जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 71/2010. तक्रार दाखल दिनांक : 11/02/2010. तक्रार आदेश दिनांक : 20/04/2011. श्री. सिध्देश्वर हरिचंद्र म्हमाणे, वय 34 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. वडाचीवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. चोलामंडलम डी.बी.एस. फायनान्स लि., ‘दारे हाऊस’, पहिला मजला, एन.ओ.2, एन.एस. बोसे रोड, चेन्नई-600 001. (नोटीस व्यवस्थापक यांचेवर बजावण्यात यावी.) 2. चोलामंडलम डी.बी.एस. फायनान्स लि., ‘वेतराण वेरटेक्स’, 83/जे, दुसरा मजला, ऑफीस नं.7, नवल पेट्रोल पंपासमोर, सोलापूर – 413 001. (नोटीस व्यवस्थापक यांचेवर बजावण्यात यावी.) विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : एस.जे. पाटील विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांनी उपजिविका भागविण्यासाठी ‘आयशर’ कंपनीचा माल वाहतूक टेम्पो घेण्याचे ठरविले. टेम्पोची किंमत रु.7,25,775/- असून त्यांनी विरुध्द पक्ष क्र.2 (संक्षिप्त रुपामध्ये ‘चोलामंडलम फायनान्स’) यांच्याकडून रु.6,15,000/- कर्ज घेतले आणि मार्जीन मनी रु.1,10,775/- ‘आयशर’ कंपनीचे डिलर सरल मोटर्स, कोंडी यांना अदा केली आहे. प्रतिमहा रु.16,125/- प्रमाणे 47 हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड करावयाची होती आणि पहिला हप्ता चोलामंडलम फायनान्स यांना देऊन उर्वरीत हत्यांसाठी 46 चेक दिले आहेत. त्यांच्या टेम्पोचा रजि. नं. एम.एच.13/आर.2493 आहे. त्यांनी चोलामंडलम फायनान्स यांच्याकडे 23 हप्ते भरणा केले असून त्यापैकी 17 हप्ते चेकद्वारे व 6 हप्ते रोख भरणा केले आहेत. माहे डिसेंबर 2007 मध्ये त्यांच्या टेम्पोस अपघात होऊन दुरुस्तीकरिता रु.40,000/- खर्च आला आणि दुरुस्तीस एक महिन्याचा कालावधी लागला. त्या आर्थिक अडचणीमुळे तक्रारदार काही हप्ते नियमीत वेळेमध्ये भरु शकले नाहीत. त्यामुळे चोलामंडलम फायनान्स यांनी दि.16/8/2008 रोजी त्यांच्या ताब्यातून बळजबरीने व धाक दाखवून वाहन जप्त केले आहे. तक्रारदार यांनी थकीत हप्ते स्वीकारुन वाहन ताब्यात देण्याची विनंती केली असता पूर्ण कर्जाचे हप्ते भरल्याशिवाय वाहन ताब्यात मिळणार नाही, असे सांगितले. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन त्यांचा टेम्पो चोलामंडलम फायनान्स यांच्याकडून ताब्यात मिळावा आणि त्यांचे व्यवसायिक नुकसान प्रतिमहा रु.20,000/- प्रमाणे मिळावे, अशी विनंती केली आहे. तसेच वाहनाच्या नुकसानीपोटी रु.50,000/- व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- मिळावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे. 2. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 चोलामंडलम फायनान्स यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी व्यापारी हेतुने वाहन खरेदी केल्यामुळे तक्रार चालू शकत नाही. लोन अग्रीमेंटप्रमाणे तक्रारदार यांना पूर्वनोटीस देऊन वाहन ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांनी वाहन ताब्यात घेताना आवश्यक कार्यवाही पूर्ण केली आहे. तक्रारदार यांनी कर्ज हप्ते भरण्यामध्ये कसूर केला आहे. तसेच अग्रीमेंटमधील अर्टिकल 16 प्रमाणे चेन्नई येथे लवादाचे कार्यक्षेत्र असून तक्रारदार मंचासमोर दाखल करता येणार नाही. तक्रारदार हे ग्राहक नसल्यामुळे शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिल्याचे सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांनी टेम्पो खरेदी करण्यासाठी चोलामंडलम फायनान्स यांच्याकडून रु.6,15,000/- कर्ज घेतल्याविषयी विवाद नाही. प्रतिमहा रु.16,125/- प्रमाणे 47 हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड करावयाची आहे, याविषयी विवाद नाही. 5. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी चोलामंडलम फायनान्स यांच्याकडे 23 हप्ते भरणा केले असून माहे डिसेंबर 2007 मध्ये त्यांच्या टेम्पोस अपघात होऊन आर्थिक अडचणीमुळे तक्रारदार काही हप्ते नियमीत वेळेमध्ये भरु शकले नाहीत. त्यांनी पुढे असे नमूद केले आहे की, चोलामंडलम फायनान्स यांनी दि.16/8/2008 रोजी त्यांच्या ताब्यातून बळजबरीने व धाक दाखवून वाहन जप्त केले आहे. उलटपक्षी, चोलामंडलम फायनान्स यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी नियमीत हप्ते न भरल्यामुळे कराराप्रमाणे हप्ते मागणीची नोटीस व पूर्वसूचना देऊन तक्रारदारांचे वाहन जप्त केले आणि त्यांनी वाहन ताब्यात घेताना आवश्यक कार्यवाही पूर्ण केली आहे. 6. तक्रारदार व चोलामंडलम फायनान्स यांच्यामध्ये कर्जविषयक झालेले अग्रीमेंट रेकॉर्डवर दाखल आहे. तक्रारदार यांनी कर्ज हप्ते भरण्यामध्ये कसूर केल्याविषयी विवाद नाही. विरुध्द पक्ष यांनी दि.16/8/2008 रोजी टेम्पो ताब्यात घेतल्याविषयी विवाद नाही. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना वाहनाचे कर्ज हप्ते भरण्याबाबत कळविल्याचे रेकॉर्डवरुन दिसून येते. 7. आमच्या मते, कोणत्याही वित्तीय संस्थेला त्यांच्या कर्जदाराकडून थकीत कर्ज रक्कम वसूल करण्याचा निर्विवाद कायदेशीर हक्क आणि त्याचबरोबर कर्जदाराने कर्जाची परतफेड करण्याचे त्यांचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. 8. निर्विवादपणे, तक्रारदार हे थकीत हप्त्यांचा भरणा करण्यास तयार आहेत. तक्रारदार यांच्या वाहनास अपघात झाल्यामुळेच कर्ज हप्त्यांचा भरणा केलेला नाही, हे स्पष्ट आहे. नैसर्गिक न्यायाचे दृष्टीने तक्रारदार यांनी वाहनाचे थकीत हप्ते भरल्यास विरुध्द पक्ष यांनी टेम्पो परत करावा, या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. तक्रारदार यांनी या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत विरुध्द पक्ष यांच्याकडे कर्जाचे थकीत हप्ते भरणा करावेत. थकीत हप्ते प्राप्त होताच विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या टेम्पो तात्काळ परत करावा. 2. तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा.
(सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/20411)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |