर्फे मॅनेजींग डायरेक्टर, कमर्शियल सेक्शन,
पाचवा माळा, प्रकाशगड,बांद्रा (पूर्व), मुंबई 53.
2. कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि,
चाळीसगांव डिव्हीजन, चाळीसगांव, ता.चाळीसगांव,
जि.जळगांव.
3. उपअभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि,एरंडोल,
ता.एरंडोल,जि.जळगांव. ......... सामनेवाला.
कोरम-
श्री.विनायक रावजी लोंढे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदारा तर्फे श्री.एन टी देशपांडे वकील.
सामनेवाला तर्फे श्री.कैलास एन पाटील वकील.
निकालपत्र
व्दारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्षः
1. तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी नुकसान भरपाई न देऊन द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवलेली आहे म्हणुन नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणेः-
2. तक्रारदार हे मौजे म्हसावद,ता.जि.जळगांव येथील रहीवाशी असुन व्यवसायाने शेतकरी आहेत. तक्रारदाराचे नांवे एरंडोल पैकी मौजे नागदुली शिवारातील शेत गट नं.24 ही शेत मिळकत आहे. सामनेवाला क्र. 1 ही विद्युत कंपनी असुन सेवा पुरवण्याचे काम करते. सामनेवाला क्र. 2 हे सामनेवाला क्र. 1 यांचे कार्यकारी अभियंता आहेत. सामनेवाला क्र. 3 हे सामनेवाला क्र. 1 कंपनीचे उपअभियंता आहेत. तक्रारदार यांनी त्यांचे राहत असलेल्या त्यांचे घरास तसेच त्यांचे शेत जमीनीस विद्युत पुरवठा विज पुरवठा घेतलेला आहे. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदाराचे मालकीचे शेत जमीनीमध्ये जवळपासच्या शेतक-यांना विद्युत पुरवठा करण्यासाठी डी.पी. बसवली आहे व विद्युत तारा टाकल्या आहेत. तक्रारदाराने शेताला पाणी देण्यासाठी विहीरीवर मोटार पंप बसवला आहे व सदरील डी.पी. मधुन विद्युत प्रवाह घेतला आहे. तक्रारदाराची डी.पी. पासुन 50 फुट अंतरावर गुरांचा चारा ठेवण्याची जागा आहे. सामनेवाला यांनी डी.पी. ची व्यवस्थीत देखभाल केली नाही, विद्युत तारा लोंबकळत होत्या तसेच विद्युत तारांना झोल पडला होता. तक्रारदाराने सामनेवाला यांना भेटुन डी.पी. ची निगा व्यवस्थीत राखण्याबाबत कळविले व संभाव्य धोक्याची कल्पना दिली होती. तक्रारदाराने त्याचे शेतात डी.पी. पासुन 50 फुट अंतरावर गुरांचा चारा 4,000 पेंडया ठेवल्या होत्या. दि.12/4/2013 रोजी दुपारी शॉर्ट सर्कीट होऊन त्या ठिकाणी ठिणगी पडली व ती चा-याच्या गंजीवर पडुन आग लागुन 4,000 पेंडया जळुन खाक झाल्या. तक्रारदाराचे रु.40,000/- चे नुकसान झाले. सदरील नुकसानीस सामनेवाला हे जबाबदार आहेत. सामनेवाला यांनी डी.पी. ची व विद्युत तारांची व्यवस्थीत निगा न ठेवल्यामुळे तक्रारदाराच्या चा-याच्या गंजीस आग लागली व नुकसान झाले आहे. सामनेवाला हे नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. तक्रारदाराने सामनेवाला यांना पत्र देऊन शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचे कळविले. सामनेवाला यांनी आग निश्चित कशामुळे लागली हे सांगता येत नाही असे कारण देऊन तक्रारदारास नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली. तक्रारदाराने सामनेवाला यांना रजिष्ट्रर पोष्टाने कळवुन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. सामनेवाला यांनी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली म्हणुन तक्रारदार यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्तुत तक्रार या मंचासमोर दाखल करावी लागली. तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडुन रु.40,000/- नुकसान भरपाईपोटी मिळावे, तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारीचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे.
3. सामनेवाला हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी लेखी खुलासा दाखल केला. सामनेवाला यांचे कथन की, तक्रारदाराची तक्रार विज कनेक्शन व सेवा देण्याबाबत नाही. सदरील वाद हा न्यायमंचाचे अधिकार क्षेत्रात बसत नाही. तसेच सामनेवाला यांनी पुढे असे कथन केले आहे की, सामनेवाला क्र. 2 कार्यकारी अभियंता,चाळीसगांव यांचे कार्यक्षेत्राअंतर्गत सदरील बाब येत नाही तसेच सामनेवाला क्र. 3 उप अभियंता हे पद एरंडोल येथे नाही. सामनेवाला यांचे कथन की, सामनेवाला यांनी सदरील डी.पी. बांधावर बसविलेली आहे तेथुन ग्राहकांना विज कनेक्शन दिलेले आहेत. तक्रारदाराने डी.पी. जवळ व अधिक संपर्कात न जाणे याची दक्षता घेणे आवश्यक होते. तसेच डी.पी.जवळ चारा ठेवणे हे देखील धोकेदायक होते याची जाणीव तक्रारदारास होती. सामनेवाला यांनी डी.पी. ची निगा व्यवस्थीत राखली होती. तक्रारदाराने संभाव्य धोक्यांबाबत कधीही कल्पना दिली नव्हती. तक्रारदाराने 4,000 पेंडया जळाल्या ही बाब चुकीने दर्शवली आहे. सदरील आग ही सामनेवाला यांचे हलगर्जीपणामुळे लागली नव्हती. आग कशामुळे लागली हे निश्चित सांगता येत नाही. तक्रारदाराने मौजे नागदुली,ता.एरंडोल,जि.जळगांव येथे 7.5 अश्वशक्तीचा शेती प्रयोजनासाठी विज पुरवठा घेतला आहे. सप्टेंबर,2013 मध्ये तक्रारदाराने चारा शॉर्ट सर्कीटने जळाल्याबाबत तक्रार केल्यानंतर सामनेवाला यांनी स्थळ निरिक्षण करुन अहवाल मागवला., अहवालामध्ये आग निश्चित कशामुळे लागली हे सांगता येत नाही असे नमुद केलेले आहे तसेच डी.पी.चे फयुज व लघुदाब वाहीनीवर कुठल्याही स्पार्कींगच्या खुणा आढळुन आल्या नाहीत. दोन पोल मधील अंतरही व्यवस्थीत होते. तक्रारदाराचा चारा कशामुळे जळाला ही बाब सिध्द होऊ शकत नाही त्यामुळे तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाहीत.
4. तक्रारदाराने पुराव्याकामी स्वतःचे शपथपत्र दाखल केलेले आहे. तसेच तक्रारीसोबत पंचनाम्याची झेरॉक्स प्रत, विद्युत निरिक्षकाचा अहवाल, सामनेवाला यांना दिलेली नोटीस, सामनेवाला यांचेकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी केलेला अर्ज, 7/12 चा उतारा, विद्युत देयक हजर केलेले आहे. सामनेवाला यांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. तक्रारदाराचे वकील श्री.देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाला यांचे वकील श्री.पाटील यांचा युक्तीवाद ऐकला. न्याय-निर्णयासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत
त्रृटी ठेवलेली आहे ही बाब तक्रारदाराने शाबीत
केली आहे काय ? होय.
2) तक्रारदार यांच्या चा-याच्या गंजीस शॉर्ट सर्कीटमुळे
आग लागुन नुकसान झाले ही बाब तक्रारदाराने
शाबीत केली आहे काय ? होय.
3) तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत
काय ? असल्यास किती ? होय, शेवटी दिलेप्रमाणे.
4) कोणता आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसाः
मुद्या क्र. 1 ते 4 ः
5. तक्रारदाराचे वकील श्री.देशपांडे यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदाराचे शेताचे बांधावर सामनेवाला यांनी डी.पी.बसवली आहे. सदर डी.पी. ची व्यवस्थीत देखभाल सामनेवाला यांनी केली नाही. डी.पी. जवळ तारांचा झोल पडला होता. डी.पी. चा बॉक्स उघडा होता. सदरची बाब सामनेवाला यांचे निर्दशनास आणुन दिली परंतु सामनेवाला यांनी त्याची दखल घेतली नाही. तक्रारदाराने डी.पी. पासुन 50 फुट अंतरावर गुरांसाठी चा-याची गंजी मारुन गुरांचा चारा ठेवला होता. डी.पी. जवळ शॉर्ट सर्कीट होऊन त्याच्या ठिणग्या तक्रारदाराचे चा-याच्या गंजीवर पडुन लागलेल्या आगीत तक्रारदाराचा चारा जळुन सुमारे रु.40,000/- चे नुकसान झाले आहे. सदरचे नुकसान हे सामनेवाला यांचे निष्काळजीपणामुळे झालेले आहे. सदरची नुकसान भरपाई मिळण्यास तक्रारदार हे पात्र आहेत.
6. सामनेवाला यांचे वकील श्री.पाटील यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदाराने सदरील चारा हा शॉर्ट सर्कीटने जळाला ही बाब शाबीत केली नाही. विद्युत निरिक्षकांच्या अहवालामध्ये निश्चित आग कशामुळे लागली याचे कारण सांगता येत नाही असे नमुद केले आहे. तक्रारदाराने स्वतः डी.पी. जवळ चारा ठेवला व त्यास आग लागली त्यामुळे तक्रारदार हा स्वतः चे नुकसानी स्वतः जबाबदार आहे. सामनेवाला यांनी डी.पी. ची व्यवस्थीत काळजी घेतली आहे. स्पार्कींग च्या कोणत्याही खुणा दिसुन आल्या नाहीत त्यामुळे तक्रारदाराचे तक्रारीत नमुद केलेल्या बाबी चुकीच्या असुन सामनेवाला हे नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत तसेच सामनेवाला यांचे वकीलांनी या मंचाचे लक्ष 7/12 उता-यावर वेधले व तक्रारदाराच्या शेतात एक एकर क्षेत्रामध्ये मक्याचे पिक केले आहे असे लिहीलेले आहे. तक्रारदाराने त्याचे तक्रारीमध्ये जे चा-याचे वर्णन केलेले आहे त्या प्रकारचा चारा तक्रारदाराच्या शेतात उत्पादीत झालेला नाही. तक्रारदाराने त्याचे तक्रारीमध्ये जे चा-याचे वर्णन केलेले आहे ते पिक तक्रारदाराच्या शेतात उत्पादीत झालेले नाही. एक एकर चारा जळाला असता तर त्याची किंमत अत्यंत अल्प होते. सदरचे नुकसान हे तक्रारदाराच्या चुकीमुळे झाले असल्यामुळे सदरची नुकसान भरपाई देण्यास सामनेवाला जबाबदार नाही असे नमुद केलेले आहे.
7. तक्रारदार व सामनेवाला यांचे शपथपत्र व दस्तऐवजाचे अवलोकन केले असता तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत. त्यांनी त्यांचे विहीरीवर विद्युत प्रवाह घेतला आहे ही बाब सिध्द होते. तक्रारदाराचे कथन की, त्यांनी डी.पी. पासुन 50 फुट अंतरावर गुरांच्या चा-याची गंजी ठेवली होती. डी.पी. जवळ असलेल्या तारांचा झोल मुळे तारांमध्ये स्पार्कींग होऊन व त्याची ठिणगी चा-याच्या गंजीवर पडुन चारा जळाला. सदर बाब त्यांनी तलाठी यांना कळविली. तलाठी यांनी पंचनामा केला त्यामध्ये गुरांचे वैरण जळुन खाक झाले आहे व आग ही शॉर्ट सर्कीटमुळे लागली आहे असे नमुद केलेले आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता, तक्रारदाराच्या चा-याच्या गंजीस विद्युत प्रवाहात असलेल्या तारांच्या झोल मुळे शॉर्ट सर्कीट होऊन त्याची ठिणगी तक्रारदाराच्या चा-याच्या गंजीवर पडुन चा-यास आग लागली ही बाब स्पष्ट होते. तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे अर्ज केला. सामनेवाला यांनी विद्युत निरिक्षक,जळगांव यांचा अहवाला मागवला त्या अहवालामध्ये आग कशामुळे लागली हे निश्चित कारण सांगता येत नाही असे नमुद केलेले आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या दस्तऐवजाचे अवलोकन करता सदरील आग ही शॉर्ट सर्कीटमुळे लागली आहे ही बाब निष्पन्न होते. तक्रारदाराने चा-याची गंजी ही डी.पी. पासुन 50 फुट अंतरावर लावली होती असे नमुद केलेले आहे. सामनेवाला यांनी असा बचाव घेतला आहे की, तक्रारदाराने डी.पी. जवळ चा-याची गंजी ठेवावयास नको होती, तो स्वतःच्या नुकसानीस स्वतः जबाबदार आहे. विद्युत निरिक्षक,जळगांव यांचा अहवाल लक्षात घेतला असता गुरांचा चारा हा डी.पी.पासुन 15 फुट अंतरावर ठेवला होता असे नमुद केले आहे तसेच लघुदाब वाहीनीवर अतिरिक्त दाब आढळला नव्हता तसेच स्पार्कींग झाल्याच्या खुणा नव्हत्या असे नमुद केले आहे. तक्रारदाराने जो फोटो दाखल केला आहे त्याचे अवलोकन केले असता चा-याची गंजी डी.पी. पासुन 50 फुट अंतरावर असल्याबद्यल निर्दशनास येते. तसेच चा-याच्या गंजीवरुन विद्युत प्रवाह वाहत गेल्याबाबत दिसुन येत नाही. तक्रारदाराने त्याचे तक्रारीमध्ये सामनेवाला यांनी डी.पी. ची व्यवस्था व्यवस्थीत ठेवली नाही, तारांना झोल पडला होता त्यामुळे स्पार्कींग होऊन चा-याच्या गंजीस आग लागली आहे असे नमुद केलेले आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता तक्रारदाराच्या चा-याच्या गंजीस आग लागली आहे असे निर्दशनास येते. सामनेवाला हे तक्रारदारास नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत असे या मंचाचे मत आहे.
8. आता महत्वाचा मुद्या उपस्थित झाला तो म्हणजे तक्रारदाराचे किती रुपयांचे नुकसान झाले. तक्रारदाराने त्याचे तक्रारीत रु.40,000/- चा चारा जळुन खाक झाला आहे असे नमुद केले आहे. तक्रारदाराने त्याचे तक्रारीमध्ये दादरीचा चारा जळाला आहे असे नमुद केलेले आहे. तक्रारदाराने त्याचे शेत जमिनीचा 7/12 चा उतारा दाखल केला आहे त्याचे अवलोकन केले असता तक्रारदाराने त्याचे शेतात दादरीचे पिक घेतले आहे असे कुठेही नमुद केलेले नाही. तक्रारदाराचे शेतात 1 हे.51 आर मध्ये कपाशीचे पिक घेतले आहे व 1 हेक्टर मध्ये मक्याचे पिक घेतले आहे असे लिहीले आहे. त्यामुळे सदरील चा-याची गंजी जी दादरीची होती हे प्रथमदर्शनी शाबीत करण्याची जबाबदारी तक्रारदारांवर आहे. ज्वारी, बाजरी, मका, दादरी यांचा जो चारा असतो त्याचा कस वेगवेगळा असतो व चा-याच्या किंमती वेगवेगळया असतात. मक्याच्या चा-याच्या किंमती इतर चा-याच्या किंमतीपेक्षा कमी असतात. तक्रारदाराचे शेतात मका पिक केले आहे. तक्रारदाराचे शेतात दादरीचे पिक घेतल्याची कुठेही नोंद नाही. सदरील गंजी ही दादरच्या पिकाची होती ही बाब तक्रारदाराने शाबीत करणे गरजेचे होते त्याबाबत तक्रारीत नमुद केल्याव्यतिरिक्त कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही तसेच तक्रारदाराच्या 4,000 पेंडया ठेवल्या होत्या याबाबतही पुरावा या मंचासमोर उपस्थित नाही. तक्रारदाराने दाखल केलेला 7/12 चा उतारा लक्षात घेतला असता तक्रारदाराने मक्याच्या चा-याची गंजी त्याचे शेताचे बाजुस लावली होती असे म्हणवयास पुरेसा वाव आहे. मक्याच्या चा-याची किंमत इतर पिकाच्या चा-यापेक्षा निश्चितच कमी असते त्यामुळे तक्रारदार म्हणतात त्यापेक्षा त्यांचे नुकसान निश्चितच कमी झालेले आहे. पंचनाम्यामध्ये रु.40,000/- चे नुकसान झाले आहे असे लिहीलेले आहे ते कोणत्या आधारावर लिहीलेले आहे हे स्पष्ट होत नाही. तक्रारदाराचे सांगण्यावरुन सदरची बाब लिहील्याचे निर्दशनास येते. एकंदर तक्रारदाराचे जे नुकसान झाले आहे त्या परिस्थितीचे अवलोकन करता व तक्रारदार घेत असलेल्या पिकाचे 7/12 उता-याचे अवलोकन करता या मंचाचे मत की, तक्रारदाराचे सुमारे रु.15,000/- चे नुकसान झालेले आहे. सदरील रक्कम ही तक्रारदाराचे 7/12 उतारा, घेतलेल्या पिकाची पध्दत, जळालेल्या चा-याची किंमत इ. लक्षात घेऊन ढोबळमानाने काढलेली आहे. तेवढी रक्कम तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे, सामनेवाला यांनी ती देण्यास नकार देऊन तक्रारदारास दिलेल्या सेवेत त्रृटी ठेवलेली आहे, तक्रारदारास प्रस्तुतची तक्रार दाखल करावी लागली त्यामुळे तक्रारदार हे त्यांना झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु.1,500/- मिळण्यास पात्र आहेत. सबब मुद्या क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्या क्र. 4 चे निष्कर्षास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
2) सामनेवाला यांना असे निर्देशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाईपोटी एकुण रक्कम रु.15,000/- (अक्षरी रक्कम रु.पंधरा हजार मात्र ) या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसांचे आंत अदा करावेत., सदर मुदतीत रक्कम अदा न केल्यास सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासुन ते प्रत्यक्ष रक्कम मिळेपावेतोच्या तारखेपर्यंत तक्रारदार हे द सा द शे 9 टक्के व्याज मिळण्यास पात्र राहतील.
3) सामनेवाला यांना असेही निर्देशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.3,000/-(अक्षरी रु.तीन हजार मात्र) व तक्रारीचे खर्चापोटी रु.1,500/-(अक्षरी रु.एक हजार पाचशे मात्र ) अदा करावेत.
4) निकाल पत्राची प्रत उभयपक्षांना विनामुल्य देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 10/2/2016. ( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विनायक रा.लोंढे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.