जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 400/2010. तक्रार दाखल दिनांक : 09/07/2010. तक्रार आदेश दिनांक : 01/02/2011. न्यू तिरुपती कम्युनिकेशन, प्रोप्रा. सौ. जयश्री अरुण कोळी, वय 40 वर्षे, व्यवसाय : व्यापार व घरकाम, रा. शिवाजी चौक, माढा, ता. माढा, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. डिव्हीजनल मॅनेजर, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि., शुभराय टॉवर्स, दत्त चौक, सोलापूर. 2. मॅनेजर, बँक ऑफ इंडिया, शाखा माढा, ता. माढा, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : आर.व्ही. पाटील विरुध्द पक्ष क्र. 1 यांचेतर्फे अभियोक्ता : जी.एच. कुलकर्णी आदेश सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी तिरुपती कम्युनिकेशन या मोबाईल विक्री व्यवसायाकरिता विरुध्द पक्ष क्र.2 (संक्षिप्त रुपामध्ये 'बँक ऑफ इंडिया') यांच्याकडून रु.4,00,000/- कर्ज घेतले आहे. त्यांच्या न्यू तिरुपती कम्युनिकेशन दुकानाचा विरुध्द पक्ष क्र.1 (संक्षिप्त रुपामध्ये 'विमा कंपनी') यांच्याकडे पॉलिसी क्र.271400/48/08/9800001663 अन्वये दि.16/9/2008 ते 15/9/2009 कालावधीकरिता रु.5,00,000/- रकमेचा विमा उतरविण्यात आला आहे. बँक ऑफ इंडियाने त्यांच्या 'न्यू तिरुपती कम्युनिकेशन' दुकानाऐवजी 'न्यू तिरुपती इलेक्ट्रॉनिक्स' या चुकीच्या नांवे पॉलिसी उतरवली आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडियाने त्यांना रु.3,00,000/- कर्ज दिले असून त्यावेळी त्यांच्या न्यू तिरुपती कम्युनिकेशन दुकानाचा विमा कंपनीकडे पॉलिसी क्र.271400/48/08/9800003684 अन्वये दि.13/1/2009 ते 12/1/2010 कालावधीकरिता रु.5,00,000/- रकमेचा विमा उतरवला आहे. दि.10/4/2009 रोजी रात्री त्यांचे दुकान अज्ञात चोरटयांनी फोडले आणि दुकानातील मोबाईल हॅन्डसेट, रिचार्ज व्हावचर, गिफ्ट आर्टीकल, बेंटेक्स दागिने इ. माल चोरुन नेला. सदर घटनेची फिर्याद दि.11/4/2009 रोजी माढा पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आणि गु.र.नं.24/2009 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. चोरी घटनेमध्ये त्यांच्या दुकानातील रु.7,83,000/- किंमतीचा मोबाईल माल चोरीस गेलेला असून तशी नोंद पोलीस जबाबामध्ये नोंद आहे. तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे संपूर्ण कागदपत्रे दाखल करुनही व वारंवार चौकशी करुनही क्लेमबाबत निर्णय घेतला नाही किंवा विमा रक्कम दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन विमा रक्कम रु.7,83,000/- व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रार खर्चापोटी रु.3,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विमा कंपनीने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार न्यू तिरुपती कम्युनिकेशन या नांवे अटी व शर्तीस अधीन राहून त्यांनी पॉलिसी जारी केलेली आहे. दि.11/4/2009 रोजीच्या पत्राद्वारे न्यू तिरुपती कम्युनिकेशन यांचे मालकाने चोरीमुळे झालेल्या नुकसानीची सूचना दिली. सूचना मिळताच विमा कंपनीने श्री. लक्ष्मीकांत बिराजदार, सर्व्हेअर व लॉस असेसर यांची नुकसानीचे असेसमेंट करण्यासाठी नियुक्ती केली. त्यानंतर तक्रारदार यांनी क्लेम फार्मसह, पोलीस पेपर्स व नुकसानीचे अंदापत्रकासह खरेदी बिले, बॅलन्सशीट, स्टॉक स्टेटमेंट इ. कागदपत्रे दाखल केली. तक्रारदार यांनी क्लेम फॉर्म पूर्णपणे भरलेला नाही. तसेच तक्रारदार यांनी रु.6,47,396/- च्या नुकसानीचे विवरणपत्र व बिले दाखल केली. सर्व्हेअरने दि.12/4/2009 रोजी घटनास्थळी भेट दिली असता खरेदी बिले मे. तिरुपती डिजीटल यांचे नांवे असल्याचे निदर्शनास आले. तसेच मोबाईल हँडसेटची सर्व विक्री बिले मे. तिरुपती मोबाईल, माढा यांचे नांवे असल्याचे निदर्शनास आले. सदर खरेदी-विक्री बिले पॉलिसीशी संबंधीत नसल्यामुळे असेसमेंट करता येणे अशक्य आहे. तसेच खरेदी-विक्री बिले बनावट असल्याचे सर्व्हेअरच्या निदर्शनास आलेले आहे. त्यांनी पुढे असे नमूद केले आहे की, चोरीच्या नुकसानीस विमा पॉलिसीनुसार संरक्षण देण्यात आलेले नाही. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. बँक ऑफ इंडियास मंचाच्या नोटीसची बजावणी झालेली आहे. उचित संधी देऊनही त्यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले नाही किंवा ते मंचासमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले. 4. तक्रारदार यांची तक्रार व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांच्या दुकानाचा विमा कंपनीकडे पॉलिसी क्र.271400/48/08/9800001663 अन्वये दि.16/9/2008 ते 15/9/2009 आणि पॉलिसी क्र.271400/48/08/9800003684 अन्वये दि.13/1/2009 ते 12/1/2010 कालावधीकरिता अनुक्रमे रु.5,00,000/- रकमेचा विमा उतरवल्याचे रेकॉर्डवर दाखल पॉलिसी शेडयुलवरुन निदर्शनास येते आणि त्याविषयी विवाद नाही. तक्रारदार यांच्या दुकानी दि.10/4/2009 रोजी मध्यरात्री चोरीची घटना घडल्याविषयी विवाद नाही. तसेच दि.10/4/2009 रोजी रात्री त्यांचे दुकान अज्ञात चोरटयांनी फोडून दुकानातील मोबाईल हॅन्डसेट, रिचार्ज व्हावचर, गिफ्ट आर्टीकल, बेंटेक्स दागिने इ. असा रु.7,43,000/- किंमतीचा माल चोरीस गेल्याचे पोलीस पेपर्सवरुन निदर्शनास येते. चोरी घटनेबाबत तक्रारदार यांनी दि.11/4/2009 रोजी माढा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिलेली असून गु.र.नं.24/2009 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आल्याचे दिसून येते. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी विमा कंपनीकडे संपूर्ण कागदपत्रे दाखल करुनही व वारंवार चौकशी करुनही क्लेमबाबत निर्णय घेतला नाही किंवा विमा रक्कम दिलेली नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 5. विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार खरेदी बिले मे. तिरुपती डिजीटल यांचे नांवे असल्याचे व मोबाईल हँडसेटची सर्व विक्री बिले मे. तिरुपती मोबाईल, माढा यांचे नांवे असल्याचे निदर्शनास आले असून सदर खरेदी-विक्री बिले पॉलिसीशी संबंधीत नसल्यामुळे असेसमेंट करता येणे अशक्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 6. तक्रारदार यांनी बँक ऑफ इंडिया यांच्याकडून कर्ज घेऊन चालवत असलेल्या 'न्यू तिरुपती कम्युनिकेशन' या नांवे दुकानाचा विमा कंपनीकडे विमा उतरविण्यात आलेला आहे. दि.10/4/2009 रोजी त्यांच्या दुकानामध्ये चोरी झालेली आहे. चोरीकरिता दुकानातील मालाकरिता रु.5,00,000/- विमा संरक्षण देण्यात आलेले आहे. तक्रारदार यांनी सर्व्हेअरकडे दाखल केलेल्या बॅलन्सशीटप्रमाणे रु.6,43,995/- रकमेच्या वस्तुंची चोरी झाल्याचे नमूद आहे. तक्रारदार यांनी मे. तिरुपती डिजीटल यांचे नांवे खरेदी पावत्या दाखल केलेल्या आहेत. विमा कंपनीने त्यास आक्षेप घेतलेला असला तरी, माढा शहरामध्ये मे. तिरुपती डिजीटल या नांवे मोबाईल विक्रीचे दुकान असल्याचे त्यांनी सिध्द केलेले नाही. इतकेच नव्हेतर, ज्या दुकानाच्या सदर पावत्या आहेत, त्या दुकानदाराकडून पावत्यांची शहानिशा करण्याचा किंवा त्यांचे शपथपत्र दाखल करण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. त्याशिवाय, तक्रारदार यांनी सदर पावत्यांचे बँक ऑफ इंडिया यांच्याकडे स्टेटमेंट सादर केले किंवा कसे ? हे तपासण्याचाही विमा कंपनीने प्रयत्न केलेला नाही. केवळ पावत्यांच्या नांवामध्ये तांत्रिक चूक असल्याचा आधार घेऊन त्या पावत्यांचा विमा संरक्षीत दुकानाशी संबंध नाही, या म्हणण्यामध्ये तथ्य आढळत नाही. विमा कंपनी अत्यंत तांत्रिक बाबीचा आधार घेऊन विमा रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास येते आणि सदर कृत्य त्यांच्या सेवेतील त्रुटी ठरते, या मतास आम्ही आलो आहोत. 7. तक्रारदार यांच्या दुकान चोरीमध्ये एकूण रु.7,43,000/- ची चोरी झाल्याचे पोलीस पेपर्समध्ये निदर्शनास येते. विमा पॉलिसीनुसार रु.10,00,000/- रकमेच्या वस्तुंना विमा संरक्षण आहे. सर्व्हेअरने रु.6,43,995/- चे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे तक्रारदार हे सर्व्हेअरने असेसमेंट केल्याप्रमाणे रु.6,43,995/- रक्कम विमा नुकसान भरपाई म्हणून मिळविण्यास तक्रारदार पात्र ठरतात, या अंतीम मतास आम्ही आलो आहोत. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्कम न देऊन सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे आणि तक्रारदार रु.6,43,995/- विमा रक्कम तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळविण्यास पात्र आहेत. 8. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारदार यांना रु.6,43,995/- दि.9/7/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 2. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांना उपरोक्त नमूद रक्कम तीस दिवसाचे आत न दिल्यास मुदतीनंतर त्यावर द.सा.द.शे. 12 टक्के व्याज द्यावे. (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/27111)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |