(घोषित दि. 06.09.2013 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदारांनी गैरअर्जदार यांचेकडून पिठाची गिरणी चालविण्यासाठी विद्युत पुरवठा ग्राहक क्रमांक 524016000972 अन्वये घेतलाअसुन, तक्रारदारांचा उदरनिर्वाह सदर गिरणीवरच अवलंबून आहे. तक्रारदारांना पिठाची गिरणी व्यतीरिक्त इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. तसेच तक्रारदार नियमितपणे विद्यूत देयकाचा भरणा करतात.
गैरअर्जदार यांनी दिनांक 03.11.2011 रोजी तक्रारदारांचे जूने विद्युत मिटर बदलून नविन मिटर बसवून गेले. त्यानंतर गैरअर्जदार यांनी दिनांक 11.11.2011 रोजी तक्रारदारांना असेसमेंट बील रक्कम रुपये 63,644/- चे दिले व सदरचे बिल भरणा न केल्यास विद्युत पुरवठा खंडीत करण्याची धमकी दिली.
गैरअर्जदार यांनी दिलेले वरील देयक तक्रारदारांच्या नावाने दिले असून बिलावरील ग्राहक क्रमांक इतर व्यक्तीचा आहे, सदर विद्युत देयक चूकीचे व बेकायदेशीर असल्यामूळे मान्य नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
गैरअर्जदार यांच्या लेखी खूलाश्यानूसार गैरअर्जदार यांचे भरारी पथकाने तक्रारदारांच्या विद्यूत मिटरची तपासणी केली असता सदरचा विद्यूत पुरवठा पिठाचे गिरणीसाठी घेत असल्याचे आढळले तसेच मिटर 85.86 टक्के स्लो असल्याचे आढळले. तक्रारदारांनी गैरअर्जदार विज कंपनीची 8253 यूनीटची रक्कम रुपये 63,644/- रुपयाची विज चोरी केल्याचे निष्पन्न केल्याबाबतचा घटनास्थळ पंचनामा, मीटर जप्ती पंचनामा, मिटर टेस्टींग रिपोर्ट, असेसमेंटशिट इत्यादी कागदपत्रे सदर प्रकरणात दाखल केली आहेत.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.बि.एम.वाघमारे व गैरअर्जदारांचे विद्वान वकील श्री.जी.आर.कड यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील दाखल कागदपत्रानूसार तक्रारदारांनी पिठाच्या गिरणीसाठी गैरअर्जदार यांचेकडून ग्राहक क्रमांक 52406000972 अन्वये विद्यूत पुरवठा घेतला आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रानूसार तक्रारदारांच्या मिटर क्रमांक 6073119 ची व तेथील वेगवेगळया उपकरणाची जोडभाराची तपासणी केली असता तक्रारदार विज चोरी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानूसार गैरअर्जदार यांनी नियमाप्रमाणे असेसमेंट बील रक्कम रुपये 63,644/- रुपयाचे दिनांक 11.11.2011 रोजी दिले आहे. सदर विज देयकावर ग्राहक क्रमांक 524016000962 दिलेला असून ते इतर व्यक्तीचे ग्राहक क्रमांक असलेले परंतू तक्रारदारांच्या नावाने चूकीचे बिल देण्यात आले अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या घटनास्थळ पंचनामा, विज मीटर जप्ती पंचनामा, मिटर टेस्टींग रिपोर्ट, असेसमेंट शीट तसेच विज चोरीची फिर्याद या कागदपत्रानूसार सदरचे तक्रारदारांचे ग्राहक क्रमांक 524016000972 व मिटर क्रमांक 6073119 या विद्यूत पुरवठयाबाबत गैरअर्जदार यांचे भरारी पथकाने तपसणी करुन नियमानूसार दिनांक 11.11.2011 रोजी रक्कम रुपये 63,644/- चे विद्यूत देयक दिल्याचे स्पष्ट होते.
गैरअर्जदार यांनी त्यांचे समर्थनाथ सर्वोच्च न्यायालयाचे सिव्हील अपील क्रमांक 5466/2012(U.P. Power Corporation V/s Anis Ahmed) मध्ये दिनांक 01.07.2013 रोजी दिलेला न्यानिवाडा दाखल केला आहे.
वरील न्यायनिवाडयानूसार
“A Complaint made against the assessment made by assessing officer u/s 126 or against the offences committed u/s 135 to 140 of the Electricity Act, 2003 is not maintainable before a consumer Forum.”
यावरुन तक्रारदारांची तक्रार न्यायमंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब मंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चाबाबत आदेश नाही.