निकालपत्र -
( दि.08-08-2018)
द्वारा : मा. श्री. विजयकुमार आ. जाधव, अध्यक्ष.
1) तक्रारदार यांचा ट्रक क्र.MH-10-Z-3978 हा चोरीस गेला त्याचा विमा सामनेवाला विमा कंपनीकडे काढला होता म्हणून सामनेवाला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदार यांनी दाखल केलेला आहे.
2) प्रस्तुत तक्रारीचा थोडक्यात सारांश असा -
तक्रारदार ड्रायव्हर असून सन 2012 साली फायनांस कंपनीकडून कर्ज काढून समीर अरुण इनामदार रा.बुधवार पेठ, मिरज, जि. सांगली यांचेकडून ट्रक क्र.MH-10-Z-3978 खरेदी केला. परंतू प्रकृतीमुळे त्यांना सदर ट्रक चालवणे कठीण झाल्याने दि.7/6/2013 रोजी मलिकजान नदीसाब देवरमनी, रा.इचलकरंजी, ता.हातकणंगले यांनी दरमहा र.रु.30,480/- तक्रारदार यांना देण्याचे ठरलेप्रमाणे देवरमनी यांना दिला. परंतु देवरमनी यांनी ठरलेप्रमाणे हप्त्याने वरील नमुद रक्कम दिली नाही. पुढे माहे फेब्रुवारी 2014 मध्ये तक्रारदार यांना इचलकरंजी पोलीस स्टेशन येथून फोन आला व पोलीसांनी तक्रारदार याचा ट्रक चोरीच्या गुन्हयात जप्त केला असल्याचे तक्रारदार यांना कळविले. तक्रारदार यांनी पोलीस स्टेशन येथे जाऊन ट्रक सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्यांना मिळाला नाही. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, वर्ग-1 इचलकरंजी यांचे न्यायालयातून र.रु.7,00,000/- चे बॉंन्डवर तक्रारदार यांना ट्रक सोडवायचा होता. परंतु ट्रकचा विमा नसल्याने तक्रारदार यांना ट्रक मिळाला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी दि.2/6/2015 रोजी सामनेवाला विमा कंपनीकडे दि.3/6/2015 ते 2/6/2016 या मुदतीची विमा पॉलिसी घेतली. त्यानंतर दि.12/6/2015 रोजी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर तक्रारदार यांना ट्रक ताब्यात मिळाला. दि.13/06/2015 रोजी तक्रारदार ट्रक घेऊन रत्नागिरीकडे निघाले असता आंबाघाट उतरत असतांना ट्रकमधून आवाज येऊ लागल्याने तसेच ट्रक स्थानिक मॅकेनिकच्या सहाय्याने दुरुस्त करणे अशक्य असल्याने त्यांनी ट्रक तेथेच बंद व लॉक करुन रत्नागिरी येथे मुक्कामी आला. त्यानंतर दुस-या दिवशी तक्रारदार हे मेस्त्रीला घेऊन ट्रक उभे केले ठिकाणी गेले असता, त्या ठिकाणी ट्रक आढळून आला नाही. तक्रारदार यांनी सर्व संबंधीत लोकांकडे ट्रकबाबत तपास केला परंतू त्यांना ट्रक मिळून आला नाही. त्यानंतर दि.15/06/2015 रोजी देवरुख पोलीस स्टेशनला अर्ज दिला. परंतू त्यांना पोलीसांनी आणखी तपास करा असे सुचविले. शेवटी दि.16/06/2015 रोजी तक्रारदार यांचेकडून फिर्याद घेऊन पोलीसांनी ट्रक चोरीचा गुन्हा नोंदविला. त्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाला विमा कंपनीकडे ट्रक चोरीबाबत फिर्याद, पंचनामा इ. कागदपत्रे पाठविली. परंतू दि.19/03/2016 रोजी ट्रक चोरीची माहिती 9 दिवस उशीरा दिली या कारणास्तव तक्रारदार यांचा क्लेम नाकारला म्हणून तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून रु.9,00,000/- नुकसान भरपाई मिळणेसाठी तसेच मानसिक त्रासापोटी रु.1,50,000/- आणि तक्रार अर्जाचा खर्च र.रु.50,000/- मिळणेसाठी प्रस्तुत तक्रार अर्ज मंचात दाखल केलेला आहे.
3) तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.6/1 वर ट्रक क्र.MH-10-Z-3978 चे आर.सी. बुकची प्रत, नि.6/2 वर प्रस्तुत ट्रकची सामनेवाला यांचेकडे दि.3/6/2015 ते 2/6/2016 ची विमा पॉलिसीची प्रत, नि.6/3 वर दि.15/06/2015 रोजी तक्रारदार यांनी पोलीस स्टेशन, देवरुख येथे ट्रक चोरी झालेबाबत दिलेला अर्ज, नि.6/4 वर तक्रारदार यांनी दि.16/06/2015 रोजी देवरुख पोलीस स्टेशन येथे दिलेल्या खबरी जबाबाची प्रत, नि.6/5 वर ट्रक चोरीचा घटनास्थळ पंचनामा, नि.6/6 वर सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दि.19/03/2016 रोजी पाठविलेल्या पत्राची प्रत, नि.6/7 वर दि.19/03/2016 रोजी सामनेवाला यांचे पत्रास तक्रारदार यांनी दिलेल्या उत्तराची प्रत, नि.18 वर तक्रारदार यांनी ट्रक चोरीचा देवरुख पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हयाशी संबंधित कागदपत्रे दाखल केली. नि.19 वर तक्रारदाराचे शपथपत्र, नि.20 वर पुरावा संपल्याची पुरसीस, नि.28 वर लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे.
4) सामनेवाला यांना नोटीस काढण्यात आली. सामनेवाला न्यायमंचात हजर होऊन नि.16 वर म्हणणे दाखल केले. सामनेवाला यांचे म्हणणे की, तक्रारदार यांनी दि.16/06/2015 च्या फिर्यादीमध्ये प्रस्तुत ट्रक देवरमनी यांना र.रु.1,26,100/- ची पावती करुन विकलेला आहे, असे मान्य करतात. त्यामुळे तक्रारदार यांचे प्रस्तुत ट्रकमध्ये विमायोग्य हित (insurable interest) नाहीत तसेच तक्रारदार यांना प्रस्तुत तक्रार करणेचा अधिकार नाही, त्यामुळे तक्रार रद्द करण्यात यावी. सामनेवाला यांचे पुढे असेही म्हणणे आहे की, तक्रारदार यांनी प्रस्तुत ट्रक देवरमनी यांना विकला आहे, ही बाब सामनेवाला यांना ट्रकची विमा पॉलिसी काढतांना कळविली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी विमासंबंधीत महत्त्वाच्या तत्वांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे तक्रारदार यांना ट्रकचा विमा घेतांना ट्रकमध्ये विमा योग्य हित (insurable interest) नव्हते. तसेच प्रस्तुत विमा पॉलिसी घेण्यापूर्वी ट्रक विकला होता, परंतु ट्रक हा फेब्रुवारी 2014 मध्ये चोरीला गेला होता आणि नंतर पोलीसांनी तो जप्त केला होता. केवळ तक्रारदार याचे नाव आर.सी. बुकवर असल्याने पोलीसांनी त्यास प्रस्तुत ट्रक न्यायालयात येऊन सोडवून घ्यावा असे सांगितले. परंतु तेव्हा ट्रकची विमा पॉलिसी नसल्याने तक्रारदार यांने विमा पॉलिसी घेतली. परंतु तक्रारदार यांने ट्रकची पॉलिसी घेण्यापूर्वीच ट्रक विकला असल्याने तक्रारदाराचे ट्रकमध्ये विमायोग्य हित (insurable interest) नव्हते. विमायोग्य हित हे विमा पॉलिसीचे महत्त्वाचे तत्व आहे. त्यामुळे विमा पॉलिसी घेतांना त्याचबरोबर वाहन चोरीला जातांना तक्रारदार याचे प्रस्तुत वाहनामध्ये विमा योग्य हित असणे आवश्यक होते. परंतु प्रस्तुत प्रकरणामध्ये विमा घेतांना तक्रारदाराचे विमायोग्य हित होते, परंतू ट्रक चोरीस जातांना त्याचे विमायोग्य हित नव्हते. तक्रारदार यांनी देवरमनी यांस ट्रकची विमा पॉलिसी घेण्याअगोदर ट्रक विकला होता ही महत्त्वाची गोष्ट लपवून ठेवली, असे म्हणणे सामनेवालाने दाखल केलेले आहे.
5) सामनेवाला यांचे पुढे असेही म्हणणे आहे की, प्रस्तुत ट्रक दि.14/06/2015 रोजी चोरीस गेला, परंतु फिर्याद 2 दिवस उशीराने म्हणजेच दि.16/06/2015 रोजी दिलेली आहे. तसेच तक्रारदार याने सदर घटनेबाबत सामनेवाला यांना दि.23/06/2015 रोजी म्हणजेच 9 दिवस उशीराने कळविले. त्यामुळे तक्रारदार यांनी विमा पॉलिसीतील अट.क्र.1 चे उल्लंघन केले आहे. तसेच तक्रारदार हे प्रस्तुत ट्रक घाटात लॉक करुन घरी गेले. त्यामुळे त्यांनी विमा पॉलिसी अट क्र.5 चे उल्लंघन केलेले आहे. तसेच तक्रारदार यांनी मागितलेली नुकसान भरपाई रु.11,00,000/- कोणत्या आधारे मागीतली याचा कोणताही उल्लेख तक्रारीमध्ये नाही. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल करुन तक्रारदार यांचे तक्रारीमधील इतर मजकुर परिच्छेदनिहाय नाकारलेला आहे. प्रस्तुत मजकुर हा खोटा, खोडसाळ, काल्पनिक असल्याचे सामनेवाला यांचे म्हणणे आहे.
6) सामनेवाला यांनी नि.16 वर म्हणणे, नि.22 वर श्री.संतोष शेळके यांचे शपथपत्र, नि.25 वर पुरावा संपलेची पुरसीस, तसेच नि.29 वर लेखी युक्तीवाद दाखल केला.
7) तक्रारीचा आशय, उभय पक्षांचा पुरावा, उभय पक्षांचा लेखी व तोंडी युक्तीवाद यांचे अवलोकन करता या न्यायमंचाचे विचारार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यावरील विवेचन खालीलप्रमाणे ः-
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1. | तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत का ? | होय. |
2. | प्रस्तुत तक्रार मंचात दाखल करण्यास पात्र(Tenable)आहे काय? | होय. |
3. | सामनेवाला यांनी तक्रारदार यांना ग्राहक म्हणून सदोष सेवा किंवा सेवेत त्रुटी ठेवली आहे का ? | होय. |
4. | तक्रारदारांची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे का ? | होय. |
5. | आदेश काय ? | अंतीम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा -
8) मुद्दा क्रमांक 1 व 2 -
मुद्दा क्र. 1 व 2 हे एकमेकांशी निगडीत असल्याने त्यांचे विवेचन एकत्रित करण्यात आले आहे. सामनेवाला यांनी नि.16 वर म्हणणे तसेच नि.22 वर श्री. संतोष शेळके यांचे शपथपत्र दाखल करुन तक्रारदार यांचा ट्रक क्र.MH-10-Z-3978 चे विमा पॉलिसीमध्ये तक्रारदार यांचे विमायोग्य हित (insurable interest) नाहीत. त्यामुळे तक्रारदार यांना प्रस्तुत तक्रार न्यायमंचामध्ये दाखल करण्याचा अधिकार नाही असा युक्तीवाद सामनेवाला करतात. तथापि तक्रारदार यांनी दाखल केलेले नि.6/2 वरील विमा पॉलिसीचे अवलोकन करता तक्रारदार यांची विमा पॉलिसी ही तक्रारदार यांचे नावे असल्याचे दिसून येते. तसेच नि.6/1 वर दाखल आर.सी. बुकचे प्रतचे अवलोकन करता प्रस्तुत ट्रक क्र.MH-10-Z-3978 हा तक्रारदार यांचे नावे असल्याचे दिसून येते. तसेच नि.6/2 वरील विमा पॉलिसी वर सुध्दा प्रस्तुत ट्रक क्र.MH-10-Z-3978 चा उल्लेख तसेच पॉलिसीचा कालावधी दि.03/06/2015 ते दि.02/06/2016 असा दिसून येतो. यावरुन तक्रारदार हे सामनेवाला यांचे 'ग्राहक' असल्याचे स्पष्ट होते, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच येते. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक होत असल्याने सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवेत दिलेल्या त्रुटीबाबत तक्रारदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक सरंक्षण कायदा,1986 प्रमाणे तक्रार अर्ज न्यायमंचात दाखल करण्याचा अधिकार आहे. सबब, प्रस्तुत तक्रार अर्ज मंचात दाखल करण्यास पात्र आहे. त्यामुळे वरील मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर हे न्यायमंच होकारार्थी देते.
9) मुद्दा क्रमांक 3 व 4 -
मुद्दा क्र.3 व 4 हे एकमेकांशी निगडीत असल्याने त्यांचे विवेचन एकत्रित करण्यात आले आहे. सामनेवाला यांच्या म्हणण्यानुसार वादातीत वाहन ट्रक हा तक्रारदार यांनी नोटरी करुन श्री देवरमनी यांना रक्कम रु.12,60,000/- ची पावती करुन दि.07/06/2013 रोजी विकला. त्यामुळे तक्रारदार यांचे वादातीत वाहन ट्रकची विमा पॉलिसी काढतांना सदर ट्रकमध्ये तक्रारदार यांचे विमायोग्य हित नाहीत व नव्हते आणि तक्रारदार यांनी ट्रकची विमा पॉलिसी काढण्यापूर्वी ट्रक विकला ही बाब सामनेवाला यांना कळविली नाही. तसेच विमायोग्य हित (insurable interest) हे विमा पॉलिसीचे महत्त्वाचे तत्व आहे. आणि वाहनाचा विमा काढतांना तसेच वाहनाची चोरी होतांना तक्रारदाराचे विमायोग्य हित असणे गरजेचे आहे परंतू प्रस्तुत केसमध्ये तक्रारदाराचे विमायोग्य हित वाहनाचा विमा काढतांना नाहीत असा सामनेवाला यांचा युक्तीवाद आहे.
10) परंतु सामनेवाला म्हणतात त्याप्रमाणे जर तक्रारदाराने ट्रक श्री.देवरमनींना विकला असेल तर विक्रीचा नोटरी केलेला करारनामा हा रेकॉर्डवर नाही. जरी सदरचा करारनामा तक्रारदाराचे ताब्यात असला तरी सामनेवाला हे तो करारनामा मंचात दाखल करणेसाठी तक्रारदारास 'नोटीस-टू-प्रोडयूस' काढू शकले असते. परंतु ट्रक विक्री कराराचा निर्णायक पुरावा मंचासमोर नाही. तक्रारदार यांनी वाहन श्री.देवरमनी यांना दि.07/06/2013 रोजी विकले असे जरी गृहीत धरले तरी दि.07/06/2013 पासून वाहन चोरीस जाण्याच्या तारखेपर्यंत म्हणजेच दि.14/06/2015 पर्यंत श्री.देवरमनी यांनी वाहन त्यांच्या नावावर करुन घेतलेले नाही, कोणताही खरेदीदार कोणतीही वस्तु खरेदी घेतल्यानंतर ती वस्तु लवकरात लवकर आपल्या नावावर करुन घेण्याचा प्रयत्न करेल. तसेच वाहनासारखी वस्तु विकणारा विक्रेता हा लवकरात लवकर वस्तु खरेदीदाराचे नावावर करुन देईल. जर ट्रक हा पोलीसांनी गुन्हयाच्या कामी जप्त केला असेल आणि तक्रारदार यांना ट्रक मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून सोडवून घेण्यास सांगितले असेल तर तक्रारदार यांनी ट्रक रु.7,00,000/- चे बॉंन्डवर कोर्टातून सोडवून घेतल्यानंतर खरोखरच ट्रक श्री.देवरमनी यांना विकला असेल तर दि.13/06/2015 रोजी स्वतः सोबत घेऊन रत्नागिरीकडे येणार नाही. जर ट्रक श्री.देवरमनीला विकला होता तर ट्रक मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून सोडवल्यानंतर तक्रारदार यांनी तो ट्रक श्री.देवरमनीला दिला असता, स्वतःसोबत रत्नागिरीकडे आणला नसता. त्यामुळे तक्रारदाराने ट्रक श्री.देवरमनीला विकला ही गोष्ट निर्णायकपणे सिध्द होत नाही. वाहन विक्रीच्या व्यवहारासाठी मोटार वाहन अधिनियममध्ये नमूद प्रक्रियेप्रमाणे वाहन एका व्यक्तीचे नावावरुन दुस-या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरीत होते, परंतु प्रस्तुत प्रकरणामध्ये वादातीत वाहन ट्रक हा चोरीला जाईपर्यंत तक्रारदार यांचे नावावर असून मॅजिस्ट्रेट कोर्टानेसुध्दा तक्रारदार यांचा मालकी हक्क पाहूनच रु.7,00,000/- चा बॉन्ड तक्रारदार यांचेकडून घेऊन वादातीत वाहन ट्रक तक्रारदार यांचे ताब्यात दिलेला आहे.
11) सामनेवाला यांचे म्हणण्याप्रमाणे वादातीत वाहन ट्रकची विमा पॉलिसी काढतांना तक्रारदार यांनी सदर वाहन विकले असल्याची माहिती सामनेवाला यांना दिली नाही, परंतु वादातीत वाहन ट्रक हा तक्रारदार यांनी श्री.देवरमनी यांना विकल्याचे निर्णायकपणे सिध्द झालेले नाही. त्यामुळे सामनेवाला यांचा वरील बचाव मान्य करता येत नाही. सामनेवाला यांचे म्हणण्याप्रमाणे ट्रक चोरीस गेल्याची घटना संशयास्पद वाटते. तसेच चोरीच्या घटनेची फिर्याद तक्रारदार यांनी 2 दिवस उशीरा दिली. तथापि ट्रक चोरीची घटना जरी दि.13/06/2015 व दि.14/06/2015 चे रात्री घडली असली तरी तक्रारदार यांने फायनान्स कंपनी, श्री देवरमनी यांचेकडे ट्रकबाबत तपास करुन नंतर तक्रार दिली, हे नि.19 वरील तक्रारदाराचे शपथपत्रावरुन दिसून येते. तसेच दि.15/06/2015 रोजी तक्रारदार यांनी ट्रक चोरीबाबत लेखी तक्रार दिल्याचे नि.6/3 वरुन दिसून येते. त्यामुळे तक्रार 02 दिवस उशीरा दिली हा सामनेवाला यांचा युक्तीवाद मान्य करता येणार नाही. तसेच ट्रक चोरीची फिर्याद तक्रारदार यांनी दि.16/06/2015 रोजी देवरुख पोलीस स्टेशन येथे नोंद केली असल्याचे तसेच सदर गु.र.नंबर 43/2015 च्या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा हा दि.17/06/2015 रोजी केल्याचे नि.6/4 व नि.6/5 वरुन दिसून येते. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेल्या गुन्हयाचा तपास करुन पोलिसांनी सदर गुन्हयाचा 'अ' फायनल पाठविला व न्यायालयाने तो मंजूर केलेचे नि.17 वर तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन दिसून येते. त्यामुळे वादातीत वाहन ट्रक चोरीला गेल्याचे घटनेबाबत सामनेवाला यांनी घेतलेला संशय तर्कहीन वाटतो.
12) तक्रारदार यांनी दि.16/06/2015 रोजी ट्रक चोरीला गेलेल्या घटनेची फिर्याद देवरुख पोलीस स्टेशन येथे दिली. त्यामध्ये श्री.देवरमनी व त्यांचा भाऊ श्री.आसिफ पठाण यांचेवर ट्रक चोरीचा संशय असल्याचे नमूद आहे. यावरुन सामनेवाला हे ट्रक चोरीच्या घटनेबाबत संशय व्यक्त करतात. परंतू पोलीसांनी सदर गु.र.नंबर 43/2015 चा 'अ' फायनल पाठविला व न्यायालयाने तो मंजूर केला. त्यामुळे सामनेवाला यांनी व्यक्त केलेला संशय तथ्यहिन वाटतो. तक्रारदार यांनी वादातीत ट्रक क्र. MH-10-Z-3978 याची विमा पॉलिसी क्र.OG-16-2005-1803-00000137 र.रु.9,00,000/- दि.02/06/2015 रोजी सामनेवाला यांचेकडे दि.03/06/2015 ते 02/06/2016 या मुदतीकरीता काढलेली असल्याचे तसेच सदर पॉलिसीचे प्रिमियमपोटी र.रु.49,151/- सामनेवालाकडे भरल्याचे नि.6/2 वर दाखल विमा पॉलिसीची प्रत यावरुन दिसून येते. तसेच नि.6/1 वर दाखल आर.सी. बुकवरुन वादातीत वाहन ट्रक क्र. MH-10-Z-3978 हा तक्रारदार यांचे नावे असल्याचे दिसून येते. तक्रारदार हे वादातीत वाहन ट्रक दि.13/06/2015 रोजी रत्नागिरीकडे घेऊन जात असतांना वाहन नादुरुस्त झाल्याने आंबाघाटात बाजूला लाऊन व्यवस्थित लॉक करुन निघून गेल्यानंतर सदर वाहन चोरीस गेल्याबाबत तक्रारदार यांनी दि.16/06/2015 रोजी देवरुख पोलीस स्टेशन येथे तक्रार क्र.43/2015 दाखल केली. सदर ट्रक चोरीस गेलेबाबत खबरी जबाब तसेच पंचनाम्याची प्रत तक्रारदार यांनी सामनेवाला यांना घटनेनंतर 9 दिवस उशीरा दिली. तसेच तक्रारदाराने ट्रकची विमा पॉलिसी काढतांना ट्रक अगोदरच विकला होता व सदर बाब तक्रारदाराने सामनेवाला यांना कळविली नाही. केवळ या तांत्रिक बाबीवरुन तक्रारदार यांचा क्लेम नाकारणे ही सामनेवाला एक सेवा पुरवठादार कंपनी म्हणून तक्रारदार यांना दिलेल्या सेवेतील त्रुटी असल्याचे निष्कर्षाप्रत हे मंच येते. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून नुकसान मिळण्यास पात्र असून तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करता येईल या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
13) तक्रारदार यांनी सदर कामी मा. राष्ट्रीय आयोग यांचा 2016(4) ALL MR (JOURNAL)20 हा दाखल केलेला आहे. परंतु प्रस्तुत न्यायनिवाडयातील वस्तुस्थिती या प्रकरणास वस्तुस्थितीशी विसंगत असल्याने त्याचा वापर सदर कामी करता येणार नाही.
14) तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे ट्रक क्र. MH 10-Z 3978 चा दि. 03-06-2015 ते 2-06-2016 मुदतीसाठीचा रक्कम रु. 9,00,000/-(रक्कम रुपये नऊ लाख मात्र)चा विमा पॉलिसी क्र.OG-16-2005-1803-00000137 घेतला होता. त्या विमा पॉलिसीची रक्कम रु.9,00,000/-(रक्कम रुपये नऊ लाख मात्र)ही सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सदर आदेश दि. 08-08-2018 रोजीपासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 6 % व्याजदराने अदा करणे न्यायोचित होईल. तसेच तक्रारदार यांस झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-(रक्कम रुपये दहा हजार मात्र) तसेच तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/-(रक्कम रुपये पाच हजार मात्र) अदा करणे न्यायोचित होईल.
15) मुद्दा क्रमांक- 5 -
सामनेवाला यांनी एक सेवापुरवठादार कंपनी म्हणून आपला ग्राहक तक्रारदार यांचा चोरीस गेलेला ट्रक क्र.MH-10-Z-3978 चा रक्कम रु.9,00,000/-(रक्कम रुपये नऊ लाख मात्र) चा क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्याचे तक्रारदाराने पुराव्यानिशी सिध्द केल्याचे निष्कर्षाप्रत हे न्यायमंच येते. सबब आदेश खालीलप्रमाणे.
- आ दे श -
1) तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.9,00,000/-(रक्कम रुपये नऊ लाख मात्र) सदर आदेश दि. 08-08-2018 रोजीपासून द.सा.द.शे. 6 % व्याजाने पूर्ण परतफेड होईपर्यंत अदा करावी.
3) सामनेवाला यांनी तक्रारदार यांस मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-(रक्कम रुपये दहा हजार मात्र) तसेच तक्रार अर्जापोटी रक्कम रु.5,000/- (रक्कम रुपये पाच हजार मात्र) अदा करावेत.
4) वरील आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी सदरहू आदेश पारीत झालेच्या दिनांकापासून 45 दिवसांचे आत करणेची आहे.
5) सदर आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी वरील मुदतीत न केल्यास तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 प्रमाणे सामनेवाला यांचेविरुध्द दाद मागू शकतील.
6) उभय पक्षकारांना निकालपत्राच्या सत्यप्रती विनामुल्य पुरवाव्यात.