(निकालपत्र सदस्य श्रीमती कविता जगपती यांनी पारित केले)
नि का ल प त्र
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये, सामनेवाला यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम देण्यास नकार देवून सेवेत त्रृटी ठेवलेली आहे म्हणुन नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार यांचे पती मयत पती प्रदीप मांगो पाटील यांचा दि. 18/09/2010 रोजी खानजोडा ता.पाचोरा येथे अपघाती निधन झाले. निधनानंतर तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे विमा प्रस्ताव दाखल केला सदर अर्जाप्रमाणे सामनेवाला यांनी काहीएक कारवाई केली नाही त्यामुळे विमा दावा दाखल करावा लागला.
तक्रारदार यांनी आपल्या विनंती मध्ये सामनेवाला यांच्याकडून विमा दावा रक्कम रु. 1,00,000/- मिळावे तसेच मानसिक व शारीरीक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- मिळावे इ. मागण्या मंचाकडे केलेल्या आहेत.
03. तक्रारदार यांनी तक्रारी सोबत खाते उतारा, ड-पत्रक नोंद, 7/12 उतारा, मृत्यू प्रमाणपत्र, पी.एम. रिपोर्ट, मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळ पंचनामा इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
04. सामनेवाला क्र. 1 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी लेखी म्हणणे सादर केले त्यांचे कथन की, सदर मयत प्रदीप मांगो पाटील यांचा प्रस्ताव कबाल इन्शुरन्स कंपनी कडे पाठविण्यात आलेला आहे. सदर विमा दावा कंपनीने नाकारला आहे सदर दावा हा मयताच्या वारसांनी प्रदीप पाटील यांचा मोटार वाहन परवाना प्रस्तावा सोबत दाखल केलेला नाही. त्यामुळे सामनेवाला क्र. 1 यांनी त्रृटीची पुर्तता न केल्याने विमा दावा नाकारला आहे असे म्हणणे सादर केले आहे.
05. सामनेवाला क्र. 2 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी लेखी म्हणणे सादर केले सामनेवाला क्र. 2 यांचे कथन की, सदर कबाल इन्शुरन्स कंपनी ही सरकारला मोफत सहाय म्हणुन मदत करते सदर विमा दावा सेटल करण्याचे काम ही विमा कंपनी करते. सदर विमा दावा प्रस्ताव आमच्या कार्यालयास दि. 14/11/2011 रोजी प्राप्त झाला व तो पुढील कारवाई करीता विमा कंपनीकडे पाठविण्यात आलेला आहे.
06. सामनेवाला क्र. 3 हे मंचात हजर झाले त्यांनी आपले कथन नि. 15 वर सादर केले त्यांच्या म्हणण्यानुसार मयत हे शेतकरी नव्हते त्यांनी कोणताही पुरावा दाखल केला नाही. सदर कागदपत्रे हे वेळेत दाखल न केल्यामुळे विमा दावा मुदतीत निकाली काढण्यात आलेला नाही. त्यामुळे सेवेत त्रृटी केलेली आहे असे गृहीत धरता येणार नाही सबब तक्रारदाराची तक्रार रदद करण्यात यावी अशी मागणी आपल्या कथनात केली आहे.
07. तक्रारदार व सामनेवाला यांच्या वकीलांनी युक्तीवाद केला. तक्रारदार यांनी दाखल केलेले दस्तऐवज व तक्रारदाराचे शपथपत्र या व्यतिरिक्त अधिक साक्षीपुरावा तक्रारदारातर्फ देणे नाही अशी पुरसीस दाखल केली. तक्रारदार यांनी लेखी युक्तीवाद केला त्यांचे अवलोकन केले असता खालील मुद्दे उपस्थित होतात.
08. निष्कर्षांसाठीचे मुद्दे व त्यावरील निष्कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.
निष्कर्ष मुद्दे
1. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा विमा क्लेम
नाकारुन सेवेत त्रृटी केली आहे काय ? नाही
2. कोणता आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 बाबत
09. तक्रारदार यांचे मयत पती प्रदीप मांगो पाटील यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे हे दाखल केलेल्या वैदयकीय अधिकारी यांचे पत्र तसेच मरणोत्तर पंचनामा यावरुन स्पष्ट होते तक्रारदार यांचे शेतकरी म्हणुन 7/12 उता-यावर नाव नमूद केलेले आहे पंरतु मयत प्रदीप मांगो पाटील यांचा जेव्हा अपघात झाला त्यावेळेस त्यांच्याकडे गाडी चालविण्याचा परवाना नव्हता त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या 2008-2009 च्या शासन शुध्दीपत्रकानुसार वाहन चालवितांना विमा धारकाचा मृत्यू झाल्यास व त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्यास सदर विमाधारकाच्या कुटूंबाला विमा रक्कम देता येणार नाही असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तक्रारदार हे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मिळणारी विमा रक्कम मिळण्यास पात्र नाही असे मंचाला वाटते सबब तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
3. निकालाच्या प्रति उभयपक्षांस विनामुल्य देण्यात याव्यात.
जळगांव.
दि. 21/07/2015 (श्रीमती. कविता जगपती) (श्री. विनायक रा.लोंढे)
सदस्या अध्यक्ष
अति.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.