जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 57/2011. तक्रार दाखल दिनांक : 11/02/2011. तक्रार आदेश दिनांक : 09/05/2011. श्री. बाबुराव सिताराम यलमार, वय 42 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. मु.पो. सुपली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. म.रा.वि.वि.कंपनी, पंढरपूर तर्फे कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कंपनी, मु.पो. पंढरपूर. 2. सहायक अभियंता, म.रा.वि.वि.कंपनी, मु.पो. पंढरपूर, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : सौ. बबिता एम. महंत-गाजरे विरुध्द पक्ष गैरहजर / एकतर्फा आदेश सौ. संजवनी एस. शहा, सदस्य यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला ग्राहक विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांनी निवासी वापरासाठी विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपामध्ये ‘विद्युत वितरण कंपनी’) यांच्याकडून वीज जोडणी घेतली असून त्यांचा ग्राहक क्र.337620350863 / आर.152 आहे. ते नियमीतपणे वीज देयकाचा भरणा करतात. तक्रारदार यांचा वीज वापर अत्यल्प असतानाही दि.16/6/2010 ते 16/8/2010 कालावधीचे रु.13,520/- चे देयक प्राप्त झाले. त्याबाबत विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली असता, दखल घेण्यात आली नाही. तसेच त्यांनी वीज देयक रद्द होण्याकरिता लेखी अर्ज दिला असता, रु.5,986/- कमी करुन उर्वरीत रु.8,000/- भरण्याचा तगादा लावला. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे त्यांना दिलेले जास्तीचे देयक रद्द करण्याचा आणि मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- देण्याचा विद्युत वितरण कंपनीस आदेश करण्याची विनंती केली आहे. 2. विद्युत वितरण कंपनीस मंचाच्या नोटीसची बजावणी झालेली आहे. उचित संधी देऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत आणि म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 व 2 :- रेकॉर्डवर दाखल वीज देयक आकाराचे अवलोकन करता, तक्रारदार हे विद्युत वितरण कंपनीकडून ग्राहक क्र.337620350863 अन्वये विद्युत पुरवठयाची सेवा घेत असल्याचे निदर्शनास येते. प्रामुख्याने, तक्रारदार यांना दि.31/8/2010 रोजी दिलेले व दि.16/6/2010 ते 16/8/2010 कालावधीचे रु.13,520/- चे देयक अवास्तव व जास्त असल्यामुळे ते रद्द करण्याची त्यांची प्रमुख तक्रार आहे. 5. तक्रारदार यांनी रु.13,520/- चे देयक अवास्तव असल्यामुळे ते कमी करुन देण्याबाबत विद्युत वितरण कंपनीकडे अर्ज केलेला आहे. वास्तविक पाहता, विद्युत वितरण कंपनीने प्रस्तुत तक्रारीस मंचासमोर लेखी म्हणणे दाखल केलेले नाही. तसेच तक्रारदार यांच्या लेखी अर्जावर काय कार्यवाही केली ? याची वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार विद्युत वितरण कंपनीस मान्य असल्याच्या अनुमानास आम्ही येत आहोत. 6. रेकॉर्डवर दाखल विवाद उपस्थित करण्यात आलेल्या वीज देयकाचे अवलोकन करता, मागील रिडींग 461 व चालू रिडींग 2362 नमूद करुन 1881 युनीट वीज वापर दर्शविला आहे. वास्तविक पाहता, तक्रारदार यांचा विवाद निर्माण झालेल्या देयकापूर्वी व नंतरचा वीज वापर पाहता, सरासरी 60 ते 70 युनीट आहे. असे असताना व तक्रारदार यांनी लेखी कळविलेले असताना, तक्रारदार यांचा वीज वापर अचानक 1881 युनीट होण्याचे कारणे काय ? हे पाहण्यासाठी विद्युत वितरण कंपनीने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. यदाकदाचित, मीटरमध्ये दोष आहे काय ? तसेच मीटर-वाचकाने घेतलेली रिडींग योग्य आहे काय ? हे पाहण्याचे कर्तव्य व जबाबदारी विद्युत वितरण कंपनीने पूर्ण केलेली नाही. अशा परिस्थितीत, तक्रारदार यांना दि.31/8/2010 रोजी दिलेले व दि.16/6/2010 ते 16/8/2010 कालावधीचे रु.13,520/- चे देयक अवास्तव असल्याचे मान्य करणे भाग पडते आणि विवेचनावरुन विद्युत वितरण कंपनीच्या सेवेमध्ये त्रुटी असल्याचे सिध्द होते. त्यामुळे ते देयक रद्द करुन त्या देयकाचे कालावधीकरिता 70 युनीटचे देयक आकारणी करणे उचित ठरते. 7. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दिलेले दि.31/8/2010 रोजी दिलेले व दि.16/6/2010 ते 16/8/2010 कालावधीचे रु.13,520/- चे देयक रद्द करण्यात येते. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दि.31/8/2010 रोजी दिलेल्या दि.16/6/2010 ते 16/8/2010 कालावधीकरिता 70 युनीट वापर गृहीत धरुन नवीन वीज देयक द्यावे आणि त्याचा भरणा तक्रारदार यांनी करावा. 3. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- द्यावेत. 4. विरुध्द पक्ष यांनी वरील सर्व आदेशाची पूर्तता या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत करावी. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/4511)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |