जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 68/2010.
तक्रार दाखल दिनांक: 16/02/2010.
आदेश दिनांक : 30/08/2010.
बळीराम दगडू चौगुले, वय 55 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. मौजे नारायण चिंचोली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
1. जैका इन्शोरन्स ब्रोकरेज प्रा.लि., जैका बिल्डींग,
सिव्हील लाईन, नागपूर - 440 001.
(दि.30/6/2010 च्या पुरसीस अन्वये विरुध्द पक्ष क्र.1
यांना वगळण्यात आले)
2. दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि., विभागीय कार्यालय क्र.1,
ए.डी. कॉम्प्लेक्स, माऊंट रोड, सदर, नागपूर - 1.
(समन्स/नोटीस डिव्हीजनल मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावे.)
3. दी ओरिएन्टल इन्शुरन्स कं.लि., रा. 442, प. मंगळवार पेठ,
चाटी गल्ली, सोलापूर. (समन्स/नोटीस डिव्हीजनल मॅनेजर
यांचेवर बजावण्यात यावे.) विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष
सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य
सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : पी.पी. कुलकर्णी
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : एकतर्फा
आदेश
सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, ते व्यवसायाने शेतकरी असून त्यांनी दुग्ध व्यवसायाकरिता घेतलेल्या होस्टर्न जातीच्या गाईचा विरुध्द पक्ष क्र.2 (संक्षिप्त रुपामध्ये 'विमा कंपनी') यांच्याकडे रु.30,000/- चा विमा घेतलेला आहे. गाईचा विमा पॉलिसी क्रमांक एस.ओ.एल.पी. 102272 असून गाईस दिलेल्या टॅगचा क्रमांक 102272 असा आहे. तक्रारदार यांच्या गाईस दि.6/10/2008 रोजी सर्पदंश होऊन मृत्यू झाला आहे. त्यानंतर गाईचे पोस्टमार्टेम करण्यात आले. तसेच विहीत नमुन्यामध्ये सर्व कागदपत्रे विमा कंपनीकडे पाठविण्यात आली. परंतु विमा कंपनीने गाईच्या कानातील टॅग खराब असल्याच्या कारणास्तव विमा क्लेम नाकारल्याचे कळविले. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे विरुध्द पक्ष यांच्याकडून विमा रक्कम रु.30,000/- व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे.
2. विमा कंपनीस उचित संधी देऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत आणि म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
3. तक्रारदार यांची तक्रार व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा
दिली आहे काय ? होय.
2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्ष
4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांच्या गाईचा विमा कंपनीकडे रु.30,000/- रकमेचा पॉलिसी क्र.एस.ओ.एल.पी. 102272 अन्वये विमा उतरवल्याचे रेकॉर्डवर दाखल पॉलिसी प्रमाणपत्रावरुन निदर्शनास येते. तक्रारदार यांची गाय मृत्यू पावल्यानंतर विमा कंपनीकडे क्लेम दाखल केला असता विमा कागदपत्रे नसल्यामुळे व टॅग खराब असल्यामुळे विमा कंपनीने त्यांचा विमा क्लेम नामंजूर केल्याचे निदर्शनास येते.
5. तक्रारदार यांनी रेकॉर्डवर दाखल केलेल्या विमा दावा प्रपत्र, पोस्टमार्टेम रिपोर्ट, कॅटल व्हॅल्युऐशन रिपोर्ट, कॅटल डेथ सर्टिफिकेट, ट्रीटमेंट सर्टिफिकेट, पंचनामा, पोस्टमार्टेम केल्याबाबत रु.50/- ची पावती इ. कागदपत्रांचे सुक्ष्मपणे अवलोकन करता, तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय मृत्यू पावल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येते. उपरोक्त कागदपत्रानुसार विमा क्लेम सेटल करण्यास विमा कंपनी कशी असमर्थ ठरते ? याचे उचित स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. आमच्या मते, सदर कागदपत्रे तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय मृत्यू पावल्याचे सिध्द करण्यास पुरेशी आहेत. त्याशिवाय विमा कंपनीने मागणी केलेल्या कागदपत्राकरिता पॉलिसीची कोणती तरतूद उपयोगी पडते ? हे सिध्द करण्याचा प्रयत्नही केलेला नाही. गाईच्या कानातील टॅग हा जनावराची ओळख पटविण्यासाठी असतो. टॅग खराब झाल्यामुळे विमा क्लेम नाकारण्याचे ते कारण होऊ शकत नाही. विमा कंपनीने अत्यंत तांत्रिक बाबीचा आधार घेतलेला आहे. वरील सर्व विवेचनावरुन विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा क्लेम अयोग्य व अनुचित कारणास्तव नाकारुन सेवेत त्रुटी केल्यामुळे तक्रारदार हे गाईच्या विम्याची रक्कम क्लेम नाकारल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दरासह मिळविण्यास पात्र ठरतात.
6. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. विरुध्द पक्ष क्र.2 व 3 विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्कम रु.30,000/- दि.30/8/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.
2. विरुध्द पक्ष क्र.2 व 3 विमा कंपनीने तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
3. विरुध्द पक्ष क्र.2 व 3 विमा कंपनीने उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी नमूद मुदतीत न केल्यास मुदतीनंतर एकूण देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने अदा करावी.
(सौ. संगिता एस. धायगुडे÷)
अध्यक्ष
(सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/30810)
|
[HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER |