जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 122/2010.
तक्रार दाखल दिनांक :11/03/2010.
तक्रार आदेश दिनांक : 29/10/2012.
निकाल कालावधी: 02 वर्षे 07 महिने 18 दिवस
सौ. स्नेहा अमर ढेरे, वय 44 वर्षे, व्यवसाय : व्यापार,
रा. द्वारा : श्री. जाधव, 106/बी, संतोष नगर,
शांती इंग्लिश मिडियम स्कूलजवळ, सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
1. मे. बाबा बिल्डर्स अन्ड डेव्हलपर्स, 631, शुक्रवार पेठ,
सोलापूर – 413 002. भागीधंद्याचे भागीदार :-
2. श्री. सिध्देश्वर भिमाशंकर तमशेट्टी, दाव्यानंतर मयत -
मे 2006, वारसदार :-
1) श्रीमती रेवती सिध्देश्वर तमशेट्टी, वय 39 वर्षे,
व्यवसाय : घरकाम.
2) श्री. भिमाशंकर सिध्देश्वर तमशेट्टी,
वय 21 वर्षे, व्यवसाय : व्यापार.
3) कु. श्रध्दा सिध्देश्वर तमशेट्टी,
वय 15 वर्षे, व्यवसाय : शिक्षण.
4) कु. संकेत सिध्देश्वर तमशेट्टी,
वय 11 वर्षे, व्यवसाय : शिक्षण.
5) कु. क्षमा सिध्देश्वर तमशेट्टी,
वय 10 वर्षे, व्यवसाय : शिक्षण.
6) सौ. सरिता नितीन आगाशे,
वय 25 वर्षे, व्यवसाय : घरकाम,
रा. श्रेयस पार्क, होटगी रोड, सोलापूर.
3. श्री. मल्लीकार्जून इरण्णा आकळवाडी, वय 42 वर्षे,
व्यवसाय : व्यापार, रा. 1, मधूबन अपार्टमेंट,
विजापूर रोड, सोलापूर. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- सौ. शशिकला श. पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदारयांचेतर्फेविधिज्ञ: द.गो. माणकेश्वर
विरुध्दपक्षक्र.3 यांचेतर्फेविधिज्ञ: व्ही.सी. पाटील
विरुध्द पक्ष क्र. 1, 2, 3, 5 व 6 यांचेतर्फे विधिज्ञ : आर.एम. मणुरे
निकालपत्र
सौ. शशिकला श. पाटील, अध्यक्ष(अतिरिक्त कार्यभार)यांचे द्वारा :-
1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांचेकडून शहर सोलापूर येथील नवीन हद्दवाढ विभागातील नेहरुनगर परिसरातील स.नं.370/ए/2/एफ या भुखंडावरील ‘मधूबन अपार्टमेंट’ निवासी संकुलातील इमारत नं. 1-अ मधील तिस-या मजल्यावरील सदनिका क्र.12 ही दि.18/2/2003 रोजीच्या रजिस्टर्ड खरेदीखत दस्ताने खरेदी केलेली आहे. त्या दस्तापूर्वी दि.29/11/2003 रोजी सदर सदनिकेच्या व्यवहाराचा साठेखताचा दस्त रजिस्टर्ड दस्ताने नोंदण्यात आलेला होता. तत्पूर्वी त्या सदनिकेचा व्यवहार विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी श्री. पंडीत मलकारी काळे यांचेशी केलेला होता. परंतु खरेदी व्यवहार पूर्ण न झाल्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी श्री. काळे यांचेकडून स्वीकारलेली रक्कम परत करावयाची होती. तक्रारदार यांनी दिलेल्या रु.17,000/- व 30,000/- च्या धनादेशापैकी विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 साठी श्री. काळे यांनी रु.17,000/- चा धनादेश वटविलेला आहे. तसेच श्री. काळे यांचे नांवे असलेले वीज मीटर तक्रारदार यांचे नांवे हस्तांतरण करण्यासाठी विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 व श्री. काळे यांच्यातील बोलणीप्रमोण तक्रारदार यांनी रु.4,500/- चा धनादेश श्री. काळे यांचे नांवे दिला असून रक्कम त्यांना पोहोच झाली आहे. तसेच श्री. काळे यांनी सदनिकेच्या हस्तांतरणापूर्वी वापरलेल्या विजेचे बिलाची रक्कम वीज मंडळाकडे भरावयाची होती आणि ती बाब विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांच्यासह श्री. काळे यांना मान्य होती. वीज बिलाची रक्कम वजावट रु.30,000/- च्या चेकच्या रकमेतून करावयाची व बाकी रकमेचा चेक तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांना द्यावयाचे याबाबत झालेल्या वाटाघाटीमध्ये निश्चित झाले होते. त्या बाकी रकमेचा चेक देतेवेळी पूर्वी दिलेली रक्कम रु.30,000/- चा चेक विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना परत करावयाचा होता. दि.18/2/2003 रोजी तक्रारदार यांना सदनिका क्र.12 चा ताबा खरेदीखताने मिळाला आहे. त्यावेळेपावतो वीज बिलाची रक्कम रु.1,910/- चे बील तक्रारदार यांना मिळाले आणि दि.10/3/2003 रोजी त्याचा भरणा केला आहे. श्री. काळे यांनी वीज मीटर हस्तांतरणाबाबतचा व्यवहारामध्ये पूर्तता करणे अपेक्षीत असताना ते काम केले नाही. तसेच सदनिका क्र.12 मध्ये वीज पुरवठयासाठी घेतलेल्या वीज मीटरचा वापर हा अन्य सदनिकाधानकांकरिता केला असल्याची तक्रारदार यांना नंतर माहिती मिळाली. तक्रारदार यांनी सदनिका क्र.12 ची ठरलेली किंमत रु.3,17,000/- ची पूर्तता केलेली आहे. परंतु केलेल्या बांधकामामध्ये ब-याच गोष्टींचा अभाव होता. बेसीन, फरशी, टाईल्स चे काम पूर्ण नव्हते. साठेखतामध्ये ठरल्याप्रमाणे जादा बाबींचा खर्च रु.18,500/- तक्रारदार यांनी अदा केला आहे. त्याप्रमाणे ठरलेली कामे विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी पूर्ण केली नाहीत. खरेदीखतानंतर प्रत्यक्ष राहण्यास जाण्यापूर्वी ठरलेल्या कामापैकी काही कामे तातडीने करावी लागली असून त्याकरिता रु.26,000/- चा खर्च आला. सदनिकेच्या चारही बाजुच्या भिंतींना तडे गेले असून पावसाचे पाणी मुरुन भिंती ओल्या होतात. रंगकाम खराब झाले आहे. दरवाजे प्लायवूड पॅनेलचे असून वाळवी लागल्यामुळे पोखरले आहेत. संडास-बाथरुमच्या वर पोटमाळा केलेला नाही आणि उलट टप्पा ठेवल्यामुळे उंची कमी झाली आहे. इमारतीला पाणी पुरवठयासाठी बांधलेल्या टाकीस गळती निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा असंतुलीत होतो. तळमजल्यावर छतावरील पाणी पडून चिखल होतो. मधुबन अपार्टमेंटच्या दोन इमारतीपैकी इमारत क्र.2 मध्ये दोन्ही इमारतीसाठीचे स्वतंत्र वीज मीटर एकाच जागी बसविलेले आहेत. त्याच्या वापराचे नियंत्रणावरुन व वीज वापरसंबंधाने सदनिकाधारकांमध्ये वारवार तक्रारी होत असल्यामुळे दोन्ही इमारतींचे स्वतंत्र वीज मीटर त्या-त्या इमारतीमध्ये बदलून बसविणे गरजेचे आहे. इमारतीच्या तळमजल्यावरील पश्चिमेकडील बाजूस पिण्याच्या पाण्यासाठी वेगळा हौद बांधून दिलेला नाही. मधुबन अपार्टमेंटच्या दोन्ही इमारतीसाठी घेण्यात आलेल्या बोअरची मोटार जुनी बसविली असल्यामुळे दुरुस्ती व देखभाल खर्च करावा लागत आहे. इमारतीच्या तळमजल्यावरील पार्कींगच्या जागेमध्ये बेकायदेशीर बांधकाम करुन गैरवापर करण्यात येत आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत क्रार दाखल करुन सदनिकेच्या अपूर्ण कामांसह इमारतीबाबत समाईक सोईंच्या बाबतीत तात्काळ पूर्तता करुन मिळावी आणि रु.11,410/- व्याजासह मिळण्यासह मानसिक त्रासापोटी रु.30,000/- विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांचेकडून मिळावेत, अशी विनंती केलेली आहे.
2. विरुध्द पक्ष क्र. 2 यांचे वारस विरुध्द पक्ष क्र. 1 ते 5 यांचेतर्फे अभिलेखावर लेखी म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांचे कथनाप्रमाणे कायद्याने मयत व्यक्तीविरुध्द तक्रार दाखल करणे बेकायदेशीर आहे. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारदार यांच्याशी केलेल्या कराराविषयी त्यांना माहिती नाही. तक्रारदार यांच्याशी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या वारससांची कोणत्याही प्रकारची लेखी किंवा तोंडी करार अस्तित्वात नसताना तक्रारदार हे वारसदारांविरुध्द तक्रार दाखल करुन नुकसान भरपाई मागू शकत नाहीत. तक्रारदार यांनी मंचामध्ये तक्रार क्र.260/2004 दाखल केली होती आणि दि.30/12/2009 रोजी फेटाळल्यामुळे प्रस्तुत तक्रार रद्द होण्यास पात्र आहे. तक्रार मुदतीच्या आत दाखल केलेली नाही. शेवटी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे.
3. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी अभिलेखावर दि.30/10/2010 रोजी लेखी म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांचे कथनाप्रमाणे तक्रारदार यांना दि.18/2/2003 रोजी सदनिकेचा ताबा दिला असल्यामुळे तक्रार मुदतबाह्य आहे. तक्रारदार यांनी श्री. पंडीत मलकारी काळे यांना खरेदीखताच्या किंमतीतून विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 च्या वतीने वजावट देण्यात आलेल्या वजावट आलेल्या रक्कम रु.30,000/- चा धनादेश तक्रारदार यांनी न वटविल्यामुळे चेकची रक्कम पंडीत मलकारी काळे यांना मिळाली नाही. त्यामुळे पंडीत मलकारी काळे यांनी तक्रारदार यांचेविरुध्द सदर रकमेच्या वसुलीकरिता रे.मु.नं.61/2005 दाखल केला आणि तो दि.31/3/2007 रोजी निर्णयीत होऊन खर्चासह मंजूर झाला आहे. त्याची दरखास्त क्र.220/2007 प्रलंबीत आहे. तक्रारदार यांनी तक्रारीमध्ये उपस्थित केलेले विवाद नाकारलेले असून शेवटी तक्रार खर्चासह नामंजूर करण्याची विनंती केली आहे.
3. तक्रारदार यांनी दाखल केलेला तक्रार-अर्ज, विरुध्द पक्ष यांची कैफियत, दोन्ही पक्षांनी दाखल कागदपत्रे, प्रतिज्ञालेख, लेखी युक्तिवाद यांचे सुक्ष्मरित्या पडताळणी व अवलोकन केले असता पुढील मुद्दे उपस्थित झाले व कारणमिमांसा देऊन पुढील आदेश पारीत करण्यात आले.
3.1) उभय पक्षकार यांचेमध्ये अर्जात नमूद केलेल्या फ्लॅटबाबत खरेदीखत दि.18/2/2003 रोजी खरेदीखताचा करार दि.15/11/2002 रोजी रजिस्टर दस्ताने दुय्यम निबंधक, सोलापूर (उत्तर-1) यांचेसमोर झालेला आहे. सदर खरेदीखत पूर्ण झालेनंतर त्वरीत ताबा दि.18/2/2003 रोजीच तक्रारदार यांना मिळालेला आहे. दाखल दस्तावरुन सर्व व्यवहार हा विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचेमार्फत मे. बाबा बिल्डर्स अन्ड डेव्हलपर्स व त्यांचे भागीदार यांचे माध्यमातून झालेला होता व आहे, हे तक्रारकर्ता यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन स्पष्टपणे कागदोपत्री पुरावा म्हणून सबळ पुराव्याने सिध्द होते व झालेले आहे.
3.2) तथापि तक्रारदार यांचे तक्रार-अर्जातील नमूद मजकूर व कथनाची दखल घेतली असता श्री. काळे यांनी वीज मीटर हस्तांतरणाबाबतचा व्यवहार पूर्ण करणेचे अपेक्षीत असताना ते काम पूर्ण केले नाही व सदनिका 12 मध्ये वीज पुरवठयासाठी घेतलेले वीज मीटर हे अन्य सदनिकाधारकांनी वापर केला असल्याचे माहीत झाले. तसेच अर्जात नमूद केलेल्या बांधकामाच्या त्रुटी, अभाव होतो. साठेखताप्रमाणे सर्व रक्कम अदा करुनही विरुध्द पक्ष यांनी बांधकाम पूर्ण केले नाही. म्हणून स्वत: काही त्रुटीची पूर्तता करुन घेतल्याने रु.20,000/- व रु.11,410/- खर्च करुन पूर्तता करुन घेतली. ती रक्कम परत मिळावी व अद्यापही समाईक सुविधा न दिल्याने त्या त्वरीत द्याव्यात, अशी मागणी केली आहे. त्याकरिता सदर तक्रार-अर्ज तक्रारदार यांनी मंचात दि.11/3/2010 रोजी दाखल केलेला आहे. म्हणून मुदतीच्या बाध्याबाबत प्राथमिक मुद्दा उपस्थित होते की तक्रारदार यांनी सदर फ्लॅटची खरेदी दि.18/2/2003 रोजी केली. ताबा त्वरीत तेव्हापासून घेतलेला आहे. त्यामुळे खरेदी व ताबा घेतलेपासून 2 वर्षाचे आत ग्राहक मंचात तक्रारदार यांनी तक्रार-अर्ज दाखल करणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तिक होते. पण तसे न केल्याने सदर तक्रार-अर्ज ‘मुदतबाह्य’ झालेला आहे. तक्रारदार यांनीही ही बाब मंचासमोर दावा दाखल करताना आणणे व विलंबमाफीचा अर्ज दाखल करुन त्यासह तक्रार-अर्ज दाखल करणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तिक होते. पण तसे केले नाही. तक्रार दाखल करण्यास कोणते कारण, केव्हा, कसे व का घडले याबाबतही मुदतीचा बाधा कायदेशीरदृष्टया आड येत असल्याने सदर तक्रार-अर्ज याच मुद्यावर नामंजूर होण्यास पात्र आहे. म्हणून तशी दखल घेणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तिक आहे.
3.3) काळे कोण होते. त्यांनी त्याचे वीज मीटरचे देयक भरले नाही. कथने मजकूर सिध्द केलेला नाही व आवश्यक पक्षकार म्हणून पार्टी केलेले नाही. म्हणून त्या मुद्याची दखल घेता येणार नाही. विरुध्द पक्ष क्र.2 श्री. सिध्देश्वर भिमाशंकर तमशेट्टी हे मयत केव्हा झाले, याबाबत सविस्तर माहिती मंचासमोर आणलेले नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 2.1 ते 5 हे वारस अभिलेखावर घेण्याचा हक्क व अधिकार तक्रारदार यांना तक्रार-अर्जात पोहोचतो किंवा नाही, या मुद्याची दखल घेण्यास, अवलोकन व पडताळणी करण्यास योग्य ते कागदपत्रेच न मिळालेने अथवा मंचाचे अभिलेखावर दाखल नसल्याने हा मुद्दा अमान्य करणेत आलेला आहे. विरुध्द पक्ष यांनीही हरकत मुद्दा लेखी जबाबामध्ये उपस्थित केलेला असल्यामुळे त्या मुद्याची दखल घेणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तिक होते व आहे. म्हणून तशी दखल घेतली आहे. तथापि तक्रारकर्ता यांचेकडून मोठी रक्कम स्वीकारुन फायदा करुन घेतलेला आहे व त्या पैशाचा वापर कुटुंबाकरिता केलेला आहे. श्री. काळे व तक्रारदार यांचेत सुरु असलेले दिवाणी दावे, वसुली अर्ज हे मंचासमोर दाखल नसल्याने मंच त्यात ढवळाढवळ करु शकत नाही. तथापि दि.18/2/2003 रोजीचे खरेदीखताप्रमाणे सर्व सुखसोई उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी विरुध्द पक्ष यांचीच होती व आहे. 2003 पासून आजतागायत पूर्ण न केल्याने ठरलेली रक्कम स्वीकारुन कामाची पूर्तता करुन न देणे ही फसवणूक, लुबाडणूक केली आहे. सेवेतील त्रुटी आहे. म्हणून केले आदेश.
आदेश
1. तक्रारदार यांचा अर्ज अंशत: मंजूर करण्यात आला आहे.
2. विरुध्द पक्ष यांनी एकत्रात, वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना खरेदी दिलेल्या सदनिका नं.12 मधील त्रुटींची पूर्तता त्वरीत स्वखर्चाने करुन द्यावी.
3. समाईक सुविधेची अपूर्ण कामे पूर्ण करुन देणे.
अर्जातील परिच्छेद नं.10 मधील अनुक्रम नं. अ, ब, क प्रमाणे स्वंयपाकगृहात ग्रॅनाईटचा ओटा करणे.
ग्राहक तक्रार क्रमांक : 122/2010 आदेश पुढे चालू...
4. ड, फ, ग, ह ही कामे करुन देणे किंवा उभयतांनी करुन त्या कामाची रक्कम ठरवून विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना देण्याची आहे.
5. विरुध्द पक्ष यांनी उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत करावी.
6. उभय पक्षकारांना आदेशाची सही-शिक्क्याची प्रत नि:शुल्क द्यावी.
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (सौ. शशिकला श. पाटील÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/पुलि/291012)