जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. तक्रार दाखल दिनांक : 09/07/2010. तक्रार आदेश दिनांक : 20/04/2011. ग्राहक तक्रार क्र. 399/2010. श्री. संदीप रमेश पंडीत, वय 28 वर्षे, व्यवसाय : डॉक्टर, रा. घर नं.28/172, शांतीप्रेम बिल्डींग, उस्मानाबाद. तक्रारदार विरुध्द 1. चेअरमन, 2. सचिव, 3. मुख्य वैद्यकीय अधिकारी, 4. प्रशासकीय अधिकारी, सर्व रा. एम.एन. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल, दादासाहेब गायकवाड रोड, रेल्वे स्टेशन रोड, सोलापूर – 413 001. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : बी.आर. पवार विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : बी.बी. इनामदार आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष यांच्या संस्थेमध्ये दि.30/1/2007 रोजी House Post in Skin & V.D. (D.V.D.) कोर्सकरिता प्रवेश घेतला आणि कोर्सला सुरुवात केली. तक्रारदार यांनी प्रवेश घेताना विरुध्द पक्ष यांच्याकडे रु.1,00,000/- डिपॉजीट जमा केले आणि पावती क्र.4835 आहे. त्यांनी कोर्स पूर्ण केला आणि त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतर तक्रारदार यांनी डिपॉजीट रक्कम परत मिळण्यासाठी वारंवार विनंती करुनही विरुध्द पक्ष यांनी ती परत करण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन डिपॉजीट रक्कम रु.1,00,000/- व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रास व तक्रारीच्या खर्चापोटी अनुक्रमे रु.5,000/- व रु.1,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची संस्था धर्मादाय तत्वावर रुग्णालय चालविण्याच्या उद्देशाने नोंदलेली आहे. त्यांनी पदव्युत्तर पदविका शिक्षण घेणा-या पात्र उमेदवारांची नेमणूक करतात आणि त्यांच्याकडून फी किंवा मोबदला आकारणी करीत नाहीत. त्याप्रमाणे तक्रारदार यांची नेमणूक करुन प्रशिक्षण कालावधीमध्ये नियम व अटीचे पूर्तता करण्याचे शाश्वतीकरिता रु.1,00,000/- सिक्युरिटी डिपॉजीट स्वीकारण्यात आले आहे. शैक्षणिक कालावधी पूर्ण केल्यानंतर व नियम व अटींची पूर्तता केल्यास सदर डिपॉजीट परत करण्यात येते. शैक्षणिक कालावधी पूर्ण न केल्यास किंवा गैरवर्तन केल्यास सिक्युरिटी डिपॉजीट जप्त करण्याचा त्यांना अधिकार आहे. तक्रारदार यांनी अटी व नियमाप्रमाणे शिक्षण घेतले नाही आणि शैक्षणिक कालावधी पूर्ण केलेला नाही. तसेच त्यांनी गैरवर्तणूक करुन सतत गैरहजर राहिले आहेत. तक्रारदार यांनी अटीचा भंग केलेला आहे आणि सिक्युरिटी डिपॉजीट परत करण्याची त्यांच्यावर जबाबदारी नाही. त्यांनी तक्रारदार यांना सेवा दिलेली नाही आणि तक्रारदार त्यांचे ग्राहक नाहीत. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार सिक्युरिटी डिपॉजीट परत मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना सेवा दिलेली नाही आणि तक्रारदार त्यांचे ग्राहक नसल्याचे नमूद केले आहे. निर्विवादपणे, तक्रारदार यांनी House Post in Skin & V.D. (D.V.D.) कोर्सला शिकाऊ उमदेवार म्हणून प्रवेश मिळविलेला आहे. निर्विवादपणे, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे रु.1,00,000/- डिपॉजीट केले आहेत. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून शैक्षणिक सेवा घेतलेली असल्यामुळे ते ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ‘ग्राहक’ संज्ञेत येतात, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. 5. तक्रारदार यांनी अनुक्रमे House Post in Skin & V.D. (D.V.D.) कोर्सला विरुध्द पक्ष यांच्याकडे प्रवेश घेतला आणि तो कोर्स पूर्ण केल्याविषयी विवाद नाही. विरुध्द पक्ष यांनी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमध्ये असे नमूद आहे की, 8. The selected Doctors for Enrolment/Registration/Subject posts will have to deposit Rs.1,00,000/- (Rs. One Lac Only) as Caution Money (In Cash) with the Hospital immediately on their selection. It will be refunded after the satisfactory completion of the tenure of selected doctors. 9. Full Caution Money will be adjusted against those who are resigning, remaining absent, discontinued for the selected posts for any other reasons and damages of any nature caused by the selected candidates. 6. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांची नेमणूक करताना प्रत्येकी रु.1,00,000/- सिक्युरिटी डिपॉजीट स्वीकारल्याचे मान्य केले आहे. तसेच शैक्षणिक कालावधी पूर्ण केल्यानंतर व नियम व अटींची पूर्तता केल्यास सदर डिपॉजीट परत करण्यात येते, हेही त्यांनी मान्य केले आहे. परंतु शैक्षणिक कालावधी पूर्ण न केल्यास किंवा गैरवर्तन केल्यास सिक्युरिटी डिपॉजीट जप्त करण्याचा त्यांना अधिकार असल्याचे नमूद करुन तक्रारदार यांनी अटी व नियमाप्रमाणे शिक्षण घेतले नाही व शैक्षणिक कालावधी पूर्ण केलेला नाही आणि त्यांनी गैरवर्तणूक करुन सतत गैरहजर राहिल्यामुळे अटीचा भंग असून सिक्युरिटी डिपॉजीट परत करण्याची त्यांच्यावर जबाबदारी नसल्याचे नमूद केले आहे. 7. विरुध्द पक्ष यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केलेल्या आरोपांकरिता तक्रारदार यांच्यावर प्रशिक्षण कालावधीमध्ये कार्यवाही केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदार यांनी शैक्षणिक कालावधी पूर्ण केला नसल्याविषयी, गैरवर्तणूक केल्याविषयी, गैरहजर राहिल्याविषयी व विरुध्द पक्ष यांनी त्यांच्यावर कार्यवाही केल्याविषयी कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल करण्यात आलेला नाही. तक्रारदार यांच्या दोषामुळे त्यांची सिक्युरिटी डिपॉजीट रक्कम जप्त करण्याकरिता विरुध्द पक्ष हक्कदार असल्याचे सिध्द होऊ शकलेले नाही. विरुध्द पक्ष यांनी कोणतेही कारण नसताना सिक्युरिटी डिपॉजीट रक्कम देण्यास नकार देऊन सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे आणि सदर रक्कम व्याजासह मिळविण्यास तक्रारदार हक्कदार आहेत, या मतास आम्ही आलो आहोत. 8. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना रु.1,00,000/- (रुपये एक लक्ष फक्त) तक्रार दाखल दि.9/7/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष यांनी उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी नमूद मुदतीत न केल्यास मुदतीनंतर एकूण देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने अदा करावी. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/13411)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |