(घोषित दि. 02.09.2013 व्दारा श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
सदरची तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदारांचे पती संजय नागोराव तेरकर यांचा दिनांक30.05.2012 रोजी अपघाताने मृत्यू झाला. तक्रारदारांनी सदर घटनेची माहिती, परतूर पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर आरोपी विरुध्द कलम 77/2012 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. नंतर मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. तक्रारदारांचे पती संजय यांचा मोटार सायकल क्रमांक एम.एच.21 ए.एफ. 2161 वर बसून घराकडे जाताना अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्या वाहनाची पॉलीसी गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे काढलेली होती. तिचा कालावधी दिनांक 31.10.2011 ते 30.10.2012 असा होता व त्यात ‘Basic Owner driver P A liability’अंतर्भूत होती. तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर दिनांक 26.07.2012 रोजी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह विमा प्रस्ताव गैरअर्जदार यांचेकडे पाठवला तो त्यांनी अद्याप निकाली काढलेला नाही. तक्रारदारांनी जालना येथील मोटार अपघात न्यायिक प्राधिकरणात देखील दावा दाखल केलेला आहे अद्यापही तो दावा प्रलंबित आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तक्रारदारांचा दावा वेळेवर निकाली न काढून सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब तक्रारदारांची तक्रार मंजूर करण्यात यावी व त्यांना विमा रक्कम रुपये 1,00,000/- 18 टक्के व्याजा सहित मिळावी व शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रुपये 5,000/- इतकी नुकसान भरपाई मिळावी. तक्रारदारांनी तक्रारीसोबत क्लेम फॉर्म, विमा पॉलीसीची प्रत, मृत्यूचा दाखला, घटनास्थळ पंचनामा, फिर्याद, शवविच्छेदन अहवाल, वाहन चालकाचा परवाना, गाडीची नोंदणी कागदपत्रे इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 मंचासमोर हजर झाले त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. गैरअर्जदार क्रमांक 2 नोटीस मिळूनही मंचासमोर हजर झाले नाहीत म्हणून तक्रार त्यांचे विरुध्द एकतर्फा चालवण्यात आली. गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या लेखी जबाबानुसार विमा पॉलीसीत फक्त मालक-चालक (Owner-driver) यांचा वैयक्तिक अपघात अंतर्भूत आहे आणि विमा पॉलीसीनुसार मयत हा मोटार सायकलाचा मालक नव्हता. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार नामंजूर करावी. गैरअर्जदार कंपनीला तक्रारदारांचा विमा प्रस्ताव मिळालेलाच नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांची यात सेवेतील कमतरता नाही. गैरअर्जदार कंपनीकडे प्रस्ताव पोहोचलेलाच नाही त्यामुळे तक्रारदारांची तक्रार Premature आहे त्यामुळे प्रस्तुतची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.आर.व्ही.जाधव व गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे विद्वान वकील श्री.पी.एम.परिहार यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यावरून पुढील गोष्टी स्पष्ट होतात.
- तक्रारदारांचे पती संजय यांचा मृत्यू दिनांक 30.05.2012 रोजी ते मोटार सायकल चालवत असताना अपघाताने झाला.
- सदर मोटार सायकलाचा विमा दिनांक 31.10.2011 ते 30.10.2012 या कालावधीसाठी गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे काढलेला होता. त्यात मालक-चालक (Owner-driver) चा वैयक्तीक अपघाता संबंधीचा विमाही अंतर्भूत होता या दोन्ही बाबी उभयपक्षी मान्य आहेत.
- अपघातग्रस्त वाहन म्हणजे क्रमांक एम.एच.21 ए.एफ – 2161 क्रमांकाची बजाज डिसकव्हर मोटार सायकलची नोंदणीची कागदपत्रे बघता त्यात गाडीचे मालक म्हणून राधेशाम संजय तेरकर यांचे नाव आहे. विमा पॉलीसीवर देखील विमा धारक व्यक्ती म्हणून राधेशाम तेरकर यांचेच नाव आहे.
- विमा पॉलीसीवर Compulsory P A Cover for Owner-Driver Of C S I 1,00,000/- असे नमूद आहे व त्यासाठी 50 रुपये हप्ताही घेतलेला आहे. परंतू प्रस्तुतच्या घटनेत मोटार सायकल विमा धारकाचे वडील संजय तेरकर हे चालवत होते. मोटार सायकल संजय यांच्या मालकीची नव्हती तसेच विमा पॉलीसी देखील त्यांच्या नावाने काढलेली नाही. त्यामुळे मोटार अपघात कायद्या प्रमाणे मालक-चालक (Owner-driver) या संज्ञेत मयत संजय येवू शकत नाहीत असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन संजय तेरकर हे अपघाताचे वेळी गाडी चालवत असले तरी ते गाडीचे मालक नव्हते व प्रस्तुतच्या विमा पॉलीसी अंतर्गत त्यांना विमा संरक्षण दिलेले नव्हते. त्यामुळे त्यांच्या मृत्यू बद्दलच्या नुकसान भरपाई पोटी विमा रक्कम रुपये 1,00,000/- मिळण्यास तक्रारदार पात्र नाही असा निष्कर्ष मंच काढत आहे.
सबब मंच खालील आदेश पारीत करत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चा बाबत आदेश नाही.