जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 84/2010. तक्रार दाखल दिनांक : 02/03/2010. तक्रार आदेश दिनांक :30/03/2011. कमल बाजीराव पवार, वय 70 वर्षे, व्यवसाय : सेवानिवृत्त, रा. रुम नं. 10, काळी मस्जिदजवळ, सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. सहायक आयुक्त, भविष्य निर्वाह निधी कार्यालय, सोलापूर. 2. यशवंत सहकारी सुत मील अवसायक जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, प्रशासकीय इमारत, सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : व्ही.व्ही. कुर्ले विरुध्द पक्ष क्र.1 यांचेतर्फे अभियोक्ता : एस.एस. कालेकर आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्या विरुध्द पक्ष क्र.2 यशवंत सहकारी सुत मिलमध्ये दि.1/1/1978 पासून नोकरीत होत्या आणि दि.2/6/1994 रोजी कामावर असताना त्यांना अपघात झाला. अपंगत्व आलेले असतानाही त्या नोकरीत होत्या आणि वयोमानानुसार सेवानिवृत्त होण्यापूर्वीच दि.26/5/1996 रोजी त्यांना कामावरुन कमी करण्यात आले. नोकरीवरुन कमी करताना त्यांना रु.3,000/- वेतन मिळत असे. कामावरुन कमी केल्यामुळे त्यांनी कामगार न्यायालयामध्ये दाद मागितली आणि त्यांच्या हक्कामध्ये निकाल पारीत करण्यात आले. सन 1995 ते 96 कालावधीमध्ये त्यांचा जमा प्रॉव्हीडंट फंड रु.17,986/- त्यांच्या खाते क्र.एम.एच./12644/2133 मध्ये जमा होती आणि ती रक्कम त्यांना सन 2001 मध्ये प्राप्त झाली. त्यानंतर तक्रारदार यांना रु.70,000/- येणेबाकी आहेत. त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे वारंवार मागणी करुनही प्रॉव्हीडंट फंडाची रक्कम अदा केली नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष यांच्याकडून प्रॉव्हीडंट फंडाची रक्कम रु.70,000/- त्यावरील व्याजासह असे एकूण रु.1,96,000/-, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रार खर्च रु.2,000/- मिळावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. 2. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल करुन तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांचा क्लेम सन 2001-02 मध्ये दि.29/11/2001 रोजी सेटल करुन रु.67,431/- मंजूर करण्यात आले आणि चेक नं.496127, दि.3/12/2001 पाठविण्यात आला. तक्रारदार यांच्या तक्रारीस कारण घडलेले नाही आणि तक्रार खर्चासह रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे. 3. विरुध्द पक्ष क्र.2 हे मंचासमोर हजर झाले. त्यांना उचित संधी देऊनही त्यांनी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द कैफियतीशिवाय तक्रार चालविण्याचा आदेश करण्यात आला. 4. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिल्याचे सिध्द होते काय ? नाही. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 5. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार या यशवंत सहकारी सुत मिलमध्ये नोकरीत होत्या आणि त्या भविष्य निर्वाह निधीच्या सभासद असल्याविषयी विवाद नाही. प्रामुख्याने, सन 1995 ते 96 कालावधीमध्ये त्यांच्या खाते क्र.एम.एच./12644/2133 मध्ये जमा रक्कम रु.17,986/- त्यांना सन 2001 मध्ये प्राप्त झाली असून उर्वरीत रु.70,000/- तक्रारदार यांना व्याजासह येणेबाकी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांचा क्लेम सन 2001-02 मध्ये दि.29/11/2001 रोजी सेटल करुन रु.67,431/- मंजूर करण्यात आले आणि चेक नं.496127, दि.3/12/2001 पाठविण्यात आल्याचे नमूद केले आहे. 6. तक्रारदार यांना रु.67,431/- सन 2001 मध्ये प्राप्त झाल्याविषयी विवाद नाही आणि त्याप्रमाणे कागदपत्रे मंचासमोर दाखल आहेत. तक्रारदार यांनी सन 1995-96 वार्षिक विवरणपत्र दाखल आहे. त्यावेळी एम्प्लॉयरचे रु.17,789/- व एम्प्लॉईचे रु.17,789/- जमा असल्याचे निदर्शनास येते. तक्रारदार यांना कामावरुन कमी करताना त्यापेक्षा जास्त रक्कम किंवा तक्रारदार यांनी तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये रक्कम जमा असल्याचे कागदोपत्री सिध्द करण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीत, विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही आणि तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. 7. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्यात येते. 2. तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/30311)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |